धर्मांतर सोहळ्यात बाबासाहेबांनी वापरलेल्या धम्मकाठीची रंजक कहाणी

प्रतिनिधी 20/01/2019

_Babasaheb_Ambedkar_Dhammakathi_1.jpgनागपूरकरांनी नागपुरातील दीक्षाभूमीव 14 ऑक्टोबर 1956 रोजी पार पडलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या काही स्मृती जपून ठेवल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्या सोहळ्यात बाबासाहेबांनी वापरलेली धम्मकाठी. ती कर्नलबागेतील मेंढे कुटुंबीयांकडे सुखरूप आहे. ती लोकांच्या दर्शनासाठी कर्नलबागेतील आंबेडकर वाचनालयात धम्मचक्र प्रवर्तन दिन, आंबेडकर जयंती वा अन्य तशा प्रसंगी ठेवली जाते. लोक मोठ्या जमावाने पुष्पार्पण करून धम्मकाठीपुढे नतमस्तक होतात.

बाबासाहेबांनी वापरलेल्या काठीचा इतिहास कर्नलबागेतील रहिवासी असलेल्या मॉरिस कॉलेजच्या पाली-प्राकृतच्या प्राध्यापक सविता मेंढे आणि सामाजिक कार्यकर्ते मिलिंद खैरकर रंजकपणे सांगतात. सविता यांचे वडील प्रल्हाद मेंढे (गुरुजी) ‘समता सैनिक दला’त होते. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात, बाबासाहेबांच्या संरक्षणासाठी खास अंगरक्षक पथक त्याच दलातील निवडक सैनिकांमधून तयार केलेले होते. त्याचे नेतृत्व मेंढे गुरुजींकडे होते. पथकात कर्नलबागेतील श्यामराव साळवे, विठ्ठलराव साळवे, एकनाथ गोडघाटे यांच्यासह आणखी काही लोकांचा सहभाग होता. बाबासाहेबांनी त्यांची प्रकृती बरी नसल्याने मेंढे गुरुजींकडे आधारासाठी काठीची मागणी केली होती. तेव्हा मेंढे गुरुजींनी डझनभर काठ्या आणून त्या बाबासाहेबांच्या पुढ्यात ठेवल्या. त्यातून बाबासाहेबांनी आठ गाठी असलेली काठी आर्य अष्टांगिक मार्गाचे प्रतीक म्हणून आधारासाठी निवडली. बाबासाहेबांनी ती धम्मकाठी चंद्रपूर येथील धम्मचक्र सोहळ्यातही वापरली होती. बाबासाहेब 16 ऑक्टोबरला चंद्रपूरचा सोहळा आटोपून नागपुरात परतले. ते मुंबईला जाण्यासाठी विमानतळावर पोचले. मात्र, त्या वेळीही विमानातून काठी नेण्यास परवानगी नव्हती. बाबासाहेबांनी ती मेंढे गुरुजींना परत केली. मेंढे गुरुजी म्हणाले, “बाबासाहेब, मी काठी घेऊन काय करू..?” त्यावर बाबासाहेबांनी हजरजबाबी होऊन उत्तर दिले, “अरे, ही साधी काठी नाही, आर्य अष्टांगिक मार्ग दाखवणारी काठी आहे.” बाबासाहेबांच्या सूचनेनंतर मेंढे गुरुजींनी काठी स्वत:च्या ताब्यात घेतली. तेव्हापासून धम्मकाठी मेंढे कुटुंबाकडेच आहे. बाबासाहेबांच्या स्पर्शाने पवित्र झालेली काठी आमच्याकडे आहे, याचा त्यांना अभिमान वाटतो. “आम्ही ती जिवापाड जपतो. तिचे पावित्र्य नष्ट होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतो” असे सविता मेंढे सांगतात.

(दैनिक 'दिव्यमराठी'वरून उद्धृत)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.