भारतातील भाषासमृद्धी


_Bhartatil_Bhasha_Samruddhi_1.jpgभारतात एकूण बोलल्या जाणार्‍या भाषा एकोणीस हजार पाचशेएकोणसत्तर आहेत (2011 ची जनगणना). भाषाशास्त्र बोली आणि भाषा असा फरक करत नाही. जी बोली बोलली जाते ती भाषाच असते. भारतात इतक्या भाषा बोलल्या जातात ही इतर देशांच्या तुलनेने डोळे दिपवणारी बाब आहे. (अनेक लहान भाषा दिवसागणिक नामशेष होताहेत या पार्श्वभूमीवर ही एक चांगली बातमी. यात आतापर्यंत मेल्या त्या भाषा किती याच्या नोंदी नाहीत.) पंधरा ते अठरा हजार भाषा भारतात बोलल्या जातात असे स्थूलपणे समजले जात होते.

दहा हजारांहून अधिक लोक एकच बोली बोलणारे आढळले, अशा भाषांची संख्या आज एकशेएकवीस इतकी आहे. दहा हजारांपेक्षा जास्त लोक एका विशिष्ट मातृभाषेचे आहेत अशा एकशेएकवीस मातृभाषा आढळल्या. मात्र देशात एकशेएकवीस पैकी फक्‍त बावीस भाषा अधिकृत समजल्या जातात. देशात भाषा दहा हजारांपेक्षा जास्त लोक बोलत असतील तरच ती भाषासूचीमध्ये समाविष्ट होण्याची अट आहे. भाषासूचीमध्ये समाविष्ट नसलेल्या भाषा नव्याण्णव आहेत.

भाषासूचीतील भाषा अवगत असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण 96.71 टक्के आहे. म्हणजे 96.71 टक्के लोक भाषासूचीतील सर्व भाषा जाणतात असं मात्र नाही. भाषा सूचीतील बावीस भाषांपैकी केवळ एकेक भाषा 96.71 टक्के लोक बोलतात,  लिहितात वा तिच्यात व्यवहार करतात. भारतातील 96.71 टक्के लोक बावीस पैकी एकाच भाषेची‍ निवड करतात. त्यांना बावीस पैकी एकच भाषा बोलता- लिहिता येते. बावीस पैकी त्यांची एकचएक मातृभाषा असून त्या त्या भाषेत बोलल्या जाणार्‍या लोकसंख्येचे प्रमाण कमी जास्त असेल, पण ते दहा हजार पेक्षा जास्त असेल.

भाषासूचीतील बावीस भाषांपैकी एकही भाषा बोलत नाहीत असे लोक 3.29 टक्के आहेत. भाषासूचीतील भाषा देशातील अनेक लोकांना माहीत नाहीत. म्हणजे भारतातील सुमारे चार कोटी (काटेकोर संख्या सांगायची झाली तर तीन कोटी अठ्ठ्याण्णव लाख नऊ हजार) लोक भाषासूचीत समाविष्ट बावीस भाषांपेक्षा वेगळ्या भाषा बोलतात.

भाषासूचीमध्ये देशाच्या राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट असलेल्या बावीस भाषा अशा आहेत - आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलगु, उर्दू, बोडो, संथाली, मैथिली आणि डोग्री.

भारताची लोकसंख्या एकशेएकवीस कोटी आहे. एकशे एकवीस कोटी लोक एकोणीस हजार पाचशेएकोणसत्तर भाषा बोलतात हे आताच्या खानेसुमारीतून दिसून आले. एकोणीस हजार पाचशेएकोणसत्तर मधून एक हजार तीनशेएकोणसत्तर ‘तर्काधिष्ठित’ मातृभाषा मिळाल्या. तर्काधिष्ठित मातृभाषा म्हणजे ज्या भाषा ओळखू येऊ शकतात त्या नक्की करणे.

_Bhartatil_Bhasha_Samruddhi_2.jpgएक हजार चारशेचौऱ्याहत्तर बोलींचा समावेश ‘अवर्गिकृत’ गटात करून भाषिक यादीतून ती नावे वगळण्यात आली. अवर्गिकृत म्हणजे ज्या भाषांची नावे ओळखू येत नाहीत, ज्या भाषेला विशिष्ट असे नाव नाही, प्रदेश नाही अथवा काही भटक्या लोकांच्या भाषा अशा ‘अवर्गिकृत’ अथवा ‘अन्य’ गटात टाकण्यात येतात. वगळण्यात आलेल्या भाषा बोलणार्‍यांची लोकसंख्या जवळपास साठ लाख इतकी आहे. साठ लाख लोकांच्या बोलण्याला आपण (म्हणजे शासन) काहीही‍ किंमत देत नाही, असा याचा सरळ अर्थ होतो.

हिंदीसदृश्य भाषा बोलणार्‍या लोकांची लोकसंख्या म्हणजे वरून हिंदी-सारख्या वाटणार्‍या भाषांची गणना सरसकट हिंदी भाषिक म्हणून जनगणनेत समाविष्ट केली जाते. (उदाहरणार्थ, राजस्थानातील अनेक बोली, भोजपुरी, मेवाडी आदी). तसेच, महाराष्ट्रात राहणार्‍या पण एखादी बोली (जसे की ‘अहिराणी’) बोलणार्‍या लोकांची भाषासुद्धा मराठी दाखवण्याची करामत जनगणना टीम करू शकते. (उदाहरणार्थ, मराठीची एखादी विशिष्ट घटक बोली कोणी बोलत असेल तर तिचा खास उल्लेख करण्याऐवजी, बोलली जाणारी भाषा मराठी असल्याचे दाखवले जाते- जनगणनेच्या अर्जाच्या विशिष्ट रकान्यात अशी चुकीची माहिती भरली जाते.) या जनगणनेत मराठी भाषकांची संख्या आठ कोटी तीस लाख सव्वीस हजार सहाशेऐंशी एवढी दाखवण्यात आली आहे (म्हणून भारतात मराठी भाषा बोलणार्‍या लोकांची संख्या तिसर्‍या क्रमांकावर दाखवण्यात आली, आतापर्यंत ती चौथ्या क्रमाकावर होती).

या सर्व भाषिक संख्या जनगणनेच्या माध्यमातून आल्या. मात्र त्या काटेकोर असण्याची शक्यता कमी आहे. कारण ही गणना जे कर्मचारी करतात ते हात तटस्थ वा भाषिक आस्था असलेले असतीलच असं नाही. या भाषिक जनगणनेतून देशातील भाषिक पट काही प्रमाणात स्पष्ट होत जातो. हा भाषासमृद्धीचा दस्तावेज हाती आल्यानंतर (2018 मध्ये) या सर्व भाषांच्या संवर्धनासाठी वा व्यवस्थापनासाठी शासकीय पातळीवर उदासिनता दिसून येते, हे अनास्थेचं चित्र जास्त विदारक आहे.

- डॉ. सुधीर रा. देवरे

लेखी अभिप्राय

एक भाषा नष्ट होणे म्हणजेच एक संस्कृती नष्ट होणे..

SAMBHAJI Watharkar30/10/2018

Thanks so much for my published my article again

Dr Sudhir R Deore04/11/2018

Good thing

Rajkumar kale08/11/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.