टहिलियानी विद्यालयाचे शून्य कचरा व्यवस्थापन


_TaahiliyaniVidyalyache_ShynyKacharaVyavasthapan_1.jpgराष्ट्रीय स्वच्छता अभियानाचा भाग म्हणून शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. विषय होता, ‘कचरा व्यवस्थापन’. मला त्या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्या विषयाची तयारी करत असताना अभ्यासण्यात आलेली Reduce, Reuse, Recycle ही त्रिसूत्री काही माझ्या मनातून जाईना. मी शिक्षक म्हणून अनेक लहान-लहान गोष्टी करू शकते; विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकते हा आत्मविश्वास वाटू लागला आणि त्यातून साकारली, ‘कचरा व्यवस्थापन संकल्पना’. संस्थेचे कार्यवाह श्रीकांत धर्माधिकारी व मुख्याध्यापक संध्या रवींद्र ठाकूर यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनीही त्या प्रकल्पास हिरवा कंदिल दाखवला.

कचरा व्यवस्थापन प्रकल्पातील पायऱ्या तीन होत्या – 1. सर्वेक्षण, 2. प्रबोधन, 3. प्रत्यक्ष कृती

1. सर्वेक्षण –

शाळेचे आवार व आसपासचा परिसर यांचे सर्वेक्षण केले असता पुढील गोष्टी आढळल्या :
अ.    संपूर्ण कचऱ्यात ओल्या कचऱ्याचे प्रमाण अधिक
 ब. सुक्या कचऱ्यात प्लास्टिक व कागद यांचे प्रमाण अधिक
 क. कचरा वर्गीकरणाबाबत लोकांची पूर्ण उदासीनता

2. प्रबोधन –

कचरा वर्गीकरण व कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट यांविषयी संधी मिळेल तेव्हा विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद सलग तीन वर्षें सातत्याने साधला, त्यांचे प्रबोधन केले. परिणामस्वरूप – पालक घरातील निर्माल्य, प्लास्टिक कचरा योग्य विल्हेवाटीसाठी शाळेत पाठवू लागले.

कचरा व्यवस्थापन दिंडी – परिसरातील नागरिकांच्या प्रबोधनासाठी 4 जुलै 2017 रोजी आषाढी एकादशीनिमित्त गोवंडी परिसरात ‘कचरा व्यवस्थापन दिंडी’ काढली.

3. प्रत्यक्ष कृती –

अ. कंपोस्ट खत निर्मिती - मी ठाण्याचे जे.एन. जोशी यांच्या घरी जाऊन कंपोस्ट खत बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी शाळेसाठी कंपोस्ट बास्केट व ‘कल्चर’ मोफत दिले. प्रथमत:, त्या छोट्या बास्केटमध्ये कंपोस्ट खत बनवण्याचा प्रयोग सातवीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने सुरू केला. तो प्रयोग यशस्वी ठरला. त्यामुळे संस्थेच्या मदतीने शालेय मैदानाच्या एका कोपऱ्यात सात x आठ फूटांचा मोठा खड्डा खोदून त्यात शालेय उपहारगृहातील ओला कचरा, परिसरातील निर्माल्य व काही प्रमाणात मंडईतील भाजी, सुकलेली पाने यांपासून कंपोस्ट खत बनवण्याचा प्रकल्प सुरू आहे. काही विद्यार्थ्यांनी घरीही कंपोस्ट खत बनवण्यास सुरुवात केली.

ब. शहरी शेती – संस्थेने शहरी शेतीसाठी कंपोस्ट खड्ड्याच्या शेजारी जागा दिली. तेथे वाफे तयार करून मुख्यत्वे पालेभाज्यांची लागवड केली जाते. त्या वाफ्यांमध्ये शाळेत तयार झालेले कंपोस्ट खत वापरले जाते. तीन x चार फूटांच्या मेथीच्या वाफ्यातून एकशेऐंशी रुपये उत्पन्न नुकतेच मिळाले.

विद्यार्थी स्वत: शहरी शेतीची संपूर्ण देखभाल करतात व उत्पन्नाचा हिशोब ठेवतात. ती रक्कम विद्यार्थी कल्याणकारी योजनांसाठी वापरली जाते.

क. कागदी लगद्यापासून शैक्षणिक साहित्य निर्मिती - प्रत्येक वर्गात ‘कागद वाचवा, झाडे वाचवा’ हे घोषवाक्य लिहिलेला कचऱ्याचा वेगळा डबा ठेवला आहे. त्यात विद्यार्थ्यांनी टाकलेले कागदी बोळे जमा केले. त्यासाठी वर्गवार स्वच्छतादूतांची नेमणूक केली. पाठकोरे कागद टाकायचे नाहीत ही सक्ती केली. मी गोळा झालेल्या तशा कागदांचा लगदा तयार करून त्यापासून शैक्षणिक साहित्य निर्मितीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले. त्यानुसार सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक साधने तयार केली आहेत. उदाहरणार्थ, पेशींचे प्रकार, मुळाचा छेद, खोडाचा छेद, दात इत्यादी.

ड. कागदी लगद्यापासून गाळण कागदनिर्मिती - स्वरूप निकम या सातवीच्या विद्यार्थ्याने कागदी लगद्यापासून गाळण कागद तयार केला. गाळण कागद प्रायोगिक दृष्ट्या सफल ठरला. तो गाळण कागद आमच्या शाळेतील प्रयोगशाळेत प्रयोगासाठी वापरण्यात येतो. विद्यार्थ्यांनी सर्व शैक्षणिक साहित्य निर्मिती, वर्तमानपत्रे, गोंद किंवा फेव्हिकॉल न वापरता केली.

इ. प्लास्टिक कचरा संकलन – प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी वेगळी प्लास्टिक कचराकुंडी शालेय मैदानात उभारली. त्यात विद्यार्थी घरून आणलेला प्लास्टिक कचरा गोळा करतात.

फ. वर्गातील रॅपर व इतर प्लास्टिक संकलन – प्रत्येक वर्गात ‘रॅपर’ व ‘इतर प्लास्टिक’ असे लिहिलेल्या बाटल्या टांगल्या. विद्यार्थी चॉकलेट, बिस्किटे खाऊन ‘रॅपर’च्या बाटलीत; तर तुटलेले पेन, पट्टी, कोनमापकाचे तुकडे हे ‘इतर प्लॅस्टिक’ या बाटलीत टाकतात.

तशा चारशे बाटल्या व पन्नास किलोग्रॅम प्लास्टिक कचरा बृहन्मुंबई महापालिकेस 2 ऑक्टोबर 2017 – गांधी जयंती व राष्ट्रीय स्वच्छता दिन यानिमित्त सुपूर्द करण्यात आला.

ग. कचरा व्यवस्थापन प्रदर्शन - शाळेतील सर्व विद्यार्थी व कर्मचारीवृंद यांनी ‘कचरा व्यवस्थापन’ प्रकल्पात सक्रिय सहभाग नोंदवावा यासाठी 2 ऑक्टोबर 2017 रोजी विद्यार्थ्यांनी ‘कचरा व्यवस्थापन’ प्रकल्पांतर्गत केलेल्या कामाचे व प्रतिकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट देणाऱ्या प्रत्येकास प्रकल्पाविषयी माहिती दिली.

सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीन- ‘रोटरी क्लब ऑफ चेंबूर’ यांना कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे यश विशेष भावले. त्यांच्या सौजन्याने शाळेत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व डिस्पोजल मशीन जानेवारी 2018 मध्ये बसवण्यात आले आहे.

शालेय वर्ष एप्रिलमध्ये परीक्षांबरोबर संपते व पुन्हा जूनमध्ये सुरू होते. ते तीन महिने कचरा व्यवस्थापनाचे कार्य थंडावते.

अशा प्रकारे एका लहानशा बास्केटमध्ये 2014 साली सुरू झालेल्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पास धुमारे फुटले आहेत. या कचरा व्यवस्थापन प्रकल्पात शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर व सफाई कर्मचारी; तसेच, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. श्रीमती रा.सो. टहिलियानी माध्यमिक विद्यालय ‘शून्य कचरा व्यवस्थापना’त यशस्वी होत आहे.

कचरा व्यवस्थापन प्रकल्पास मिळालेले पुरस्कार -
1. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण व इको फोक्स यांच्या विद्यमाने शाळेस – BEST GREEN SCHOOL AWARD  2017-18
2. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ‘स्वच्छ शाळा सर्वेक्षण प्रमाणपत्र 2017-18’
3. आठवे राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन, बेळगाव येथे तृतीय पारितोषिक

- स्मृती संदेश वावेकर

लेखी अभिप्राय

खुपच सुंदर प्रकल्प

Ajay Vijay Nee…09/04/2018

संस्था व शाळा यांच्या सहकार्यातून RST विद्यालय अनेक वेगवेगळ्या प्रकारे उपक्रम राबवत असते व त्यामध्ये उल्लेखनीय यश मिळवतात यशस्वी विद्यार्थी पालक व सर्व कर्मचार्‍यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा

Gherade Bayaji 10/04/2018

अति उत्तम पर्याय आणि विद्यार्थ्यांना एका नवीन कौशल्याची ओळख होते.. वनराई संस्था असेच उपक्रम पुण्यातील 250 शाळांमध्ये घेत आहे... आपणास या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा..व सदर बातमी आमच्या पर्यंत पोहोचविली त्यासाठी आभार!

Vrushali Nampurkar10/04/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.