होदिगेरे- शहाजीराजे समाधी


_Hodigire_ShajicheSamadhi_1.jpgहोदिगेरे हे गाव दावणगेरे येथून त्रेपन्न किलोमीटर अंतरावर आहे. तसेच, संतेबेन्नुर तेथून वीस किलोमीटरवर आहे. ते गाव पुष्करणीसाठी प्रसिद्ध आहे. इतिहासकरांचा असा कयास आहे, की त्याची बांधणी सोळाव्या शतकातील आहे. ती स्थाने पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत आहेत. शहाजी राजे यांची समाधी आणि त्यांचा वाडा हे आकर्षणाचे केंद्र आहे. गाव छोटे आहे. समाधी मुख्य रस्त्यालगत आहे. समाधी एक एकरामध्ये आहे. सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेशद्वार उघडे असते. त्याचे जतन चांगल्या प्रकारे केले गेले आहे. सरकारने समाधीचे सुशोभीकरण केले आहे. राजांचा मुक्काम ज्या वाड्यामध्ये असायचा तो सावकार वाडा म्हणून ओळखला जातो. तो वाडा समाधीपासून एक किलोमीटरवर, देवीच्या मंदिराजवळ आहे. वाडा बऱ्यापैकी अवस्थेत साडेतीनशे वर्षांनंतरही आहे. महाराष्ट्रातून फारच कमी लोक समाधीच्या ठिकाणी जातात असे कळले.

शहाजीराजे यांचा जन्म मालोजीराजे आणि उमाबाई नाईक-निंबाळकर यांच्या पोटी 18 मार्च 1594 रोजी झाला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास लहानपणापासून वडील आणि चुलते यांच्या (विठोजी) यांच्या मार्गदर्शनाखाली झाला, त्यामुळे तरुणपणी, त्यांना निजामाने पुणे-सुपेची जहागिरी दिली. त्यांचा विवाह सिंदखेडराजा येथील जाधव कुटुंबातील जिजाबाई यांच्याशी 1605 साली झाला. शहाजीराजांच्या वडिलांचा मृत्यू इंदापूर जवळील युद्धामध्ये 1606 मध्ये झाला.

शहाजीराजे यांच्या राजकारणाची सुरुवात निजामशाहीपासून झाली. परंतु त्यांनी मलिक अंबरच्या खराब वागणुकीमुळे आदिलशाहीत प्रवेश केला. त्यांनी इब्राहीम खान आदिलशहाच्या मृत्यूनंतर मोगलांच्या दरबारी प्रवेश केला, पण तेथेदेखील त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली. त्यांनी मृतप्राय झालेल्या निजामशाहीचे पुनरुत्थान करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी निजामशाहीचे पूर्ण पतन झाल्यावर आदिलशाहीमध्ये पुन्हा एकदा प्रवेश केला. त्यांना विजापूर सुलतानाने बंगलोरची जहागिरी 1639 साली दिली, त्यानंतर शहाजीराजे जोपर्यंत हयात होते तोपर्यंत ते कर्नाटक-बंगलोर भागातच राहिले.

त्यांचा दरारा, रुतबा (अधिकार, पद, महत्ता) सार्वभौम राजाला शोभेल असाच होता. त्यांची जनतेप्रती तळमळ त्यांच्यावर झालेल्या संस्कारांमुळेच उद्भवली होती. त्यामुळेच जनतेमध्ये त्यांच्यासाठी आदर होता, त्यांची इच्छा मराठ्यांचे (हिंदवी) स्वतंत्र स्वराज्य असावे अशी होती, ती छत्रपती शिवाजीराजे यांनी पुढे पूर्ण केली.

- भाग्येश वनारसे

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.