गुजरातमधील कुटुंबसंस्था आणि कुटुंबकबिला हरवला!


_Gujaratmadhill_Kutumbkabila_1.jpgमी ‘आर्किटेक्चर’चे काही विषय गुजराथमधील तीन महाविद्यालयांत व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून शिकवतो. मला तेथे पाच-सात मुले तरी दरवर्षी ‘सर, आय अॅम अ सिंगल चाईल्ड’ असे सांगणारी भेटतात. मी जसे बँकेत ‘केवायसी’ करतात तसे मुलांचे ‘केवायएस’ म्हणजे ‘तुमचे विद्यार्थी जाणून घ्या’ हा उद्योग दरवर्षी करत असतो. त्यातून गेल्या दहा वर्षांत तीन महाविद्यालयांत मिळून दोनशे विद्यार्थ्यांचा बायोडेटा मजकडे एकत्र झाला आहे. त्यात विद्यार्थी कोणत्या गावातील आहे? कोठल्या माध्यमात शिकला आहे? पालक काय करतात? त्यांची आवडनिवड वगैरे माहिती रकान्यांत भरून घेतो. त्यामुळे कोण-कोठला आहे, सध्याच्या पिढीचा कल कोणत्या बाजूकडे आहे वगैरे माहिती कळते. त्या माहितीचे विश्लेषण एक्सेल शीटवर केल्यावर गंमतीदार माहिती समोर येते. ती अचूक असते. त्यामुळे विद्यमान गुजराती तरुण पिढी कळण्यास मदत होते.

फक्त एका महाविद्यालयाची माहिती नमुन्यादाखल द्यावीशी वाटते. डिझाईन सेमिनार या विषयासाठी तीन तुकड्या मिळून शहात्तर विद्यार्थी एका मोठया वर्गखंडात बसतात. त्या विद्यार्थ्यांपैकी पंचावन्न टक्के मुली आणि बाकीचे मुलगे आहेत. मुली जास्त हुशार असतात. मुली जास्त काम करणाऱ्या असतात. दर वर्षी तीनचार मुली भरतनाट्यम्-कथकलीचे शिक्षण पूर्ण केलेल्या असतात. मुलग्यांना गोंजारून मोठे केले गेले असण्याची शंका वाटते. ते आळशी आढळतात. पासष्ट टक्के विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून तर पस्तीस टक्के गुजराती माध्यमातून आलेले आहेत. बहात्तर टक्के मुले स्वत:च्या घरात राहतात तर अठरा टक्के मुले भाड्याच्या घरात राहतात. ऐंशी टक्के पालकांना वास्तुकला म्हणजे नेमके काय शिकवले जाते ते पहिल्या वर्षी तरी माहीत नसते. असे असूनही वेगवेगळ्या व्यवसायांतील पालक त्यांच्या मुलांना तो विषय शिकवण्यासाठी पाठवत आहेत. ते का, त्याचा उलगडा होत नाही. एकूणच, सध्याची मुले जास्त चलाख असतात, पण वास्तुकलेबाबत उत्कट दिसत नाहीत. कोणत्याही माध्यमातील विद्यार्थ्याला वाचनाची आवड नसते. त्यामुळे त्यांच्यामध्ये सर्वसामान्य ज्ञानाचा अभाव असतो.
फक्त एकोणीस टक्के पालक नोकरी करणारे आहेत, तर एक्याऐंशी टक्के उद्योग, व्यवसाय, दुकानदारी, कारखानदार, आयातनिर्यात असे व्यावसायिक आहेत. प्रत्येक कुटुंबात जास्तीत जास्त दोन मुले आहेत. पालक त्यांच्या मुलाला किंवा मुलीला शिकवण्यासाठी पैसे खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. बहुतेक पालक सधन आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याकडे लॅपटॉप, स्मार्टफोन असतोच; त्याखेरीज शिकणे सध्या शक्य नसते.

वर्गात कानपूर, जौनपूर, आबूरोड, जोधपूर, उत्तराखंड, मुंबई, पाटणा, रतलाम, कोटा - राजस्थानातील एकेक विद्यार्थी आहे. त्यांपैकी तीन मुली आहेत. पंचमहाल या मागास जिल्ह्याच्या पाच गावांतील मुले, कच्छमधील चार मुले, सौराष्ट्राच्या लहान गावातील सात मुले, उत्तर गुजरातमधील पाच गावांतील मुले आहेत. मुलांच्या आवडी विविध प्रकारच्या असतात. फक्त दोन मुलींनी सांगितले, की त्यांना लिहिण्यास आवडते. पहिल्या वर्षी गावंढळ वाटणारी मुले-मुली पाचव्या वर्षाला येईपर्यंत शहरी होतात. मुली नाना प्रकारचे कपडे परिधान करतात. कोणाच्याही मूळ गावात नोकरी-व्यवसायाची संधी नसल्याने त्यांना अहमदाबाद-राजकोट-सुरतेला जावे लागते. शहरातील मुलगी लहान गावातील स्थळाला नाकारते. खरे तर, लहान गावांवर शहरी कल्पनांचे प्रोक्षण होत असते. तेथील मुले शिकण्यास शहरात जातात. येताना स्मार्टफोन घेऊन येतात. शहरीकरण खेड्यात असे प्रवेशते. आता तो प्रवाह उलटा फिरणे अशक्य आहे.

आम्ही नगर व प्रादेशिक आयोजनाच्या अभ्यासासाठी गुजरातमधील तेहतीस जिल्ह्यांत पाऊल ठेवलेले आहे. आम्ही खेड्यापाड्यांत, लहान गावांत जाऊन कौटुंबिक माहिती गोळा करतो. साठ प्रश्न कुटुंबप्रमुखाला विचारतो. पाच लाखांहून जास्त वस्ती असलेल्या महानगरांतील आणि तालुक्याच्या गावांतील गुजराती कुटुंबांमधील एक साम्य लक्षात येते. लहान गावांतील तरूण मंडळी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मोठ्या नगरांत गेली आहेत; घरोघरी मात्र ज्येष्ठ माणसे उरली आहेत. महानगरांत तेच झाले आहे. द्वारकेच्या उत्तरेला शिवराजपूर हे खेडे आहे. गावातील वस्ती रजपुतांमधील वाघेर नावाच्या एकाच पोटजातीची आहे. काही काम पडले तर त्यांना सगळे बारा बलुतेदार दुसऱ्या गावातून बोलावावे लागतात. अशी आणखी दोन रजपूत गावे आढळली.

कुटुंब याचा अर्थ ‘एकमेकांशी नातेसंबंध असणाऱ्या लोकांचा गट किंवा घराणे’ असा आहे. साल 1900 पासून म्हणजे आमच्या आजोबांपासून कुटुंब तुटण्यास सुरुवात झाली. आमचे आजोबा गावी परतले नाहीत. त्यांची दोन मुलेही त्यांच्यापासून नोकरीमुळे दूर गेली. आमच्या चार पिढ्यांना एकत्र कुटुंबाचा अनुभव नाही. त्यामुळे नाटक, सिनेमा आणि टीव्हीत दाखवली जाणारी एकत्र कुटुंबे ही फॅण्टसी वाटतात. कुटुंब तीन कारणांनी तुटत आहे. एक- तरूण शिकण्यास जातात म्हणून. दोन- तरुण पोटापाण्यासाठी गाव सोडण्यास लागते म्हणून. तीन- शहरात शिकण्यास वा उद्योग करण्यास गेलेला मुलगा गावाला परतत नाही. मुली लग्न होऊन घरे सोडतात, तो वेगळाच विषय आहे. एकेकाळी एकत्र कुटुंब म्हणजे तीन पिढ्या एकत्र राहणारी माणसे असा अर्थ होता. गुजरातेत उद्योगधंद्यात असलेली कुटुंबे एकत्र आहेत.

कुटुंबसंस्थेतील जबरदस्त बदल गेल्या काही दशकांतील आहे. पहिली आय.आय.टी. खरगपूरला 1951 साली झाली. त्यानंतर मुंबई, कानपूर, मद्रास आणि दिल्ली या संस्था झाल्या. त्यानंतर मुले परदेशी जाऊ लागली. ‘ब्रेनड्रेन’ अशी हाकाटी सुरू झाली. त्यात मध्यमवर्ग पुढे होता. तसे गुजरातेत घडले नाही. कोणी ‘ब्रेनड्रेन’ अशी बोंब ठोकली नाही. ‘नॅशनल जिऑग्राफिक’च्या सप्टेंबर 2018 च्या अंकात युद्धिजित भट्टाचार्य लिहितात, की 1940 पासून पटेलांची कुटुंबे अमेरिकेत पोचून त्यांनी मोटेल्स सुरू केली होती. आज अर्धी हॉटेले-मोटेले गुजरात्यांची आहेत. ते सहकुटुंब राहतात. उच्चशिक्षित मराठी तरूण नंतर अमेरिकेत गेले. आमच्या महाविद्यालयात बंगाली, दक्षिण भारतीय, राजस्थानी, मराठी सहशिक्षक असतात. ती सगळी त्रिकोणी कुटुंबे आहेत.

_Gujaratmadhill_Kutumbkabila_2.jpgगुजरातेतील महानगरांत एक, दोन, तीन किंवा साडेतीन सदस्य एवढ्यावर कुटुंब रचना आली आहे. म्हणजे कुटुंबकबिला हा शब्दप्रयोग संपला. तरुण जोडपी पहिली मुलगी झाल्यावर थांबतात, पण पहिला मुलगा झाला तर दुसऱ्या वेळेस मुलगी होण्याची वाट पाहतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची दखल कुटुंबात जाहीरपणे तीस-पस्तीस वर्षांपूर्वी घेतली जायची. मामाशिवाय चालायचे नाही. बाळाचे नाव ठेवण्यास आत्या, मावश्या, धाकटी बहीण करवली, प्रत्येकाचे मानपान असा थाटमाट असे. हल्ली भाडोत्री नाती जोडावी लागतात. नाती अदृश्य झाल्याने मंगलप्रसंगी वेगळेच वाटते.

कुटुंबांची ध्येये गेल्या काही दशकांत बदलत गेली. ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव’ हा आशीर्वाद खरा करून दाखवणारे नवराबायको उत्तर गुजरातच्या एका आडबाजूच्या खेड्यात सापडले. आमच्या आधीची कुटुंबे मुलगा केव्हा एकदा मॅट्रिक होऊन नोकरीला लागतो या विचारात असत. नंतर; कर्ज काढू, पण मुलामुलीला उच्च शिक्षण देऊ अशी वृत्ती आता दिसते. कानपूर, पाटणा, जोधपूरपासून चेन्नईपर्यंत मुलीला बडोद्यात हॉस्टेलला ठेवून शिकवणारे आईवडील दिसतात. तू आनंदात स्वतंत्र राहा असे मुलाला सांगू शकणाऱ्या आया आहेत. अमेरिकेत जा, पण सुखी राहा. इतक्या गोष्टी आठवल्या, तरी मन चक्रावून जाते. तशी ‘मी तर लिव्ह इन रिलेशनशिपमधे राहणार’ असे सांगणारी मुलगीही भेटली. मुलगा- मुलगा, मुलगी- मुलगी, अशा जोड्यांचा वास येऊ लागला आहे.

थोडे घराच्या आसपासचे निरीक्षण - आमच्या येथे शंभर घरांची अगदी जुन्यापैकी गुजरात्यांची उमा कॉलनी आहे. त्यांपैकी साठ घरांतील मुले परदेशी गेली आहेत. तेथे घरटी फक्त दोन ज्येष्ठ नागरिक आहेत. काही घरांत विधुर अथवा विधवा एकेकटे आहेत. मुख्य म्हणजे बाह्य स्वरूपावरून सगळे मजेत आहेत. ही झाली एका कॉलनीची गोष्ट. अशा अनेक कॉलन्या आहेत. सर्वत्र परिस्थिती सारखी आहे, पण कोणी कुढत नाही. सगळे आनंदी असतात. गुजराथमधील बहुतेक विभक्त मराठी कुटुंबे धनवान नसली तरी सुखी आहेत.

मुले परदेशी-परगावी गेली, ज्येष्ठ मागे राहिले. त्यांची संख्या वाढली. त्यातून ज्येष्ठ नागरिक संघ, निवृत्तांचे संघ, हास्यक्लब (पूर्वी खुळ्यासारखे हसले की गहजब व्हायचा. आता सर्वमान्य झाले आहे), नाना-नानी उद्याने, जॉगर्स पार्क अशा संस्था जन्माला आल्या आहेत. सगळ्या महानगरांत अनिवासी भारतीयांच्या पालकांच्या संघटना स्थापन झाल्या आहेत. त्यात प्रमुख, उपप्रमुख, कोषाध्यक्ष वगैरे पदे असतात. महिन्यातून एक सभा, नटुनथटून जाणे, सभासदांचे वाढदिवस साजरे करणे, कोणा डॉक्टरचे किंवा आर्थिक गुंतवणुकीबाबत भाषण ऐकणे वगैरे वगैरे.

इमानदारी या एका गुणामुळे मराठी कुटुंबे परप्रांतात सुखी झाली; विशेषत्वाने समृद्ध गुजरातेत. समज जरा कमीजास्त असली तरी चालते, पण इमानदारी माणसांना मोठमोठ्या वादळांतून सहीसलामत बाहेर काढते. एकनिष्ठा आणि इमानदारी, मग ती कामाशी असो, की व्यक्तीशी असो, त्या गुणांनी मराठी माणसे पुढे आली. ज्यांनी ते गुण सोडले ते बुडाले. तीन शतकांत कोण्या मराठी माणसाने घोटाळा, मोठी अफरातफर, लबाडी केलेली ध्यानात आली नाही, तीच त्यांची श्रीमंती. एकेकाळी रेल्वेत पुष्कळ मराठी होते. कापड गिरण्यांत-कारखान्यांत मॅनेजर मराठी असतात. म्हणजे मराठी लोकांनी इमानदारी हा त्यांचा दुर्मीळ गुण पिढ्यान् पिढ्या जपून ठेवला आहे. इमानदारी ही आयुष्यभर सांभाळावी लागते. ती तुकड्या तुकड्यांत तुटक-तुटक चालत नाही. परप्रांती विकासाचे काम केले, की आपोआप परप्रांताच्या विकासाला हातभार लागतो. ते इमानदारीने केले जाते.

मराठी कुटुंबांतून स्वभाषेने गुजरातेतून १९६० नंतर पाय काढण्यास सुरुवात केली. आता मराठी गुजरातमधील मराठी कुटुंबातून माजघरातील बोली उरली आहे. तिशीच्या आतील मुले मराठी वाचत नाहीत. मराठी स्त्रिया त्यांच्याकडील सरपण गुजराती चुलीत सारताहेत. बडोद्यात मराठी वर्तमानपत्रांच्या वीस-पंचवीस प्रती येतात असे पेपरवाला सांगतो. नव्या पिढीची गुजराती आणि सिंधी भाषांबाबत तीच गत आहे. गुजराती, मराठी,  मध्यप्रदेशी, राजस्थानी सर्वसामान्य मध्यमवर्गीय एकाच संस्कृतीत जगताहेत असे लक्षात आले. नुकतेच लग्न झालेल्या परिचित कुटुंबांचे विचार सारखे असतात. ती माणसे मजेत असतात.

माणूस दोन पद्धतींनी सुखी होऊ शकतो. इमानदारीसह अर्थप्राप्ती, चांगले शिक्षण, कौटुंबिक संस्कार, निर्व्यसनी जीवन असे जे कुटुंब समाधानी असेल ते श्रीमंत. श्रीमंती दोन प्रकारची असते- आर्थिक आणि मानसिक. गुजरातचे वेगळेपण दारूबंदीमुळे भारतात उठून दिसते. बहुतेक धार्मिक संप्रदाय व्यसनमुक्त आहेत. स्वामिनारायण पंथात व्यसन त्याज्य असते. वैष्णव आणि जैन दारू पीत नाहीत. शिवाय, ज्याचे दुकान असते तो रात्री नऊपर्यंत दुकानात असतो. त्याला गावगप्पा करण्यास वेळ नसतो. दारूबंदी असलेल्या गुजरातेत सर्वसामान्य कुटुंबांत सुख आहे. मुख्य म्हणजे रस्ते चोवीस तास भयमुक्त असतात असे माझ्या अनेक मैत्रिणींचे मत आहे, कारण चोरून पिणारे पिऊन रस्त्यावर फिरू शकत नाहीत, घरात चुपचाप झोपून जातात.

बसने न जाता चालत जाऊन तिकिटाचे पैसे वाचवणारे बरेच लोक अहमदाबाद-बडोद्यात काही वर्षांपूर्वी होते. ते वाचवलेले पैसे साठवून ठेवत. अशी ही अभिनव काटकसर कुटुंप्रमुख करत. अंबुभार्इ पटेल या आमच्या घरमालकाला चार मुलगे होते. त्यांनी मोठ्या मुलाचे लग्न लावले. मोठ्या भावाने त्याहून धाकट्याचे लग्न खर्चासह लावले. नंतर तशाच पद्धतीने बाकी दोन मुलांची लग्ने झाली. प्रत्येक मुलाला जबाबदारीची जाणीव असावी ही कल्पना. ती प्रथा हल्ली एकदोनच मुले असल्याने पाहण्यास मिळत नाही. तसेच कोणी घरी आले असता, जो लहानात लहान हजर असेल, त्याने उठून सगळयांना पाणी देण्याची प्रथा होती. आता ती प्रथा थांबल्यात जमा आहे. भावाभावांत कुरबुर, भांडणे झाली तरी बहिणीच्या लग्नात सगळे एक होऊन, आर्थिक हातभार लावून लग्न पार पाडतात. आईवडील असेतोवर मुले वेगळी होत नाहीत, कारण उद्योग-धंदा एक असतो.

स्वजातीत लग्न करण्याचे प्रमाण, अपवाद सोडता शंभर टक्के आहे. आजच्या  तरुण-तरुणींचे मत तेच आहे. सहशिक्षणामुळे महानगरांत प्रेमविवाहाचे प्रमाण वाढू लागले आहे. शारीरिक शुचिता पाळण्यातही सैलपणा येत आहे. घटस्फोटाचा बाऊ केला जात नाही. पुन्हा लग्ने होतात. हिंदू-मुस्लिम वगळता आंतरजातीय प्रेमविवाहांना कडवा प्रतिकार होत नाही. गुजरातेत ब्राह्मणाला मान असतो, पण भटजीकडे जेवण्यास जाण्याचे एकेकाळी टाळत. कारण त्यांच्याकडे अनेक घरांतून धान्य आलेले असते!

गुजरातेत बत्तीस प्रमुख संस्थाने आहेत. तशी लहान गावांची संस्थाने बरीच आहेत. त्यांच्या मुलींसाठी संस्थानिकाचा मुलगा शोधावा लागतो. संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांची सोयरिक तंजावरच्या कुटुंबाशी केली गेली होती. तसेच, थेट ग्वाल्हेरपासून अनेक संस्थांनांबरोबर पुढील पिढ्यांचे लग्नसंस्कार झाले आहेत. त्यावरून साधारण कल्पना येईल.

शेतकऱ्यांच्या घरातील महत्त्वाचे निर्णय कुटुंबातील प्रमुख स्त्री घेते. कारण तिचा वावर घरात सतत असतो. आर्थिक निर्णय पत्नीच्या सल्लाने कुटुंबप्रमुख घेतो. नवी सून घरात आली, की सासू स्वैपाकघरात शिरत नाही. सगळी जबाबदारी सुनेवर टाकते. प्रत्येक गुजराती माणसाच्या आयुष्यात ‘घर’ ही बाब सगळ्यात महत्त्वाची असते.

गुजराती घरात संध्याकाळी भात शिजवत नाहीत. त्याऐवजी डाळढोकळी, शेवउसळ, पाणीपुरी, दणगेले असे पदार्थ बनवतात. हल्ली गुजराती कुटुंबांतही सुट्टीच्या वारी हॉटेलांत जेवण्याचे प्रमाण वाढले आहे. स्त्रियांनाही आठवडयातून दोन दिवस सुट्टी हवी असते. स्त्रियापुरुष घर स्वच्छ ठेवतात, पण परिसर स्वच्छ ठेवण्याचे फारसे कोणाच्या लक्षात येत नाही.

लहान गावांत मुलगी सात वर्षाची झाली, की सगळे घरकाम शिकवून लग्नाची होईस्तोवर तिला सुगरण बनवतात. कोणतेही काम लहान नसते, सगळ्या कामांना प्रतिष्ठा असते असे ते मानतात. पटेल आणि बनिया यांची संख्या मोठी असल्याने ते कामात सोवळेओवळे मानत नाहीत. नोकरी करणाऱ्या गुजराती-मराठी कुटुंबांची मानसिकता सारखी होत आहे. आपण आपल्या नातवंडांसाठी काय सोडून जाणार आणि ते कोणती संस्कृती पुढे नेतील असे बडबडणारे ज्येष्ठ नागरिकही भेटतात.’ गेली अनेक वर्षें महाविद्यालयातील मुले पाहत आहोत. आजचा विद्यार्थी आशादायक आहे. तो वेगळा विचार करतो. ईश्वरापासून दूर जातो. त्याचे ज्ञानप्राप्तीचे मार्ग नवे आहेत, पण त्यांचा विश्वास आधुनिक साधनांवर म्हणजे इलेक्टॉनिक मीडियावर आहे. महाविद्यालयातील मुलांची कुटुंबे आणि गुजरातेतील खेडी, गावे आणि मोठी शहरे यांतील कुटुंब परिस्थिती विविध पातळीवर जगणारी आहे. त्यात पाच दशकांतील मानसिकता एकाच वेळी पाहण्यास मिळत आहे.

- प्रकाश पेठे, prakashpethe@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.