रथसप्तमी

प्रतिनिधी 03/01/2019

_rathasaptami_1.jpgमाघ शुद्ध सप्तमी म्हणजेच रथसप्तमी होय. तो दिवस महासप्तमी, भास्करसप्तमी अशा नावांनीही ओळखला जातो. रथसप्तमीचे व्रत प्रामुख्याने स्त्रिया करतात. रथसप्तमीला सकाळी घरी अंगणात रक्तचंदनाने सात घोड्यांचा रथ व त्यावर सारथ्यासह सूर्यप्रतिमा काढून पूजा केली जाते. गोवऱ्यांच्या विस्तवावर मातीच्या भांड्यात खीर शिजवून, तिचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच, धान्ये सात, रुईची पाने सात व बोरे सात सूर्याला वाहण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी गोवऱ्यांवरील मातीच्या छोट्या बोळक्यांत दूध तापवून उतू घालवतात. त्या दिवशी हळदीकुंकूही करतात. दक्षिणेत रथसप्तमीच्या रात्री गायन, वादन, दीपोत्सव व रथोत्सव असा कार्यक्रम असतो. तो दिवस जागतिक ‘सूर्यनमस्कार दिन’ म्हणून ओळखला जातो.

ही सप्‍तमी अचलासप्‍तमी, जयंतीसप्‍तमी, भास्‍करसप्‍तमी, महासप्‍तमी, माकरीसप्‍तमी या अन्‍य नावांनीही ओळखली जाते. सप्‍तमीच्‍या व्रताचे विधान पुढीलप्रमाणे - षष्‍ठीच्‍या दिवशी एकभुक्त राहून सप्‍तमीला पहाटे स्‍नान करावे. सोन्‍यारूप्‍याची पणती पेटवून ती डोक्‍यावर ठेवून सूर्याचे ध्‍यान करावे. मग तो दिवा उदकात सोडावा. घरच्‍या अंगणात रक्‍तचंदनाने सात घोड्यांचा सूर्याचा रथ व त्‍यावर अरूणासह सूर्यप्रतिमा काढावी. नंतर ‘ध्‍येयःसदा सवितृमण्‍डलमध्‍यवर्ती’ या मंत्राने ध्‍यान साधून पूजा करावी. गोवऱ्यांच्‍या विस्‍तवावर मातीच्‍या भांड्यात खीर शिजवून तिचा नैवेद्य दाखवावा. सप्‍त धान्‍ये, सात रूईची पाने व सात बोरे सूर्याला वाहावी. अष्‍टांग अर्घ्य द्यावे. ब्राह्मणाला भोजन घालावे.

हे व्रत महाराष्‍ट्रात मुख्‍यत्‍वे स्त्रिया करतात. ती सूर्यपूजा आहे व स्त्रिया सात दिवस उपवास करतात. त्याचे पारणे रथसप्तमीला फेडले जाते. त्या दिवशी हळदीकुंकूही करतात.

रथाचा नाच

महाराष्‍ट्रातील भिल्‍लांचे एक नृत्‍य. हे लोक एकाच्‍या खांद्यावर दुस-याला उभे करून त्‍याचा रथ बनवतात आणि वर्तुळाकार नाचतात. तो नाच गोमंतकात थोडा निराळ्या प्रकाराने होतो. तेथील लोक देवाच्‍या जत्रेत किंवा रथसप्‍तमीच्‍या दिवशी बिनचाकाचा रथ तयार करतात. मग त्‍याच्‍या खाली दोन दोन दांडे घालून ते दांडे खांद्यावर घेतात आणि नाचतात. त्या नाचाला चौघड्याची साथ असते.

रथोत्‍सव

हे व्रत आश्विन शुद्ध द्वितीयेला केले जाते. त्‍या दिवशी कृष्‍ण, बलराम व सुभद्रा यांच्‍या मूर्ती रथात बसवून त्‍यांची मिरवणूक काढली जाते. या दिवशी पुष्‍प नक्षत्र असल्‍यास ते विशेष पुण्‍यप्रद मानतात.

रथोत्‍सव चतुर्थी - एक व्रत.

आश्विन शुद्ध चतुर्थीला हे व्रत केले जाते. त्या व्रतात भागवतीचे पूजन, जागर आणि एका सजवलेल्‍या रथात देवीला बसवून नगरप्रदक्षिणा या गोष्‍टी करतात.

- प्रतिनिधी

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.