शिक्षक आणि समाज


_ShikshanAani_Samaj_1.jpgसमाजशास्त्रज्ञांनी शंभर वर्षांपूर्वी ‘समाज’ ही संकल्पना विषद केली. ती आजच्या काळाच्या कसोटीवर टिकेल का? आजूबाजूला घडणाऱ्या समाजविघातक घडामोडींनी कोणाही संवेदनशील व्यक्तीला हळहळ वाटेल. प्रश्न आणि समस्या यांचा नुसता बाऊ करण्यात अर्थ नाही, त्यावर उपाय शोधणे मानवी स्वभावाला धरून आहे. म्हणून समाजउभारणीचा प्रश्न डोळ्यांसमोर येतो तेव्हा तो पारंपरिक उपाय कामी येईल असे वाटते. गावा-गावात, शहराच्या वाडा-वस्तीत असणाऱ्या शाळा ह्या समाज परिवर्तनाच्या कार्याचे केंद्रे होऊ शकतात. शाळांमध्ये वर्गात मुलांना अक्षर, अंक याबरोबर व्यवहारज्ञान शिकवणारे, चारित्र्य विकासाचा ध्यास घेतलेले शिक्षक हे समाजउभारणीचे काम करू शकतील.

समाजउभारणीची वेळ आली आहे, हे आपण सर्वांनी मान्य करायला हवे. या मान्यतेपासूनच शुद्धीकरणाचा प्रांरभ होईल. त्याची उदाहरणे अनेक आहेत. गावपातळीपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत या समाजउभारणीची गरज अधोरेखित करणारी उदाहरणे आहेत. वाढती वृद्धाश्रमांची संख्या, महिलांवरील अत्याचार, मुला-मुलीचे शोषण, दुर्बलाचे मरण, वाढता हव्यास, प्रत्येक स्तरावरील भ्रष्टाचार त्यातून उद्भवलेली अनैतिक कृत्याची साखळी, भौतिक सुखाची प्रंचड आसक्ती देव, धर्म श्रद्धा यांच्या बाजारीकरणातून होणारी लूट –प्रंसगी राष्ट्रीय अस्मिता सुरक्षितता पणाला लावण्याचे कृत्य. ही यादी संपणारच नाही. या आणि अशा घटनांमुळे समाजाची घडी विस्कटली आहे हे मान्य करावेच लागते.

सुजाण नागरिक, सुसंस्कृत व्यक्तिमत्व घडवण्याची आपल्या देशात तरी एकच केंद्र आहे ते म्हणजे शाळा. या शाळा म्हणजे नुसत्या निर्जीव-भिंतीची इमारत नव्हे. या शाळांना जीवंतपणा, आधुनिकपणा, दूरदृष्टी, परिवर्तनाच्या वाटेवर आणण्याचे काम शिक्षक करत असतो. हे सत्य नाकारता येणार नाही.

समाजउभारणीत शिक्षकाची भूमिका कशी असावी?

१.    जगभर घडणाऱ्या पर्यावरणीय घटनांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना त्याविषयी सामाजिक भान आणून देण्यासाठी उपक्रम राबवणे.
२.    माहितीच्या उपयोगातून ज्ञानाची निर्मिती आणि या ज्ञानाचा मानव व पर्यावरण यांच्या संयुक्त विकासासाठी प्रकल्प राबवणे.
३.    शक्य असेल तेव्हा मानवी व्यवहारातील सचोटी, प्रामाणिकपणा,वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी धडपड करणे.
४.    विद्यार्थ्यांच्या शरीर-मनातील विघातक ऊर्जेला विधायक ऊर्जेत जाणीवपूर्वक परिवर्तन करण्याचे उद्दिष्ट बाळगणे.
५.    एकेक व्यक्तिमत्व संपन्न करणे. तशा संपन्न व्यक्तीमत्वातून ‘समाज’ साकारणे. त्या  ‘समाजाला’ राष्ट्रभावनेने प्रेरित करणे यासाठी दीर्घ स्वरूपाचा कार्यक्रम निश्चित करणे.
६.    प्रत्येक शिक्षकाने, विद्यार्थ्यांचा विचार भावी नागरिक म्हणून करणे. तरच ही साखळी पूर्ण होईल. त्यातील एक तरी कडी निखळली तर साखळी उरणार नाही.
७.    समाजउभारणीची प्रकिया अंखड, अव्याहत चालू राहणारी आहे. त्याचे फलित दिसण्यासाठी, दृश्य परिणाम मोजण्यासाठी संयम, निरीक्षण दृष्टी आणि मापनाची वस्तुनिष्ठ साधने या साऱ्यांचीच आवश्यकता असते. या साऱ्याचे भान शिक्षकांनी ठेवले तर समाजउभारणीचे काम सुलभ होऊ शकते.

मात्र समाजाची उभारणी करताना, आपल्याला समाज नेमका कसा हवा आहे. तसेच तो कसा असू नये या दोन्ही अंगाने विचार करून सर्वानुमते राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम निश्चित व्हायला हवा. त्यापूर्वी, राष्ट्रीय स्तरावर अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यांची निश्चिती संविधानिक संस्थाकडून केली जाते. हे अभ्यासक्रम, पाठ्यक्रम काळाचा वेग सांभाळू शकलेले नाहीत. म्हणून त्यात परिवर्तन करण्याची गरज शिक्षकांनी अधोरेखित करायला हवी. शिक्षक केवळ हुकूमाचा ताबेदार नसावा. तळागाळातील विद्यार्थ्यांच्या जडण-घडणीचा आलेख शिक्षकाच्या चक्षुपटलावर असतो. समाज उभारणीच्या प्रक्रियेतील कच्चे दुवे शिक्षकच अधिक जाणून असतात. शिक्षकांनी त्यांचे आपले अनुभव, कल्पना मांडायला हव्यात. शासनाने त्या  सहिष्णू भावनेने ऐकायला हव्यात, पटल्यास बदल स्वीकारयाला हवा. तरच नव्या, आदर्श समाजाची उभारणी होऊ शकते.

अलीकडे अभियंता, व्यवस्थापन, आरोग्यशास्त्र, औषधशास्त्र या विषयांचे पदव्युत्तर, पदवीपर्यंतचे शिक्षण होऊन बेरोजगारीला तोंड द्यावे लागत आहे. आयआयटी, आयआयएम यांसारख्या संस्थांतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनाही नोकरी मिळत नाही. पुन्हा नव्याने कामाच्या स्वरूपाप्रमाणे प्रशिक्षण घेण्याची वेळ येत आहे. शिक्षणातून मूल्य व संस्कार यांची निर्मिती व विकास हे घडायला हवे. पण त्याबरोबर उत्पादकता, आर्थिक स्वावलंबन हेही वाढायला हवे. गेल्या दशकभरात बेरोजगारीने समाजव्यवस्था ढवळून निघाली आहे. शिकलेल्या तरुणांच्या शक्तीला योग्य वळण न मिळाल्यामुळे समाजविघातक घटना घडत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत तग धरून राहण्याची व अस्तित्व टिकवण्याची युक्ती शिक्षकांनी द्यायला हवी. कष्टातून मोती पिकवण्याची ‘कला’ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवली तर सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण होऊ शकेल. असा समाज खऱ्या अर्थाने सामाजिक असेल.

पूर्वी, एक शिक्षक गावाच्या पलीकडे असणाऱ्या शाळेत गावाच्या मधून जाणाऱ्या रस्त्याने जात. एक दिवस रस्त्याकडेच्या घरातील नवरा-बायकोचे प्रंचड भांडण चालू होते. ती  तावातावाने बोलत होती. गावकरी, पोरेसोरे भांडण ऐकण्यासाठी  जमा झाले होते. तेवढ्यात मुलांना शिक्षक गावात येताना दिसले. मुले शाळेत पळाली. बाया-बापडे त्यांच्यात्यांच्या घरी गेली. गुरुजींपुढे तमाशा नको म्हणून नवरा-बायको दोघेही भांडायची थांबली. केवळ शिक्षकांच्या आदरापोटी. म्हणून समाज उभारणीत शिक्षकच योग्य भूमिका निभावेल आणि आदर्श समाज साकारेल!

- यशवंत सुरोशे

लेखी अभिप्राय

sunder lekh..

sandhya joshi19/03/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.