गावगाडा - यंत्रयुगापूर्वीची ग्रामरचना

प्रतिनिधी 25/01/2019

‘गावगाडा’ हा ग्रंथ 1915 साली प्रसिद्ध झाला. त्याची शताब्दी साजरी होऊन गेली. तो त्रिंबक नारायण आत्रे यांनी लिहिला. ते मामलेदार होते. त्यांनी खेडेगावांच्या स्थितीचा अभ्यास केला होता. यंत्रयुग येण्याआधी ग्रामरचना कशी होती, ते समजून घेण्यासाठी ‘गावगाडा’ उपयुक्त आहे. जातिभेदाच्या चक्रव्युहात अडकलेला समाज त्यात दिसतो. गावाची रचना, ‘पांढरी’ म्हणजे रहिवासाची भूमी आणि ‘काळी’ म्हणजे शेतजमीन अशा संज्ञा ग्रंथात येतात. तसेच, लोकवस्तीचे दोन भाग ‘कुणबी’ आणि ‘अडाणी’ असे शेतकरी करतात. ‘कुणबी’ हा शेतकरी आणि ‘अडाणी’ हा बिगरशेतकरी. बलुतेदारी कशी आहे त्याचे त्यात चित्रण आहे. देशात राजकीय उलथापालथी झाल्या, पण ग्रामीण उत्पादन व्यवस्था आणि बलुतेदारी, शेती यांची रचना मात्र तशीच राहिली.

सदानंद मोरे यांनी पुस्तकाबद्दल लिहिले आहे, “धर्म-संप्रदायाच्या नावाने, शेतकऱ्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यांना लुबाडणाऱ्या फिरस्त्या भिक्षुकांची आत्रे यांना चीड आहे. त्यांची संभावना ते ‘आयतखाऊ’ अशी करतात. त्याबाबतचे त्यांचे स्वतःचे म्हणणे असे आहे, की प्रत्येकाने काम करावे आणि पोटाला मिळवावे. असे जो करत नाही; मला पोटाला मिळत नाही म्हणून जो भीक मागण्यास येतो, त्याला भीक घालू नये. तो उपाशी मरत असला, तर त्याला काम करण्यास सांगावे. पण फुकट पोटाला देऊ नये.” मोरे पुढे लिहितात, “अशा भिक्षेकऱ्यांना फटकारले होते ते लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी. ज्योतिराव फुले यांनीही ते काम एका मर्यादेत केले होतेच. त्यांनी त्या संदर्भात ब्राह्मणांना जबाबदार धरल्याचे दिसून येते. आत्रे सरसकट सर्व जातींमधील भिक्षुकांवर टीका करतात. ब्राह्मणेतर जातींचे काही पुरोहित ब्राह्मण नसून त्यांच्या स्वतःच्या जातींमधील असल्याचेही निदर्शनास आणून देतात. आत्रे यांनी संकुचित जातीय विचारांपलीकडे जाऊन केलेले ते विश्लेषण आहे.”

मिलिंद बोकील यांचा या पुस्तकावर आरोप असा आहे, की महात्मा फुले आणि न्यायमूर्ती रानडे यांच्याही आधी लोकहितवादी ज्या पद्धतीने परकीय सरकारच्या वसाहतवादी धोरणाची चिकित्सा करतात, तशी आत्रे करत नाहीत. तत्कालीन वसाहतवादी विचारसरणी पूर्णपणे स्वीकारणारा एक महसुली अधिकारी त्यांच्या लेखनातून दिसतो.

‘गावगाडा’मध्ये त्या काळाच्या भाषेचा लहेजा अप्रतिम असा आहे. त्याखेरीज त्यात असंख्य म्हणी आणि त्या काळचे वाक्प्रचार आहेत. ते सारे जाणून घेणे मजेशीर वाटते. ‘गावगाडा’ या शब्दाची व्याख्या - ग्रामीण जीवनाचा गाडा सांभाळत सर्वांना घेऊन चालणारी व्यवस्था म्हणजे गावगाडा.

- प्रतिनिधी

(संपादकीय,  8 मे 2016 ‘सागर’ रत्नागिरी वरून उद्धृत, संपादित)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.