अनिल शाळिग्राम आणि सिटिपिडिया


माहिती हा सध्याच्या जगातील कळीचा घटक अाहे. माहितीचा वापर विविध कारणांसाठी होतो. मोठ्या कंपन्या माहितीचा वापर मार्केटींगसाठी करतात. ‘थिंक महाराष्ट्र’सारखी संस्था माहितीचा वापर सांस्कृतिक वारशाच्या डॉक्युमेण्टेशनसाठी अाणि चांगुलपणाच्या प्रसारासाठी करते. ठाण्याचे अनिल शाळिग्राम यांनी माहितीचा वापर नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणिव व्हावी यासाठी केला अाणि त्यातून निर्माण झाला सिटिपिडिया!

_citypedia_3.jpgशहरीकरण आणि शहरीकरणाशी संबंधित अनेक समस्या गेल्या पंधरा-वीस वर्षांत वाढल्या आहेत. शहरांच्या गरजा अमर्याद वाढल्या. त्यासाठी व्यवस्थापन संस्थांची गरज निर्माण झाली. नगरपरिषदा, महानगरपालिका अस्तित्वात आल्या- त्यात विविध विषयांचे विभाग, राज्य सरकारप्रमाणे निर्माण झाले. तरीसुद्धा वाढणाऱ्या शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांची व्याप्ती वाढत चालली आहे. प्रत्येक समस्येसाठी वेगळा विभाग- त्याचे कायदे, नियम वेगळे. त्यामुळे नागरिकांपुढे त्यांचे हक्क नेमके कोणते आणि त्यांनी ते कसे मिळवायचे? समस्या कशी आणि कोठे सोडवायची? असे प्रश्न निर्माण झाले. त्या प्रश्नांसाठी व्यासपीठ असावे, ते लोकाभिमुख असावे असे वाटून ठाणे येथील अनिल शाळिग्राम यांनी एका व्यासपीठाची निर्मिती केली. ते ‘सिटिपिडिया’! ठाणे येथील अनिल शाळिग्राम यांनी 26 नोव्हेंबर या लोकशाही दिनाचे औचित्य साधून 27 नोव्हेबर 2017 रोजी ‘सिटिपिडिया’ हा शहरांचा मुक्त ज्ञानकोश मराठी भाषेत उपलब्ध करून दिला.

मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसह महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांचा, तेथील संस्कृती, परंपरा, समस्या यांचा त्यावर सध्या प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. लोकांना विकिपिडिया माहीत असतो, मात्र, केवळ शहरांचा सर्व अंगानी विचार करणारा, शहरांवर भाष्य करणारा हा कदाचित जगातील पहिला मुक्त ज्ञानकोश असेल. विकिपिडियाची प्रणाली सिटिपिडियामध्ये वापरण्यात आली आहे.

अनिल यांचा स्वतःचा माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास आहे. त्यांनी ‘माहिती तंत्रज्ञानातून सामजिक बदल’ या विषयावर मराठी वर्तमानपत्रांतून चारशेहून अधिक लेख लिहिले आहेत. त्यांनी 2002 साली ‘एक गाव एक संगणक‘ ही संकल्पना राबवली. त्यांना त्यासाठी ‘अशोका फेलोशिप’ही मिळाली होती. माहितीचे महाजाल योग्य पद्धतीने हाताळून त्यातून सजग नागरिकत्व निर्माण करण्याची; तसेच, शहरीकरण आणि नागरीकरण यांतून निर्माण होणाऱ्या समस्या, जडणघडण यांवर नागरिकांनी व्यक्त होण्याची गरज निर्माण झाली आहे असे अनिल यांना वाटले.

_citypedia_6.jpgअनिल यांनी भंडारा, बालाघाट, छिंदवाडा या ठिकाणच्या असंघटित कामगारवर्गासाठी काम केले आहे. त्यांनी पुण्यातही कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केले आहे. त्याव्यतिरिक्त ते ‘ठाणे मतदाता जागरण अभियाना‘चे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांना ‘सिटिपिडिया’ची कल्पना तसे काम करत असतानाच सुचली. त्यांच्या मते मुंबई, पुणे, नाशिक अशी सर्व शहरे एका पातळीवर सारखी आहेत, तरी प्रत्येक शहराची संस्कृती, चालीरीती, मानसिकता वेगवेगळी आहे; तेथील बोलीभाषादेखील वेगवेगळ्या अाहेत. त्यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. नागरिकांना स्वतःची मते ही राजकारणाने प्रभावित न होता खुलेपणाने मांडता यायला हवी यासाठी ‘सिटिपिडिया’ हे व्यासपीठ निर्माण केले असल्याचे ते सांगतात. अनिल यांना शहरात वसणाऱ्या प्रत्येकाला त्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळण्यासाठी म्हणून सिटिपिडियाची निर्मिती करणे गरजेचे वाटले. दुसरे म्हणजे राजकारण ते समाजकारण ही संस्कृती समुदायाने निर्माण केली आहे. ती परंपरा आणि इतिहास यांमधून प्रवाहीत राहिली आहे. कोणत्याही समाजाची सामुदायिकता तेथील राजकारण, समाजकारण आणि संस्कृती यांमध्ये यायला पाहिजे.

‘प्रत्येक नागरिकाने घाबरून न जाता व्यक्त व्हावे आणि लिहिते राहवे’ हा ‘सिटिपिडिया’चा मूलमंत्र आहे. शहरामध्ये आरोग्य, वाहतूक, स्वच्छता, नियोजन अशा अनुषंगाने नागरिकांचे अधिकार, कायदे यांवर विचार आणि मार्गदर्शन होणे गरजेचे असते. म्हणून ‘सिटिपिडिया’वर ते सगळे विषय घेण्यात आले आहेत. समस्या वेगवेगळ्या शहरांत समान असतात. त्यामुळे एका शहरातील नागरिकांनी त्याच समस्येवर दुसऱ्या ठिकाणी लोकांनी कसा उपाय शोधला हे कळण्याचा मार्ग ‘सिटिपिडिया’ने खुला करून दिला आहे. व्यासपीठावर तज्ज्ञांचे लेख आहेत. तेथे सतत संपादित होत, प्रवाहित राहणारे लेखही आहेत. कायदेशीर मार्गदर्शन आहे. माहिती अधिकार, नागरिकांचे हक्क- त्यांची अंमलबजावणी यांबद्दलची माहितीपण आहे. स्वराज्य संस्था कशा चालतात याबद्दलचे बोधपूर्ण विवेचनही तेथे आहे. प्रत्येक शहराची खाद्यसंस्कृती, बाजारहाट, सणवार यांचाही अंतर्भाव तेथे करण्यात आला आहे.

‘सिटिपिडिया’ साइटवर जाहिराती घेतल्या जात नाहीत. ‘सिटिपिडिया’ सध्या लोकसहभागातून आर्थिक आणि शाब्दिक मदत मिळून सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नांना बरेच यश गेल्या वर्षभरात मिळाले आहे - झाडे पडल्यामुळे मृत्यू पावलेल्या एका व्यक्तीच्या पत्नीला नोकरी मिळाली किंवा त्यांनी ठाण्यात होणारी मोठी वृक्षतोड थांबवली. ते ठाणे महानगरपालिकेसोबत शिक्षण या विषयावर काम करत आहेत. तरूणाईला दृकश्राव्य माध्यमांतून व्यक्त होण्यासाठी खास जागा देण्यात आली आहे. सिटिझन जर्नलिस्टच्या धर्तीवर त्याच्याही पुढचे हे व्यापक पाऊल आहे असा अनिल यांचा विश्वास आहे. ‘सिटिपिडिया’मध्ये लिहिते होण्यासाठी आधी नागरिकाला त्याचे नाव नोंदवावे लागते.

_citypedia_1.jpgअनिल सोशल मिडियाच्या बाबतीत गंमतीशीर उदाहरण देतात. त्यांच्या मते, फेसबुक हे प्रतिध्वनीसारखे आहे, ट्विटर भोंग्यासारखा आवाज काढू शकतो, वॉट्स अपमध्ये केवळ ग्रूपपुरते चॅटिंग होऊ शकते. मात्र, त्या सर्व ठिकाणचे लिखाण मागे पडते. ते संपादित होऊ शकत नाही. अधिकाधिक लोकांनी ‘सिटिपिडिया’मध्ये सहभागी होऊन त्यांच्या त्यांच्या शहरांबद्दल बोलावे असे अनिल यांचे आवाहन आहे.

अनिल यांच्याबरोबर उन्मेश बागवे आणि संजीव साने यांचाही त्या कामात मोलाचा वाटा आहे.

अनिल शाळिग्राम 9930606952
संकेतस्थळ - http://news.citypedia.net.in/

- तृप्ती राणे, truptiar9@gmail.com

(पूर्वप्रसिद्धी दैनिक 'दिव्य मराठी', 'मधुरीमा' पुरवणी 25 सप्टेंबर 2018)

लेखी अभिप्राय

लक्षवेधी संकल्पनेस मनापासून शुभेच्छा!अधिक माहितीची इच्छा आहे.

वास्तुविशारद च…04/10/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.