पांढऱ्या रंगाचा दरारा - एशियाटिक आणि इतर वास्तू


_Asiatic_Society_1.jpgप्रत्येक रंगाचा स्वभाव वेगळा असतो. रंगाच्या स्वभाववैशिष्ट्यातून इमारती नकळतपणे पाहणाऱ्याशी संवाद साधत असतात. मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या इमारतीचे सौंदर्य तिचा पांढरा रंग खुलवतो. तो रंग वरकरणी शांत, सौम्य व सदैव प्रसन्न दिसतो. परंतु त्या रंगात एक प्रकारचा दराराही दडलेला असतो. ते एशियाटिकच्या इमारतीकडे पाहून जाणवते. त्या संस्थेच्या कार्याचा दरारा आहेच; तो रूपातूनही प्रकट होतो. संस्थेचा 26 नोव्हेंबर हा स्थापना दिन. ‘एशियाटिक सोसायटी’ दोनशेहून अधिक वर्षें कार्यरत आहे.

दोन जगप्रसिद्ध शैलींतील इमारती मुंबईत एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बांधल्या गेल्या. पहिली सरकारी टांकसाळ व दुसरी एशियाटिक सोसायटी. ती टाउन हॉल म्हणूनही ओळखली जाते. सर जेम्स मॅकिण्टोश यांनी ‘लिटररी, मुंबई’ या संस्थेची स्थापना 26 जानेवारी 1804 रोजी आशिया खंडातील देशांच्या अभ्यास-संशोधनासाठी केली होती. मेजर हॉकिन्स यांनी तत्कालीन गव्हर्नर डंकन यांच्या मदतीने मुंबईत सार्वजनिक सभागृहाची गरज ओळखून जागेची निवड केली. त्यानुसार कर्नल थॉम कौपर यांनी इमारतीचा आराखडा ग्रीक-रोमन शैलीत 1811 मध्ये बनवला. त्या शैलीला पुनरुज्जीवित निओ क्लासिकल शैली म्हणूनही ओळखले जाते. इमारतीचे बांधकाम 1820 मध्ये सुरू झाले आणि ते 1833 मध्ये पूर्ण झाले. एशियाटिक सोसायटीने सर्वप्रथम त्या इमारतीत जागा मिळवली. सारासेनिक शैलीला (मिश्र - हिंदू व मुघल वास्तू-स्थापत्य घटकांचा मिलाफ) कलासौंदर्याची जोड देऊन बांधलेल्या पुरातन इमारतींची रेलचेल दक्षिण मुंबईत त्या शतकाच्या उत्तरार्धात आढळते. तत्कालीन दक्षिण मुंबईत केवळ गरजेसाठी बांधलेल्या इमारतींची संख्या कलासौंदर्याने नटलेल्या पुरातन इमारतींच्या तुलनेत अधिक आहे. त्या प्रमाणात बदल झालेला नाही. परंतु पुरातन इमारतीच मुंबईची शान राखून असलेल्या जाणवतात.

एशियाटिक सोसायटीच्या इमारतीच्या दर्शनी भागातील ऐसपैस व्हरांड्यातील डोरिक शैलीतील उंच, ठसठशीत भारवाहक स्तंभ, अनेक पायऱ्यांचा भव्य दगडी सोपान व मानवी दृष्टिक्षेपात मावणारा, पण अभ्यागतास त्याच्या खुजेपणाची अव्यक्त जाणीव करून देणारा दर्शनी देखावा, भव्य दरवाजे व खिडक्या ही इमारतीची वरकरणी दिसणारी वैशिष्ट्ये आहेत. त्या शैलीतील इमारती भव्यता, प्रमाणबद्धता व शांतता यांचे प्रतीक समजल्या जातात. त्याच इमारतीने त्या काळात, ब्रिटिश साम्राज्याचे महत्त्व प्रस्थापित करण्याचे आणि समाजावर दरारा व प्रभाव निर्माण करण्याचे कामही केले होते. वास्तुविशारदाचे कौशल्य व गुणवत्ता इमारतीच्या दृश्य रूपातून समाजावर प्रभाव टाकण्याचे कार्य करू शकतात व तो प्रभाव अनंतकाळ टिकून राहू शकतो, हे त्या इमारतीच्या अंतर्बाह्य रूपातून दिसून येते.

_Asiatic_Society_3.jpgरेषांना स्थापत्य-वास्तू आरेखनात महत्त्व खूप असते. सरळ, साध्या व मोजक्या रेषांतील आरेखन, भव्य पण मानवी दृष्टिकक्षेत मावणारा आकार व शुभ्र पांढरा रंग यांमुळे मूळ वास्तूचे सौंदर्य उजळून निघण्यास मदत होते. त्यामुळेच इमारत प्रसन्न दिसते. मुंबई महानगरपालिकेने त्या वास्तूला त्याच सर्व बाबींचा विचार करून ‘ग्रेड-1’ असा दर्जा दिला आहे. आणखी एक लक्षवेधी घटक त्या वैशिष्ट्यांना जोडणारा म्हणून महत्त्वपूर्ण ठरतो, तो म्हणजे इमारतीचा एकवर्णी रंग. वास्तविक पाहता पांढरा रंगच त्या इमारतीचे सौंदर्य खुलवतो. इतर कोणत्याही रंगाचे मूळ सौंदर्य खुलवण्याची ताकद केवळ त्या रंगात आहे. एशियाटिक सोसायटीची इमारत ही वास्तुशैली, आकार, रंग व अवकाश यांचे एकत्रित दर्शन घडवणारी एकमेवाद्वितीय इमारत आहे.
पांढऱ्या रंगाचा एकूण प्रभाव दर्शवणारे दक्षिण मुंबईतील दुसरे समकालीन उदाहरण म्हणजे 1833 मध्ये बांधलेले भायखळा चर्च. चर्चचे 2016 मध्ये पुनरुज्जीवन करताना त्याचा मातकट गुलाबी रंग काढून प्रथमच पांढरा रंग लावल्यामुळे इमारतीला उजाळा मिळाला आहे.

दक्षिण मुंबईतील, पेडर रोडवरील पांढऱ्या रंगातील मिश्र-आधुनिक शैलीतील ‘जिंदाल मॅन्शन’ ही इमारत पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेते. त्या इमारतीच्या दर्शनी भागाच्या अवलोकनातून, इमारतीच्या दर्शनी खिडक्यांच्या तावदानामुळे प्राप्त झालेल्या काळसर रंगाला पांढरा रंग सामावून घेतो असे दिसते; पण पांढरा रंग स्वत:चा दरारा राखून ठेवतो, हेही त्यातून प्रकट होते. त्याचबरोबर, पांढऱ्या रंगाप्रमाणे कृष्णवर्णासही त्याच्या कवेत कोणत्याही रंगास घेण्याचा गुण सामावलेला आहे, हे ‘जिंदाल मॅन्शन’च्या शेवटच्या मजल्यावरील बाल्कनीतील रंगछटेकडे पाहिल्यास समजून येते.

वास्तुसिद्धांतानुसार एशियाटिक सोसायटीच्या इमारतीचे अंतर्बाह्य सौंदर्य इमारतीच्या साधेपणात दडलेले आहे. इमारतीच्या दृश्य भागात व्यापारी ऐश्वर्याचा भपका जाणवत नाही, जाणवते ती भव्यता. ब्रिटिशांच्या सामर्थ्य, शांतता व सुव्यवस्था यांच्या नियोजनाचा सरकारी संदेश देण्याचे काम त्या इमारतीने चोखपणे बजावले होते. इमारतीचे रंगलेपन पूर्णत: शुभ्र पांढऱ्या रंगात जवळपास एकशेपंच्याऐशी वर्षांपासून केले जाते. पांढरा रंग स्वत:चे अस्तित्व कायम ठेवून इतर रंगांना उठाव देतो. इतर कोणत्याही रंगछटेला सामावून घेण्याचे सामर्थ्य फक्त एकट्या पांढऱ्या रंगात आहे. कोणताही एक रंग इतर रंगाच्या सहकार्याशिवाय त्याचे खरे रूप ठसवू शकत नाही, ही रंगकिमया एशियाटिक सोसायटीच्या पुरातन इमारतीने खरी करून दाखवली आहे. मूलतः सुंदर असलेल्या इमारतीला उजाळा देण्याचे काम करणे म्हणजे कल्पनांची पूर्तता (idea realization) होय.

- चंद्रशेखर बुरांडे, fifthwall123@gmail.com

(‘बाईट्स ऑफ इंडिया’वरून उद्धृत, संस्कारित- संपादित)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.