मी आणि माझा छंद


‘संकल्पना’ कोशाचे पाच खंड जवळजवळ बत्तीस वर्षें खपून सिद्ध केले. ते ‘ग्रंथाली’ने 2010-11 मध्ये प्रसिद्ध केले. मी त्यासाठी मराठी, संस्कृत, हिंदी, गुजराती व इंग्रजी या भाषांतील पंचेचाळीस शब्दकोश आणि इतर काही ग्रंथ व लेख यांचा अभ्यास केला होता.

संकल्पना कोशाचे काम संपत आले तेव्हा एक प्रकारचे रितेपण जाणवू लागले. पुढे काय करावे हा प्रश्न मनासमोर उभा राहिला. मग केव्हातरी वाचनात आले, की इंग्रजीत शेक्सपीयर डिक्शनरी आहे. त्यात शेक्सपीयरच्या समग्र वाङ्मयातील शब्दांचे अर्थ, उदाहरणे वगैरे दिलेली आहेत. मनात विचार आला, की मीही त्या धर्तीवर एखादा कोश का लिहू नये?

पण कोणाच्या साहित्यावर? विचार करता करता कालिदासाचे नाव सुचले. कालिदासाने ‘अभिज्ञान शाकुंतल’, विक्रमोवंशीय व ‘मालविकाग्निमित्र’ ही तीन नाटके, ‘कुमारसंभव’ व ‘रघुवंश’ ही महाकाव्ये आणि ‘मेघदूत’ व ‘ऋतुसंहार’ ही ललित काव्ये लिहिली. मी त्या सात साहित्यकृतींपैकी एकही सलगपणे वाचले नव्हते. संस्कृतचा अभ्यास आठवीपासून अकरावीपर्यंत झाला असेल, तेवढाच! संस्कृतचा संपर्क शालांत परीक्षा 1960 मध्ये उत्तीर्ण झाल्यावर तुटला. कारण मी त्यानंतर विज्ञान शाखेतून बी.एस्सी. आणि अमेरिकन विद्यापीठातून केमिकल इंजिनीयरिंग अशा पदव्या संपादन केल्या.

पण ‘संकल्पनाकोश’ लिहिताना आलेल्या अनुभवांची शिदोरी हाताशी होती. त्याआधारे कालिदास कोश लिहिण्याचे मनावर घेतले. मोनियर-विल्यम्स विल्यम्स, वामन शिवराम आपटे व देवस्थळी ह्यांचे संस्कृत-इंग्रजी शब्दकोश आधारभूत मानले. समानार्थी शब्दांसाठी मुळगावकर ह्यांची The Handy English-Sanskrit Dictionary वापरली. संस्कृत व्याकरण व वाक्यरचना समजून घेण्यासाठी आठवी-नववीची क्रमिक संस्कृत पुस्तके आणून त्यांचा अभ्यास केला.

त्यानंतर कालिदासाच्या साहित्यकृती वाचत गेलो आणि जाणवले, की तो नुसताच महाकवी नव्हता, तर महापंडितही होता. त्याने अभ्यासलेली शास्त्रे पाहा – आयुर्वेद, कामशास्त्र, काव्य, ज्योतिष, धर्मशास्त्र, नाट्यशास्त्र, नीतिशास्त्र, मीमांसाशास्त्र, योगशास्त्र वेदांत, व्याकरण, संख्यशास्त्र. त्याखेरीज त्याने रामायण, महाभारत, महाशिवपुराण ह्यांचा जागोजागी उपयोग केला आहे, तो वेगळाच. कालिदासाला शास्त्रे व ग्रंथ मिळून किमान अठरा विषयांचे ज्ञान असावे.

‘मेघदूत’ वाचताना जाणवते, की कालिदासाने रामटेकपासून कैलासापर्यंत प्रवास केला असावा. त्याला पर्यावरण व स्थापत्यकला यांची जाण असावी.

कालिदासाने त्याच्या ज्ञानाचा त्याच्या साहित्यकृतींत त्या सर्वांचा कसा उपयोग केला हे समजून घेण्यासाठी अठरा विषयांचा (कदाचित जास्त) सखोल अभ्यास असला पाहिजे. ते काम जगद्व्याळ आहे ह्याची मला जाणीव आहे. त्यासाठी प्रस्तुत कोशाला ‘कालिदास कोश’ न म्हणता ‘कालिदास शब्दकोश’ म्हणत आहे. तथापी कालिदासाच्या साहित्यातील शब्दांचा केवळ अर्थ न देता इतर अनुषंगिक माहिती जागोजागी दिली आहे.

कालिदास शब्दकोशात कालिदासाने त्याच्या सात ललित कृतीत वापरलेल्या शब्दांचे अर्थ दिलेले आहेत; तेवढेच नव्हे, तर एकच शब्द कोठे कोठे वापरला आहे व तेथील त्याच्या विविध अर्थछटांसह नोंदवले आहे. उदाहरणार्थ, ‘आलीढ’ शब्द घ्या - त्याचा एक अर्थ आहे धनुर्धराने घेतलेला पवित्रा, तर दुसरा आहे चाटलेला, खाल्लेला. दोन्ही अर्थ प्रस्तुत कोशात दिले आहेत, पण धनुर्धराने घेतलेला पवित्रा हा अतिशय मोघम खुलासा आहे. त्याचा अन्यत्र शोध घेऊन त्याचा अर्थ एका परिशिष्टात दिला आहे. त्याचे नाव आहे ‘वीर’. त्याच परिशिष्टात कालिदासाच्या साहित्यात सापडणाऱ्या वीरांची माहिती दिली आहे. अशी अनेक परिशिष्टे पुस्तकाशेवटी जोडली आहेत. त्यावरून कालिदासाच्या शब्दप्रभुत्वाचीच नव्हे तर विद्वत्तेची साक्ष पटेल. उदाहरणार्थ, ‘त्रेताग्नी’ बरोबर त्याने ‘चतुर्थ अग्नी’चा उल्लेख केला आहे. तीन अग्नीबद्दल अन्य कोशात माहिती मिळू शकेल, पण ‘चौथा अग्नी’? पण कोशात तेही स्पष्ट केले आहे.

कालिदास महाकवी होता, यात वाद नाही. त्याचे समकालीन किंवा नंतरचे कवी व भाष्यकारही ते निःसंकोचपणे मान्य करतात. त्या दृष्टीने अनेकांनी शोधनिबंध लिहिले आहेत, पण त्याच्या महापंडितत्त्वावर प्रकाश टाकणारे लेखन फारसे झालेले नाही. त्याच्या काळातील सामाजिक परिस्थिती पेशवाईच्या काळापर्यंत आणि नंतरही टिकून होती. उदाहरणार्थ, जिचा पती परदेशी गेला अशा स्त्रीने म्हणजे प्रोषितभर्तृकेने साजशृंगार करू नये असा संकेत कालिदासाच्या वेळी होता. ती चाल पेशवाईतही होती. कारण एकदा माधवराव पेशवे मोहिमेवर गेले असताना, नाना फडणीसाने रमाबार्इंच्या घरगुती खर्चातून पानविड्याचा खर्च कमी केला होता. विशेष म्हणजे मोहिमेवरून परत आल्यावर माधवराव पेशव्यांनी तो निर्णय मान्य केला होता! ‘मेघदूत’ वाचताना जाणवते, की मेघाबरोबर कालिदासानेही रामटेकपासून कैलासपर्यंत प्रवास केला असावा. त्या भागातील पर्यावरणाची माहिती संकेतस्थळावर (उदाहरणार्थ, गुगलवर) उपलब्ध आहे. त्या वर्णनात आणि ‘मेघदूता’त कमालीचे साम्य आढळते.

कालिदासाचा काळ निश्चित नाही. तो शूद्रकाचा समकालीन मानला जातो. शूद्रकाने ‘मृच्छकटिक’ नाटकांत ‘शाकारी’ भाषेचा उपयोग केला आहे. ती भाषा शाकारांची असून संस्कृतपेक्षा कनिष्ठ प्रतीची मानली जाते. कालिदासानेही शाकारीचा उपयोग केला होता का? तो अभ्यासाचा एक विषय आहे.

त्यावेळी संस्कृत नाटककार कनिष्ठ पात्रांच्या तोंडी प्राकृत भाषा वापरत असत. त्याला कोणीही नाटककार अपवाद नाही. शूद्रकाने कनिष्ठ दर्ज्याची ‘शाकारी’ प्राकृत भाषा वापरली होती. जर कालिदास शूद्रकाच्या समकालीन असेल तर त्यानेही ‘शाकारी’ वापरली होती का? की कालिदास भवभूतीचा समकालीन होता?

आख्यायिका अशी आहे, की भवभूतीने कालिदासाला त्याचे ‘उत्तररामचरित’ हे नाटक वाचून दाखवले होते. त्या नाटकात एक वाक्य होते – ‘अविदित गतयामा रात्रिरेवं व्यरंलीत्’ (घटकापळे गेलेली कळू नयेत अशा प्रकारे रात्र संपून गेली - अर्थात रात्र संपली नि गप्पाही संपल्या!) कालिदासाने ‘रात्रिरेवं’ शब्दातील अनुस्वार काढून टाकण्यास सांगितले. आता ते वाक्य असे झाले - ‘अविदित गतयामा रात्रिरेव व्यरंलीत्’ (घटकापळे गेलेली नाहीत; इतकेच काय आख्खी रात्र नकळत संपून गेली - अर्थात रात्र संपली पण गप्पाही संपल्या नाहीत.)
हे खरे असेल का?

कालिदासाचा विवाह झाला होता आणि पत्नीने हिणवल्यामुळे त्याने कालीची उपासना करून तिला प्रसन्न करून घेतले वगैरे. पण त्याला मुलगा किंवा मुलगी झाली होती का?  नाही तर ‘धन्यास्तंगरजसा मलिनी भवति (बालकांना खेळवल्यामुळे ज्यांची वस्त्रे मलिन होतात, ते लोक खरोखर धन्य होतात.) ह्या वाक्याची संगती लागत नाही. ‘शाकुंतल’मधील एका श्लोकावरून (सर्व नाटकांतील सर्वश्रेष्ठ नाटक ‘अभिज्ञान शाकुंतलम’! - त्या नाटकातील चौथा अंक आणि त्या अंकातील चौथा श्लोक) मला वाटते, की कालिदासाला मुलगी असावी!

हे सगळे विषय संशोधनाचे आहेत. त्यासाठी सुरुवातीला उल्लेख केलेल्या अठरा शास्त्रांचा अभ्यास करावा लागेल आणि त्यासाठी हा ‘कालिदास शब्दकोश’ विशेषतः परिशिष्टे मार्गदर्शक ठरली तर त्यासारखा दुसरा आनंद मला वाटणार नाही.

- सुरेश पा. वाघे

लेखी अभिप्राय

हाँ ग्रंथ नेटवर किंवा दुकानात उपलब्ध आहे का?

Daya22/05/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.