लोककवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी युगाचा सर्जनशील भाष्यकार!


_Vamandada_Kardak_1.jpgलोककवी वामनदादा कर्डक म्हणजे आंबेडकरी विचारांचे सर्जनशील वादळ. त्यांनी त्यांच्या काव्यप्रतिभेने आणि पहाडी आवाजाने त्यांचे प्रेरणास्रोत व उद्धारकर्ते अशा बाबासाहेबांचा सांगावा खेड्यापाड्यांत पोचवला. त्या ध्येयवेड्या भीमशाहिराने त्यांचे सर्व आयुष्य आंबेडकरी चळवळीसाठी वेचले; भीमकार्याची महती जगाला सांगितली.

वामनदादा कर्डक यांचा 15 ऑगस्ट 1922 हा जन्मदिन. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील देशवंडी या खेड्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तबाजी कर्डक, आईचे नाव सईबाई. त्यांचा मोठा भाऊ सदाशिव तर धाकटी बहीण सावित्री होती. लहान वामन गुरेढोरे सांभाळायचा. गावचा संबंध तो तितकाच, कारण वयाच्या दहाव्या वर्षी वामनराव आईवडिलांसमवेत मुंबईस आले. गावी जी तुटपुंजी शेती होती त्यावर कुटुंबाचा चरितार्थ चालणे मुश्किल होते. त्यांचे बालपण गरिबीत आणि खडतर अशा परिस्थितीत गेले. त्यांनी बालपणी खेळण्याच्या आणि शिकण्याच्या वयात आईसोबत कोळशाच्या वखारीत कोळसा वेचण्याचे काम केले. त्या दरम्यानच, त्यांची जेमतेम अक्षरओळख झाली. लिहितावाचता येऊ लागले.

वामनरावांचे लग्न विसाव्या वर्षी अनसुया नावाच्या मुलीबरोबर झाले. त्यांना मीरा नावाची मुलगी झाली. त्यांचे जीवन सुखात गेले नाही. त्यांना त्यांची पत्नी अनसुया सोडून गेली. त्यांची मुलगी आजारपणात वारली. पुढे ते पोटापाण्यासाठी त्यांच्या आईसोबत मुंबईत आले. त्यांनी अनेक प्रकारची कामे केली. कोळशाच्या वखारीत कोळसा उचलला, चिक्कीविक्रीचा-आईसफ्रुटविक्रीचा व्यवसाय केला. नंतर, त्यांना टाटा कंपनीत नोकरी लागली. ते शिवडीच्या बीडीडी चाळीत राहत. तेथेच त्यांनी ‘समता सैनिक दला’त प्रवेश केला. त्यांनी देहलवी नावाच्या मास्तरांकडून बाराखडी शिकली. ते जोडाक्षरे दुकानाच्या पाट्या, बोर्ड वाचून शिकले. हळुहळू, त्यांचे वाचनलेखन वाढू लागले. ते विविध खेळ खेळत असत व ते कसरतही करत असत. त्याच दरम्यान, आंबेडकरी चळवळीला वेग आला होता. दलित मानवसमूह बाबासाहेबांच्या विचारांनी मानवमुक्तीच्या लढ्यात उतरला होता. वामनदादापण बाबासाहेबांच्या सभेला जात. त्यांनी बाबासाहेबांना पहिल्यांदा 1943 साली नायगाव येथे पाहिले.

वामनदादांना चित्रपटाचे आकर्षण होते. त्यांना कथाकार, अभिनेता व्हावेसे वाटे. ते अनेक चित्रपट कंपन्यांत गेले. त्यांना एक्स्ट्रा म्हणून ‘मिनर्व्हा फिल्म कंपनी’त कामही मिळाले होते. त्यांना काम नसे तेव्हा ते राणीच्या बागेत जाऊन तासन् तास बसत. त्यांनी राणीच्या बागेत जाऊन बसून एक विडंबन गीत 1943 साली लिहिले व रात्री चाळीतील लोकांसमोर सादर केले. लोकांना ते आवडले. त्यांनी वामनची प्रशंसा केली आणि तेथेच वामन कर्डक यांचा कवी म्हणून जन्म झाला.

तो कालखंड आंबेडकरी जलसाकारांचा होता. भीमराव कर्डक, रामचंद्र सोनवणे, उद्धवराव रामटेके, एस.के. गायकवाड आदी जलसाकार आणि समाजसुधारक यांनी त्यांच्या जलशांनी उभा महाराष्ट्र ढवळून काढला. वामनदादांनी अनेक गायन पाट् र्या स्थापन केल्या. त्यांतील पहिली गायन पार्टी शिवडी येथे होती. ते स्वतः गीते लिहून त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर कार्यक्रम करू लागले. त्याच दरम्यान, त्यांच्या आयुष्यात दुसऱ्या पत्नी शांताबाई आल्या. शांताबाईंनी त्यांना शेवटपर्यंत साथ दिली. शांताबाई यांना दमा होता. वामनदादा शांताबाईंना आवडीने ‘दमाकी’ म्हणत. त्यांनी मेहुण्याच्या मुलाला दत्तक घेऊन त्याला मानसपुत्र मानले. शांताबाईंनी वामनदादांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली. वामनदादा महाराष्ट्रभर भ्रमण करून बाबासाहेबांचे विचार गायनाच्या माध्यमातून सांगत असत. उपाशीपोटी मिळेल ते खाऊन दौऱ्यामध्ये दिवस काढत.

_Vamandada_Kardak_2.jpgवामनदादा कर्डक यांनी लिहिलेली गीते ही आंबेडकरी समाजाची सामूहिक अभिव्यक्तीच आहे! त्यांनी विपुल गीतलेखन केले आहे. त्यांची लेखणी आंबेडकरी चळवळीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा अचूक वेध घेते. वामनदादांनी सर्वसामान्यांच्या भाषेत लिहिले. त्यांनी साध्या सोप्या शब्दांतून ‘भीमा’चे कार्य जनसामान्यांपर्यंत पोचवले. वामनदादा लिहितात :

भीमा विचार तुझा पिंपळापार आहे
सुखाचे द्वार आहे, शीलाचे भांडार आहे

फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांनीच लोकांचा उत्कर्ष होऊ शकतो; त्यांनी त्या महामानवांच्या विचारानेच जावे हे सांगताना वामनदादा म्हणतात :

वाट फुलेंची सोडून
आंबेडकरांना तोडून
चालताच इयाचं नाय अरे
तुला चालताच इयाचं नाय

शूद्र-वंचित, उपेक्षित समाजाला बाबसाहेबांसारखा उद्धारकर्ता मिळाला. त्या उद्धारकर्त्या बापाविषयी वामनदादा म्हणतात :

उद्धरली कोटी कुळे
भीमा तुझ्या जन्मामुळे

बाबासाहेबांच्या गुणांविषयी वामनदादा म्हणतात :

वादळवाऱ्यांमधी तोफेच्या माऱ्यामधी
पाहिला भीम आम्ही रणी लढणाऱ्यांमधी...

बाबासाहेबांनी बुद्धाला गुरू मानले आणि त्यांच्या धम्माचा स्वीकार करून त्यांच्या समाजाचा उद्धार केला. त्याविषयी वामनदादा लिहितात :

थोर चेला गुरू गौतमाचा एक भीमराव होऊनी गेला।
गुरू आणि चेल्याच्या बळाने, कोटी कोटीचा उद्धार केला ।।

वामनदादांनी त्यांच्या साध्यासोप्या शब्दांत तथागत बुद्धाचे तत्त्वज्ञान मांडले. बुद्धाबद्दल ते म्हणतात :

सागर मनाचा जिथे शुद्ध आहे ।
तिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे ।।

बाबासाहेबांनी दलित जनतेला धम्म दिला. त्या धम्माचे पालन करायचे आहे; त्याअनुषंगाने वामनदादा म्हणतात :

भीमाने जो दिला धम्म मला तो पाळणे आहे
तयासाठीच रे आता जीवन जाळणे आहे
झरा निर्मळ वाहे तसे मन शुद्ध ठेवण्यासाठी
मला या पंचशिलेला कवटाळणे आहे ।।

त्यांनी आंबेडकरी समाजातील बेकी आणि स्वार्थी नेतृत्वाला खडे बोल सुनावून एकतेने राहण्याचा उपदेश केला. ते समाजाला प्रश्न विचारतात :

भीमा गेल्यापाठी काय काय केले? काय काय लावलंय पणाला
काय काय लावलंय पणाला, विचार आपुल्या मनाला

तसेच

कोण राखील आता हा भीमाचा मळा
वाळून चालला हा उभा जोंधळा
कोण राखील आता भीमाचा मळा...

बाबासाहेब गेल्यानंतर समाज गटागटांत विभागला, त्याबद्दल खंत व्यक्त करताना ते लिहितात :

जिथे तिथे दारी आता गटाच्या गटारी
जाताच कैवारी जनता, दुभंगली सारी

आंबेडकरी चळवळीला जरी फाटाफुटीचे ग्रहण लागले असले तरी सर्वांनी एक झाले पाहिजे असा आर्जव करताना वामनदादा लिहितात :

विहार आपुले बांधा रे, विहार आपुले बांधा
विहीर बांधा एक दिलाने, एके ठिकाणी नांदा ।।
तसेच, उठून सारा देश उभा आज तुझा तू करशील का
आज तरी क्रांतीसाठी वाट भीमाची धरशील का ।।

_Vamandada_Kardak_3.jpgअसे हे वामनदादा कर्डक आंबेडकरी कव्वालांचा, कलावंतांचा गुरू होऊन गेले. त्यांचे छोटेसे घर नाशिक शहरात नागसेन नगरात होते. पण तो कलावंत घरात फारसा रमला नाही. त्यांनी पोटापाण्याची काळजी कधी केली नाही. आज या गावी तर उद्या त्या गावी, काखेत शबनम बॅग, तीत जरुरीपुरते कपडे अन् खिशात वाटखर्चापुरते पैसे असले, की त्यांना पुरे होत. अशा कायमच्या जागरणामुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला. ते आजारी पडले.

कर्डकांनी विविध प्रकारची हजारो गीते लिहिली. साधीसोपी सहज अशी अलंकृत भाषा त्यातून ग्राम्य जीवनाचे, निसर्गाचे प्रत्ययकारी चित्र दिग्दर्शित होते. बहुतेक सर्व गीते लोकप्रिय झाली. अशी लोकप्रियता एखाद्या गीतकाराच्या वाट्याला क्वचितच येते. कर्डकांचे एक जुन्या काळातील गीत अजूनही रसिकांना आठवत असेल –

‘अहो सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला
हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला… अहो सांगा या वेडीला ||’

‘सांगते ऐका’ या चित्रपटातील गीताने एके काळी उभा महाराष्ट्र वेडावून गेला होता. कर्डक त्या गीतातून मराठमोळ्या संस्कृतीचे सुंदर दर्शन घडवतात.

लोककवी वामनदादा कर्डक यांनी सामाजिक समतेच्या आंबेडकरी चळवळीसाठी अनन्यसाधारण असे कार्य केले. त्यांच्या कार्याची जाणीव ठेवूनच ‘अखिल भारतीय दलित साहित्य अकादमी’ने त्यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप’ देऊन त्यांचा गौरव केला, तर महाराष्ट्रात त्यांना ‘मानव मित्र पुरस्कार’, ‘संत नामदेव पुरस्कार’ सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा ‘दलितमित्र’ पुरस्कार आणि 1996 साली कर्डक यांच्या वयाच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात शाहिरी जगतात प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘शाहीर अमरशेख’ पुरस्कार असे सन्मान त्यांना मिळाले.  

त्यांनी बाबासाहेबांचे हिमालयाच्या उंचीचे कार्य शब्दबद्ध, लयबद्ध करून समाजाला जागृत करण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचे वर्णन करताना शब्दही अपुरे पडतात.

वामनदादा कर्डक यांची वृद्धापकाळाने प्रकृती क्षीण झाली होती. त्यांची दृष्टीही अधू झाली होती. ते अंथरुणाला खिळून राहिले होते. त्यांची पत्नी त्यांची सेवा करायची. वामनदादा आजारी आहेत ही बातमी महाराष्ट्रात सर्वदूर पसरली. त्यांना रोज लोक भेटण्यासाठी येत असत. त्यात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश होता. त्यांचे अशा आजारी अवस्थेत 15 मे 2004 रोजी निधन झाले.

- गौतम सातदिवे

(बबन लोंढे यांनी लेखात भर घातली आहे)

(16 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2018, ‘युगांतर’वरून उद्धृत, संपादित व संस्कारित)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.