नापास मुलांसाठी चतुरंगी अभ्यासवर्ग


_NapasMulansathi_ChaturangiAbhyasvarg_1.jpg‘चतुरंग’ विद्यार्थ्यांवर 2018 सालच्या एसएससीचा निकाल गुणांची अक्षरश: बरसात करून गेला! आम्ही ‘चतुरंग’चे कार्यकर्ते, ‘निवासी’ आणि ‘निर्धार निवासी’ अभ्यासवर्गाचे विद्यार्थी पालक आणि शिक्षक सारेच आनंदसरींमध्ये न्हाऊन निघालो. ‘चतुरंग’च्या हुशार विद्यार्थ्यांच्या ‘निवासी’ वर्गाचा निकाल प्रतिवर्षीप्रमाणे; शंभर टक्के लागलाच; पण विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नववीतून दहावीत जाताना ‘प्रमोट’ झालेल्या ‘कच्च्या’ विद्यार्थ्यांच्या वर्गाचा निकालही अठ्ठ्याण्णव टक्के इतका लागला. नापासांच्या वर्गातून पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला शहाऐंशी टक्के गुण मिळाले आहेत, तर त्याच वर्गातील चोवीस विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी संपादन केली आहे. हुशारांच्या निवासी वर्गातील नव्वद टक्क्यांहून जास्त गुण मिळवणाऱ्यांची संख्या बावन्न इतकी आहे. त्या वर्गांमधून विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ‘गुणवंत विद्यार्थी सोहळ्या’त भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येते. यावर्षी, तो सोहळा रविवारी, 1 जुलै रोजी चिपळूणच्या ‘ब्राह्मण सहाय्यक संघा’च्या सभागृहात पाककला तज्ज्ञ विष्णू मनोहर, ‘मांडके हिअरिंग सर्व्हिसेस’च्या संचालक कल्याणी मांडके व ‘चतुरंग’ अभ्यासवर्गातील ज्येष्ठ शिक्षक दीपक मराठे यांच्या उपस्थितीत, हृद्य वातावरणात पार पडला.

‘चतुरंग कोकण अभ्यासवर्गा’ने आकार 1986 पासून घेतला. अभ्यासवर्ग प्रकारांवर टप्प्याटप्याने भर दिला जाऊ लागला. श्रृंगारतळी, मार्गताम्हाणे, गुहागर, ओमळी, आबलोली, पालशेत, दाभोळ, वहाळ, पोफळी, रामपूर, देवघर... अशी ‘चतुरंग’ अभ्यासवर्ग केंद्रे आरंभीला नाताळच्या सुट्टीत सुरू झाली. सुमारे दीड-दोन हजार विद्यार्थी त्या आठ दिवसांच्या विनामूल्य मार्गदर्शनवर्गांचा लाभ घेऊ लागले. त्यातूनच, नंतर गोडबोलेसरांच्या प्रेरणेने ‘चतुरंग’ने चाचणी परीक्षेद्वारा निवडक हुशार विद्यार्थ्यांसाठी दिवाळी सुट्टीतील पंधरा दिवसांचा ‘निवासी अभ्यासवर्ग’ ‘वहाळ’ या गावातील ‘न्यू इंग्लिश स्कूल’ येथे सुरू केला. तो वर्ग शाळेचे नंदकुमार काटदरेसर, त्यांच्या सहकाऱ्यांची टीम आणि वहाळकर ग्रामस्थ यांच्या सहकार्याने गेली चोवीस वर्षें चालू आहे.

कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांनी एका सोहळ्यात मधल्या टप्प्यावर ‘चतुरंग’ कार्यकर्त्यांपुढे आव्हानच उभे केले. ते म्हणाले, की हुशार मुलांचे वर्ग तर अनेकजण घेतात, पण तुम्ही ‘नापास’ विद्यार्थ्यांसाठी काही करता की नाही? की ही जबाबदारी फक्त शासनाची आहे, असे समजून त्याकडे तुम्हीही दुर्लक्ष करता? ‘चतुरंग’च्या कार्यतत्पर कार्यकर्त्यांनी तशी नापासांसाठी मार्गदर्शन वर्गाची योजना लगेच केवळ कागदावर आखली नाही; तर ती अंमलातही आणली. नापासांसाठी/प्रमोट झालेल्यांसाठी निर्धार वर्ग दर रविवारी जुलै ते डिसेंबर अशा सहा महिन्यांच्या कालावधीत वहाळ, दाभोळ, आबलोली, पालशेत, गुहागर, तळी यांपैकी तीन-तीन केंद्रांवर सुरू झाले. त्यात इंग्रजी, विज्ञान आणि गणित हे तीनच विषय शिकवले जात. मुंबईहून शिक्षक-कार्यकर्त्यांच्या जोड्या शनिवारी रात्रीच्या गाडी/ एसटीने जात आणि रविवारी रात्रीच्या एसटीने मुंबईस परतत. नापास-प्रमोटेड मुलांच्या त्या ‘निर्धार वर्गा’चे प्रवेशाचे ‘क्वालिफिकेशन’ म्हणजे कोणत्या ना कोणत्या विषयात लाल रेघ! मुले निर्धार वर्गासाठी 1998 सालापासून येत राहिली, शाळांच्या निकालांतही फरक पडत गेला, पण तरीही शिक्षक-कार्यकर्त्यांना म्हणावे तसे समाधान वाटत नव्हते. एका रविवारी शिकवलेला विषय पुन्हा तिसऱ्या रविवारी शिकवावा लागे. मुलांना विषयाचे आकलन मध्ये आठवडा जात असल्याने कमी होई. अनेकदा, समोरचे विद्यार्थीही बदललेले असायचे! काही वेळेस संख्या खूप रोडावायची. त्यामुळे, शिक्षकांचा उत्साह कमी होई. मग ‘निर्धारवर्गा’ची रचना कमी गुणवत्तेच्या मुलांसाठी नव्या पद्धतीने झाली. अनुत्तीर्ण-प्रमोटेड विद्यार्थ्यांसाठी रविवार ते रविवार पठडीचे अभ्यासवर्ग योजण्यापेक्षा, हुशारांच्या निवासी वर्गाप्रमाणेच सलग पंधरा दिवसांचा मुक्कामी पद्धतीचा ‘निर्धार निवासीवर्ग’च योजला जाऊ लागला. ‘निर्धार निवासीवर्गा’ची ही संकल्पना 2004 पासून वास्तवात उतरू शकली, ती ‘सद्गुरु काडसिद्धेश्वर विद्यालय-गुणदे’ या शाळेमुळे, अभ्यंकर पती-पत्नी, यशवंत वाकोडेसर, श्रीकांत काळे, दीपक मराठेसर इत्यादी जुन्या जाणत्या चतुरंगी शिक्षकांच्या मनस्वी मार्गदर्शनामुळे आणि सातत्याने शिकण्यासाठी येणाऱ्या पुण्या-मुंबईकडील शिक्षकमंडळींच्या सहकार्यामुळे! ‘निर्धार निवासी वर्ग’ नववीतून दहावीत जाताना वर चढवल्या-ढकलल्या गेलेल्या प्रमोटेड-कच्च्या मुलांसाठी असतो. त्यांना त्यांच्या दप्तर, पुस्तके, अंथरूण, पांघरूण, कपडे, ताट, वाटी इत्यादींसह ‘चतुरंग अभ्यासवर्गा’त सोळा-सतरा दिवसांसाठी मुक्कामाकरता बोलावायचे. दिवसभरात नऊ तासांच्या वेळापत्रकीय अभ्यासाव्यतिरिक्त विशिष्ट प्रकारच्या दैनंदिनीनुसार प्रातःस्मरण, योगासने, सूर्यनमस्कार, ओंकारसाधना, खेळ, गाणी, गप्पा, व्याख्याने, मनन, चिंतन, ध्यानधारणा अशा विविध अभ्यासेतर प्रकारांचाही अंतर्भाव असतो. त्यामुळे नापास-नापास म्हणून सर्व स्तरांवर हेटाळणी होणाऱ्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाचे बळ मिळते, त्यांच्या अभ्यासप्रयत्नांना योग्य दिशा मिळते. त्यांना अभ्यासाचा कंटाळा न वाटता अभ्यास करावासा वाटतो! महत्त्वाचे म्हणजे ‘चतुरंग’ची सर्व शिक्षक मंडळी मार्कांवर भर न देता, ज्या विषयांची विद्यार्थ्यांना भीती वाटते त्या विषयांची त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न अधिक करतात.

_NapasMulansathi_ChaturangiAbhyasvarg_2.jpg‘निर्धार निवासीवर्गा’च्या पहिल्या दोन वर्षांनंतर, विद्यार्थ्यांनी ‘चतुरंग’ कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले, की आम्हाला मार्गदर्शन उत्तम मिळते ते सगळे अर्धे वर्ष संपल्यानंतर, दिवाळीसुट्टीत! ते जर वर्षाच्या सुरुवातीपासून मिळाले तर अधिक उपयुक्त ठरेल! त्यातून मग ‘पूर्वतयारी वर्ग’ आणि ‘उजळणी वर्ग’ अशी जोड त्या ‘निर्धार निवासीवर्गा’ला दिली गेली. त्यामुळे जूनमधे आठ दिवसांचा ‘निर्धार निवासी पूर्वतयारी वर्ग’, दिवाळी सुट्टीत सतरा दिवसांचा ‘निर्धार निवासीवर्ग’ आणि पुन्हा जानेवारीत आठ दिवसांचा ‘निर्धार निवासी उजळणी वर्ग’ असे एकाच बॅचसाठी वर्षातून तीन वेळा ‘निर्धार निवासीवर्ग’ होऊ लागले. ते वर्ग नित्यनेमाने गेली चौदा वर्षें सुरू आहेत. वर्गांचा फायदा होत असल्याचे त्यांच्या निकालांमधून दिसून येते. पालकांकडून त्यांच्या पाल्यांमधे, त्याच्या वागणुकीत, बोलण्या-चालण्यात, अभ्यास करण्याच्या तयारीतही चांगले बदल झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात. शाळा शिक्षकांकडूनही या उपक्रमाला दाद दिली जाते.

वर्गांच्या निकालाचा आलेख हा दरवर्षी चढत्या क्रमाने जाणारा आहे. नवे सरकारी धोरण विद्यार्थ्याला नापास करायचे नाही किंवा एकूणच, खिरापतीसारखे गुण देण्याचे आहे. पण ‘चतुरंग’च्या ‘निर्धार निवासीवर्गा’तील विद्यार्थ्याला मिळालेले यश हे त्याच्या मेहनतीचे, त्याने केलेल्या निर्धाराचे, ‘चतुरंग’ शिक्षकांच्या चिकाटीचे व परिश्रमाचे आहे असे ‘चतुरंग’ला खात्रीपूर्वक म्हणता येते. ‘निर्धार निवासीवर्गा’तून शहाऐंशी टक्के गुण मिळवून पहिला आलेला संगम रावणंग हा विद्यार्थी म्हणाला, की मी वर्गात येण्यापूर्वी खूप घाबरलेल्या अवस्थेत होतो. पण येथे आल्यावर इंग्रजी, गणित, सायन्स, समाजशास्त्र यांसारखे अवघड विषय शिक्षकांनी इतके सोपे करून सांगितले, की माझा अभ्यास कधी सोप्पा झाला ते मलाही कळले नाही! ‘चतुरंगी’ शिक्षक मंडळी विद्यार्थ्यांच्या मनात तसा आत्मविश्वास निर्माण करणारी आहेत. काही विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यावर कार्यकर्ते म्हणूनदेखील चतुरंग वर्गात हजेरी लावतात! वर्गाच्या यशस्वीतेचे श्रेय हे वर्गातील विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, सर्व शिक्षक मंडळींचे आहे. आम्ही चतुरंगी फक्त निमित्तमात्र!!

विष्णू लाड 2011-12 च्या ‘चतुरंग निर्धारनिवासी वर्गा’चा विद्यार्थी. चिपळूण तालुक्यातील खाडोत्री या छोट्याशा गावातून आलेल्या विष्णूला आई-वडील तर नव्हतेच, पण जवळचे म्हणावे असे नातेवाईकही नव्हते. ‘चतुरंग वर्ग’ हेच त्याचे कुटुंब झाले. त्याला दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळाले. तो तीन-चार वर्षांनी ठाणे येथे भेटला, म्हणाला, “मी येथेच मोटर मॅकॅनिकचा कोर्स केला आणि येथीलच एका नावाजलेल्या ‘मोटर सर्व्हिस सेंटर’मध्ये काम करतो. पण मी माझ्या गावाला विसरलो नाही. पैसे जमा झाले, की माझ्या गावात जाऊन स्वतःचे गॅरेज काढण्याचे ठरवले आहे मी. हे घडू शकले ते ‘चतुरंग वर्गा’मुळेच. नाही तर लहानपणापासून गाड्यांची आवड असणारा मी, फक्त गाड्या पुसण्याचेच काम करत बसलो असतो. गाड्या दुरूस्त करण्याचे शिक्षण घेता येते हा आत्मविश्वास ‘चतुरंग’ने मला दिला.”
जूनच्या पूर्वतयारी वर्गात स्वतःचे नाव सांगायलाही घाबरणारा विष्णू आज माझ्यासमोर ताठ मानेने उभा होता हे पाहून मन कृतार्थतेने भरून आले. ‘चतुरंग निर्धार निवासीवर्गां’मधील असे ‘विष्णू’ समाजात आत्मविश्वासाने वावरताना दिसतात. त्यांच्या आयुष्यातील सुखदुःखात आम्हा कार्यकर्त्यांना वाटेकरी करून घेतात, तीच या वर्गाची श्रीमंती आहे.

- इंद्रायणी दीक्षित
indrayanidixit@yahoo.co.in

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.