उत्तराच्या शोधात प्रश्नचिन्ह शाळा!


_UttarachyaShodhat_PrashnachinhShala_1.jpgमतिन भोसले याने भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात पाटी-पुस्तक दिले आहे. त्या मुलांनी शिकारीची हत्यारे आणि फासे टाकून हातात पेन पेन्सिल धरली आहेत. मतिनकडे तशी साडेचारशे मुले आहेत. मतिनच्या शाळेचे नाव आहे 'प्रश्नचिन्ह!'

प्रश्नचिन्ह ही आदिवासी आश्रमशाळा. ती अमरावती जिल्ह्याच्या नांदवाग खंडेश्वर तालुक्यात अाहे. नागपूर-औरंगाबाद आणि अमरावती-यवतमाळ हे हमरस्ते परस्परांना शिंगणापूर येथे छेदतात. तो शिंगणापूर चौफुला. प्रश्नचिन्ह शाळा त्या चौफुल्यापासून पश्चिमेस साधारण पाच किलोमीटरवर मंगरूळ चव्हाळा येथे आहे. अमरावती जिल्ह्यात पारधी समाजाचे बेचाळीस बेडे आहेत. मोठ्या बेड्यात नऊशेपर्यंत लोकसंख्या असते. मंगरूळ चव्हाळा बेड्याची लोकसंख्या सातशेपन्नास आहे. मतिन भोसले नववीत असताना त्याने 'दिव्य सदन' या ख्रिश्चन संस्थेबरोबर काम केले होते. त्याने धानोरा, जगतपूर, शिवरा, मंगरूळ चव्हाळा येथील बांधवांना सोबत घेऊन त्यांच्यावर ब्रिटीशांच्या काळापासून बसलेला चोरीचा शिक्का पुसण्यासाठी, त्यांना हक्काची जमीन मिळावी म्हणून, जातीची प्रमाणपत्रे मिळावीत म्हणून मोर्चे काढले होते. आंदोलने केली होती. मतिनने पुढे समाजातील मुलांच्या शिक्षणाचा ध्यास घेतला. त्याची त्यासाठी शोधमोहीम सुरू झाली. त्याने नागपूर, औरंगाबाद, मुंबई, छत्तीसगड अशा ठिकठिकाणी. पुलाखाली राहणारी, रेल्वेस्टेशन, ट्राफिक सिग्नल येथे उभे राहून भीक मागणारी अशी एकशेअठ्ठ्याऐंशी मुले एप्रिल-मे 2012 मध्ये गोळा केली. मतिनने त्यांच्या पोटापाण्यासाठी गहू, कडधान्य गोळा केली. शिकारदेखील करावी लागली.

मतिनला मुले सांभाळायची होती. त्याने बेड्याशेजारी रिकामे पडलेल्या सरकारी गोडाऊनचे कुलूप तोडले. मुले त्यात राहू लागली. तीच शाळेची सुरवात. मतिनसमोर मुलांना एकत्र टिकवून ठेवणे हे पहिले अाव्हान होते! दुसरे अाव्हान त्या अादीवासी मुलांच्या हक्कासाठी, सरकारला जागे करण्यासाठी शिक्षणाच्या लढाईचे! त्या शाळेतील मुलांच्या शिक्षणाची सुरुवात आंदोलनाने झाली. 'भीक मागो आंदोलन!'

मतिनचे तर कार्यकर्ते आणि सर्व मुले सरकारी कार्यालयात जाऊन त्या अांदोलनाची भूमिका, त्यांच्या मागण्या सांगायचे. एक रुपयांची भीक मागायचे. कोणी डब्यात एक रुपया टाकत तर कोणी एक हजार रुपयांची नोट टाके. ते आंदोलन सरकारने या मुलांच्या शाळेला मान्यता द्यावी, शंभर टक्के अनुदान द्यावे, पारधी समाजाचे प्रश्न सुटावेत यासाठी होते. मतिन भोसलेने केलेली ती आंदोलने विनापरवानगीची होती. त्याच्यावर 'भीक मांगो आंदोलना'त अठ्ठावीस पोलिस केसेस झाल्या. फॉरेस्ट विभागाने लाकुडचोरीचेदेखील आरोप केले. मतिनला तीन दिवसांसाठी अटकेत टेवण्यात अाले.

मतिनने आंदोलनात थेट जिल्हाधिकाऱ्यांना गाठले. त्यांच्याकडे भीक मागितली. जिल्हाधिकारी भडकले. त्यांनी मतिन सिस्टीमच्या विरोधात आंदोलन करत असून त्याला अटक करण्याची धमकी दिली. गुन्हा काय तर, 'तुम्ही लहान मुलांना भीक मागायला प्रवृत्त करत आहात.' मतिन बधला नाही. त्या साहेबांनी पोलिसांना बोलावून मतिनला बाहेर काढले. मग आंदोलक एस.पी. कार्यालयात गेले. तेथून अांदोलकांची ती वरात अमरावतीच्या राजकमल चौकापर्यंत हुसकली गेली. मतिन भोसले पोलिस आयुक्तांकडे गेला. त्यांनीही त्याला अटक करण्याची भीती दाखवली. मतिन भोसले रागाच्या भरात त्यांना फार बोलला. मतिनला अटक करण्याचा आदेश निघाला. त्याच्यासोबत मुले-कार्यकर्ते होते. मतिनला अटक झाली. मुलांना बालसुधारगृहात पाठवले गेले.

मतीनने 15 ऑगस्टला घोषणा दिली - 'ये आझादी झुटी है,  आदिवासी पारधी भुखा है.' त्याने सोबत आमरण उपोषणाची चिठ्ठी पोलिसांना दिली. चक्रे फिरली. पंधरा मिनिटांत मतीन भोसलेला नक्षलवादी, धोकादायक गुन्हेगार ठेवतात त्या अंडासेलमध्ये पाठवले गेले. स्वातंत्र्याचे हक्क मागणारा अंधारात कोंडला गेला. त्याला मारझोड झाली. त्याची तब्येत खालावली. मतिनच्या उपोषणाला बहात्तर तास झाले. कार्यकर्त्यांनी आवाज उठवला. जेलमधील कैदी मतिनला धमकावत होते, 'आम्ही खून केलेत, तुझा पत्ता लागू देणार नाही.' मग मतिनला दवाखान्यात हलवले गेले. इतर कार्यकर्त्यांचे उपोषण सुरू होते. मग मतिनची सुटका करण्यात अाली. मतिनने जेलच्या गेटपासून 'भीक मांगो आंदोलन' पुन्हा सुरू केले.

मतीनने त्याच्या नोकरीचा राजीनामा जून 2012 मध्ये दिला. त्यामुळे कुटुंबियांनी त्याच्याशी बोलणे बंद केले. वडील 'तुला मारून टाकतो' म्हणू लागले. पत्नीही विरोधात गेली. मतिनला घरातील संघर्षाला दोन महिने तोंड द्यावे लागले. अाता त्याची पत्नी मतिनच्या खांद्याला खांदा लावून कामात सोबत करत आहे.

_UttarachyaShodhat_PrashnachinhShala_3.jpgमतीन भोसले म्हणतो, "पारधी मूळचे रजपूत. लढवव्ये. तो समाज पानिपतच्या युद्धात लढला. त्यांचे काम प्रामुख्याने शस्त्रे पुरवण्याचे होते. ते इंग्रजांच्या रेल्वेचे लोखंड चोरून राजाला द्यायचे. त्या अारोपांखाली इंग्रजांनी त्यांना अटक केली अाणि त्या सर्व समाजाला चोर-दरोडेखोर म्हणून जाहीर केले. पारधी समाजाला जंगलात लपून राहावे लागले. रानोमाळ भटकावे लागले. आता पारधी लोक पुन्हा समाजाजवळ येऊ लागले अाहेत, परंतु त्यांच्यावर असलेला चोर नावाचा शिक्का अद्याप पुसलेला नाही. त्यांना घरकुले मिळाली, जमिनी मिळाल्या, तरी त्या समाजाचा विकास होणार नाही. त्यांना विकास करायचा असेल, समाज बदलायचा असेल, माथ्यावरचा शिक्का पुसायचा असेल; तर त्यांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही."

शाळा 22 सप्टेंबर 2012 रोजी सुरू झाली. शाळेचे नाव - प्रश्नचिन्ह, आदिवासी पारधी आश्रमशाळा. समाजापुढे पोटाचा प्रश्न, गावाचा प्रश्न, घराचा प्रश्न, जातीच्या प्रमाणपत्राचा प्रश्न, विविध दाखल्यांचा प्रश्न, माणूस म्हणून जगण्याचा प्रश्न... प्रश्न, प्रश्न, प्रश्न! प्रश्नच प्रश्न!! म्हणून त्या शाळेचे नाव प्रश्नचिन्ह.

मतीनच्या शाळेत मुले आली, पण त्यांच्या स्वच्छतेचा मोठा प्रश्न होता. ती मुले अंगावरील कपडे महिनोनमहिने काढत नव्हती. त्यांना शौचाला कसे बसायचे, दात कसे घासायचे, काहीच माहीत नव्हते. मतिनची दोन वर्षें त्या मुलांना साफसफाईची सवय लावण्यात गेली. मुलांना नदीवर घेऊन जायचे. अंघोळ घालायची. त्यांचे अंग दगडाने घासायचे. त्यातील बरीच मुले निराधार होती. कोणाचे आई-वडील जन्मठेपेची शिक्षा भोगताहेत, काही सर्पदंशाने, अस्वलाच्या हल्ल्यात, शिकारीला गेल्यानंतर शेतकऱ्याने टाकलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन धक्क्याने मेले आहेत अशी स्थिती होती. काहींच्या अाईवडिलांचे मुले हेच कमाईचे साधन होते. कोणी भंगार गोळा करे तर कोणी भीक मागे. त्यांच्या कमाईवर कुटुंबांचे पोट भरे. भीक मिळाली, की त्यातली निम्मी रक्कम दलालाला द्यावी लागे. तशा स्थितीत जगणाऱ्या मुलांना शाळेत आणणे मतिनसाठी सोपे नव्हते. तशा मुलांचे पालक आणि दलाल, दोघेही शाळेचे शत्रू. त्यामुळे मतिनवर जीवावरचे प्रसंगही बेतले. त्यामुळे मतिनला पहिली लढाई मुलांच्या आई-वडिलांबरोबर लढावी लागली.

मतीन भोसलेचे आयुष्य त्या मुलांमुळे बदलून गेले. रात्री शहराबाहेर फिरून हॉटेलातील शिल्लक वडे-सामोसे गोळा करायचे. पोरांना चारायचे. तेथेच पोरांबरोबर सिग्नल किंवा पुलाखाली झोपायचे. एकदा मतीन भोसलेला टायफाईड झाला. धान्य संपले होते. मुलांना खाण्यास काय घालावे? मुलांची परीक्षा फी द्यायची आहे! पालक साथ देत नाहीत. पण मतिनच्या मदतीला कोणी ना कोणी उभे राहिले.

_UttarachyaShodhat_PrashnachinhShala_2_0.jpgमतीनने सप्तशृंगीवरून, मनमाडच्या रेल्वे स्टेशनवरून भीक मागणारी पंचवीस मुले शाळेत आणली होती. त्यांचे आईवडिल तुरुंगात सजा भोगत होते. मुले शाळेत रमली आणि एके दिवशी त्या मुलांचे इतर पालक- काकू, काका मुलांना नेण्यास आले. त्यांची कमाई थांबली होती. दलाल त्यांच्या पाठीशी होता. तो दिवस 15 ऑगस्ट 2016! मुलांच्या पालकांनी भांडण काढले, अंगावर धावून आले. मारामारीचा प्रसंग आला. नाईलाज झाला. मुलांना जा म्हणावे लागले. मुले रडू लागली. ती जाण्यास तयार होईनात. मुले मतिन भोसलेला बिलगली, अलग होण्यास तयार नव्हती. शेवटी, पालकांनी मुले नेलीच. काही काळ गेल्यावर ती मुले परत शाळेत आली. ती मुले नववी-दहावीत शिकत आहेत.

महाराष्ट्रातील पारधी भीक मागण्यासाठी सिकंदराबाद-तेलंगणापर्यंत पोचले आहेत. तेथील काही लोकांना वाघाची शिकार केल्याच्या आरोपाखाली सजा झाली होती. मतीन भोसले त्यांच्या मुलांना आणण्यासाठी तेथे गेला. त्याला त्या मुलांनी विचारले, 'तुमच्या शाळेत काय काय मिळणार?' मतीनने विचारले, 'तुम्हाला काय काय हवे?' मुले म्हणाली, 'एकशेवीस-तीनशेचा खर्ररा, नागपुरी सितार गुटखा असे मिळणार का तुमच्या शाळेत? बॉयलर कोंबड्यांची आतडी मिळणार का? मटण, लाल रंगाची दारू?' मतीनने तेथून अठरा मुले आणली. त्याने त्या मुलांना सुरुवातीला तंबाखू, खर्ररा दिला. चार दिवस दारूही दिली. मतीनला देणगीतून टीव्ही मिळाला होता. ती मुले टीव्हीवरचे कार्यक्रम, गाणी, योगा यांतून पहिल्या कुळांत मिसळून गेली. त्यांच्या सवयी सुटल्या. त्यांना मटण मात्र लागायचे. त्यासाठी रोही (नीलगाय) पकडून आणावी लागे, रानडुकराची शिकार करावी लागे. ती मुले मटण नाही मिळाले तर म्हणत, 'मतीन, तू केत्रोही सिरा (कितीही जाग), आम्ही पळून जाणार.' काही मुले पळून जात. मतीनजवळ रेल्वे स्टेशनजवळच्या पोलिस स्टेशनचे, पोलिसांचे फोन नंबर होते. तो त्यांना कळवे. मग पोलिस मुलांना पकडून परत आणत. त्यांची रोज शे-दीडशे भांडणे होत. भांडणेही अशी, की ते एकमेकांना दगडाने मारायचे - रक्त निघेपर्यंत! मतीनला त्यांच्या राखणीसाठी तीन-चार कर्मचारी तैनात करावे लागत.

जंगलात राहणारी, भटकणारी, शिकार करणारी ती मुले सारखी पळायची. दंड ठोकायची, 'थाम्ब पाह्यते तुमचं! न्हाय मटण देऊन ऱ्हायले?' मग मतीनने शाळेभोवतीचे वातावरण जंगलाप्रमाणे तयार केले. तेथे शिकारीचे साहित्य ठेवले. तो त्या सोबत मुलांना पुस्तके दाखवी. शिकार चांगली, की पुस्तके? शिकार सोडा, पुस्तक हातात धरा. मतीन त्यांना समजवत असे. अाता मुले पळून जात नाहीत. सुट्टीत आईवडिलांना भेटण्यास जातात. ज्यांचे आईवडिल नाहीत ते मावशी काकांना भेटतात. पूर्वी मुले गेली, की परत फिरकत नसत, आता स्वतः होऊन परत येतात.

दैनिक 'सकाळ'च्या प्रमोद काळपांडे यांनी मतीनच्या त्या कामासंबंधात लेख लिहिला. 'एका शिक्षकाने राजीनामा देऊन गुढीपाडव्याला शिक्षणाची गुढी उभारली!' लोकांचे लक्ष तो लेख वाचून मतीनच्या शाळेकडे गेले. जालन्याची 'मैत्र मांदियाळी' ही संस्था मतीनच्या मदतीला धावून आली. मतीनची 'भीक मांगो आंदोलने' बंद झाली. अाता 'प्रश्नचिन्ह' शाळेचे रूप पालटू लागले आहे. 'मैत्र मांदियाळी' या संस्थेच्या सहकार्याने इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. दैनिक 'पुण्यनगरी'मध्ये 'कुणा कुणा भेटू मी?' हा लेख आला. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी तो वाचला. त्यांनी यंत्रणा कामाला लावली. तहसीलदारांना पाठवले. त्या शाळेच्या अडचणी समजून घेतल्या आणि शाळेचे दोन वर्षें रखडलेले विजेचे काम आठ दिवसांत मार्गी लागले. गित्ते यांनी शाळेला कपाटे-पुस्तके दिली. 'प्रश्नचिन्ह'ला उत्तराचा मार्ग गवसला आहे. प्रश्न सोपे नाहीत. एक प्रश्न सुटला, की दुसरा प्रश्न उभा राहतो. 'मैत्र मांदियाळीचे' अजय किंगरे यांनी मतीनला आधार दिला. त्यांच्यामुळे प्रकाश आमटे यांनी शाळेला भेट दिली. ते मतीन भोसलेचे काम पाहून भारावले. प्रकाश अाणि मंदाताई अामटे अधूनमधून तेथे येतात. मुक्कामाला थांबतात, रमतात, अडचणी समजून घेतात. त्यांच्या सहकार्यामुळे शाळेत पाण्याची सोय झाली आहे. त्यासाठी पासष्ट फूट खोल विहीर खोदली आहे. पस्तीस फूट खोल पाणी आहे. प्रकाश आमटे यांनी त्या कामासाठी जवळपास साठेआठ लाख रुपयांची मदत केली आहे.

आश्रमशाळेत दहावीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. पारधी समाजाची बोली जाणणारे शिक्षक तेथे आहेत. मुले शिकतात, गातात, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतात. प्रत्येक मूल शिकून स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी मतीन भोसले धडपडत आहे. सात मुले हेमलकसा, चंद्रपूर, जळगाव, नागपूर या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी आहेत. 'प्रश्नचिन्ह'शी जोडलेल्या संस्था आणि व्यक्ती त्यासाठी मदत करत आहेत. कोणाला डॉक्टर व्हायचे आहे, कोणाला स्पर्धापरिक्षा देऊन अधिकारी व्हायचे आहे. मुले क्रीडास्पर्धेत चमकत आहेत. केंद्रप्रमुख जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली योगामध्ये राष्ट्रीय पातळीपर्यंत शाळेचे नाव पोचले आहे. लोकसत्ताच्या 'सर्वकार्येषु सर्वदा' या सदरामध्ये 'प्रश्नचिन्ह'विषयी माहिती आली. संस्था माहीत झाली. लोक मदतीसाठी पुढे येऊ लागले. मतीनला नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पंचायत समितीतील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांनीही आर्थिक मदत केली. मदत करणारे हात पुढे येत आहेत. तरीही मुलांची संख्या, सोई-सुविधा, खर्च पाहता 'प्रश्नचिन्ह' अजूनही उत्तराच्या शोधात आहे.

मतिन भोसले, 9096364529

- नामदेव माळी

Last Updated On 18 April 2018

लेखी अभिप्राय

सुंदर काम खरोखरच नतमस्तक व्हावे

Rajesh16/04/2018

आता लेख वाचताना छान वाटतं ..पण हा दिवस आणण्यापर्यंतचा प्रवास किती खडतर होता ..हे जाणून .त्या जिद्दीला सलाम करावाच लागेल .
मतीन भोसले ग्रेट

shrikant Petkar17/04/2018

अतिशय सुंदर उपक्रम हार्दिक शुभेच्छा

Shivaji Banedar 17/04/2018

मतिन भोसले सलाम तुमच्या कार्याला.

Samiksha Katkar 06/08/2019

मतीन भोसले नतमस्तक तुमच्यापुढे. सलाम तुमच्या कार्याला क्रांतिकारी विचारांची कल्पना करणारे भरपूर पाहिले पण आमलात आणणारा एखादाच अवलिया असतो तुमच्यासारखा.

राजाराम ठोकळ30/12/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.