जाधवराव यांच्या सव्वातीनशे वर्षे जुन्या समाधीचा शोध


_PatangraoJadhav_Samadhi_2.jpgस्वराज्याचे सेनापती धनाजी जाधवराव यांचे थोरले पुत्र पतंगराव यांच्या समाधीचा शोध लागला आहे. ती चंदन-वंदन किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या जांब-किकली गावात आहे. समाधी सव्वातीनशे वर्षांपूर्वी बांधली गेली असावी असे मत इतिहासप्रेमींनी व्यक्त केले आहे. सेनापती संताजी घोरपडे यांच्या तुकडीची लढाई चंदन-वंदन किल्ल्याच्या पायथ्यास मोगल सरदार हमीदुद्दीन खान याच्या सैन्यासोबत झाली होती. त्यावेळी संताजी घोरपडे यांच्या सैन्यात असलेले पतंगराव जाधवराव मोगलांकडून मारले गेले.

चंदन-वंदन ही दुर्गजोडी साताऱ्याच्या अलिकडे चोवीस किलोमीटर अंतरावर उभी आहे. ते किल्ले माथा सपाट असल्यामुळे पुणे-सातारा मार्गावरून सहजच ओळखता येतात. त्यांच्या पूर्वेस जरंडेश्वर कल्याणगड, भवानीचा डोंगर, पश्चिमेस वैराटगड, पांडवगड. एकीकडे महाबळेश्वर तर दुसरीकडे सातारा शहर. त्या सीमेवर ते किल्ले उभे आहेत. ते किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले (1191-1192 सालचा ताम्रलेख). तो सर्व परिसर ऊसाच्या पिकामुळे सधन झालेला आहे. त्यामुळे रस्ते, वीज, एस.टी. या सर्व प्राथमिक सुविधा गावा-गावापर्यंत पोचल्या आहेत.

पतंगराव मरण पावले त्या युद्धाचे वर्णन सेतुमाधवराव पगडी यांच्या ‘समोगल दरबाराची बातमीपत्रे’ या संग्रहात आढळते. 9 सप्टेंबर 1695 रोजीच्या मोगल बातमीपत्रात हमीदुद्दीन खान याने चंदन-वंदन किल्ल्याखालील वाड्या जाळण्यासाठी फतेहुल्लाखान याला पाठवले होते. संताजी यांना ती बातमी समजली. ते फतेहुल्लाखानवर चालून आले. हमीदुद्दीन खानही तेथे पोचला. युद्ध झाले. धनाजी जाधव यांचा मुलगा, एक मराठा सरदार व अनेक काफर सैनिक यांचा पराजय झाला. गनीम किल्ल्यात जाऊन बसले. खानाने किल्ल्याखालील पेठा जाळून टाकल्या व गुरेढोरे पकडली. त्या लढाईत धनाजी जाधवरावांचे पुत्र पतंगराव जाधवराव मारले गेले असे नमूद केले आहे.

पतंगराव जाधवराव यांची समाधी जांबच्या पूर्वेस, कृष्णा मंदिरासमोरील बागेच्या विहिरीजवळ शेतात आहे. बांधकामाची शैली जाधवराव घराण्याच्या इतर समाधींप्रमाणेच आहे. समाधीकडे वीरगळ अभ्यासक अनिल दुधाने यांचे लक्ष प्रथम गेले. समाधीची बांधकाम शैली व परिसराच्या इतिहासाचा अभ्यास करताना तिचे महत्त्व त्यांच्या ध्यानात आले. इतिहास अभ्यासक दामोदर मगदूम-नाईक, अजय जाधवराव, राजनरेश जाधवराव, रमेश चंदनकर; तसेच, जामचे इतिहासप्रेमी संकेत बाबर यांच्याशी चर्चेतून ती समाधी पतंगराव जाधवराव यांची असल्याचे निश्चित झाले.

जाधवराव घराण्याच्या त्या समाधींवर प्रामुख्याने आढळणारी शरभशिल्प, मयूरशिल्प, गजशिल्प ही चिन्हे त्या समाधीवर आढळतात. समाधीच्या चारही बाजूला पुष्पवेलीची कमान; तसेच, शिवलिंगही आहे. समाधीची लांबी 15.5 फूट, उंची 3.5 फूट तर रुंदी 14.5 फूट आहे. धनाजी जाधवराव यांच्या इतर तीन पुत्रांची समाधी चंद्रसेन जाधवराव (भालकी), संताजी जाधवराव (मांडवे, सातारा), शंभुसिंग जाधवराव (माळेगाव) येथे आहेत.

_PatangraoJadhav_Samadhi_1.jpgनिजामाने लखुजी जाधवराव, त्यांचे पुत्र अचलोजी, रघुजी व नातू यशवंतराव यांची हत्या दौलताबाद किल्ल्यावरील दरबारात फितुरीने केल्याची नोंद आहे. जाधवराव कुटुंबीय त्या घटनेनंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी विस्थापित झाले. त्यामुळे जाधवराव घराण्यातील पराक्रमी वीरांच्या समाधी महाराष्ट्रात सिंदखेडराजा, किनगावराजा, देऊळगावराजा, उमरद रसूमचे जवळखेड, पैठण, निलंगा, ब्रह्मपुरी, माळेगाव बुद्रुक, वाघोली, भुर्इंज, पेठवडगाव या ठिकाणी आढळतात.

धनाजी जाधवराव हे मातोश्री जिजाबाई यांचे पणतू तर पतंगराव जाधवराव हे खापरपणतू होत. छत्रपती राजाराम महाराज यांनी धनाजी जाधवराव यांना जयसिंगराव हा किताब बहाल केला. स्वराज्यासाठी बलिदान देणारे जाधवराव घराण्यातील शंभुसिंह जाधवराव हे पहिले तर पतंगराव हे दुसरे शूर वीर होत.

शिवरायांनी सातारा प्रांत 1673 च्या सुमारास जिंकला; आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसोबत चंदन-वंदन यांनादेखील स्वराज्यात सामील करून घेतले. नव्या संशोधनानुसार शिवाजी महाराजांनी हे किल्ले 1642 ला जिंकून स्वराजाची मुहूर्तमेढ रोवली हे पुढे येत आहे. अफझलखान वधानंतर महाराजांनी साताऱ्याचा किल्ला जिंकून या गडांवर आक्रमण केले व गडाची पूर्वीची नावे शूरगड आणि संग्रामगड बदलून चंदन-वंदन नामकरण केले. पुढे, अमानुल्ला खानाने संभाजीराजांच्या कारकिर्दीत 1685 मध्ये फेब्रुवारी महिन्यात चंदन-वंदन येथे असणाऱ्या मराठ्यांच्या तुकडीवर हल्ला केला. त्या चकमकीत मोगलांच्या हातात पंचवीस घोडी, वीस बंदुका, दोन निशाणे, एक नगारा सापडला. तो सर्व परिसर मराठ्यांच्या ताब्यात 1689 पर्यंत होता. नंतर मात्र तो मोगलांच्या हातात पडला. छत्रपती शाहुमहाराजांनी तो प्रदेश 1707 च्या पावसाळ्यात जिंकून घेतला. पुढे, बाळाजी विश्वनाथांनी त्या किल्ल्यावर दादोपंत यांची नेमणूक 1752 मध्ये ताराबाईवर लक्ष ठेवण्यासाठी पुरेसा फौजफाटा देऊन केली. नंतर तो किल्ला इंग्रजांच्या हातात पडला.

सह्याद्री पर्वताची एक शाखा महादेव डोंगर म्हणून ओळखली जाते. त्याच डोंगरशाखेत किल्ले चंदन-वंदन वसलेले आहेत. चंदनपेक्षा वंदन उंच आहे. साधारण वंदनगड पाच टप्प्यांत तर चंदनगड तीन टप्प्यांत आहे. त्या किल्ल्यांमुळे कृष्णा आणि वासना नद्यांचे खोरे दुभागले जाते. चंदनगड कोरेगाव तालुक्यातील बनवडी तर वंदनगड वाई तालुक्यातील किकली गावामध्ये मोडतो. तसे इनामपत्रांमध्ये नमुद आहे.

चंदन किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील रस्ता पूर्वी बराच कठीण होता. मात्र सध्या तेथे असलेल्या मशिदीमुळे तो रस्ता रुंद झाला आहे. दोन अर्धवट पडलेले बुरूज प्रवेशद्वाराची जाणीव करून देतात. तेथून साधारण पंधरा पायऱ्या चढून गेले असता, डाव्या बाजूस पडकी वास्तू दिसते. तिच्या वरील अंगास वडाचे झाड आहे. तो वृक्ष पाच वडांचा मिळून बनलेला असल्यामुळे त्यास ‘पाचवड‘ असे म्हणतात. बाजूलाच शंकराचे मंदिर आहे. त्यातील महादेवाच्या दोन्ही पिंडी या पाच लिंगांच्या आहेत. ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. श्रावणात तेथे यात्रा असते (तेथून दहा-एक पायऱ्या चढून गेल्यावर समोरच मोठ्या शिळा रचलेल्या दिसतात).

चंदन-वंदन किल्ला
निर्माण कर्ता - दुसरा भोजराजा
निर्माण काळ - इसवीसन 1178 ते 1192
किल्ल्याची उंची- तीन हजार आठशे
किल्ल्याचा प्रकार- गिरिदुर्ग डोंगररांग: सातारा
जिल्हा- सातारा

_PatangraoJadhav_Samadhi_3.jpgचंदनप्रमाणेच, वंदन येथेही एक दर्गा आहे. दर्ग्यात तीस-चाळीस जणांना राहता येते. दर्ग्याच्या बाजूस एखाद्या वाड्याच्या भिंतीसारखे बांधकाम आढळते. एका अर्धवट दरवाज्यासारखे काहीतरी दिसते. तेथील बांधकामाचे अवशेष साधारण सदरेसारखे दिसतात. त्याच्या मागील भागातसुद्धा अनेक उद्‌ध्वस्त अवशेष दिसतात. तीच गडावरील मुख्य वस्ती असावी. गडाच्या उत्तर टोकावर मजबूत बांधणीचा, सुस्थितीत असलेला बुरूज आढळतो. त्याच वाटेवर एक समाधी आढळते. त्याच्या वरील बाजूस अस्पष्ट असे शिवलिंग आहे आणि एका बाजूस मारुतीची मूर्ती आहे. गडाच्या दक्षिणेकडे तीन कोठ्या असलेली पण वरचे छप्पर उडालेली वास्तू आढळते. गावकर्यांयच्या मते, ते कोठार म्हणजे दारूगोळा साठवण्याची जागा होती. गडाच्या मध्यभागी प्रशस्त चौथरा आहे. त्यावर काय वास्तू होती याचा मात्र अंदाज लागत नाही.

चंदनगडावरील वास्तू –
1. चंदनगडावर पंचलिंगी दोन शिवलिंग असलेले महादेव मंदिर.
2. गडावर प्रवेश करतानाच भोज राजाने उभारलेले दोन दगडी मिनार.
3. चंदनगडाच्या मध्यभागी पायापर्यंत बा़ंधलेला चौथरा.
4. गडाच्या नैऋत्य बाजूस दारूगोळा कोठार.
5. गडाच्या वायव्येस बुरूज. त्या शेजारी शिवलिंग असलेली समाधी. समाधीवर एका बाजूला मारूतीची प्रतिमा कोरलेली आहे.
6. एक विहीर – पाणी जुलै ते फेब्रुवारी

_PatangraoJadhav_Samadhi_4.jpgवंदनगडावरील वास्तू –
1. मराठा स्थापत्य शैलीतील प्रवेशद्वार. त्यावर कीर्तिचक्र आणि गणेश प्रतिमा कोरलेली आहे.
2. पहिल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दुसरे प्रवेशद्वार. ते मातीत बुजले आहे.
3. भोजकालिन प्रवेशद्वार - हे द्वार पन्हाळागडावरील प्रवेशद्वाराच्या धर्तीवर बांधण्यात आले आहे. त्याच्यावर एक शिलालेख फार्शी भाषेत तर दुसरा मोडी लिपीत आहे. त्यात यादव राजा सिंघणदेवाचा उल्लेख आढळतो. त्या वास्तूच्या उत्तरेला पुरातन तुरूंग आहे. तुळाजी आंग्रेला तेथेच कैद करून ठेवले असावे.
4. खंदक - गडाच्या पूर्व आणि पश्चिम दिशांना तटबंदीलगत खंदक आहेत. महाराणी ताराबार्इंनी तो बनवून घेऊन तब्बल दोन वर्षें शाहूमहाराजांशी लढाई केली होती.
5. पाच तलाव - वंदनगडावर पायऱ्यायुक्त अशी पाच तळी. पैकी एक बुजले. चार तळी सुस्थितीत.
6. गडाच्या पूर्वेस बालेकिल्ल्याच्या पायथ्याला छप्परवजा महादेव मंदिर.
7. गडाच्या वायव्येस काळूबाई मंदिर.
8. तीन अज्ञात वीरांच्या समाधी.
9. गडाच्या मध्यभागी तीन दालन असलेले कोठार.
10. पुरातन राजवाडा, अवशेषरूपात.
11. एक टेकडी असून तिला बालेकिल्ला म्हणतात. तीवर एका बुरूजाचे व इमारतीचे अवशेष.
12. पडकी घरे :- गडाच्या पूर्वेस तसेच वायव्य दिशेस शेकडो पडक्या घरांचे अवशेष आढळतात.
13. दक्षिणेस चोर वाट.
14. चुन्याचे पूर्वेस एक आणि दक्षिणेस एक प्रमाणे चाके नसलेले घाणे आहेत. गडावर खाण्याची सोय नाही.
15. चार तळी; पैकी तीन तळ्यांतील पाणी पिण्यायोग्य.

- अनिल दुधाने

( मूळ माहितीस्रोत वार्ताप्रसार, जुलै 2018. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’कडून संस्कारित, विस्तारित)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.