अक्षराची अक्षर चळवळ


_AksharachiAkshar_Chalval_1.jpgमी माझा बालमानसिकतेवरील प्रबंध (एम फिल) पूर्ण होताच, कोल्हापुरला ‘बाल मार्गदर्शन केंद्रा’त समुपदेशक म्हणून कामास सुरुवात केली. त्यामध्ये विविध शाळांना भेटी देऊन, शाळांतील शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी बोलून, शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंध, विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या वर्तनविषयक त्यांच्या समस्या- त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी चर्चा, अभ्यासाबद्दल गप्पागोष्टी, विद्यार्थ्यांचे व पालकांचे नाते अशा अनेक बाबींचा समावेश असे. मी रोटरी क्लबच्या वतीने मुलांना समुपदेशन करत होते. डॉ. किरण गुणे आणि डॉ. गोगटे यांनी ती जबाबदारी मजवर सोपवली. मी ते काम चार वर्षें केले, नंतर लग्न होऊन मुंबईत गोरेगावला आले. आता, तेथील ‘अ. भि. गोरेगावकर’सारख्या शाळा मजकडे मुले तशाच हेतूने पाठवत असतात.

एके दिवशी, ताराबाई पार्कमधील ‘माईसाहेब बावडेकर शाळे’तील अक्षरा सावंत तिच्या आईसमवेत ‘बाल मार्गदर्शन केंद्रा’त आली. ती इयत्ता सहावीत होती. तिचे हुशारीची चुणूक दर्शवणारे टपोरे डोळे, सावळा रंग, कुरळे केस अशी अक्षरा सतत आईला बिलगून माझ्याशी संवाद साधत होती. अक्षराची आई मात्र मध्ये-मध्ये वैतागून तिला म्हणत असे, “अगं, इतकी मोठी झालीस तू! बारा वर्षांची!! सारखी आई हवी असण्यास बाळ थोडीच आहेस तू!” मग अक्षरा हिरमुसून पुन्हा थोडी बाजूला सरकत असे.

“ताई, हिला शाळेत जाण्यास मुळीच नको असते बघा. साधारण एक वर्ष झाले, ती असे करत आहे. माझ्या मिस्टरांची नोकरी फिरतीची. त्यांची बदली दर तीन वर्षांनी होते. मग नवीन गाव, नवी जागा, नवे वातावरण, नवीन शाळा -तसेच मित्र-मैत्रिणी, त्या सर्वांशी मिळतेजुळते घ्यावे लागते. जर शाळेत ती सतत अनुपस्थित राहिली तर तिला पुढील वर्षी पुढील इयत्तेत प्रवेश मिळणार नाही असे आम्हाला मुख्याध्यापकांनी बजावून सांगितले आहे. त्यामुळे साहजिकच आम्हा उभयतांची नुसती घालमेल सुरू आहे.”

अक्षराच्या शाळा चुकवण्यामागे काहीतरी कारण दडलेले असावे. तिच्यासोबत संवाद साधून ते जाणण्यास हवे होते. नंतर त्यावर मार्ग शोधणे शक्य होते. त्यामुळे अक्षरा बोलती होणे जरूरीचे होते. मी आधी वैयक्तिकपणे तिच्या पालकांशी व नंतर तिच्याशी बोलावे असे ठरवले.

त्यासाठी मी माझ्या समुपदेशनाच्या वेळा निश्चित केल्या. मी तिच्या आईवडिलांना प्रथम बोलावून, त्यांना म्हटले, “तुम्ही मला अक्षराच्या दैनंदिन रुटीनबद्दल सांगा.”

अक्षराचे वडील बोलू लागले, “माझ्या मिसेसने अक्षराला भरपूर लाडावून ठेवले आहे. एकुलती एक मुलगी म्हणून ती तिला सतत मागेल त्या गोष्टींचा पुरवठा करत असते. अक्षराचा हट्टीपणा त्यामुळे दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिवाय, मायलेकी दिवसभर घरात! अक्षराचे संध्याकाळी खेळणेसुद्धा नसते सोसायटीत! खेळातून मिळतेजुळते घेणे, सांघिक भावना वाढीस लागणे या गोष्टी होतात ना? तसे न करण्यामुळे त्या गोष्टींचा अक्षराबाबत अभाव जाणवतो. पूर्वी ती जरा तरी मिसळायची सर्वांच्यात, आता मात्र अजिबात मिसळत नाही.”

तिच्या आईने विचारले, “या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी त्याचा शाळेत जाण्यावर काय परिणाम होऊ शकतो का?”

“अक्षराच्या मनावर अलीकडच्या काळात मानसिक आघात होणारी कोणती घटना घडली आहे का?” मी विचारले.

“हो. तिच्या आजीचा हृदयविकाराने अचानकपणे मृत्यू झाला. तिचे व आजीचे भावबंध खूप हळवे, नाजूक आणि प्रेमळ असे होते. तिला फार ओढ असे आजीची. आजीच्या जाण्याने तिच्या मनात मोठी भावनिक पोकळी निर्माण झाली आहे.”

मी म्हटले, “बरोबर. जवळच्या व्यक्तीच्या अचानक मृत्यूने मुलांच्या जीवनात खळबळ निर्माण होऊ शकते. अक्षराबाबतही अशी स्थिती असावी. त्यामुळे तिला तुम्हा दोघांकडूनही मानसिक आधार मिळणे जरुरीचे आहे. जर मुलांना त्यांच्या पालकांशी बोलताना मोकळेपणा वाटत नसेल तर ती त्यांच्याच वैचारिक आंदोलनांत गुरफटून राहतात. त्याचा त्यांच्या शालेय, कौटुंबिक व सामाजिक जीवनावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.”

अक्षरा माझ्याशी समुपदेशनाच्या पुढील काही टप्प्यांमध्ये गप्पा मारू लागली.

मी अक्षराच्या शिक्षकांशीसुद्धा त्याबाबत चर्चा केली. शिक्षकांनी ती वर्गात रुळण्यासाठी, तिला मानसिक सुरक्षितता जाणवण्यासाठी तिच्याशी कशा प्रकारे वागण्यास हवे याबद्दल माझे त्यांच्याशी बोलणे झाले. तिला शालेय नियमित प्रवाहात आणण्यासाठी समजूतदार, जाणकार शिक्षकांची मदत मिळाली तर ती लवकरच सर्वांमध्ये मिसळेल अशी खात्री मला वाटत होती. मुख्याध्यापक व इतर शिक्षकवर्ग यांनीही आनंदाने त्यास सहमती दिली. अक्षराची शाळा पुन्हा सुरू करणे हे एक मोठे दिव्यच आम्हांपुढे होते. पण सुरुवातीला एक तास, मग दोन तास असे करत करत तिची शाळेतील वेळ हळुहळू वाढवत नेली. ती एव्हाना शाळेत रुळू लागली. पण कधी कधी, अचानकपणे तिला रडू येई. मग शिक्षक तिची समजूत काढत किंवा तिची आई शाळेत येऊन तिला घरी घेऊन जाई. अशा प्रकारे आम्ही प्रयत्नांची शिकस्त चालू ठेवली. तिच्या शाळेतील शिक्षकांनीसुद्धा ‘अक्षराकडे, तिच्या एकटीकडेच कोठे आम्ही सतत लक्ष द्यायचे’ अशी आडमुठेपणाची भूमिका न घेतल्यामुळे अक्षरा हळुहळू बदलू लागली व तिला शाळेची गोडी निर्माण झाली.

प्रत्येक मूल वेगळे असते आणि त्याचे ते वेगळेपण जाणून घेऊन, त्याला सकारात्मक, आनंदी जगण्यास शिकवणे यात समुपदेशकाचे खरे कौशल्य असते, तर त्या वेगळ्या मुलांचे व त्यांच्या वेगळेपणाचे काही पालक व शिक्षक यांना जाण-भान नसणे हे शल्य समुपदेशकाला टोचत असते.

- पल्लवी अष्टेकर

लेखी अभिप्राय

Sujanatmak lekhan w preranadai

Ratna Choudhary26/03/2018

Khup chan 👌

Mrs.Amruta Jere 26/03/2018

लहान मुलांच्या मानसिकतेचे यथोचित वर्णन. आजी आणि नातवंड यांचे नाते मायेच्या धाग्यांनी बांधलेले आसते,आणि म्हणुनच ते आतुट आसते.

आनंत27/03/2018

"बालमनाला समजावून सांगणे आणि त्या काेवळ्या मनाला पटणे" ही सामाजिक समस्या आहे.

आनंत27/03/2018

अक्षरा बाबतचा लेख छान वाटला.

मानसिंग पवार27/03/2018

Nice.. It's. Useful for Students. As well as Parents..

Almeida Robert Sir27/03/2018

Good

Ganesh Kulkarni27/03/2018

खूप छान. Keep it up.

Vidya Tamhane28/03/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.