मुलांनी मला घडवले आहे


_MulanniMala_GhadavleAahe_2.jpgमी शिक्षक म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत गेली चोवीस वर्षें कार्यरत आहे. मला माझा मी शिक्षक म्हणून शाळेत रूजू झाल्याचा पहिला दिवस चांगला आठवतो. मी मुलांना ‘कावळ्याने खाल्ल्या शेवया’ ही तालकथा सांगितली. तालकथेची गंमत असते. त्यात कथा-काव्याचा सुंदर मिलाप असतो. गोष्ट ऐकल्यावर वर्गात जणू चमत्कार घडला! मुले मोकळी झाली. मुले त्यांच्या वर्गातील, शाळेतील गोष्टी सांगू लागली. मी आस्थेने ऐकत आहे असे कळल्यावर काही मुले तर त्यांच्या घरांतील गोष्टीही हातचे राखून न ठेवता निरागसपणे माझ्याशी बोलू लागली. माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी शिकवण्यापेक्षा गप्पाच अधिक झाल्या, ओळख परेड झाली. मुलांच्या गालांवर कळ्या खुलल्या!

शाळा सुटण्यास शेवटची दहा मिनिटे बाकी होती. तेवढ्यात एक जण म्हणाला, “सर, आणखी एक गोष्ट सांगा ना, तुम्ही मघाशी सांगितलेली गोष्ट खूप भारी होती. जाम आवडली मला.” इतर मुलांनीही त्याची री ओढली. “सर, गोष्ट... गोष्ट...” मुलांनी एकच कल्ला केला. मग मी म्हटले, “मघाशी कावळ्याची गोष्ट सांगितली, आता चिमणीची सांगतो... चालेल?” मुले उत्साहाने म्हणाली, “सांगा सांगा... चिमणीची सांगा.” “बरं सांगतो... सांगतो, शांत बसा आधी!”

वर्ग एकदम चिडिचूप झाला. मुले गोष्ट ऐकण्यासाठी आतुर. मी गोष्ट सांगितली. मुले माझे हावभाव एकटक टिपत होती. गोष्ट संपली. अनपेक्षितपणे, टाळ्यांचा उत्स्फूर्त कडकडाट झाला. शाळा सुटल्याची घंटा झाली. मुले दप्तर पाठीवर अडकावत म्हणाली, “सर, उद्यासुद्धा सांगा बरं का नवीन गोष्ट!” दुसरी एक मुलगी म्हणाली, “सर, कवितासुद्धा सांगा. मला कविता आवडतात.”

मी वर्गात शिरलो तेव्हाची शांत मुले आणि वर्ग सुटल्यावर माझ्याशी आपलेपणाने ‘उद्या नवीन गोष्ट, कविता सांगा’ असे बोलणारी मुले. केवढा तो फरक! माझ्या लक्षात आले, की ती जादू कथाकथनाची आहे.

_MulanniMala_GhadavleAahe_1.jpgमुले जेव्हा वारंवार नवीन गोष्टींची, कवितांची फर्माईश करू लागली तेव्हा ‘आपणही मुलांसाठी कथा, कविता का लिहू नये? प्रयत्न तर करून पाहुया’ असा विचार माझ्या मनात आला. माझ्या त्या विचाराला पुष्टी मिळाली, ती माझ्या वर्गातील विद्यार्थिनी सविता पटेकर हिच्यामुळे. ती शाळेत सतत गैरहजर असे. मी सविता शाळेत यावी म्हणून अनेक प्रयत्न केले. तिचे घर गाठले, तिच्या आईला समजावून सांगितले. दुसऱ्या दिवशी, तिची आई तिला ओढत ओढत शाळेत घेऊन आली. ती तिची कर्मकहाणी सांगता सांगता तिच्या डोळ्यांतील पाण्याला वाट करून देत होती. मी मला त्यावेळी जे काही वाटले ते शब्दबद्ध केले आणि त्याची कविता झाली! माझ्या आयुष्यातील ती पहिलीवहिली कविता. एका विद्यार्थिनीमुळे ती घडली होती! कवितेचे शीर्षक होते, ‘सविता पटेकर-सतत गैरहजर’. शाळेने माझ्या त्या कवितेचे कौतुक केले. ती कविता महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या मुखपत्रात छापून आली. मनात आले, सविता माझ्या वर्गात नसती तर माझी ‘कविता घडली नसती’. माझा लिखाणाचा हुरूप वाढला.

मी सुरुवातीला बालकविता लिहिल्या. त्या मुलांपुढे प्रसंगानुरूप सादर केल्या. एका वृत्तपत्रासाठी वर्षभर दर रविवारी ‘बोधकविता’ हे मुलांसाठी कवितेचे सदर चालवले- चिमुकली गोष्टच कवितेत गुंफून लिहू लागलो. त्या गोष्टीरूप बालकविता मुलांपुढे सादर करताना मुलांचे हसरे चेहरे, त्यांचे डोळे बरेच काही सांगून जात. त्या कवितांचे ‘बोधाई’ हे पुस्तक निघाले. केवढा तो आनंदाचा क्षण! मुले मला घडवत होती!

नंतर पहिलीच्या मुलांना गतिशील वाचनाचा आनंद मिळावा आणि मराठी भाषेची नुकतीच ओळख झालेल्या इंग्रजी माध्यमाच्या मुलांना सोप्या सुटसुटीत बालकविता वाचण्यास मिळाव्यात म्हणून मी जोडाक्षरविरहित ‘गंमत गाणी’ हे बालकवितांचे पुस्तक लिहिले आणि त्या पुस्तकाने बालसाहित्यिक म्हणून माझे अवघे आयुष्य उचलून धरले. एक वेगळा प्रयोग म्हणून मला शाबासकी मिळाली. शासनाने उत्कृष्ट बालवाङ्मयाचा राज्य पुरस्कार त्या पुस्तकाला दिला.

मग माझी बालकवितांची गाडी मुलांना सोबत घेऊन सुसाट निघाली. मी बालकवितांसोबत बालकथा, नाट्यछटा, मजेदार कोडी हेदेखील लिहू लागलो... लिहिलेले सादर करू लागलो. ‘अक्षरांची फुले’, ‘हसरे घर’, ‘तळ्यातला खेळ’, ‘पंख पाखरांचे’ अशी बालकवितांची पुस्तके आकाराला येत गेली, आनंद देत गेली. माझी ‘आनंदाची बाग’, ‘एकदा काय झाले’, ‘राजा झाला जंगलाचा’, ‘निष्फळ भांडण’, ‘थेंबे थेंबे तळे साचे’, ‘जरा ऐकून तर घ्या!’ ही बालकथेची सहा पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

माझे कथाकथन- कवितांचे कार्यक्रम मुलांसाठी, शिक्षकांसाठी शाळा-शाळांतून, विविध कृती-कार्यक्रमातून होऊ लागले. ते माझे काम पाहून प्रकाश मोहाडीकर यांनी मला ‘अखिल भारतीय साने गुरुजी कथामाले’तर्फे ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट कथानिवेदक साने गुरुजी पुरस्कार’ वर्धा येथे 2008 साली दिला.

_MulanniMala_GhadavleAahe_4.jpgएकदा मोठी गंमतच झाली. मी चेंबूरच्या मुक्तानंद शाळेतील मुलांना दोन-तीन नवीन बालकविता वाचण्यास दिल्या. त्यातील एका मुलाने त्याला दिलेल्या कवितेवर समर्पक असे चित्र काढले. ते चित्र पाहून मला अभिनव कल्पना सुचली-माझ्या पुढील बालकविता संग्रहाला मुलांकडूनच चित्रे काढून घ्यावी! मुलांना जशी काढावीशी वाटतील अगदी तशी त्यांना काढू द्यावी. त्यातूनच मुलांच्या चित्रांनी सजलेले ‘तळ्यातला खेळ’ हे पुस्तक आकाराला आले. त्या पुस्तकाने ‘आपटे वाचन मंदिर’चा (इचलकरंजी) राज्यस्तरीय उत्कृष्ट बालवाङ्मयाचा पुरस्कार पटकावला.

माझ्या बालसाहित्य लेखनामुळे मला ‘बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळा’वर सदस्य म्हणून काम करण्याची संधी दोन वेळा मिळाली आहे.

_MulanniMala_GhadavleAahe_3.jpgमला एक प्रसंग आठवतो- ‘शशिकलाताई आगाशे उत्कृष्ट बालसाहित्या’चा पुरस्कार माझ्या ‘अक्षरांची फुले’ या पुस्तकाला जाहीर झाला होता. मी तो पुरस्कार घेण्यासाठी बुलढाण्याला गेलो. तेथील ‘भारत विद्यालय’ शाळेत कार्यक्रम होता. नंतर मुलांशी संवाद साधायचा होता. शाळेच्या प्रांगणात प्रवेश केला आणि मी अवाक झालो, कारण तेथील शाळेच्या भिंतींवर दर्शनी फलकांवर मुलांनी त्यांच्या अक्षरांत माझ्या ‘अक्षरांची फुले’ या पुस्तकातील अनेक कविता रंगीबेरंगी खडूंनी लिहून काढल्या होत्या. त्या कवितांवर चित्रेही मुलांनीच रेखाटली होती. मुलांनी कवितांना चाली लावल्या होत्या. कार्यक्रम सुरू झाला. मुलांनी सर्व कार्यक्रमाचा ताबा घेतला होता. मला कळले होते, की ह्या पुरस्कारासाठी मोठी मंडळी नाही तर चक्क मुलेच पुस्तक वाचून, पारखून पुस्तकाची निवड करतात. मुलांचे पुस्तक मुलांनीच पुरस्कारासाठी निवडावे हे मला विशेष वाटले. मुलांना ते पुस्तक त्यांचे वाटले यातच सारे काही आले. मुलांनी माझा हात लिहिता ठेवला आहे. त्यांनीच माझ्या बालसाहित्याला खरा बहर आणला आहे. त्यांची ‘आनंदाची बाग’ बालसाहित्यातून फुलवता फुलवता मीही आतून फुलत गेलो आहे.

- एकनाथ आव्हाड

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.