येळीव (Yeliv)


_Yeliv_2.jpgयेळीव हे गाव सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यात आहे. तो भाग देशावरील किंवा पश्चिम महाराष्ट्रातील असा संबोधला जातो. त्या गावाची लोकसंख्या एक हजार सहाशेपर्यंत आहे. येळीव हे गाव तलावाकरता प्रसिद्ध आहे. त्या तलावात बारमाही पाणी असते. तलावात वेगवेगळ्या प्रकारचे मासे आढळतात. तलावामुळे तेथे विविध पक्षी पाहण्यास मिळतात. गावात ओढा आहे.

त्याच प्रकारे गावात कॅनॉलही आहे. गावाच्या आजूबाजूला डोंगर आहे. गावात श्री लक्ष्मी, विठ्ठल, हनुमान, महादेव, खंडोबा, ज्योतिबा अशी मंदिरे आहेत; बौद्ध विहारही आहे. ग्रामदैवत दख्खनचा राजा ज्योतिबा आहे. ज्योतिबाची आणि हनुमानाची यात्रा मे महिन्यात भरते. यात्रेत पालखी काढली जाते. यात्रेच्या दिवशी संपूर्ण गावभर ज्योतिबाच्या काठ्या नाचवल्या जातात.

गावात मराठी आणि सातारी भाषा बोलली जाते. येळीवमध्ये प्राथमिक शाळेची सोय आहे. विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी लाडेगाव फाट्यावरील शाळेत, औंधमध्ये, पुसेसावळीत या आसपासच्या गावांत किंवा कराड तालुक्याला जातात.

_Yeliv_3.jpgगावात जास्त प्रमाणात जगताप-देशमुख नावाचे लोक राहतात. तेथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. काही लोक जवळच असलेल्या लाडेगाव फाट्यावरील हरणाई सूतगिरणीमध्ये काम करतात. काही लोक नोकरी करतात, काही लोक ट्रॅक्टर-टेम्पो-जीपगाडी चालवतात. दुधगाडी दूध नेण्यासाठी औंध व पुसेसावळीतून येते. लोक ऊस, बटाटा, भुईमूग, कडधान्ये, गहू, ज्वारी, कांदा, हरभरा या पदार्थांचे उत्पादन घेतात. डाळिंब, आंबा यांच्याही बागा आहेत. गावात बाजार भरत नाही, परंतु मंगळवारी औंधमध्ये आणि बुधवारी पुसेसावळीत बाजार भरतो. गावकरी त्यांचा भाजीपाला विकण्यासाठी त्या बाजारांत नेतात. गावात शेतीबरोबर दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन, पशुपालन केले जाते. गावात बर्‍याच घरांत बैल आणि बैलगाडी दिसून येते. शेतीकामासाठी बैलांचा वापर केला जातो.

औंधपासून एसटीची व्यवस्था आहे. पुसेसावळी मार्गे आल्यास लाडेगाव फाट्यावरून पायपीट करत यावे लागते. मात्र बाजाराच्या दिवशी गावातून जीपगाडीची व्यवस्था असते. काही लोक पारंपरिक शेती करतात. वातावरण उष्ण असते. त्यामुळे उन्हाळ्यात गावातील विहिरींवर मुलांची गर्दी असते. बहुतेक लोक मुंबईला स्थायिक आहेत. ते सुट्टीकरता येतात.

_Yeliv_4.jpgजवळच, ब्रिटिश काळातील औंध संस्थान आहे. लाडेगाव, उचीठाणे, करांडेवाडी, पळशी ही येळीवच्या आजुबाजूची गावे आहेत.

माहिती स्रोत : हणमंत शिंदे - 9892716416, छायाचित्रे - निखिल शिंदे.

- नितेश शिंदे

लेखी अभिप्राय

खुपच छान माहिती.

Nitiraj06/05/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.