धोमचे नृसिंह मंदिर


_DhomcheNrusiha_Mandir_1.jpgसातारा जिल्ह्यातील वाईपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर धोम धरणाच्या निसर्गरम्य परिसरात त्याच नावाच्या गावी साधारणपणे पेशवेकाळात उभारले गेलेले 'लक्ष्मीनृसिंह मंदिर' आहे. धोम धरण आणि आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आहे, की तेथे आले, की पाय निघण्याचे नाव घेत नाहीत.

वाईमधील सर्व लोक त्या भागाला महाभारतात फार महत्त्व होते असे सांगतात 'विराट राजाची' 'विराट नगरी' म्हणून 'वाई' अशी आणि अनेक वेगवेगळ्या आख्यायिका आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहेत. वाळकी आणि कृष्णा या दोन नद्यांचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या संगमावर धोम नावाचे टुमदार निसर्गरम्य गाव आहे. ते सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले आहे. एका बाजूला पांडवगड, एका बाजूला केंजळगड, तर धरणाच्या जवळ परंतु पलीकडील बाजूला हाकेच्या अंतरावर उभा ठाकलेला 'कमळगड'... ह्या सर्व किल्यांच्या कुशीमध्ये हे धोम गाव लपलेले आहे. 'कमळगडा'च्या पोटामध्ये कावेची विहीर हे वैशिष्ट्यपूर्ण पाषाणशिल्प आहे. मुळातच धोम आणि परिसर यांवर निसर्गाची एवढी कृपा आहे, की साऱ्या बाजूंनी डोंगररांगा आणि हिरवागार परिसर. पर्यटकाचे गावाच्या बाजूने वाहणारी कृष्णा नदी- त्यावर बांधलेले धरण हे सारे काही पाहूनच मन भरते.

पुराणकाळातील ‘धौम्य ऋषीं’चे वास्तव्य त्या भागात होते, म्हणून त्या गावाला ‘धोम’ हे नाव पडले असे सांगतात. त्याच ‘धोम’ गावामध्ये ‘श्री सिद्धेश्वर महादेवा’चे सुंदर शिवालय आहे. त्याचे आवार बंदिस्त आहे. ते शिवालय म्हणजे शिवपंचायतन आहे. मंदिर पाषाणामध्ये उभारलेले आहे. ते पाहत असताना प्रवाशाची नजर खेचून घेतो तो समोरचा नंदी. तो नंदी पाषाणात कोरलेला सुबक आणि रेखीव व देखणा आहे. नंदीची रचना फार कल्पना करून उभारलेली आहे. हा नंदी शिवपंचायतन आणि नृसिंह मंदिर यांच्या मधोमध, एका कमळाच्या आकृतीच्या पुष्करणीची योजना करून त्यामध्ये बरोबर मध्यभागी अडीच मीटर लांबीच्या दगडी कासवाची निर्मिती करून त्याच्या पाठीवर नंदी उभारला आहे. त्याचे अजून वैशिष्ट्य म्हणजे पुष्करणीमध्ये पाणी सोडले जाते तेव्हा कासव त्याच्या पाठीवर नंदीला घेऊन पाण्यावर तरंगत आहे असा भास होतो. ऊन आणि पाऊस यांपासून संरक्षण होण्यासाठी नंदीच्या डोक्यावर सुंदर नंदीमंडप उभारलेला आहे. तो नंदीमंडपही सुंदर बांधणी केलेला आहे. त्यामध्ये अजून एक संकल्पना मांडलेली जाणवते; ती अशी, की कासवी तिच्या पिल्लांना ज्या पद्धतीमध्ये वाढवते त्याप्रमाणे देव त्यांच्या भक्तांना वाढवत असतो!

_DhomcheNrusiha_Mandir_2.jpgनिसर्गरम्य आणि शांत परिसरात वसलेल्या त्या शिवपंचायतनामध्ये प्रदक्षिणा मार्गावर सूर्य, गणपती, महालक्ष्मी आणि विष्णू या देवतांची छोटी सुंदर रेखीव मंदिरे उभारली आहेत. शिवपंचायतनावर केलेले रेखीव नक्षीकाम मनाला भुरळ पाडते.

पुढे जाताना एका उंच अष्टकोनी जोत्यावर  'श्री नरहर-नृसिंह' मंदिर उभारलेले आहे. मंदिरात जाण्यास पायऱ्या खोदलेल्या आहेत. मंदिराच्या आत गेल्यावर पूर्व आणि पश्चिम अशा विरुद्ध दिशांना नरसिंहाच्या दोन स्थापन केलेल्या रेखीव मूर्ती आहेत. त्यांपैकी पूर्वेकडे जी मूर्ती आहे ती हिरण्यकश्यपू याचा वध करणारी असून पश्चिमेकडे असलेल्या 'नरसिंह' मूर्तीच्या मांडीवर साक्षात लक्ष्मी बसलेली आहे. त्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे नृसिंहाचे दोन्ही हात हे गुडघ्यावर टेकलेले आहेत. वरील उजव्या हातामध्ये कमळ असून, डाव्या हातामध्ये शंख धारण केलेला आहे. वटारलेले डोळे, गर्जनेसाठी उघडलेले विशाल मुख, त्यातून दिसणारे वरील आणि खालील जबड्यातील आठ दात; तसेच, दातांमधून बाहेर आलेली जीभ अशी ती मूर्ती आणि तिचे भाव जिवंत वाटतात.

नृसिंह मंदिरामध्ये प्रल्हादाचीदेखील मूर्ती आढळून येते. नृसिंह जयंतीचा उत्सव वैशाख शुद्ध दशमीला मोठ्या प्रमाणात तेथे केला जातो. त्या उत्सवाचा रथदेखील मंदिराजवळ पाहण्यास मिळतो. पूर्वीच्या काळी, त्या देवस्थानामध्ये ठरावीक लोकांना ओलेत्याने जवळून दर्शन घेण्याची मुभा होती आणि बाकीच्या लोकांनी खाली असलेल्या चौथऱ्याच्याजवळ उभे राहून दर्शन घ्यायचे अशी व्यवस्था होती, परंतु आता सर्व मोकळेपणा व सर्वांना मुक्त वावर आहे.

मंदिर परिसरामध्ये उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळ गणपतीचे मंदिर आहे. त्याच्या समोर एका संगमरवरी शिलास्तंभावरील पंचमुखी शिवलिंग लक्ष वेधून घेते. चार दिशांना चार मुख- त्यातील एक मुख हे वरच्या बाजूस आहे. त्या मुखांची नावे ही पुराणानुसार तत्पुरुष, वामदेव, अघोर, सद्योजात आणि ईशान अशी आहेत. ती सगळी पंचमुख शंकराची विविध रूपे आहेत.

- शंतनू परांजपे

लेखी अभिप्राय

Aprtim

Jyoti18/05/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.