सच्च्या राज्यकर्त्या : अहिल्याबाई होळकर


_Ahilyabai_Holkar_1.jpgअहिल्याबार्इ होळकर यांच्याबद्दल इतिहासात कमी माहिती उपलब्ध आहे. मराठा इतिहासातील कर्तबगार स्त्रियांच्या कामगिरीचा लेखाजोखा घेता लक्षात येते, की जिजाबाई, येसूबाई, महाराणी ताराबाई, उमाबाई दाभाडे, लक्ष्मी आंग्रे, दर्याबाई निंबाळकर अशा कर्तृत्ववान स्त्रियांपैकी जिजाबाई आणि ताराराणी यांना पिढ्यानपिढ्यांचा समृद्ध वारसा लाभलेला होता. तसा वारसा अहिल्याबार्इंना नव्हता. त्या पिढीजात मातब्बर घरातून आलेल्या नव्हत्या. तरीही त्यांनी सिद्ध केलेले कर्तृत्व हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला उंचीवर घेऊन जाते.

पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज हे भारतात सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात होते. ब्रिटिश अधिकारी अँलन मँकफरसन याने 7 मार्च 1776 साली त्यांच्या मित्राला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘या देशात मराठे सगळ्यात बलाढ्य आहेत. आपला मुख्य सामना त्यांच्याशीच आहे.’ औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (20 फेब्रुवारी 1707) औरंगजेबाचा मुलगा आझमशाहा याने शाहू महाराजांची कैदेतून मुक्तता केली. त्याच्यानंतर बहादुरशहा बादशहा झाला. त्याचा शिखांशी लढताना लाहोर येथे 17 फेब्रुवारी 1712 रोजी मृत्यू झाला. फारुकशायर त्यानंतर 1715 मध्ये गादीवर आला. त्याने ‘इस्ट इंडिया कंपनी’च्या मागण्या मान्य केल्या. इंग्रज सत्तेने पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली होती. दिल्लीत सतत बदलते दुबळे बादशहा असल्याचा तो परिणाम. मराठ्यांकडील आघाडीवर मोगलांच्या कैदेतून सुटून आलेल्या छत्रपती शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपदाची वस्रे दिली, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव बाजीराव यांना पेशवेपद बहाल करण्यात आले. बाजीरावांच्या काळात राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर आणि उदाजी पवार या सरदारांनी उत्तरेत मुसंडी मारत प्रचंड पराक्रम करून सर्वत्र विजय मिळवला. राणोजी शिंदे यांना उज्जैन, मल्हारराव होळकर यांना इंदूर आणि उदाजी पवार यांना धार येथील चौथाई वसूल करण्यासाठी अधिकार मिळाले. ते तिघेही मातब्बर सरदार घरातील नव्हते, हे विशेष.

होळकर घराणे नीरा नदीकाठच्या होळ नावाच्या गावाचे; म्हणून होळकर नावाने ओळखले जात. बाजीराव पेशव्यांनी मल्हारराव होळकर यांना 1725 मध्ये पाचशे स्वारांची मनसब दिली आणि मल्हाररावांच्या सरदारकीची सुरुवात झाली. बाजीराव पेशवे, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे आणि इतर मराठा सरदार यांनी उत्तर भारतात प्रचंड मुसंडी मारली. त्या धामधुमीत मल्हारराव होळकर यांनी केलेल्या पराक्रमाचे बक्षीस म्हणून त्यांना माळवा प्रांताची जहागिरी मिळाली आणि मल्हारराव इंदूरचे सुभेदार झाले. माळवा प्रांतावरील मराठ्यांच्या सत्तेत होळकर आणि शिंदे दोन मातब्बर सरदार उदयाला आले.

अहिल्याबार्इंचा जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर परगण्यातील चौंढी गावाचे पाटील माणकोजी शिंदे आणि पत्नी सुशीला यांच्या पोटी 31 मे 1725 रोजी झाला. मल्हारराव होळकर त्यांच्या संपूर्ण लवाजम्यासह पुण्याकडे जात असतांना त्यांचा मुक्काम चौंढी या गावी पडला. मल्हाररावांनी अहिल्याबार्इंना बघितले आणि त्यांनी माणकोजी शिंद्यांकडे त्यांचा मुलगा खंडेराव यांच्यासाठी अहिल्याबार्इंना मागणी घातली. अहिल्याबार्इंनी मल्हारराव होळकर यांची सर्वात मोठी सून म्हणून इंदूरच्या होळकर वाड्यात 1733 मध्ये प्रवेश केला. मल्हारराव यांनी अहिल्याबार्इंना बालवयापासून राजकारण आणि समाजकारण यांचे धडे दिले. त्यामुळे अहिल्याबार्इंचा राजकारणात प्रवेश सुकर झाला.

अहिल्यापती खंडेराव यांना त्यांचे पिता मल्हाररावांनी वयाच्या बाराव्या वर्षापासून स्वारीवर नेण्यास सुरुवात केली होती. पेशवाईच्या काळात मराठा सरदार त्यांचे कुटुंब सोबत घेऊन जात असत, त्यामुळे अहिल्याबाई खंडेराव यांच्यासोबत स्वारीवर जाऊ लागल्या. त्यांना युद्धभूमीवरील डावपेच व मसलतीही कळू लागल्या आणि अप्रत्यक्षपणे अहिल्याबाई यांची जडणघडण होऊ लागली. अहिल्याबाई आणि खंडेराव यांना मालेराव आणि मुक्ताबाई अशी दोन अपत्ये झाली. मराठ्यांनी कुंभेरीच्या किल्याला तशातच 17 मार्च 1754 रोजी वेढा घातला. युद्धात खंडेराव होळकर यांचा मृत्यू तोफेचा गोळा लागून झाला. अहिल्याबाई त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर होळकर संस्थानाच्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळू लागल्या. त्याच काळात राघोबादादा, होळकर, शिंदे आणि इतर मराठा सरदारांनी सतलज, बियास, रावी, चिनाब, झेलम आणि सिंधू या नद्या ओलांडून, भोवतालचा प्रदेश पादाक्रांत करत सिंधू तीरावरील अटक या गावी पोचले आणि मराठ्यांचे झेंडे अटकेपार पोचले.

मल्हारराव 1759 च्या सुमारास जयपूरच्या मोहिमेवर होते. त्यांना जनकोजी शिंदे यांचे पत्र प्राप्त झाले, त्यात अब्दालीच्या आक्रमणाची बातमी होती. त्यांनी मदतीला येण्याचे आवाहनही केले होते. मल्हारराव जयपूरची मोहीम अर्धवट सोडून शिंद्यांच्या मदतीसाठी दिल्लीच्या दिशेने निघाले. परंतु दत्ताजी शिंदे 10 जानेवारी 1760 रोजी दिल्लीच्या जवळ कोटपुतळी गावी असताना मारले गेले, जनकोजी शिंदे घायाळ झाले. अहिल्याबाई त्या मोहिमेत सैन्याच्या छावणीतच होत्या. त्या इंदूरला पानिपतावरील युद्धाच्या जखमा सोबत घेऊनच परतल्या. मल्हाररावांचा मृत्यू त्यानंतर सहा वर्षांत 20 मे 1766 रोजी झाला. अहिल्यापर्व तेथे सुरू झाले. त्यांचा मुलगा मालेराव यांना सुभेदारीची सनद मिळाली. मालेराव यांची कारकीर्द अत्यल्प ठरली. मालेरावाचा मृत्यू 20 मार्च 1767 रोजी झाला. होळकर घराण्यातील तिसऱ्या पुरुषाचा अंत झाला होता.

राघोबादादांनी होळकरांचे श्रीमंत राज्य हडपण्यासाठी खेळी सुरू केली. त्यांनी होळकरांचे राज्य ताब्यात घ्यावे किंवा स्वतःच्या मनाप्रमाणे दत्तक घ्यायला भाग पाडावे असे प्रयत्न सुरू केले. अहिल्याबार्इंना आतील गोटातील सर्व बातम्या मिळत होत्या. अहिल्याबार्इंनी त्यांचा मुक्काम महेश्वरला हलवला. तेव्हा राघोबादादा महेश्वरला येण्यास निघाले. अहिल्याबार्इंची पहिली सत्त्वपरीक्षा सुरू झाली होती. त्यांनी तुकोजी होळकरांना फौजेसह हजर होण्यासाठी कळवले. त्यांनी माधवराव पेशव्यांना पत्र लिहून स्वतः कारभार करण्यासाठी अधिकार मागितले. तसेच, सर्व मराठा सरदारांना पत्र लिहून त्यांच्या बाजूने वळवले. मराठे अहिल्याबार्इंच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे अहिल्याबार्इंचा विजय झाला. मराठ्यांच्या इतिहासात प्रथमच एका विधवा महिलेने तिचे अधिकार स्वतःच्या मुत्सद्देगिरीने आणि स्वतःच्या ताकदीवर मिळवले होते. अहिल्याबाई, होळकरांचे सैन्य नीट हाताळत. अहिल्याबाई सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत असे म्हणतात.

अहिल्याबार्इंनी राज्यकारभार सुरू केला तेव्हा घरातील रक्ताच्या नात्यातील माणसे बोटावर मोजण्याइतकी होती. मुलगी मुक्ता, जावई यशवंत फणसे. दोन सख्खे भाऊ शहाजी आणि महादजी. अहिल्याबार्इंनी कारभार हाती घेतला त्यावेळी जी प्रतिज्ञा केली ती महेश्वरच्या वाड्यावर लिहिलेली आहे...

माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे.
माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वतः जबाबदार आहे.
सत्तेच्या अधिकारामुळे मी येथे जे जे काही करत आहे त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरापुढे देणे आहे.
परमेश्वराने ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवल्या आहेत, त्या मला पार पाडावयाच्या आहेत.

अहिल्याबार्इंची जनतेशी असलेली बांधिलकी ही अंत:करणाच्या गाभ्यातून आलेली होती याची अनेक उदाहरणे त्यांच्या चरित्रात सापडतात. गांडापूर परगण्यातील नांदगाव व आजूबाजूच्या परिसरातील गावांत फौजेच्या धामधुमीत बरेच नुकसान झाले होते. त्या गावांची परिस्थिती लक्षात घेता, अहिल्याबाई, तुकोजी होळकर, हरिपंत फडके, चौथाई वसूल करणारे जाधवराव अशा सर्वांनी सर्व प्रकारची मदत परिसरातील गावांना केली होती. परंतु कमाविसदार विठ्ठलपंत यांनी डोळेझाक केली. ते वसुलीचा तगादा लावून थांबले नाहीत तर त्यांनी दांडगटांना हाताशी धरले आणि वसुली सुरूच ठेवली. गावातील गोधाई पाटलीण बाई, काळू पाटील, भवानी कारभारी यांनी अहिल्याबार्इंना पत्र लिहून व्यथा कळवली. अहिल्याबार्इंनी कारभाऱ्यांना सूचना दिल्या, कमाविसदाराला कडक पत्र द्यावे, तरीही न ऐकल्यास दंड करावा किंवा धरून समोर आणावे. हा न्यायनिवाडा बघितला की थेट शिवकाळाची आठवण होते.

अहिल्याबाई यांच्या राज्यात रयतेला न्याय मिळत असे. त्यांनी अनेक विधवांना त्यांच्या पतींच्या मिळकतीवरील हक्क मिळवून दिला. अहिल्याबाई यांच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्याबाई यांनी दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः घेऊन, रीतसर कपडे व दागिने यांचा अहेर दिला.

भिल्ल व गोंड या राज्यांच्या सीमेवर असलेल्या जमाती परंपरागत काळापासून सामानाची पहाडांतून ने-आण करत असत. त्यात लूटमार होत असे. अहिल्याबार्इंनी त्यांना त्यातून कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी डोंगराळ भागातील जमीन दिली आणि प्रामाणिकपणे शेती करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यासोबतच त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर 'कर' घेण्याचा अधिकार दिला.

अहिल्याबाई यांनी त्यांच्या राज्याच्या सीमा ओलांडून संपूर्ण भारतभर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मंदिरे बांधली, नदीघाट बांधले किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला, विहिरी खोदल्या, नवीन रस्ते बांधले आणि जुन्या मार्गांची दुरुस्ती केली. भुकेल्यांसाठी अन्नछत्र उघडले. महेश्वर व इंदूर या गावांची रचना केली. भोपाळ, जबलपूर या शहरांपेक्षा इंदूर सर्व बाबतीत प्रगतीशील राहिले आहे. त्याच्या मागे अहिल्याबार्इंची दूरदृष्टी होती. त्यांनी द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक, परळी वैजनाथ, काशी, गया, सोमनाथ, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी यांच्यासह अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मंदिरे वा धर्मशाळा यांचे बांधकाम केले. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने उध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारी शंकराचे एक देऊळ बांधून दिले.

धनगर समाजात एक पद्धत होती, दिवसभर जी काही कमाई होईल त्यातील चार आणे भाग पत्नीच्या मालकीचा असे. मल्हारराव होळकरांनी त्यांच्या काळापासून ती परंपरा कायम ठेवल्याचे दाखले इतिहासातून मिळतात. मल्हारराव होळकरा यांच्या विनंतीवरून, बाजीराव पेशवे यांच्या 20 जानेवारी 1734 च्या पत्रात मल्हारराव होळकर यांच्या सरंजामाचे खाजगी आणि दौलती असे दोन भाग केल्याचे व त्याप्रमाणे इमान देत असल्याचे म्हटले आहे. त्या परंपरेमुळेच होळकर संस्थानाची भरभराट झाली असावी.

अहिल्याबार्इंनी त्यांच्या शूरवीर कार्यक्षम पतीचे अकाली निधन, मुलाचा अकाली मृत्यू अशा प्रसंगी थोडेही न डगमगता सासरे मल्हारराव होळकर यांना समर्थपणे साथ दिली, समर्थपणे राज्यकारभार केला. त्या पेशव्यांचे राज्य हडप करण्याचे प्रयत्न व नंतरच्या काळात तुकोजी होळकरांचे कारस्थान या सर्वाला पुरून उरल्या.

त्यांच्या राज्यात गर्द वनराईने झाकलेले रस्ते, याचक तृप्त होऊन जाईल असे अन्नछत्र सदैव सुरू असत. पक्षांसाठी पिकलेली राणे राखून ठेवली जाई. त्यांनी स्वप्नवत वाटावा असा राज्यकारभार करून दाखवला. त्या होळकरांच्या राज्याच्या सर्वेसर्वा होत्या. त्या मराठेशाहीच्या आधारस्तंभ होत्या. पेशव्यांनी अहिल्याबार्इंवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या, पैसा मागितला व अहिल्याबार्इ यांनी देखील सर्वाना वेळोवेळी मदत केली. परंतु त्यांना पेशव्यांनी निर्णयप्रक्रियेत मात्र घेतले नाही. दिल्लीच्या पातशहांनी अहिल्याबाई यांची दखल घेतली, शिखांनी वेळोवेळी अहिल्याबाई यांचा सल्ला मागितला. राजपुतांनी वेळोवेळी अहिल्याबाई यांच्यावर विश्वास व्यक्त केला. यातच त्यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा गौरव सामावलेला आहे.

-  कैलास वडघुले

संदर्भ - ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई होळकर (विनय खडपेकर) आणि इतर पुस्तके

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.