ज्ञानप्राप्तीची शोधयात्रा


_Dnyanpraptichi_Shodhyatra_1.jpgमाणूस विचार करतो म्हणजे नक्की काय करतो? तो कसला विचार करतो- कशाच्या आधारे विचार करतो? विचार करून त्याला काय साध्य करायचे असते? तो अनेक वेळा द्विधाच नव्हे तर त्रिधा वा त्याहूनही अधिक पर्यायांचा विचार करतो. माणूस तोच असतो, पण त्याचे एक मन म्हणते अमुक करण्यास हवे, दुसरे मन म्हणते ते अजिबात करता कामा नये! मन एकच पण पर्यायी विचार अनेक, तर प्रश्न हा की माणूस ‘विचार’ करतो म्हणजे नक्की काय करतो?

त्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी ‘विचार’ आणि ‘विचारसरणी’ यांतील फरकही समजून घ्यायला हवा. काही लोक विचार करतात तो विशिष्ट विचारसरणीनुसार! म्हणजे विचार आणि विचारसरणी या दोन भिन्न बाबी आहेत. ‘प्रेरक ललकारी’ने ‘विचारसरणी’ हाच विषय विशेषांकासाठी निवडला आहे. म्हणून त्या प्रश्नावर मुळापासून ‘विचार’ करायला हवा.

विचारसरणी अनेक असतात - समाजवादी, साम्यवादी, उदारमतवादी, हिंदुत्ववादी, इस्लामवादी, भांडवलवादी, पर्यावरणवादी, चंगळवादी, फॅसिझमवादी आणि अशा इतरही काही विचारसरणी दररोजच्या वर्तमानपत्रांत वा टीव्हीवर लोकांच्या वाचनात येतात किंवा कानावर पडतात. मी या लेखात त्या विचारसरणींविषयी लिहिणार नाही तर विचार व विचारसरणी यांच्या निकषांचा ऊहापोह करणार आहे.

त्या निकषांमध्ये एक मुद्दा असतो, की ‘चूक’ काय आणि ‘बरोबर’ काय? कधी कधी, दोन्ही (वा अधिक) पर्यायी विचार ‘चूक’ असू शकतात. म्हणजे ‘इकडे आड तिकडे विहीर’ किंवा ‘आगीतून फुफाट्यात सापडणे’ किंवा ‘धरले तर चावते आणि सोडले तर पळते’ या म्हणींमधून दोन्ही पर्यायी विचार कसे चुकीचे असू शकतात ते स्पष्ट होते.

त्याउलट दोन्ही पर्याय बरोबरही असू शकतात. म्हणजे संभाव्य दोन्ही नोकऱ्या चांगल्याच आहेत. प्रश्न इतकाच, की कोणती घ्यायची? किंवा दोन्ही जागा चांगल्या आहेत पण कोणती घ्यायची? अशी अनेक उदाहरणे व्यक्तिगत जीवनातील देता येतील. पण सरकारला वा एखाद्या कंपनीच्या व्यवस्थापकाला वा वैज्ञानिकाला जेव्हा दोन चुकीच्या वा दोन बरोबर पर्यायांमधून एक निवडण्याचा प्रसंग येतो तेव्हा तो खरोखरच दिङ्मूढ  होतो.

या पर्याय निवडण्याच्या प्रक्रियेत विचारांपलीकडे विचारसरणी येते. काहींच्या मते, विचारसरणी ही एक चौकट आहे, घट्ट बांधलेली. तर काहींच्या मते, विचारसरणी म्हणजे मानवी जीवनाचे, जगाचे आकलन करून घेण्याची पद्धत-घट्ट बांधलेली नव्हे तर स्थळ-काळ यांचा विचार करून निर्माण केलेला पुरेसा लवचीक आकृतिबंध! कोणत्याही विचारसरणीच्या आकृतिबंधाला नैतिकतेचे पदर असतातच. त्यात स्वातंत्र्य, न्याय, समता, माणुसकी अशी नीतिमूल्ये अनुस्यूत असतात. प्रत्येक व्यक्ती किमान दोन स्तरांवर जीवन जगत असते - व्यक्तिगत आणि सामूहिक!

बहुतेकांच्या दैनंदिन जीवनात अपेक्षा वा अपेक्षाभंग असतात. ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडूनच घडत असतात. त्यामुळे जवळजवळ प्रत्येकाने स्वतःच्या भोवती नैतिक कवचकुंडल तयार केलेले असते. तो इतरांच्या वागण्यावर, बोलण्या-चालण्यावर, निर्णयांवर टीका-टिप्पणी त्या नैतिक मापदंडानुसार करत असतो. गंमत म्हणजे सर्वांचे एकमत ‘सर्वत्र एकूणच नैतिक ऱ्हास चालू आहे आणि तो सर्व इतर माणसे अनैतिकपणे वागत असल्यामुळे होत आहे’ याबद्दल असते! व्यक्तिगत जीवनात प्रत्येक जण, स्वतःचे नैतिक निकष बहुतेक वेळा सोयीने ठरवतो. सामूहिक-सामाजिक जीवनाला मात्र ‘कायदामान्य’ नीती लागते.  

प्रत्येकाने स्वतःचे निर्णय घेणे वा वागणे हे मात्र योग्य, नैतिक आणि बऱ्याच अंशी अपरिहार्य असल्याचे गृहीत धरलेले असते. प्रत्येकाचा मापदंड वेगळा किंवा ज्या परिस्थितीत तो व ती असते ती परिस्थिती वेगळी. त्यामुळे त्या प्रत्येकाच्या दृष्टीने त्याचा निर्णय वा वागण्याची रीत योग्य. तो निर्णयही त्याने वा तिने स्वतःशी घेतलेला असल्यामुळे कलह ‘अपरिहार्य’ ठरतो. स्वाभाविकच, प्रत्येकाला दुसऱ्याचे वागणे ‘अयोग्य’ किंवा ‘अनैतिक’ ठरवण्याचा स्वयंभू अधिकारही प्राप्त होतो. सर्वत्र नैतिक अधःपतन चालू आहे असे मानणारी सर्व माणसे इतरांकडून मात्र नैतिक अपेक्षा करत असतात हा एक ‘एथिकल पॅरॅडॉक्स’ म्हणजेच विरोधाभास आहे. न्याय-अन्याय, विवेक-अविवेक असे सर्व विषय नैतिकतेच्या कसोटीवर घासले जात असल्यामुळे ‘नीतिशास्त्र’ नावाची वैचारिक शाखाच जन्माला आली. विशेष म्हणजे माणसाला पडणारे प्रश्न फक्त अन्न-वस्त्र-निवाऱ्यापुरते मर्यादित असतात, तर माणूस करत असलेली कृती नैतिक आहे की अनैतिक, हाही प्रश्न त्याला भेडसावत असतो. डोस्तोवस्कीच्या बहुतेक साहित्यात, विशेषतः ‘क्राइम अँड पनिशमेंट’ या कादंबरीत सर्व कथानक या नैतिक-अनैतिकतेच्या प्रश्नाभोवती गुंफलेले आहे. या कादंबरीत कायद्याच्या नैतिक मर्यादा आणि व्यक्तिगत जीवनातील गुंतागुंतीचे प्रसंग व भावभावनांचा विलक्षण माहोल वाचकासमोर येतो.

कोणत्याही मुद्याला ‘अॅबसोल्यूट’ किंवा पूर्णतः वादातीत असे उत्तर शोधण्याचा प्रयत्न वेदपुराणांपासून सुरू आहे. तसा प्रयत्न सॉक्रेटिसचा अडीच हजार वर्षांपूर्वी होता आणि गांधीजींचा विसाव्या शतकात. सॉक्रेटिसला त्या प्रयत्नातच विषाचा प्याला दिला गेला आणि गांधीजींना हुतात्मा व्हावे लागले. सॉक्रेटिसला माफी मागण्याचा पर्याय दिला होता, पण त्याच्या दृष्टिकोनातून माफी मागणे ‘अनैतिक’ होते. गांधीजींच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्यांना प्रार्थनास्थळी संरक्षक माणूस घेऊन जाण्याची सूचना केली गेली होती. परंतु त्या पवित्र स्थळी शस्त्रास्त्रधाऱ्यांना नेणे हे गांधीजींच्या दृष्टिकोनातून ‘अनैतिक’ होते. सॉक्रेटिस-प्लेटो यांच्या संवादात (‘द रिपब्लिक’ या ग्रंथात) लोकशाही व्यवस्थेचे नीतिशास्त्र मांडले आहे. गांधीजींनी राजकीय नीतीला आध्यात्मिक परिमाण दिले.  

हे ‘मोठ्या’ लोकांचे ‘मोठे’ नैतिक प्रश्न झाले. बहुतेक सामान्य माणसांना दैनंदिन जीवनात सतत नैतिक समस्यांना, ‘डायलेमां’ना, पेचांना सामोरे जावे लागत असते. त्यांपैकी कोणत्याही प्रश्नांना वैज्ञानिक उत्तरे नाहीत आणि तत्त्वज्ञानात तोडगा नाही. नैतिकतेचे निकष आणि मापदंड या दोघांना सत्याचा शोध घ्यायचा असतो, तर नीतिशास्त्रज्ञांना व्यक्तिगत व सामाजिक व्यवहारातील योग्यायोग्यतेचे ‘नियम व नियमन’ निश्चित करायचे असते. वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञ यांना समाज ‘चालवायचा’ नसतो. त्यामुळे ते नीतिनियमांच्या फंदात सहसा पडत नाहीत. परंतु नीतिनियम, कायदे, विचारसरणी यांची सुरुवात समाजातील मतभेद, संघर्ष व कलह यांच्यामुळे झाली.

समाजातील कलहांची सुरुवात खाजगी संपत्ती निर्माण झाल्यानंतर होत गेली आणि म्हणूनच नीतिनियमावली व कायदेही तेव्हापासूनच निर्माण होऊ लागले. कायद्याचा संदर्भही धर्माप्रमाणे सामाजिक रूढी-परंपरांशी असतो. साहजिकच, कायदा बनवणाऱ्या संस्थांना (सुरुवातीस धर्मसत्ता, मग राजसत्ता, मग प्रजासत्ताक राजवटी- विधिमंडळे वगैरे) प्रचलित व्यवहार विचारात घ्यावा लागतो. त्या प्रचलित व्यवहाराचे निकष नैतिकतेच्या गृहितकांवर आधारलेले असतात. म्हणूनच प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याच्या  व्यवहारावर, वागणुकीवर व हितसंबंधांवर नजर बारकाईने ठेवून असते. त्यातूनच भावनिक वा व्यावहारिक अपेक्षा निर्माण होतात. मानापमानाच्या संकल्पनाही ‘अॅब्स्ट्रॅक्ट मॉरल कोड’वर म्हणजे अमूर्त या स्थूल नैतिकतेच्या गृहितकांवर आधारलेल्या असतात. त्यातून हितसंबंध दूर केले तरी परस्परसंबंधांमधील कटुता, मत्सर, असूया, द्वेष, हेवा अशा अनेक मानसिक अवस्था टिकून राहतात. त्यांना सामाजिक समतोलाचे वा मानसिक संतुलनाचे निश्चित असे साधन उपलब्ध नसते. त्यामुळे प्रत्येक माणूस काही नैतिक गृहितकांचा आधार घेतो, तर सगळ्यांची, किमान संबंधितांची गृहितके समान असतील, तर तो कलह आटोक्यात येऊ शकतो वा सुटूही शकतो. सर्वसाधारणपणे ‘कायदा’ नेमके हे काम करतो किंवा तशी अपेक्षा कायद्याकडून असते. परंतु कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी असलेल्या संस्था (म्हणजे नोकरशाही, पोलिस वा दमनयंत्रणा आणि न्यायसंस्था) त्या कायद्याचा अर्थ लावून मग ती अंमलबजावणी करतात. साहजिकच, तो अर्थ लावताना त्या संस्था त्यांचे, त्यांच्या परिसराचे वा त्या परिस्थितीचे संदर्भ घेतात. ते संदर्भही त्यांच्या नैतिकतेच्या गृहितकावर आधारलेले असतात. म्हणून एकाच कायद्याचे परस्परविरोधी अर्थ अनेकदा लावले जातात. इतके कायदे व निकष असूनही (खाप पंचायत ते न्यायव्यवस्था) संघर्ष संपलेले नाहीत.   

सॉक्रेटिस असो वा भगवान बुद्ध, कन्फ्युशियस असो वा आदी शंकराचार्य, येशू असो वा महंमद पैगंबर, महावीर असो वा अलीकडील गुरू नानक, कार्ल मार्क्स वा महात्मा गांधी या सर्वांनी; तसेच, जगभरच्या साधुसंतांनी नैतिकतेचे मापदंड परिपूर्ण अशा तऱ्हेने निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. ते प्रयत्न फसले असे वरवर पाहता वाटू शकेल, परंतु परिस्थिती बदलत गेली, विविध संस्कृती एकत्र येत गेल्या, परिणामी, सांस्कृतिक संघर्ष वाढत गेले आणि त्यामुळे सामायिक अशी नीती-नियमावली करणे कठीण होत गेले. परंतु तो शोध थांबलेला नाही, थांबणारही नाही; कारण मानवी संस्कृतीचे सर्वात प्रगल्भ आणि व्यवच्छेदक लक्षण मानवाचे नैतिकतेचे भान हेच आहे. त्या नैतिकतेचे वैश्विक विचारशिल्प म्हणजे विचारसरणी -सतत उत्क्रांत होणारी. विचारसरणी हा सापळा नाही. वैचारिकतेला नैतिक-सामाजिक शिस्त आणणे म्हणजे विचारसरणी.  

जगण्याला असा ‘हेतू’ असणे हे बरेच अलीकडले, म्हणजे काही हजार वर्षांपूर्वीचे आहे. ज्याप्रमाणे माणसाला ‘मन’ आहे हा शोध त्याला कधी, कोठे व केव्हा लागला हे सांगणे अशक्य आहे, त्याचप्रमाणे जगण्याला ‘हेतू’ असला पाहिजे, जीवनात काहीतरी साध्य केले पाहिजे, जग व जीवन ‘अमक्या स्वरूपाचे’ असले पाहिजे आणि ‘तमक्या स्वरूपाचे’ असता काम नये अशा प्रकारचा विचारही नक्की केव्हा, कोठे, कधी प्रथम रुजला हे सांगणे कठीण आहे. भारतीय, चिनी, ज्यू विचारवंत-इतिहासकार मात्र असे दावे करत आले आहेत, की सर्वात प्राचीन व मूलभूत चिंतन त्यांचेच आहे. असो. परंतु जीवनावर ‘हेतू’चे, ‘ध्येया’चे उद्दिष्टाचे हे कलम केल्यानंतरच खऱ्या अर्थाने इतिहासाला सुरुवात झाली. तोपर्यंतच्या टोळीसदृश व नंतरच्या शेतीप्रधान समाजाला तसे उद्दिष्ट नव्हते, हेतू नव्हता, कोठल्या ध्येयाने प्रेरित होण्याची पद्धत रूढ झालेली नव्हती आणि ‘धर्म’ या संकल्पनेचा उदय व्हायचा होता. प्रत्येक ‘हेतू’भोवती रूढी, परंपरा, संघटना यांच्या प्रयत्नांतून विचारसरणीचे एक जाळे उभारण्यात आले. त्यातून गट, पक्ष, संस्था आणि पुढे सशस्त्र दले निर्माण झाली. सत्ताधीशाला ‘धोरण’ हवे आणि त्या ‘धोरणा’मागे हेतू हवा. तो ‘हेतू’ हेच आदर्शवादाचे समर्थन ठरवले गेले आणि प्रत्येक कृतीमागे ‘हेतू’ काय असेल याचा शोध सुरू झाला.

माणसाच्या जीवनाचे ध्येय ‘राष्ट्रवाद’ आहे असे काही जण अभिमानाने सांगतात. परंतु राष्ट्र’ ही संकल्पनाच अडीच-तीनशे वर्षांत उदयाला आली. ती संकल्पना अजून वादग्रस्त आहे. त्यामुळे ‘राष्ट्रवाद’ हा विचार प्राचीन नाही. काही जण धर्म-सिव्हिलायझेशन-संस्कृतीला राष्ट्र ही संकल्पना जोडतात. त्यातून ‘हिंदू राष्ट्र’, ‘ज्यू राष्ट्र’ वा ‘इस्लामिक राष्ट्र’ अशा धर्म-राष्ट्र आधारित विचारसरणी निर्माण होतात. परंतु त्यांचे स्वरूप त्या धर्म-संस्कृतींशी व संकल्पित राष्ट्राशी निगडित असते. त्यामुळे त्यांना सर्वंकष, वैश्विक विचारसरणीचा दर्जा व प्रतिष्ठा येणे शक्य नाही. काहींनी सद्यकाल हे ‘ज्ञानयुग’ सुरू आहे, अशी मांडणी करून ‘ज्ञान-विज्ञान’ विचारसरणी मांडली आहे. पण ‘ज्ञान’ ही एक वस्तू झाली आहे. म्हणूनच ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट’ ऊर्फ ज्ञानसंपदेसंबंधातील हक्काबद्दल एक संहिता आणि कायदा केला गेला आहे. ‘ज्ञाना’चे हे वस्तू व मूल्यरूपांतर भांडवलशाहीच्या उदयानंतर होऊ लागले हे खरे, ते गेल्या पन्नास वर्षांत (विशेषतः गेल्या वीस वर्षांत) सर्वव्यापी झाले आहे. त्यामुळेच ज्ञानाची ‘योग्य’ ती किंमत मोजावी लागते, संशोधनाला योग्य तो ‘भाव’ द्यावा लागतो, त्यासाठी योग्य त्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते! फक्त संशोधन नव्हे तर एखादी कविता, संगीत, कादंबरी वा नाटक यांबाबतची संकल्पना वा त्या कृतीची संहिता, गाण्याची चाल हे सर्व ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट’मध्ये येते - जसे छायाचित्र, चित्रपट, चित्रकलाही!

परंतु गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगणाऱ्या आयझॅक न्यूटनचा वा गुरुत्वाकर्षणाची मर्यादा भेदून जाऊ शकेल असे पहिले विमान बनवणाऱ्या राइट बंधूंचा ‘हेतू’ पैसे, प्रतिष्ठा व कीर्ती हा नव्हता. न्यूटनला वा राइट बंधूंना, कोपर्निकसला वा आइनस्टाइनला झपाटले होते ते विश्वातील गूढांनी. अगदी वेगवेगळ्या क्षेत्रांतील उदाहरणांनीही ‘हेतू’ आणि जगण्यातील ध्यास व आनंद यांचा मागोवा घेता येईल. त्यामुळे त्यांनी ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट’चा दावा केला नाही. शेक्सपीयर किंवा ज्ञानेश्वर यांनी ‘कॉपीराईट’ मागितला नाही! परंतु भांडवलशाहीचा विस्तार व विकास यांबरोबर ज्ञान-विज्ञान हीदेखील ‘प्रॉपर्टी’ झाली आहे!       

‘ज्ञान’ हा अर्थव्यवस्थापनातील महत्त्वाचा घटक गेल्या वीस-पंचवीस वर्षांत ठरू लागला आहे. ‘ज्ञान’ हा संपत्तिनिर्मितीचा मुख्य घटक म्हणून आहे. म्हणजेच वरकरणी ‘हेतू’ काय तर ‘ज्ञान’ असे वाटेल, पण प्रत्यक्षात हेतू मात्र संपत्तिनिर्मिती हा असतो. साहजिकच, ज्या ज्ञानामुळे लाभ होणार नाही त्या ज्ञानाच्या फंदात फारसे कोणी पडणार नाही. उपयुक्ततावाद हे व्यवहारवादी तत्त्वज्ञानाचे एक अंग आहे आणि आधुनिक व्यवहारवाद हा भांडवलशाहीच्या बाजारपेठीय तत्त्वज्ञानाचा भाग आहे. परंतु त्याचबरोबर हेही लक्षात ठेवण्यास हवे, की गेल्या काही वर्षांतील ‘सिव्हिलायझेशनल’ इतिहास हा भांडवलशाहीच्या इतिहासाबरोबर वाढला आहे. त्यामुळे ज्ञानविस्तार व संशोधन थांबले नाही. आता तर, व्यवहारवाद आणि उपयुक्ततावाद यांना ‘प्रॅग्मटिझम’ आणि ‘युटिलिटरिऍलिझम’ नावाने थेट विचारसरणीचा दर्जा देण्याचा प्रयत्न आहे. तो अर्थातच घातक आहे.      

परंतु व्यक्तिगत पातळीवर मात्र संगीतात आणि गणितात, वैद्यकीय क्षेत्रात आणि सॉफ्टवेअरमध्ये; तसेच, इतर काही क्षेत्रांत ज्ञान हाच जीवनाचा ध्यास व हेतू मानणारे लोक काम करत आहेत. कदाचित त्यांच्या ज्ञानाचेही मूल्यांकन व वस्तुरूपीकरण पुढे होईल; पण या घडीला, ते विशुद्ध ज्ञानप्राप्तीच्या शोधयात्रेत आहेत. आधुनिक मानवी इतिहास जसा अलेक्झांडर, नेपोलियन, लेनिन वा माओ यांनी घडवला आहे, तसाच तो ‘ज्ञानध्यासी’ व्यक्तींनी समृद्ध केला आहे. दोघांच्या जीवनाला आणि एकूणच जगण्याला ‘हेतू’ होता. तो हेतू अलौकिक होता - त्या अलौकिकतेतूनच हे लौकिक ‘सिव्हिलायझेशन’ निर्माण झाले!

एक लक्षात ठेवण्यास हवे, की माणसाने त्याच्या विचारातून, प्रज्ञेतून, सर्जनशीलतेतून, अनुभवातून आणि सामाजिक जीवनातून पर्यायी विश्व निर्माण केले आहे. अर्थातच, ते या भूतलावरचे पर्यायी विश्व आहे! मूळ विश्व नसते तर हे पर्यायी विश्वच निर्माण झाले नसते. आता तर वैज्ञानिक म्हणतात, की विश्व एक नाही. विश्वे अनेक आहेत. ती सर्व विश्वे मिळून त्या अथांगतेला एक समग्र विश्व म्हणून संबोधता येऊ शकेल. माणसाचा तो अथांगतेचा शोध चालूच राहील. निदान पृथ्वीवर जन्माला आलेल्या बाकी कोणत्याही प्राणिमात्राला तसे विचारविश्व उभे करता आलेले नाही. त्याचा अर्थ मुंगी असो वा हत्ती, डास असो वा देवमासा, ते विचारच करत नाहीत असा होत नाही. त्यांच्या ‘विचारा’ला जगणे, खाणे-पिणे, पुनरुत्पादन करणे इतके मर्यादित स्वरूप असते. माणसाने बाकी प्राणिसृष्टीला असलेल्या सर्व मर्यादा ओलांडून जे जीवन निर्माण केले आहे त्याचा आधार ‘विचार’ हा आहे आणि आकृतिबंध ‘विचारसरणी’ हा आहे.

(‘प्रेरक ललकारी’च्या सौजन्याने)

- कुमार केतकर

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.