संत मुक्ताबाई


_Muktabai_1.jpgमुक्ताबाई या महाराष्ट्रातील संत कवयित्री. त्यांचा जन्म विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात पुण्याजवळील आळंदी येथे 1279 साली  झाला. त्यांचे वडील विट्ठलपंत गोविंद कुलकर्णी यांनी संन्यास घेतला होता, पण त्यांनी पुन्हा संसारात पदार्पण गुरू आज्ञेनुसार केले. विठ्ठलपंतांना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई अशी चार अपत्ये झाली. ती सारी सद्गुणी आणि विद्वान असूनही समाजाने त्यांना संन्याशाची मुले म्हणून हिणवले. त्यांना वाळीत टाकले. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांनी समाजाने त्यांच्या मुलांचा स्वीकार करावा यासाठी, काही धर्मपंडितांनी सांगितल्याप्रमाणे जलसमाधी घेतली.

ज्ञानेश्वरांनी एकदा मुक्ताबाईला मांडे बनवण्यास सांगितले. त्याकरता मुक्ताबाई मातीचे खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेली. विसोबा चाटी हा त्या गावाचा प्रमुख होता. तो त्या चौघा भावंडांचा द्वेष करत असे. त्याने मुक्ताबाईला कोणीही खापर देऊ नये अशी ताकीद केली. त्यामुळे मुक्ताबाईला रिकाम्या हाताने परतावे लागले. तिचा चेहरा हिरमुसलेला पाहून ज्ञानेश्वरांनी योगबळाने त्यांची पाठ तापवून मुक्ताईला पाठीवर मांडे भाजण्यास सांगितले. विसोबा तो चमत्कार पाहून ज्ञानेश्वरांना शरण आले. त्यांनी मुक्ताईने भाजलेले मांडे प्रसाद म्हणून खाण्यासाठी धावतच झडप घातली. त्यावर मुक्ताईने त्यांना खेचर पक्षी असे म्हटले. विसोबांनी तेच नाव धारण केले आणि ते विसोबा खेचर बनले.

योगी चांगदेव एवढा मोठा तपस्वी होता. पण त्याने गुरू केला नसल्याने त्याला ईश्वरदर्शन झाले नव्हते. त्याला कोरा ठरवून त्याला उपदेशाचे पासष्ट श्लोक ज्ञानेश्वरांकडून लिहवून पाठवले. ज्ञानेश्वरांना गुरू करावे असे चांगदेवांना वाटले, पण ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईकडून चांगदेवाला बोध घेण्यास सांगितले. आठ वर्षांची मुक्ताई चौदाशे वर्षांच्या चांगदेवाची आध्यात्मिक गुरु बनली! मुक्ताईने समाजावर नाराज होऊन ताटी म्हणजे दरवाजा बंद करून झोपडीत बसलेल्या ज्ञानेश्वरांचे सांत्वन करणारे अभंग लिहिले, त्यालाच ‘ताटीचे अभंग’ म्हणतात.

ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यावर, निवृत्तिनाथ मुक्ताईला घेऊन तीर्थयात्रेला निघाले. ते तापी नदीच्या काठी आले असताना अचानक वीज कडाडली आणि मुक्ताई त्या विजेच्या प्रवाहात लुप्त झाली! ती घटना 12 मे 1297 रोजी घडली.

- नितीराज शिंदे

nitirajshinde98@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.