शिक्षकांचे व्यासपीठ - नव्या योजना नव्या कल्पना

प्रतिनिधी 01/06/2018

_ShikshakVyaspitha_1.jpgथिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या ‘शिक्षकांचे व्यासपीठ’ या उपक्रमाची बैठक अनेक विधायक सूचनांनी आणि उपस्थितांच्या विविध कार्यक्रम करण्याच्या निश्चयाने भरीव ठरली. बैठकीस शिक्षणक्षेत्रातील सुमारे पस्तीस मंडळी उपस्थित होती. जवळजवळ तेवढ्याच मंडळींनी फोनवर बैठकीस शुभेच्छा देताना, ‘शिक्षकांचे व्यासपीठ’ या उपक्रमास सर्व तऱ्हेचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. बैठकीचे संचालन व्यासपीठाच्या समन्वयक शिल्पा खेर यांनी केले.

शिक्षकांचे व्यासपीठ’ या उपक्रमात मुख्यतः शिक्षकांचे शिक्षणक्षेत्रातील प्रयोग नोंदले जातात. त्यासाठी ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलवर ‘शिक्षकांचे व्यासपीठ’ हे विशाल दालन तयार करण्यात आले आहे. बैठकीस उपस्थित शिक्षणकार्यकर्त्यांनी काही कार्यक्रम हाती घेण्याचे सुचवले. उदाहरणार्थ दीपा ठाणेकर म्हणाल्या, की प्रत्येक व्यक्तीने नजीकच्या शाळेत जाऊन, काही करून पाहवे. तर सुशील शिंत्रे यांनी सांगितले, की शिक्षकांना जसे प्रोत्साहन द्यायचे तसे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन कोण देणार? त्यांनी ‘स्वतःपासून बदल’ हे सूत्र मांडले. शिंत्रे अमेरिकन विद्यापीठात भारतीय शिक्षणव्यवस्थेतील जातियतेसंदर्भात पीएच.डी. करत आहेत. सुनील डिंगणकर यांनी साधने निर्माण करण्यावर भर दिला तर सुबोध केंभावी यांनी इमेल अभ्यासगटाचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी सुचवले, की शाळांमध्ये जाऊन आठवड्याला तास-दोन तास विद्यार्थ्यांशी बोलण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींची यादी बनवावी व त्यांना स्थानिक शाळांशी जोडून देण्याची व्यवस्था करावी. ‘शिवाई विद्यालया’चे माजी प्राचार्य विश्वास धुमाळ यांनी शिक्षकांना घडवण्याचे, त्यांच्यामध्ये मुलांबद्दल आत्मीयता निर्माण करण्याचे उपक्रम घ्यावेत असे सांगितले. त्यांनी स्वतः सुशिक्षित तरुणांचा एक ग्रूप सातारा येथे तयार केला आहे. बोरिवलीच्या उज्ज्वला झारे (मुख्याध्यापक, शेठ गोपालजी हेमराज हायस्कूल) व स्वप्नाली ठाकरे (मुख्याध्यापक, कॉसमॉस हायस्कूल) यांनी भावेशभाई मेहता हे गुजराती माध्यम शाळांसाठी जे काम करतात त्याचे तपशील सांगितले. स्वप्नाली ठाकरे यांचा भर पर्यायी शिक्षणपद्धतीवर होता. नमिता देशपांडे यांनी ठाणे महापालिकेच्या शाळांतील हुशार मुले दुर्लक्षित राहतात असे सांगताना, त्या म्हणाल्या, की ठाणे महापालिकेच्या सुमारे एकशेवीस शाळा आहेत. त्यामध्ये पन्नास संस्था बाहेरून काम करतात तरीदेखील हीच स्थिती आहे. ठाण्यातील ज्येष्ठ मुख्याध्यापक अशोक चिटणीस यांनी नवीन टेक्नॉलॉजीशी शिक्षकांचा संबंध खरोखर किती आहे हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी ‘शिक्षकांचे व्यासपीठ’ या उपक्रमाची माहिती ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ वेब पोर्टलबरोबर अन्य, विशेषत: छापील माध्यमातून द्यावी असे आग्रहाने सांगितले. काही व्यक्तींकडून दालनामध्ये नोंदली जाणारी माहिती लिखित माध्यमासोबत व्हिडिओ माध्यमातूनही नोंदवली जावी अशी सूचना करण्यात आली. बैठकीमध्ये जितेंद्र खेर, दिनकर गांगल, सुदेश हिंगलासपूरकर, सुधीर बडे, धनंजय गांगल अशी मंडळी उपस्थित होती.

_ShikshakVyaspitha_2.jpgसुमारे दोन तास चाललेल्या त्या बैठकीचा समारोप जितेंद्र खेर यांनी केला. ते म्हणाले, की “आजच्या बैठकीतून दोन गोष्टी ठरवता येतील. एक - पुढील तीन महिने 'शिक्षकांचे व्यासपीठ' हे दालन कसे चालेल? याची रूपरेषा आखण्यात येईल. तसेच, उपस्थितांनी सुचवलेल्या वेगवेगळ्या कल्पना एकत्र करून, त्यातील पाच कल्पना निवडता येतील आणि व्यासपीठाच्या पुढील बैठकीत त्यांसंबंधात कृतिकार्यक्रम ठरवता येईल.” मात्र दीपा ठाणेकर, नमिता देशपांडे अशा काही उपस्थितांचा उत्साह मोठा होता. त्यांनी स्वत:पुरती काही कामे आखून घेऊन त्याबाबतचा रिपोर्ट पुढील बैठकीत सादर करण्याचे स्वत:हून मान्य केले.

बैठकीचे प्रास्ताविक करताना व्यासपीठाच्या संयोजक शिल्पा खेर, दालनाच्या कामकाजाविषयी च्या बैठकीत व्यासपीठाची कल्पना स्पष्ट करून सांगताना 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'चे संपादक दिनकर गांगल आणि बैठकीचा समारोप करताना कार्यकर्ते जितेंद्र खेर यांचे व्हिडीओ 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'च्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहेत.

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.