दासनवमी

प्रतिनिधी 27/12/2018

_Dasnavami_1.jpgश्री समर्थ रामदास स्वामी ह्यांचा जन्म शके 1530 चैत्र शुद्ध नवमी (रामनवमी) या दिवशी मौजे जांब परगणे, अंबड (गोदातीरी) येथे झाला. समर्थांचे वडील सूर्याजीपंत ठोसर व माता राणुबाई हे सात्त्विक जीवन जगत होते. समर्थांचे नाव ‘नारायण’ होते. त्यांची मुंज पाचव्या वर्षी झाली. त्यांच्या घराण्यात रामभक्ती पिढ्यान् पिढ्या चालत आलेली होती. ते त्यांच्या मातोश्रींकडून रामायण-महाभारतातील कथा ऐकत व त्यावर विचार करत बसत.

नारायण लग्न टाकून पळाले, त्यावेळी त्यांचे वय बारा वर्षांचे होते. ब्राम्हणांनी लग्नात ‘सावधान’ म्हणताच ते लग्नवेदीवरून निघून गेले अशी कहाणी आहे. त्यांनी पंचवटीजवळ टाकळीस जाऊन बारा वर्षे अनुष्ठान केले. गोदावरीच्या पात्रात उभे राहून ‘गायत्री पुरश्चरण’ व ‘श्रीराम’ नामाचा जप अशी खडतर तपश्चर्या करत असताना, त्यांना श्री प्रभुरामचंद्रांचे सगुण दर्शन होऊन अनुग्रह मिळाला. पुढे, त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केली. त्यांचे अंत:करण यात्रेदरम्यान देशबांधवांची, धर्माची व सामाजिक स्थिती पाहून हळहळले. त्यांनी राष्ट्रोद्धारासाठी सामाजिक जागृतीचे काम हाती घेतले.

त्यांनी श्री रामोपासनेचा संप्रदाय व गावोगावी बलसंवर्धनासाठी मारुती मठांची स्थापना केली. लोकांमध्ये अन्याय व अत्याचार यांविरुद्ध चीड निर्माण केली. लोकांचा स्वाभिमान जागृत केला. तेथे शिष्यांची नेमणूक केली. समर्थांनी लोकजागृतीसाठी ग्रंथरचना केल्या. महाडजवळ शिवथर घळीत सुंदर मठाची स्थापना केली. तेथेच, त्यांनी  'दासबोध', 'मनोबोध', 'करुणाष्टके', 'मनाचे श्लोक' व इतर ग्रंथ यांचे लेखन केले.

'दासबोध' या ग्रंथाची रचना सलगपणे एका विवक्षित काळी आणि विवक्षित स्‍थळी झालेली नाही. रामदासांनी कृष्‍णातीरी त्यांचे प्रचारकार्य सुरू केल्‍यापासून त्‍यांच्‍या जीवनाच्‍या अखेरपर्यंत त्‍यांनी त्यांच्या शिष्यांना वेळोवेळी विविध विषयांवर जो उपदेश केला, तो त्या ग्रंथात संकलित केलेला आहे. वेळोवेळी उपदेशलेल्‍या दोनशे स्‍फुट समासांची विषयानुरोधाने वीस दशकांत व्‍यवस्‍था लावून, तो ग्रंथ सिद्ध केला गेलेला आहे. त्याची ओवीसंख्‍या सात हजार सातशेएकतीस आहे.

दासबोधाच्‍या संकलनाचे कार्य तीन टप्‍प्‍यांत झालेले दिसते. प्रथम हा ग्रंथ केवळ एकवीससमासी होता. पुढे, सातदशकी दासबोध तयार झाला आणि पूर्वीच रचलेला आठवा ज्ञानदशक त्‍याला जोडला गेला. सहाव्‍या दशकाच्‍या चौथ्‍या समासात (ओ. 7) ‘चारी सहस्र सातशेंसाठी, इतुकी कलियुगाची राहाटी’ असा कालोल्‍लेख आहे. त्‍यावरून आठदशकी दासबोध 1659 मध्‍ये तयार झाला असे म्‍हणता येते. सध्‍याचा वीसदशकी दासबोध रामदासांच्‍या जीवनाच्‍या अखेरीला तयार झाला असावा, असे जाणत्‍यांचे मत आहे. त्‍यातील पहिले सहा दशक भोरजवळच्‍या शिवथर घळीत रचलेले आहेत, असे म्‍हणतात.

'दासबोध' हा प्राचीन मराठी वाड्.मयातील अपूर्व ग्रंथ आहे. त्‍याला सांस्‍कृतिक  आधार वेदान्‍तविचारांचा असला, तरी तो अनुवादाच्‍या स्‍वरूपाचा नसून स्‍वतंत्र आहे. तो ग्रंथ म्‍हणजे रामदासांच्‍या समृद्ध व्‍यक्तिमत्त्‍वाचा सहस्रमुखी आविष्‍कार आहे. स्‍वतः रामदासांनीच ग्रंथातील प्रतिपाद्य विषयाचे स्‍वरूप विशद केले आहे, ते असे -

ग्रंथा नाम दासबोध, गुरूशिष्‍यांचा संवाद,
येथ बोलिला विशद, भक्तिमार्ग,
नवविधा भक्ति आणि ज्ञान, बोलिले वैराग्‍याचे लक्षण,
बहुधा अध्‍यात्‍मनिरोपण, निरोपिंले,
भक्‍तीचेन योगें देव, निश्‍चयें पावती मानव,
ऐसा आहे अभिप्राव, ईऐ ग्रंथी

त्यांना त्यांचे अवतारकार्य संपत आल्याची जाणीव झाल्यावर ते सज्जनगड येथे रामपंचायतनाच्या मूर्तीसमोर ध्यानस्थ बसले. त्यांचे शिष्य दु:खी झाले. तेव्हा ते ‘दासबोध’ ग्रंथाकडे बोट दाखवून म्हणाले,

माझी काया गेली खरे | परि आहे मी जगदाकारे ||
ऐका स्वहित आरे | सांगेन ती  ||

राष्ट्रसंत समर्थ रामदास माघ वद्य 9 शके 1603 (म्हणजेच दासनवमी) रोजी प्रभू रामचंद्रांच्या चरणकमली विलीन झाले.

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.