ना. गो. चापेकर (N. G. Chapekar)

प्रतिनिधी 20/03/2018

_NaGo_Chapekar_1.jpgनारायण गोविंद उर्फ नानासाहेब चापेकर यांचा जन्म 5 ऑगस्ट, 1869 रोजी मुंबईमध्ये झाला. ते मराठीतील ऐतिहासिक विषयावर लेखन करणारे एक भाषातज्ज्ञ संशोधक लेखक, समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी पैसा, राज्यकारभार, समाज-नियंत्रण यांसारख्या विषयांवर ग्रंथ लिहिले आहेत.

चापेकरांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे झाले. पुढे एक वर्ष ते पुण्याच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये होते. तेथे त्यांना वा. गो. आपटे, आगरकर, गोखले, गोळे आणि धारप या नामवंत शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. देशाभिमान जागृत होण्यासाठी, बहुश्रुतता येण्यासाठी आणि विचारशक्तीला चालना मिळण्यासाठी हा अल्प काळ त्यांना पोषक ठरला. त्यानंतरचे हायस्कूलमधील शिक्षण त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये घेतले. 1887 साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचे महविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये झाले. तेथे त्यांना स्कॉट, प्रा. गार्डनर आणि प्रा. जिनसीवाले हे नामवंत प्राध्यापक लाभले. 1891 मध्ये ते बीए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबईतून 1894 साली कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ वकिली केली आणि मग ते न्यायखात्यात नोकरी करू लागले. पंचवीस वर्षे न्यायाखात्यात काम करीत असताना तत्कालीन मुंबई इलाख्यात अनेक ठिकाणी त्यांना भ्रमंती करावी लागली. ते 1925 साली प्रथम वर्ग न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले. त्यांनतर औंध संस्थानचे मुख्यन्यायाधीश झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी औंध संस्थानातील न्यायव्यवस्थेत अनेक सुधार घडवले. ना. गो. चापेकर यांनी कार्यकुशल आणि नि:स्पृह न्यायाधीश म्हणून ख्याती मिळवली. ते 1925 साली ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे वास्तव्यास गेले.

बडोद्याला 1934 मध्ये भरलेल्या विसाव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. 'वाड्:मय ही समाजाची नाडी आहे. कोणत्याही समाजाच्या वाड्:मयीन स्वरूपावरून तो समाज संस्कृतीच्या कोणत्या पायरीवर आहे हे समजते'. असे विचार त्यांनी अध्यक्षपदावरून मांडले.

चापेकरांनी साहित्य व संस्कृती या क्षेत्रांत लक्षणीय स्वरूपाचे कार्य केले. ते कुशल संघटक होते. त्यांनी सेवानिवृत्तीनंतरच्या काळात 'भारत इतिहास संशोधक मंडळ', 'मराठी ग्रंथोत्तेजक सभा', 'राजवाडे संशोधन मंडळ', 'धर्मनिर्णय मंडळ' आदी अनेक संस्थांमधून काम केले. अनेक नव्या-जुन्या साहित्यिकांना एकत्र आणून त्यांनी 'महाराष्ट्र साहित्य परिषदे'ला ऊर्जितावस्थेला आणले. पुणे विद्यापीठातून पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत. ना.गो. चापेकर यांना पुणे विद्यापीठाकडून 1966 साली डी.लिट्‌. ही सन्माननीय पदवी देण्यात आली.

'मराठी ग्रंथरचना करण्याचा उद्देश मनात धरला म्हणजे विषयाध्यायन विशेष काळजीपूर्वक करावे लागते व फुरसतीचा काळ आळशीपणात न घालवता योग्य कामाकडे खर्च होऊन लेखकाची स्वत:ची मन:संस्कृती तयार होते.' असा आपला लेखनविषयक दृष्टीकोन त्यांनी व्यक्त केलेला आहे. निवृत्तीनंतर त्यांनी विपुल लेखन केले.

त्यांनी लेखनास 1895 पासून प्रारंभ केला. त्यांची वृत्ती संशोधकाची होती. अरुणोदय, ग्रंथमाला, विश्ववृत्त, विविधज्ञानविस्तार, लोकशिक्षण, पुरुषार्थ आणि महाराष्ट्र साहित्य पत्रिका इ. नामांकित नियतकालिकांतून त्यांनी लेखन केले. लोकमान्य या वृत्तपत्रातून त्यांनी गच्चीवरील गप्पा ही लेखमाला लिहिली.

त्यांची एकूण चौदा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांची ‘आमचा गाव बदलापूर’, ‘एडमंड वर्कचे चरित्र’, ‘चित्पावन’, ‘वैदिक निबंध’, ‘पेशवाईच्या सावलीत’, ‘समाज नियंत्रण’, ‘शिवाजी निबंधावली’ (संयुक्त – न. चिं. केळकर व वागोकले सहलेखक) ही काही गाजलेली पुस्तके. त्यांनी समीक्षण केलेल्या पुस्तक परीक्षणांचे संकलन 'साहित्य समीक्षण' या ग्रंथात करण्यात आलेले आहे.

ना. गो. चापेकर यांचे निधन 5 मार्च, 1968 साली बदलापूर येथे झाले.

लेखी अभिप्राय

आपण दिलेली वरील व्यक्तिमत्त्वाची माहिती documentary साठी आम्ही वापरू शकतो का?

अरविंद जाधव31/05/2019

अरविंद जाधव ही माहिती 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'चे सौजन्य नमूद करून जरूर वापरावी.
- नितेश शिंदे

Think Maharashtra05/06/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.