तुकाराम खैरनार - कलंदर शिक्षक (Tukaram Khairnar)


_TukaramKhairnar_KalandarShikshak_1.jpgतुकाराम खैरनार हे ‘खैरनारसर’ या नावाने नाशिकमध्ये ओळखले जात. गणित आणि विज्ञान विषय शिकवणे हा त्यांचा हातखंडा होता. त्या विषयांची आवड नसलेले विद्यार्थीसुद्धा शालांत परीक्षेतील गणित आणि विज्ञान विषयांचे उंबरठे खैरनारसरांचा हात धरून लीलया ओलांडू शकत! सरांना त्यातूनच त्यांच्या स्वतःच्या स्थिरतेचा आणि मुलांच्या बौद्धिक प्रगतीचा मार्ग सापडला.

खैरनारसर मूळचे नाशिकच्या सटाणा तालुक्यातील मुंजवाड या गावाचे. त्यांचे माळकरी वडील गावातील कुलकर्णी नावाच्या सधन शेतकऱ्याकडे काम करत असत. घरी भावंडे अनेक. तुकाराम खैरनार यांच्यावर शाळेतील सोनावणे गुरुजी, परदेशी गुरुजी यांचे संस्कार झाले. खैरनारसर त्यांची नावे आदराने घेत असत. सरांवर घरातील धार्मिक संस्कारांसोबत नदीवरून पाणी आणणे, शेतात काम करणे असे श्रमसंस्कारदेखील होत गेलेत. त्यांच्या ठायी मेहनती वृत्ती त्यामधून जोपासली गेली. खैरनारसरांना वाचनाच्या आवडीतून जीवनाकडे बघण्याची सजग वृत्ती लाभली. त्यातूनच त्यांना नवनव्या गोष्टी सतत करून पाहण्याची सवय लागली. खैरनारसरांची यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेण्याची तयारी असे. त्यामुळेच, ते 'खैरनार क्लासेस'च्या यशापर्यंत पोचू शकले. सरांचा ठाम विश्वास नियोजनबद्ध बौद्धिक, शारीरिक कष्ट माणसाला यशापर्यंत घेऊन जातात यावर होता.

खैरनारसरांचा स्वभाव सडेतोड होता. त्यांची समाजमान्य गोष्टींमध्ये समाधान मानून धोपटमार्ग स्वीकारण्याची वृत्ती अजिबात नव्हती. त्यांना स्वत:लाच त्यांनी बीएस्सी पहिल्या वर्षाच्या परीक्षेच्या पेपरमध्ये लिहिलेली उत्तरे पसंत पडली नाहीत म्हणून उत्तरपत्रिकेवर 'Please don't Check' अशी सूचना लिहून ठेवली होती; निकाल अपेक्षितच लागला.

तुकाराम खैरनार यांनी नाशिकच्या कंधाणे गावातील शाळेत नोकरी काही काळ केली. त्या शाळेचा निकाल दोन टक्के लागत असे. खैरनारसरांनी तेथे केलेल्या कामाचा परिणाम असा, की शाळेचा निकाल साठ टक्केपर्यंत वर चढला. तेव्हा त्यांना त्यांच्या ठायी इतरांना शिकवण्याची हातोटी असल्याचे जाणवले. खैरनारसरांनी पुन्हा मुंबई गाठली. तेथे 'पिंगेज क्लासेस'मध्ये नोकरी मिळवली. त्यांनी स्वत:चे खास तंत्र विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी निर्माण केले होते. सर स्वत:च्या शैलीत विद्यार्थ्यांना गणित-विज्ञान शिकवू लागले. त्यांच्या शिकवण्यामुळे 'पिंगेज क्लासेस'च्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली.

'पिंगेज क्लासेस'मधील इतर शिक्षकांनी पगारवाढीसाठी संप पुकारला. तेव्हा सरांनी शिक्षणाचे काम सहकाऱ्यांचा रोष पत्करून सुरू ठेवले. तरी खैरनारसर ‘पिंगेज क्लासेस’मधून बाहेर पडले. ती घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्यास कारणीभूत ठरली.

सरांनी स्वत:चा क्लास स्वत:च्या मनासारखे शिकवता येण्यास हवे आणि विद्यार्थ्यांची उन्नती व्हावी ही उद्दिष्टे ठेवून काढण्यासाठी कंबर कसली. त्यांनी स्वत:चा जम मुंबईतील 'सावंत क्लासेस’ भाड्याने घेऊन बसवण्याचा प्रयत्न केला. सरांचा क्लास आकार घेऊ लागला. सरांच्या शिकवण्याच्या पद्धतीचा परिणाम जाणवू लागला. जवळपास सत्तर-ऐंशी शाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये सरांचे नाव आदराने उच्चारले जाऊ लागले.

सरांचा विवाह 1972 साली झाला. पत्नी कुसुम शिक्षक होत्या. पत्नी बीएड होती. सरांनी त्या बेताला अनेक व्याप सांभाळून बीएडची पदवी प्राप्त केली. सर पत्नीसह परळला रेल्वे क्वार्टरमध्ये भाडेकरू म्हणून राहत असत. सरांनी स्वत:च्या दोन खोल्या कल्याणला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची त्या प्रकरणात फसवणूक झाली; कोर्टकचेऱ्यांचा मनस्तापही झाला. त्या दरम्यान सरांच्या पायाला दुखापत होऊन त्यांना Actinomycosis नावाच्या Fungal Diseaseची लागण झाली. तो काळ सरांसाठी वेदनादायी होता. त्या काळात सरांच्या विचारांना वेगळी आणि महत्त्वपूर्ण दिशा दिली ती ग.प्र. प्रधान यांच्या 'साद देती हिमशिखरे (Towards the Silver Crest of Himalaya)' या पुस्तकाने. सर त्यामुळे जीवनाकडे स्थितप्रज्ञतेने पाहू लागले.

सरांनी अनेकांना मदत केली. ते इतरांच्या अडचणीच्या काळात धावून गेले. त्यांनी इतरांना सहाय्य करण्याची वृत्ती अखेरपर्यंत कायम ठेवली.

खैरनारसरांना त्यांची इंग्रजी भाषा व्हर्नेक्युलर आहे याची जाणीव झाली तेव्हा ते पैजेवर उत्तम इंग्रजी शिकले. पुढे जाऊन त्यांनी 'इंग्लिश स्पीकिंग'चे क्लास सुरू केले. त्यांची ‘एक हजार रुपयांत आठवडाभरात इंग्लिश’ ही योजना नाशकात चांगलीच गाजली. सरांच्या पहिल्या बॅचमध्ये वीस मुले होती. ती संख्या साठ-सत्तर मुलांपर्यंत जाऊन पोचली.

सर निवृत्त झाले. मात्र निष्क्रिय राहिले नाहीत. खैरनार दांपत्याने नाशिकला घर घेऊन तेथे आयुष्याचा उत्तरार्ध नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला. सरांनी घराजवळ छोटी जागा भाड्याने घेऊन पुन्हा क्लासेस सुरू केले. खैरनारसर आयुष्याच्या उत्तरार्धात अनेकांचे ‘मेण्टॉर’ झाले. खैरनारसर सचोटीने जगले. त्यांनी गैरव्यवहार कधीच केले नाहीत. खैरनारसर सांगत, की “मला उदंड मेहनत आणि अखंड शिकवणे यांतून सारे यश मिळत गेले.’’ सरांची जगण्याची, शिकवण्याची स्वतंत्र आणि निर्भीड पद्धत होती. त्यांना तिचा रास्त अभिमान होता. ते त्यांच्या विद्यार्थ्यांना त्याच पद्धतीने, ताठ मानेने जगण्याचे बाळकडू देत असत. सरांनी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'गणित-विज्ञानाशी हातमिळवणी कशी करावी’ या विषयावर अनेक शाळांतून नि:शुल्क व्याख्याने दिली. डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या तब्येतीवर ताण पडू नये याकरता कमी बोलण्याचा सल्ला दिला होता, मात्र सरांना त्यांच्यामधील इतरांशी संवाद साधण्याची ऊर्मी शांत बसू देत नसे. अनेक पालक खैरनारसरांनी त्यांच्या मुलांना शिकवावे यासाठी आमंत्रित करत असत. मात्र तरीही सरांनी अनाठायी आणि अवाजवी शुल्क कोणाकडूनही कधी घेतले नाही. त्यांचे मूलतत्त्व कष्टाचा पैसा खणखणीत वाजतो हे होते.

अनुभवातून, अभ्यासातून आणि व्यासंगातून गवसलेली मूलतत्त्वे दृढ करत त्यांच्या आधारे विद्यार्थ्यांना सक्रिय समजावणे हे खैरनारसरांचे वैशिष्ट्य होते. सर केवळ परीक्षेसाठी नव्हे, तर आयुष्याचे गणित सोडवण्याचीही मुलांची तयारी झाली पाहिजे असे मानत. त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ‘करियर फाउंडेशन’कडे मोर्चा वळवला होता. त्यांनी 'दहावीनंतर काय?' याचे उत्तर विद्यार्थ्यांना-पालकांना मिळावे यासाठी अकरावी/ बारावी/ स्पर्धा अशा परीक्षांच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले होते.

खैरनारसर आयुष्याच्या अखेरपर्यंत नाशिकमध्ये विद्यार्थी-पालकांच्या गराड्यात, पत्नी आणि कुटुंबीयांसोबत उत्साहात कार्यरत राहिले. ते स्वत:च्या प्रयत्नांची वाच्यता न करता, फाजील सत्कारांना कायम फाटा देऊन प्रयोगशीलतेत मग्न राहिले.

त्यांचे प्रेम शिकवण्यासोबत शेतीवरदेखील होते. त्यांनी नापीक जमिनीतून पिके घेण्याचे प्रयत्न चालवले होते.

सरांच्या पत्नी कुसुम समंजस. त्यांनी सरांना त्यांचा कलंदरपणा मन:पूर्वक समजून घेत सर्व स्तरांवर साथ दिली. खैरनारसरांच्या प्रयोगशीलतेचा आणि कलंदर वृत्तीचा त्रास संसारात होऊनही त्या त्यांच्या प्रत्येक प्रयत्नांत सरांसोबत राहिल्या.

सरांचे 7 जुलै 2018 मध्ये ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यामागे त्यांच्या पत्नीसह दोन मुलगे आहेत. ते सुस्थित आहेत. त्यांच्या मोठ्या मुलाचा स्वतःचा व्यवसाय आहे. धाकटा CA-M.B.A आहे; एका विख्यात कंपनीत उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहे.

- अलका आगरकर

alka.ranade@gmail.com

लेखी अभिप्राय

Very Good

Sandeep Shewale02/08/2018

Bhavpurna Shraddhanjali.

Rakhi SONAWANE03/08/2018

I had heard about Shri Tukaram Jadhav sir in 1982 when I was studying in 10th class at Munjwad.Same time I had his tuition class book for 10th students. It was very useful. He was one of the respectable personalities of Munjwad. RIP

Sunil Bhamre04/08/2018

Really great person

Sunil Bhamre04/08/2018

Sir is immortal,ते नाहीत असे वाटत नाही,his life will always motivate many many,

गोरख जाधव04/08/2018

सहवास हवा हवासा वाटणारे व्यक्तीमतत्व

Nitin kapadnis04/08/2018

Great personality

गोरख जाधव04/08/2018

मुंजवडकर असल्याचा अभिमान आहे

साहेबराव जाधव04/08/2018

Bhavpurn shradhanjali

Bhagwan Khairnar05/08/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.