वारकरी शिक्षण संस्था आळंदी : कीर्तनकारांचे विद्यापीठ!
महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिल्या वारकरी शिक्षण संस्थेची गुढी 24 मार्च 1917 रोजी (चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) शके 1839) आळंदी येथे उभारली गेली. महाराष्ट्र धर्माचे अनौपचारिक विद्यापीठ त्या संस्थेच्या द्वारे निर्माण झाले. त्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले ते वै. गुरुवर्य जोग महाराज! त्यांचेच प्रयत्न त्या पीठाच्या स्थापनेमागे होते. घटनेला 2017 च्या गुढीपाडव्याला एक शतक पूर्ण झाले. संस्थेचा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहाने वर्षभर महाराष्ट्रात साजरा झाला. आता ती संस्था म्हणजे जोगमहाराज यांचे स्मृतीस्मारकच होऊन गेली आहे. या शतकाच्या वाटचालीत संस्थेने हिंदू संस्कृतीचे, वारकरी पंथाच्या तत्त्वज्ञानाचे जागरण तर केलेच; त्याबरोबर महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्रपण’ जपले. बुद्धिमत्ता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सुसंस्कारित समाज व सामाजिक निकोपता यांसाठी संस्थेने कार्य केले. वारकरी शिक्षण संस्थेचे अभूतपूर्व असे योगदान महाराष्ट्रात कीर्तनकारांची, कीर्तन-प्रवचन-भजनादी भक्तिपर्वाची आणि प्रबोधन परंपरेची कक्षा रुंदावण्यात आहे. वारकरी संस्थेने ग्रामीण भागातील व विशेषतः बहुजन समाजातील तरुणांना या भक्तिप्रवाहांमध्ये आणून महाराष्ट्रात हरिभक्तीची आणि कीर्तनकारांची मांदियाळी निर्माण केली.
वारकरी पंथाचे तत्त्वज्ञान, तत्संबंधी अभ्यास, विविध वाद्यांचा अभ्यास, मृदंगवादन, गायन-कीर्तन-प्रवचन यांबाबतचे शास्त्रीय अध्ययन यांसाठी पद्धतशीर व संघटित अशी सोय गरजेची होती. वारकरी पंथास रीतसर अध्ययन केंद्र देखील नव्हते. तशी तजवीज असावी अशी मनीषा मारुतीबुवा ठोंबरे, बंकटस्वामी, मारुतीबुवा गुरव, लक्ष्मणबुवा इगतपुरीकर इत्यादी साधकांना झाली. त्यांनी वारकरी पंथाच्या अध्ययन शाळेचे स्वप्न पाहिले. त्यांचे विचार जोग महाराजांच्या पुढाकाराने फलद्रूप झाले. त्या विषयासाठी पहिली सभा (बैठक) 19 मार्च 1917 रोजी झाली. तेथे सखोल विचारमंथन घडून आले. त्याच सभेत संस्थेची ध्येयधोरणे ठरवण्यात आली. त्यातील मुख्य उद्देश म्हणजे ‘वारकरी संतांच्या वाङ्मयात ज्ञानेश्वरी, अमृतानुभव ,तुकोबांची गाथा आदी ग्रंथ आहेत. त्यांतील तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून वारकरी पंथास व त्याद्वारा महाराष्ट्र धर्मास चालना देणारे प्रचारक निर्माण करणे हा होय.’ ही उद्दिष्ट्ये डोळ्यांसमोर ठेवून वारकरी पंथाच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्याच्या उदात्त हेतूने या संस्थेची उभारणी करण्यात आली. संस्थेचे पहिले संस्थापक अध्यक्ष झाले ते विष्णू महाराज जोग! सहा विद्यार्थ्यांचा पहिला वर्ग मामासाहेब दांडेकर यांनी घेतला. त्यानंतर निष्ठावंत गुरुवर्यांची परंपरा संस्थेला लाभली आहे. या संस्थेच्या तिसऱ्या वार्षिक अहवालातील पुढील अवतरण मुद्दाम उद्धृत करावेसे वाटते. “आम्ही या धार्मिक शिक्षणात हल्लीच्या काळात योग्य असा फरकही केला आहे. धार्मिक शिक्षणाबरोबर व्यावहारिक व औद्योगिक शिक्षण देण्याची व्यवस्था येथे केलेली आहे. आम्हास धर्माचे नाव करून देशास लुटणारे नामधारी संत निर्माण करायचे नाहीत. आमची इच्छा स्वकष्टाने स्वत:चे कुटुंब पोसून आपल्या देशाची, आपल्या समाजाची व धर्माची सेवा करण्यात अंग झिजवणारे लोक तयार व्हावे अशी आहे... बहुजन समाजास एका विशिष्ट तऱ्हेने वळण लावण्याचा अल्प प्रयत्न आम्हास करणे आहे.” या शतकभरात महाराष्ट्राच्या गावोगावात या कीर्तनशाळेत तयार झालेले कीर्तनकार नामभक्तीचा आणि विठुमाऊलीचा गजर अखंडपणे करत आहेत. संत नामदेवांनी ‘नाचू कीर्तनाचे रंगी | ज्ञानदीप लावू जगी’ ही प्रतिज्ञा करून वारकरी पंथाच्या तत्त्वज्ञानाचा महाराष्ट्राबाहेरही प्रचार केला. त्यांची ती उक्ती संस्थेच्या माध्यमातून सार्थ झाली आहे. कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय संस्था चालवली जाते. तेथे सर्व विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण दिले जाते. तेथील गुरुजनही सेवाभावी वृत्तीने ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. आचार संपन्नता व विचार सामर्थ्य यांची भक्कम बैठक संस्थेला लाभली आहे.
स्वातंत्र्याची रणधुमाळी चालू असताना देवाच्या आळंदीत वारकरी पंथाच्या लोकोत्तर व सुसंस्कारित समाजाच्या निर्मितीचा वारसा पुढे नेणाऱ्या संस्थेची उभारणी होत होती. लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या ‘केसरी’मध्ये अग्रलेख लिहून संस्थेच्या राष्ट्रीय कार्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी गुरुवर्य जोग महाराज यांचा गौरवही केला आहे.
संस्थेने भक्ती अवकाशात तेजस्वीपणे तळपणारे अनेक चमकते तारे या महाराष्ट्राला दिले. संस्थेने महाराष्ट्राच्या पावन भूमीत भजनकीर्तनाचा व पारमार्थिक आनंदाचा सुकाळू केला. भीमसिंह महाराज, दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज पवार, रामकृष्ण महाराज लहवितकर, रामराव महाराज ढोक, शिवाजी महाराज देशमुख (नेवासा संस्थान) ही वानगीदाखल काही नावे. विस्तारभयास्तव सर्वांचा नामोल्लेख करता येणार नाही पण या काही नावांवर नजर टाकली तरी या संस्थेच्या श्रीमंतीचा समृद्ध पैस लक्षात यावा... कोणत्याही संस्थेचा लौकिक त्यांच्या भौतिक संपन्नतेत नसतो, आर्थिक समृद्धतेत नसतो तर तो त्या संस्थेच्या आचारशीलतेत व विचारशिलतेत असतो. नीति आणि गति यांच्यातील सुरम्य योग तेथे असतो. त्याचे प्रतिक म्हणजे ही संस्था! विचारांची आणि आचारांची श्रीमंतीच व्यक्ती आणि समाजाला मोठी करत असते ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले’ असे जगद्गुरू तुकारामांनी म्हटलेले आहे. त्याच धर्तीवर या पंथाच्या या विचारपीठाने समृद्धपणे शतकभरारी घेतली आहे. संस्था स्थापन झाल्यावर या संस्थेचे आद्य गुरुवर्य जोग महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अनुक्रमे गुरुवर्य बंकटस्वामी, मारुती महाराज गुरव, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर आणि मामासाहेब दांडेकर यांनी ज्ञानदानाचे कार्य करून एक महान भगवत भक्त शिष्यांची मांदियाळी निर्माण केली त्या गुरुवर्यांचा आदर्श समोर ठेवून पुढे त्या संस्थेची धुरा सर्व गुरुवर्य ह.भ.प.विठ्ठल महाराज, चौधरी, ह.भ.प.विठ्ठल महाराज घुले, ह.भ.प.मधुकर महाराज शिंपी, ह.भ.प.रामचंद्र बाबा निकम, ह.भ.प.पांडुरंग महाराज वैद्य, ह.भ.प.मारुती महाराज कुऱ्हेकर यांनी समर्थपणे पेलली!
संस्थेच्या प्रेरणेतून अनेक पारमार्थिक संस्थाही उभ्या राहिल्या आहेत. उदाहरणार्थ, संगमनेरमध्ये गेल्या बारा वर्षांपासून ‘वारकरी शिक्षण संस्थे’चे विद्यार्थी सखाराम महाराज तांगडे हे ‘संदीपान गुरुकुल आश्रम’ या संस्थेच्या माध्यमातून आळंदी येथील संस्थेचा वारसा त्यांच्या गुरूंच्या, संस्थेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी चालवत आहेत. सहासष्ट विद्यार्थी तेथे अध्ययन करत आहेत. तसे उपक्रम महाराष्ट्रभर आद्य वारकरी संस्थेच्या प्रेरणेतून चालू आहेत.
- अशोक लिंबेकर ,9822104873, Ashlimbekar99@gmail.com
लेखी अभिप्राय
उपयुक्त माहिती असलेला लेख
मला शिक्षण घ्यायचे आहे.
Mazya aajobanche chulte banybapu khod hari bhakt parayan hote. tyanchya vishi far mahiti nahi. tyanchi mahiti kothe samju shakel? 9850207001
Add new comment