तृप्ती अंधारे - शिक्षकांची सक्षमकर्ती


‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या ‘शिक्षकांचे व्यासपीठ’ या उपक्रमासाठी प्रयोगशील शिक्षकांचा शोध सुरू होता. मात्र येऊन पोचलो तृप्ती अंधारे या बिनशिक्षकी नावावर. तृप्ती या लातूर तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी. शिक्षकाला स्वयंपूर्ण आणि चिंतामुक्त केले तर शिक्षण व्यवस्थेत अमूलाग्र बदल घडवता येऊ शकेल हा त्यांचा विश्वास. त्यांनी त्या उद्देशाने सातत्यपूर्ण काम केले. परिणामी जिल्हा परिषदेच्या ओस पडलेल्या शाळा उघडल्या गेल्या, शाळेकडे न फिरकणारे शिक्षक शाळेत नेमाने येऊ लागले, शिकवण्याची उमेद हरवलेली शिक्षक मंडळी झपाटून कामाला लागली, गावांमध्ये शिक्षणाच्या दृष्टीने प्रयोग केले जाऊ लागले. त्याचा परिणाम असा, की गावकऱ्यांनी खासगी इंग्रजी शाळांमधे शिकणारी त्यांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाठवण्यास सुरूवात केली…

_TruptiAndhare_Shikshkanche_1.jpgतृप्ती अंधारे यांची गटशिक्षण अधिकारी पदावर पहिली नियुक्ती झाली ती बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यात. त्या रुजू होण्यापूर्वी गटशिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयात डोकावल्या. त्यांना कोणत्याही साधारण शासकीय कार्यालयात असते तसे निरस वातावरण, तुटलेल्या खुर्च्या, अस्वच्छता दिसली. तृप्ती यांना ते दृश्य पाहून खूप आनंद झाला. त्यांनी लगेच घरी फोन करून सांगितले, की मला इथे खूप काम करता येणार आहे.

तृप्ती यांनी ठरवले, की या परिसरात शाळांमध्ये बदल घडवायचा असेल तर तो बदल आधी कार्यालयापासून सुरू करायला हवा. त्यांनी तेथील धुरकटलेले वातावरण, निस्तेज दिवे येथपासून बदलाला सुरूवात केली. त्यांनी माजलगावच्या गावागावांतल्या शाळा पाहण्याचा सपाटा लावला. त्यांना दिसले, की शिक्षक हवे तेव्हा शाळेत जात आहेत, एकमेकांच्या गैरहजेरी सांभाळून घेत आहेत, काही शिक्षकांनी चक्क इतर उद्योग सुरू केले आहेत. शिक्षणाची प्रक्रिया केवळ नावाला सुरू होती. तृप्ती यांनी अनेक ठिकाणी जाऊन शाळांची कुलूपे काढली. जेथे शिक्षक हजर नव्हते तेथे त्यांनी स्वत: परिपाठ घेतले. त्यांच्या शाळाभेटींच्या बातम्या कर्णोपकरणी पसरू लागल्या. शाळेकडे न फिरकणारे शिक्षक वेळेवर शाळेत येऊ लागले. त्यांना पाहून गावकरीदेखील ‘आज गुरूजी शाळेत कसे काय?’ म्हणत चकित होऊ लागले.

तृप्ती म्हणतात, ‘‘काम न करणारी मंडळी संख्येने कमी असतात. पण काम करण्याची इच्छा असलेली मात्र आत्मविश्वास नसलेले शिक्षक अनेक होते. मी त्यांना विश्वास देण्यास सुरूवात केली. मी ‘झिरो पेंडन्सी’वर काम सुरू केले. खात्याचे, शिक्षकांचे कोणतेच काम थकीत राहणार नाही यावर लक्ष दिले. मुख्याध्यापकांच्या, शिक्षकांच्या बैठका घेतल्या. त्यांना त्यांचे कोणतेच काम अडून राहणार नाही याचा विश्वास दिला. शिक्षकांची कामे सुरळीत व्हायची असतील तर कार्यालयात ‘वर्क कल्चर’ निर्माण होणे आवश्यक होते. माझ्या कार्यालयात वेगवेगळ्या विभागांतील पंचवीस मंडळी होती. त्यातील आस्थापना हा विभाग कार्यालयाचा आत्मा! कारण शिक्षकांची जीपीएफ, मेडिकल बिले, रजा मंजुरी यांची कार्यवाही त्या विभागाकडूनच होणार होती. त्या विभागाची बैठक घेऊन त्यांना स्पष्ट सांगितले, की कुठलीही फाईल अडवायची नाही, खोटी माहिती सांगायची नाही. जर तुमच्याविरोधात तक्रारी आल्या तर खैर नाही.’’

_TruptiAndhare_Shikshkanche_2.jpgतत्पूर्वी शिक्षकांना अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी गटशिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयात तासनतास ताटकळत उभे राहावे लागे. तृप्ती यांनी ती पद्धत बंद केली. शिक्षकाने यावे, कागदपत्रे द्यावी आणि शाळेला निघून जावे. कार्यालयाकडून कागदपत्रे सह्या करून शिक्षकांकडे पोचती केली जाऊ लागली. पूर्वी शिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात येणारी शिबिरे रविवारी घेण्यात येत. मात्र त्यामध्ये शिक्षकाची हक्काची सुटी खर्च होई. तृप्ती यांनी तो प्रघात बंद केला. तृप्ती शिक्षकाला चिंतामुक्त करण्यासाठी जे जे म्हणून शक्य असेल ते ते करू लागल्या. त्याचा परिणाम असा, की शिक्षकांनी शिकवण्यामध्ये झोकून देण्यास सुरूवात केली. गावागावातील लहानलहान शाळांमध्ये शिक्षणविषयक प्रयोग सुरू झाले.

तृप्ती यांच्या कामाची पहिल्या वर्तमानपत्रांनी दोन महिन्यांतच दखल घेण्यास सुरूवात केली. अनेकांना गटशिक्षण अधिकारी नावाचे पद असते आणि त्याची अशी कामे असतात हे प्रथमच कळले. तृप्ती म्हणतात, ''शिक्षक असोत वा कर्मचारी, त्यांना विशिष्ट तऱ्हेच्या कामची सवय लागली होती. त्यांच्यासमोर कामाचा आदर्श निर्माण केला, की तीच मंडळी अॅक्टीव्ह होऊन काम करण्यास सुरूवात करतात.’’ तृप्ती यांनी लोकांच्या मनातील सरकारी कार्यालयांबद्दलची नकारात्मक भावना बदलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानाची वागणूक देण्यास सुरूवात केली. तृप्ती यांना त्यातून निर्माण झालेल्या सकारात्मकतेमुळे लोकसहभाग लाभला. लोकांनी-संस्थांनी शासकीय इमारत रंगवून देणे, स्वच्छतागृह तयार करणे, बोर खणणे अशी मदत केली. कार्यालयात चोवीस तास पाणी आणि वीज सुरू झाली. कुणी वायफाय बसवून दिला. माजलगावचे कार्यालय सीसीटीव्हीचा वापर करणार राज्यातील पहिले गटशिक्षण अधिकाऱ्याचे कार्यालय ठरले. ते सारे लोकसहभागातून घडत होते. तृप्ती यांनी गटशिक्षण अधिकारी कार्यालयाची वेबसाईट शिक्षण विभागात तंत्रज्ञानाचे वारे वाहायला लागण्यापूर्वी तयार केली. त्या वेबसाईटला महाराष्ट्र शासनाकडून सर्वोत्कृष्ट वेबसाईटचा पुरस्कार मिळाला.

तृप्ती अंधारे यांना पोलिस अधिकारी होण्याची इच्छा होती. मात्र त्यांना घरच्यांच्या आग्रहाखातर शिक्षकी पेशा स्वीकारावा लागला. त्यांनी उस्मानाबाद येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक पदावर 1996 ते 2009 पर्यंत काम केले. त्या काळात त्यांचा एमपीएससीच्या परिक्षांचा अभ्यास सुरू होता. त्या दोन वेळा डेप्युटी कलेक्टर, एक वेळा पीएसआय या पदांसाठीच्या परिक्षांमध्ये पास झाल्या. पण अगदी शेवटच्या क्षणी शारिरीक किंवा इतर परिक्षांमध्ये त्यांची संधी हुकली. तृप्ती यांनी विस्तार अधिकारी पदावर पुणे येथे दोन वर्षे काम केले. त्यानंतर त्यांनी गटशिक्षण अधिकारी पदाची परिक्षा उत्तीर्ण होऊन बीडच्या माजलगाव तालुक्यात कार्यभार सांभाळला.

_TruptiAndhare_Shikshkanche_3.jpgतृप्ती यांनी बीडमध्ये तीन वर्षे, तर उस्मानाबादच्या भूम तालुक्यात एक वर्षे काम केले. तेथून त्यांची बदली झाली ती लातूरला! तृप्ती अविनाश धर्माधिकारी यांच्या विद्यार्थी. ते तृप्ती यांचे आदर्श! तृप्ती शासकीय सेवेत सच्चेपणाने काम करण्याचा उद्देश मनाशी बाळगून या क्षेत्रात उतरल्या. त्यांनी शिक्षक म्हणून काम केले असल्यामुळे आपण त्यावेळी जे भोगले ते इतरांच्या वाट्याला येऊ नये असा त्यांचा प्रयत्न नेहमी राहिला.

तृप्ती यांना प्रयत्नांची दखल घेण्यातील महत्त्व कळते. त्या त्यांना प्रयत्नशील व्यक्ती, वेगळे उपक्रम आढळले, की लगेच त्या शाळेला अभिनंदनाचे, कौतुकाचे पत्र पाठवतात. त्या कामाचे उल्लेख शिक्षकांच्या व्हॉट्स अॅप ग्रूपवर करतात. कार्यक्रम-सभा यांमधून त्या कामाची उदाहरणे देत राहतात. माजलगाव येथे त्यांनी तशा शिक्षकांना पुरस्कार देण्याची पद्धत वैयक्तीक प्रयत्नांतून सुरू केली होती. तृप्ती यांच्या पुढाकाराने शिक्षक मंडळींमध्ये चैतन्य निर्माण झाले. सोबत त्यांना त्यांच्या जबाबदारीचे भानही येऊ लागले. प्रत्येकजण आपापल्या शाळांमध्ये नव्या गोष्टी साकार करण्यासाठी धडपडू लागला. त्यातून निर्माण झालेले अनेक उपक्रम राज्यामध्ये, शिक्षण वर्तुळामध्ये चर्चिले गेले. शाळा डिजिटल होऊ लागल्या. विद्यार्थ्यांच्या मनोवस्थेचा आणि भूमिकेचा विचार करून शाळांचे रुपडे पालटू लागले. लातूरच्या ढोकी गावातील प्राथमिक शाळेची कहाणी तर विलक्षण आहे. तेथील गावकऱ्यांनी शेजारच्या गावात इंग्रजी शाळेत जाणारी त्यांची मुले त्या शाळेतून काढून गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत घातली आहेत. त्या शाळेचा प्रत्येक विद्यार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांची आणि त्यातील सर्व तालुक्यांची नावे घडाघडा म्हणून दाखवतो. त्यामध्ये अद्याप पहिलीत प्रवेश न घेतलेली साडेपाच वर्षांची शरयू शिंदे हिचादेखील समावेश आहे.

तृप्ती कवीमनाच्या आहेत. कदाचित म्हणूनच त्यांच्यातील संवेदनशीलता अजूनही ताजी आहे. त्यांना शाळाशाळांमधून फिरताना तेथील मुलांना खूप काही सांगायचे आहे, लिहायचे आहे असे वाटे. त्यांनी त्यांच्या अभिव्यक्तीला वाट मिळवून देण्याचे ठरवले. त्यांनी माजलगावातील दोनशे सात शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी कविता लिहाव्यात असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी त्यास उबदार प्रतिसाद दिला आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी लिहिलेला ‘दप्तरातल्या कविता’ हा कवितासंग्रह संपादीत करून प्रसिद्ध केला. तृप्ती यांनी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या शिक्षकांच्या प्रयत्नांच्या कहाण्या ‘प्रयास’ या नावाने संपादीत करून प्रसिद्ध केला. तृप्ती यांना मानव संसाधन केंद्रीय मंत्रालयाकडून उपक्रमशील गटशिक्षण अधिकाऱ्याचा पुरस्कार लाभला आहे.

मी तृप्ती यांच्यासोबत काम केलेल्या शिक्षकांशी बोलत होतो. त्या प्रत्येकाच्या सांगण्यात तृप्ती यांच्या कामाचा झपाटा, वेग, शिक्षकांना समजून घेण्याची - त्यांना मदत करण्याची मनोभूमिका, त्यांनी घेतलेली त्यांची दखल, दिलेले प्रोत्साहन याबद्दलची कृतज्ञता दाटली होती. त्यांच्या सांगण्यात अधिकाऱ्याबद्दलचे कौतुक नव्हते, तर जवळच्या सहकाऱ्याबद्दलचा आपलेपणा आणि अभिमान होता.

तृप्ती यांच्या कामाचा आलेख पाहता त्यांनी निर्माण केलेला कार्यसंस्कार अधिकाऱ्याच्या पदापासून पाझरत खालील सर्व स्तरांपर्यंत पोचला असल्याचे जाणवते. कर्मचाऱ्यांच्या भूमिका बदलल्या, शिक्षक कार्यरत झाले, विद्यार्थी शिकण्यास उत्सुक दिसू लागले, गावकऱ्यांची जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पाहण्याची दृष्टी बदलली. तृप्ती अंधारे यांनी एक कार्यदक्ष शासकीय अधिकारी इच्छाशक्तीच्या जोरावर हाती असलेल्या यंत्रणेतून काय घडवू शकतो याचे सकारात्मक चित्र उभे केले. ते चित्र कार्यतत्परता, संवेदनशीलता आणि चांगुलपणा या तीन रंगाचे अभूतपूर्व मिश्रण आहे.

(पूर्वप्रसिद्धी - दैनिक दिव्य मराठी, रसिक पुरवणी, मार्च 2018)

तृप्ती अंधारे - 8698503503

- किरण क्षीरसागर

लेखी अभिप्राय

खूपच मस्त लिहलय.तृप्ती एक संवेदनशील व्यक्ती म्हणून
मला जास्त भावते.

पुष्पा क्षीरसागर30/03/2018

जादूची कांडी फिरवावी असे अफलातून परिवर्तन घडवून चौफेत विकास घडवणा ऱ्या तृप्ती मॅम च्या जबरदस्त इच्छाशक्ती व धडाडी अनुकरणीयवैशाली सूर्यवंशी
३/०४/२०१८

वैशाली मोठाभाऊ…03/04/2018

अतिशय प्रेरणादायी लेख, आणि खरोखरच तृप्ती मॅडमनी प्रत्येक शिक्षकाच सक्षमीकरण केलय, त्यांच्या कार्यास त्रिवार सलाम.....

किरण साकोळे04/04/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.