गाडगेबाबांच्या... बालपणीच्या पाऊलखुणा शोधताना


_Gadgebabnchya_Paulkhuna_1.jpgअमरावती जिल्ह्यातील ‘शेंडगाव’ हे गाडगेबाबांचे जन्मगाव. गाडगेबाबांनी बालवयातील 1876  ते 1884 पर्यंतचा काळ तेथे व्यतीत केला. अमरावती ते शेंडगाव हे अंतर सत्तर किलोमीटरचे. त्या रस्त्याने जात असताना कोठल्या तरी महाराजांची वारी आणि पालखी अशी दोन दृश्ये मला पाहण्यास मिळाली. दिंडीत शंभरेकजण होती. त्यात तरूण, तरूणी, वृद्ध पुरूष, स्त्रिया व काही लहान मुले यांचा समावेश होता. सर्वांच्या डोक्यांवर पांढऱ्या रंगाच्या टोप्या होत्या. दिंडीच्या मागे जेवणाची, आराम करण्याची साधनसामग्री भरलेला ट्रॅक्टर होता! एकंदरीत, ‘स्पॉन्सर्ड इव्हेंट’ वाटत होता!  चमत्कारी बाबांची चलती असल्याने तशा ठिकाणी जास्त गर्दी आढळते. ती दिंडी मागे टाकत मी पुढे निघालो. रस्त्याच्या दोन्ही कडांना शेतात हरभऱ्याचे पीक दिसत होते.

शेंडगाव जसे जसे जवळ येत होते, तसे माझे मन अधिक रोमांचित होत होते, मनात विचारांची दाटी झाली होती.

शेंडगावात शिरल्याबरोबर एका बाजूला जिल्हा परिषदेची शाळा उघडीबोडकी- बहुदा छप्परदुरूस्तीचे काम सुरू असावे अशी दिसली. मुख्य चौकात आलो तर डाव्या बाजूला गाडगेबाबा अस्थिकलश मंदिर, त्याच्या बाजूला खाजगी शाळा. इतर गावांत असतो तसा बकालपणा तेथेही. तरूणांचे टोळके चौकात गप्पा मारत होते. त्यांची आमच्याकडे प्रश्नार्थक नजर. आम्ही गाडगेबाबांच्या घराची विचारणा करत त्या दिशेने निघालो. घरापर्यंतचा रस्ता काँक्रिटचा होता. गाडगेबाबांच्या घराजवळची माती कपाळी लावण्याचा माझा विचार हवेतच विरला! गाडगेबाबांच्या घराचे रूपांतर मंदिरात झालेले आहे! मंदिराचे बांधकाम निकृष्ट दर्ज्याचे आहे. मंदिराचा कळससुद्धा प्रमाणबद्ध नाही. बाहेरून गुलाबी रंग, खिडक्यांची तावदाने फुटलेली. उद्घाटनाची पाटी मात्र मंदिरात एका कोपऱ्यात, संगमरवरी, 1995 सालची.

गाडगेबाबांच्या जन्मस्थळाचे उद्घाटन चक्क वेदशास्त्रसंपन्न वासुदेव महाराज यांच्या  आशीर्वादाने झाले! ती जागा मूळ गाडगेबाबांच्या वाडवडिलांची. जागेची मालकी महादेव जानोरकर यांच्याकडे आली आहे. त्यांनी ती जागा स्मारकासाठी दान दिली. मंदिरात बाबांची सुबक नसलेली अशी बसलेल्या अवस्थेतील मूर्ती आहे. शेजारी, भक्तांची वाट बघत असलेले विठ्ठल-रूख्मिणी. मूर्तीसमोर घंटा, दानपेटी, गाडगेबाबांचे दोन मोठे फोटो, मंदिरात साचलेल्या धुळीवरून तेथे आठ-आठ दिवस कोणी येत नसावे. ते दृश्य मला अस्वस्थ करणारे होते.

बाहेर निघालो तर, जानोरकर आडनावाची घरे स्मारकाशेजारी दाटीवाटीने लागलेली. ती मंडळी त्यांच्या राहत्या घरांवरून खाऊन-पिऊन सुखी असल्याचा अंदाज येत होता. पण स्मारकाशेजारी एक वृद्ध स्त्री गहू वाळवत बसली होती. तिला उत्सुकतेने विचारणा केली तर तिने निर्विकारपणे उत्तर दिले. माझा भ्रमनिरास झाला.

_Gadgebabnchya_Paulkhuna_2.jpgडेबूची लहानगी पावले स्मारकाच्या आजूबाजूच्या मातीवरच पडली असणार. डेबू अनेक वेळा तेथे पडला असेल, मातीत अडखळला असेल, रडला असेल, खिदळला असेल. या घराच्या भिंतींनी डेबूचे वडील झिंगराजी यांचे वैभव, पैपाहुण्यांची लगबग, सणासुदीचा थाट, झिंगराजी यांचा व्यसनीपणा, डेबूच्या मनातील भाबडे प्रश्न, अफाट निरीक्षण, सखुमाय व झिंगराजी यांची कौतुकमिश्रीत नजर, सखुमायचे अंतर्मनातून कोसळणे, सखुमायच्या डोळ्यांतील विझलेपण, नात्यागोत्यांची पडझड, डेबूचे व सखुमायचे घराला सोडून जाणे... अगदी सगळे काही. असे अनेक क्षण त्या परिसराने अनुभवले असणार. मी ते सर्व काही कल्पून रोमांचित होत होतो. मी भूतकाळातून भानावर आलो. शेंडगाव हे हजार-अकराशे लोकवस्तीचे गाव. गावात कुणबी, बौद्ध, टाकोणकार यांची घरे असून  परीटांची आठ-दहा घरे आहेत. परिटांची घरे एकजात जानोरकर आडनावांची- ती सर्व गाडगेबाबांच्या भावकीतील. जानोरकरांच्या घरात बीएस्सी (अ‍ॅग्री) झालेला एकमेव तरूण. बाकीच्यांचे शिक्षण यथातथा. बहुतांश लोक शेतकरी.

डेबूच्या पाऊलखुणा इतरत्र दिसतात का ते शोधण्यासाठी गावात निघालो असता बाहेर एक तरूण भेटला. तो जानोरकर परिवारातील होता. त्याला गाडगेबाबांविषयी माहिती त्रोटक होती. त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. तो शेती करतो. ज्या गाडगेबाबांनी त्यांचे आयुष्य शिक्षणाच्या प्रचार-प्रसारासाठी खर्ची घातले त्या दस्तुरखुद्द गाडगेबाबांच्या गावात आणि परिवारात शिक्षणाबद्दल ही अनास्था! सरकारने गाडगेबाबा स्मारक एप्रिल 2017 मध्ये उभारले. ते बघण्यासाठी त्याच्यासोबत निघालो. तेथील चित्र तर मन अधिकच विषण्ण करणारे होते. एका बाजूला स्मशान, दुसऱ्या बाजूला भलेमोठे पटांगण, त्यात मार्बलचा चौथरा, त्यामध्ये गाडगेबाबांचा अर्धपुतळा. पुतळ्याला गुंडाळलेले रंग उडालेले कापड, चौथऱ्याला स्टीलचे तुटलेले रेलिंग, पुतळ्याशेजारी फडकणारा भगवा झेंडा. ज्या गाडगेबाबांनी जातिधर्माची कवचकुंडले नाकारली, त्यांना एका विशिष्ट धर्मात कोंबण्याचा हा प्रयत्न तर नव्हे? पुतळ्याशेजारी रस्त्यावर काटेरी झुडपे. वृक्षारोपण केलेली झाडे मृत्युपंथाकडे जाणारी. पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर भयाण, रुक्ष. गाडगेबाबांच्या पुतळ्याची नजर भुलेश्वरी नदीकडे. भुलेश्वरी कोरडीठाक पडलेली- निस्तेज, मलूल. त्याच भुलेश्वरीने तिच्या अंगाखांद्यावर डेबूला खेळवले असेल. सखुमायने त्याच भुलेश्वरीच्या काठावर एकांतात बसून तिच्याशी हितगुज केले असणार.

_Gadgebabnchya_Paulkhuna_4.jpgभुलेश्वरीच्या दुसऱ्या काठावर कोतेगाव. डेबू आणि सखुमाय यांनी त्या गावामध्ये काही दिवस काढले असे कळले. हंबीरमामाला डेबूची व सखुमायची झालेली परवड बघवली गेली नसणार. म्हणून त्याने त्या दोघांना दापुरा गावी नेले असावे. मी गावातील अधिक माहिती घेण्यास गाडगेबाबा स्मारकाकडून परत गावाकडे गेलो. मी एकाला प्रश्न विचारला, गाडगेबाबा जयंती तुम्ही गावात नेमकी कशी साजरी करता? त्यांनी ग्रामस्वच्छता, रामधून, भागवतकथा, कीर्तन, अन्नदान, महाप्रसाद अशी, कार्यक्रमांची यादी ऐकवली. एक वगळता ते सर्व कार्यक्रम गाडगेबाबांच्या विचारांशी फारकत घेणारे होते. जयंतीचा कार्यक्रम गाडगेबाबांच्या मृत्यूनंतर तब्बल वीस वर्षांनी सुरू झाला (1976 साली). विशेष म्हणजे गाडगेबाबा जयंती कॅलेंडरनुसार साजरी न होता तिथी-पंचागानुसार होते. कार्यक्रम महाशिवरात्रीच्या दरम्यान साजरे होतात. महापुरुषांना कॅलेंडर-तिथी-पंचागात फसवण्याचे कारस्थान नेमके कोण करत असेल? गावाच्या राजकारणात दोन गट सक्रिय असल्याने, गटातटाचे राजकारण, भाऊबंदकी यांमुळे कोठलीही नवी शासकीय योजना अंमलात आलेली नाही. गावच्या आजूबाजूच्या लोकांनी पंचक्रोशी मंडळ स्थापन केलेले आहे. ते मंडळ वेगळी यात्रा भरवते. सध्याच्या घडीला कोकर्डा गावचे श्रीकृष्ण शामरावजी सावरकर हे गृहस्थ तो उत्सव साजरा करतात.

शेंडगावात शिरताना ‘गाडगेबाबा अस्थिकलश मंदिर’ दृष्टीस पडते. हरिनारायण जानोरकर यांच्याकडून त्यासंबंधी माहिती मिळाली. ते स्वत: गाडगेबाबांच्या  परिवारातील. नात्याने बाबांचे नातू. वय वर्षें पंचावन्न, त्यांचा स्टोव्ह-स्प्रे पंप रिपेरिंगचा व्यवसाय आहे. ‘अस्थिकलश मंदिरा’चा कारभार हरिनारायण जानोरकर बघतात. गाडगेबाबांचे निधन 1956 साली झाले. गावकऱ्यांनी त्यांच्या अस्थी आणल्या व त्यांचे मंदिर तेथे वीस वर्षांनंतर, 1976 साली बनवले. तेथे नित्यनेमाने साफसफाई, पूजाअर्चा करण्याचा मान हरिनारायण यांच्याकडे आहे. आमची भेट त्यांच्याशी झाली व त्यांनी गाडगेबाबांचा दुर्मीळ फोटो, नारळ व दुपट्टा देऊन सन्मान केला. त्यांची परिस्थिती सर्वसाधारण असूनसुद्धा गाडगेबाबांच्या स्मृती चिरंतन राहव्या यासाठीची धडपड लक्षणीय होती.

गाडगेबाबांच्या बाबतीतील गावातील एक किस्सा खूपच धक्कादायक वाटला. गाडगेबाबा 1951 साली गावात आले होते. त्यांनी शेंडगाव व कोतेगाव येथील गावकऱ्यांसाठी भुलेश्वरी नदीवर घाट बांधण्याचे त्यावेळेस ठरवले. त्यांनी नदीकाठी विटाची भट्टी लावण्यासाठी काही लोकांच्या सहकार्याने बाभळीची झाडे तोडली. शेंडगावचे काही ‘महान’ लोक विरुद्ध बाबा व त्यांचे सहकारी यांच्यात त्यावरून संघर्ष झाला. प्रकरण पोलिसांपर्यंत पोचले. गाडगेबाबांनी त्यांच्या जन्मगावातील सुधारणेचा नाद शेवटी सोडून दिला. तो प्रसंग बाबांसाठी खूप क्लेशदायक होता.

शेंडगावचा धांडोळा घेतला तर गाडगेबाबांच्या स्मृतीच्या पाऊलखुणा फारशा आढळत नाहीत. गाडगेबाबांना ज्यांनी बघितले असेही कोणी जिवंत नाही. गाडगेबाबांच्या जन्मभूमीची हेळसांड, धूसर होत चाललेल्या बाबांच्या स्मृती या पार्श्वभूमीवर माझ्यासारख्याच्या मनात विचार येतो शासकीय यंत्रणा, राज्यकर्ते सर्व काळ असेच वागत असतात. त्यांना महापुरुषांविषयी प्रेम, आदर वगैरे नसतोच. महापुरुषांच्या मागे असलेले अनुयायी यांच्या संख्येवरून राज्यकर्त्यांचे धोरण ठरत नसेल ना?

गाडगेबाबा हा जातपात-धर्म नाकारलेला माणूस. जातीपातीच्या, गटातटाच्या हेव्यादाव्यांमुळे शेंडगावचा विकास थांबला आहे. गाडगेबाबांची जात महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी नाही. तिला उपद्रवमूल्यही नाही. त्यामुळे अनास्था असावी. गाडगेबाबांचे आभाळाएवढे कार्यकर्तृत्व सामान्य माणसांच्या आकलनापलीकडचे आहे. शासनाचे जाऊ द्या, पण गावातील एकाही व्यक्तीला गाडगेबाबांच्या प्रबोधनाचा वारसा निरंतर चालू राहण्यासाठी काहीतरी केले पाहिजे असा विचार करावासा वाटत नसेल काय? एकंदरीत, गाडगेबाबांच्या शेंडगावचे चित्र कोठल्याही संवेदनशील व्यक्तीला कमालीचे अस्वस्थ करणारे आहे.

मी शेंडगावात गेलो तेव्हा लोकांनी गाडगे महाराजांचे घर समोरच दाखवले. माझ्यासमोर साठी ओलांडलेले एक बाबा बसले होते. गावातील माणसांनी सांगितले, की ते गाडगे महाराजांचे पुतणे आहेत. अरे व्वा.... मला आश्चर्य वाटले ....गाडगे महाराजांचे साक्षात पुतणे...  मी त्यांच्याजवळ बसलो ....सर्वसामान्य गावकऱ्यांसारखे गरिबीचे प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर असलेले रामकृष्ण जानोरकर हे बाबांचे पुतणे, अल्पभूधारक शेतकरी, आर्थिक बाबतीत घायकुतीला आलेले. बाबांना डोळ्यांनी बघितलेले .... ते त्यांच्या डोळ्यांसमोर बाबांची दोन अपत्ये वारल्याचे कोरडेपणाने सांगत होते. ‘बाबा जन्मले आमच्या घरात. पण ते समाजाचे होते. ते त्यांचे वडील झिंगराजी लहान असतानाच वारले. शेती आणि घर मारवाड्याकडे गहाण होते. ते बाबांचे चुलते झिंगोजी जानोरकर यांनी सोडवले. पण बाबांनी प्रपंचाकडे लक्ष दिले नाही. ते गावात फक्त बोटावर मोजता येईल इतक्या वेळा आले. त्यांचा प्रपंच समाज हा होता...!’

(‘मीडिया वॉच’ विशेषांक, फेब्रुवारी 2018 वरून उद्धृत)

- प्रदीप पाटील

लेखी अभिप्राय

sunder far chan lekh.

sandhya joshi22/03/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.