शाश्वत विकासासाठी युवा मित्रची धडपड


_ShashvatVikassathi_YuvaMitrachiDhadpad_1.jpgनाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील ‘युवा मित्र’ स्वयंसेवी संस्था शाश्वत विकासाच्या ध्यासाने काम करत आहे. शेतक-यांनी शेतक-यांसाठी उभी केलेली ‘देवनदी व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनी’ व ग्रामीण उपजीविका व्यवस्थापन केंद्र असे ‘युवामित्र’चे शाश्वत विकासाचे मॉडेल आहे. संस्था प्रश्नाचे उत्तर शोधून देण्यासाठीही जीव तोडून काम करते. उत्तर हाती लागले, की त्या प्रश्नाशी झुंजणार्याे सर्वसामान्य नागरिकांवर पुढील धुरा सोपवून देते. त्यांचा गट, कंपनी स्थापन करून त्यावर तीच गरजवंत माणसे जोडलेली राहतात. त्यांच्या कामातील पारदर्शकता, त्यांची दीर्घकालीन विकासाकडील वाटचाल चालू ठेवण्यास मदत करते.

‘युवा मित्र’ ही मूलत: ग्रामविकासाचे कार्य करणारी स्वयंसेवी संस्था आहे. मुलांसाठी शिक्षण, महिला व किशोरी यांच्यासाठी आरोग्य व सक्षमता, शेतक-याना आधुनिक शेती तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन- त्यांच्या शेतमालाला बाजारपेठ मिळवून देणे अशा विविध कामांत गुंतली आहे.

‘युवा मित्र’ची स्थापना छात्रभारतीच्या युवकांनी मिळून 1995 मध्ये केली. संस्था मनीषा आणि सुनील पोटे या दांपत्याच्या कार्यातून उभी राहिली. ‘युवा मित्र’च्या सिन्नर तालुक्यातील मित्रांगण कॅम्पसमध्ये प्रवेश केल्यानंतर तेथील चैतन्यामुळे कामाचा आवाका लक्षात येतो.

_ShashvatVikassathi_YuvaMitrachiDhadpad_2_0.jpgमनीषा या मूळ नाशिकच्या तर सुनील सिन्नर तालुक्यातील लोणारवाडीचे. दोघेही एमएसडब्ल्यू झालेले आहेत. सुनील यांचे सामाजिक भान पाहून मनीषा प्रभावित झाल्या. ती गोष्ट दोघे आयएमआरटी कॉलेजमध्ये एकत्रित शिकत असताना एका प्रकल्पावर काम करता करता दोघेही एकमेकांत गुंतले आणि त्यांच्या सहजीवनाबरोबर ‘युवामित्र’ही फुलत गेले.

‘युवा मित्र’ने 1995 मध्ये सिन्नर शहरातील माकडवाडी या भागात दुर्बल घटकांसाठी बालवाडी सुरू केली. त्यांनी त्या भागात राहणारे वैदू, भराडी, माकडवाले यांच्या मुलांना मराठी भाषेची व शिक्षणाची गोडी लागावी यासाठी बालवाडीच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग राबवले. त्यांनी 1996 मध्ये रामनगर व जामगाव येथे आरोग्य मेळावा आयोजित केला. तेथून ‘युवा मित्र’चे काम विस्तारू लागले होते. तो उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेला होता. त्यातून ‘उत्तर महाराष्ट्र लोकविकास मंचा’चे ‘युवा मित्र’ने सदस्यत्व 1999 मध्ये स्वीकारले. त्यामध्ये ‘युवा मित्र’ला महिलांसोबत बचतगटाचे, शेतक-यांसोबत कृषक मित्र उपक्रम राबवायचे होते. त्याच वेळी नाशिक येथील ‘अभिव्यक्ती’ या संस्थेला ‘क्षणोक्षणी शिक्षण’ हा उपक्रम राबवायचा होता. त्या प्रकल्पामुळे ‘युवा मित्र’चे काम प्रत्यक्ष जमिनीवर सुरू झाले ते रामनगर व जामगाव या गावांमध्ये महिला, युवक, बालक, शेतकरी यांच्या गटबैठका घेऊन.

‘युवामित्र’ने औपचारिक कार्यालय सिन्नर शहराच्या शिवाजीनगर भागात 2001 मध्ये घेतले. ‘युवा मित्र’ने रमाई सक्षमीकरण योजनेअंतर्गत पंचेचाळीस बचत गट तयार केले होते. त्या बचत गटांच्या अनुषंगाने लिंगभाव समानता, सामाजिक जाणीव जागृती, कार्यात्मक साक्षरता, बचतगट संकल्पनात्मक प्रशिक्षण या विषयांवर भर देण्यात आला. बचतगट हे स्त्री संघटनेची साधने बनावीत ते त्यांच्यातच साध्य नव्हे हा विचार महत्त्वाचा होता. त्यातूनच रामनगर येथे दारूबंदी व जामगाव येथे वीजमंडळाच्या विरूद्ध आंदोलन पुकारली गेली. रामनगर हे दारूसाठी प्रसिद्ध. तेथेच दारूबंदी झाली. त्यामुळे गावच जोडले गेले. ‘युवा मित्र’ने बचत गटांचे काम 2001 ते 2006 या काळात कसोशीने केले. त्याच सुमारास महिला राजकारणात आल्या. पण त्यांना त्यांचे स्थान तेथे प्राप्त झालेले नाही ही गोष्ट ध्यानात घेऊन, ‘युवा मित्र’ने ‘उत्तर महाराष्ट्र लोकविकास मंचा’च्या माध्यमातून महिलांच्या क्षमता बांधणीसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले.

‘युवा मित्र’ने 2005 मध्ये महत्त्वाचा विषय हाताळला, तो बालकांसोबत. पर्यावरण व जैवविविधता संवर्धन ही मूल्ये समाजामध्ये रूजावी या उद्देशाने ‘युवामित्र’ने बालकांसाठी ‘निसर्ग मित्र’ प्रकल्प सुरू केला. बालकांना त्यांच्या त्यांच्या गावांचा इतिहास काय आहे हे त्यांनीच शोधायचे असा मूलमंत्र देण्यात आला. सिन्नर तालुक्यातील वीस गावांमध्ये तसे काम सुरू झाले. गावांची परिक्रमाच करायची, सकाळ-संध्याकाळी फेरी मारायची, स्थानिकांशी चर्चा करायची असा धडाका लावला गेला. त्यातून शहरीकरणाचा फटका कसा बसला आहे आणि निसर्गाची वाताहत कशी झाली हे मुद्दे ‘युवा मित्र’समोर आले. त्या माहितीचे संकलन करण्यात आले. वीस गावांची जैवविविधता रजिस्टरे, शिवारफेरी व निसर्गमित्र हस्तपुस्तिका साकार झाले. ते महाराष्ट्र राज्यातील पहिले जैवविविधता रजिस्टर. ते गावाच्या स्वाधीन करण्यात आले.

पोटे दांपत्याने ‘युवा मित्र’ संस्थेसाठी लोणारवाडी व हरसुले गावाच्या मध्यावर तीन एकर जागा 2006 साली घेतली. त्यातील सोळा गुंठे जागा ‘युवामित्र’ या संस्थेच्याच नावे लिहून दिली. त्याला मित्रांगण कॅम्पस असे नाव देऊ केले. शिवाजीनगरच्या छोट्याश्या हॉलमध्ये सुरू झालेले कार्यालय मित्रांगण कॅम्पसमधील दगडमातीच्या कार्यालयात वसले. त्यामुळे ‘युवा मित्र’चे कार्य अधिकच फुलू लागले.

‘युवा मित्र’ने कायमच स्थानिकांचे प्रश्न ओळखून त्यानुसार काम करण्याची पद्धत अवलंबलेली होती. युवा मित्रने कामाला सुरूवात केली तेव्हाच त्यांच्या लक्षात आले, की शेतीचा प्रश्न अतिशय बिकट आहे. पाण्याचे खूप मोठे संकट समोर होते. दरम्यान, निसर्गमित्र प्रकल्पामुळे ब्रिटिशांनी पाण्याची उत्तम व्यवस्था केलेली होती हे लक्षात आले. शंभर  वर्षांपूर्वीच ब्रिटीश काळात देवनदीवर पाटबंधारे बांधले होते. त्या पाटामुळे गावाच्या गरजेनुसार पाण्याचे नियोजन केले होते व उर्वरित पाणी पुढील गावाकडे वाहते व्हायचे. मात्र काळाच्या ओघात ती पाटव्यवस्था नष्ट झाली. लोकांनी पाट बुजवून टाकले. त्यातच वीजेचे भारनियमन बारा-बारा तास. मग तळातून पाणी फिरणार तरी कसे? ते लक्षात आल्यानंतर त्या पाटबंधा-यांना पुनर्जीवित करणे अधिक महत्त्वाचे वाटले. पाट खुले झाल्यानंतर शेतकर्यांटना, स्थानिकांना त्याचा फायदा होणार होता. त्यामुळे त्यांना त्याबाबत पटवून देऊन लोकसहभाग मिळवण्यात आला. टाटा ट्रस्ट, बॉश इंडिया फाऊंडेशन, नाशिक चॅरिटेबल ट्रस्ट यांची मदत झाली. कामाला 2007 मध्ये सुरुवात झाली आणि सिन्नरची जीवनवाहिनी असणारी देवनदी व पाटबंधारे जिवंत झाले. देवनदीवरील आणि म्हाळुंगी नदीवरील मिळून वीस पाटबंधारे व्यवस्था दुरूस्त करण्यात आल्या. परिसरातील गावांत दुष्काळ नाहीसा होऊन तीन तीन पिके निघू लागली आहेत. प्रत्येक पाट पाणी व्यवस्थेची काळजी घेण्यासाठी गावानुसार पाणी वापर संस्थांची स्थापना करण्यात आली.

शेतक-यांनी एकेकट्याने मालविक्री केल्याने त्यांना हवा तितका फायदा मिळत नसे. शिवाय, सगळे गावकरी एकच पीक घ्यायचे त्यामुळे बाजारभाव कमी मिळायचा. त्यातच डिलरकडून फसवणूक. त्या सगळ्यावर मात करण्याकरता ‘देवनदी व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनी’ची स्थापना 2011 मध्ये केली गेली.

सहकार क्षेत्र आणि प्रायवेट कंपन्या यांच्यातील चांगल्या बाजूंच्या एकत्रिकरणातून ‘प्रोड्युसर कंपनी’ ही यंत्रणा ‘द कंपनीज अॅणमेंडमेंड अॅडक्ट, 2002’च्या अंतर्गंत हा प्रयोग सुरू केला गेला आहे. या कंपनीचे नऊशेहून अधिक शेतकरी सभासद आहेत. कंपनीच्या कार्यकारी मंडळावर शेतकरीच आहेत. शाश्वत विकासाचा हाही एक मूलमंत्र आहे. सभासदांना आवश्यक त्या सेवासुविधा व कृषीनिविष्ठा रास्त दरात पुरवण्यासाठी महाराष्ट्रातील पहिला अॅेग्रीमॉलही सुरू करण्यात आला. शेतीत पाच गुंठ्यांचे प्लॉट करून वेगवेगळी पीके घेण्याचे प्रशिक्षण शेतक-यांना देण्यात येते. पाच गुंठ्यांचे भाजीचे प्लॉट सुरू केले; त्यातही निर्यातीयोग्य, बाजाराला आवश्यक असणा-या पिकांना प्राधान्य असा नियम केला. त्यामुळे शेतक-यांच्या हाती खेळते भांडवल येऊ लागले. दलाली प्रकारही बंद झाला होता. शेतकरी  दिवसाला पाचशे-हजार रुपये कमाई झाली तरी त्याला कर्ज घेण्यापासून मुक्तता मिळते!

‘युवा मित्र’ संस्थेने माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत. त्या प्रयोगशाळांमध्ये शेतक-यांना माती व पाणी परीक्षणाबरोबर पीक निवडीपासून ते खत-औषधांचा डोस देण्यापर्यंतचे सर्व मार्गदर्शन करण्यात येते. त्यामुळे बर्याषच खर्चात बचत होऊ शकते.

संस्थेच्या बालमित्र प्रकल्पातून ‘विक एंड स्कूल’ हा शिक्षणाचा आगळावेगळा कार्यक्रम 2011 मध्ये सुरू झाला आहे. ‘युवा मित्र’ने बालकांबरोबर मुक्त शिक्षणासाठीही तो उपक्रम सुरू केला आहे. ‘विक एंड स्कूल’ ही महिन्याच्या दुस-या व चौथ्या शनिवार-रविवारी पाटी पुस्तकांशिवाय भरणारी शाळा आहे.

सिन्नर तालुक्यामध्ये पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात करार तत्त्वावर केला जातो. करार एकतर्फी असल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान होते. त्यासाठी ‘युवा मित्र’ने सिन्नर पोल्ट्री प्रोड्युसर्स कंपनी स्थापन केली आहे. भोजापूर खोरे डाळिंब उत्पादक कंपनीही स्थापन केली आहे. माल एकत्रित विक्रीमुळे होणारा फायदा, बाजारभाव ही व्यवस्था चोख पाळता यावी यासाठी ही कंपनी सुरू करण्यात आली. त्यामध्ये सहाशे डाळिंब शेतकरी एकत्र आले आहेत. कंपनीच्या माध्यमातून ‘ओनार’ नावाचा ब्रॅण्ड विकसित करण्यात आला आहे. भारतातील हा एकमेव ब्रॅण्ड आहे.

संस्थेने ‘दूध संकलन केंद्रे’ उभी करण्यास चालना देऊन शेतक-यांची पायपीट थांबवली व त्यांचा दुधविक्रीचा वेळ अर्ध्या तासावर आणला.

महिला, विधवा, परित्यक्ता यांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांच्या उपजीविकेचे साधन शेळीपालन असल्याचे लक्षात घेऊन त्यासाठीच त्यांना प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. व्हेटरनरी डॉक्टरची नेमणूक करून शेळीची रोज तपासणी सुरू केली आहे. त्यांचे वीमा उतरवण्यात आले आहेत. शेळी उत्पत्ती वाढवण्यात सहाय्य केले जाते. त्यातून ‘अहिल्याबाई होळकर महिला शेळी उत्पादक कंपनी’ सुरू केली गेली आहे. दौडी बुद्रुक, खंबाळे, नांदूर, चास, माळवाडी या पाच गावांमध्ये कंपनीचे काम सुरू आहे. पाच-पाच महिलांचा गट तयार करून त्यांना चाळीस हजार रुपयांची मदत केली जाते. त्यातून त्यांच्यासाठी रोजगार उभा केला जात आहे. पाच वर्षांपासून सुकन्या- किशोरीसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यामध्ये वर्षाला साधारण वीस हजार मुलींना प्रशिक्षण दिले जाते.

सुनील पोटे यांचा स्वत:चा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. परिस्थिती कायमच रंजलेली होती. त्यांनी त्यांचे विश्व हलाखीच्या जगण्याशी दोन हात करत निर्माण केले. ते बारावीनंतर नोकरी करत शिकत राहिले. मात्र ते लहानपणापासून छात्रभारती, राष्ट्रसेवा दल यांसारख्या चळवळींच्या संपर्कात आले. त्यामुळे त्यांना सामाजिक कामाची जाणीव पहिल्यापासून होती.

मनीषा पोटे या मात्र मध्यमवर्गीय सुखी कुटुंबात जन्मल्या. त्यांचे वडील सरकारी नोकरीत तर आई एका शाळेत मुख्याध्यापक. त्यामुळे मनीषा यांना एमएसडब्ल्यूला प्रवेश घेईपर्यंत सामाजिक कार्य वगैरेची ओळखही नव्हती. त्यांच्या दृष्टीने समाजासाठी काही करायचे म्हणजे दानधर्म! मात्र त्यांनी एम.ए. झाल्यानंतर नाशिक येथील सोशल वर्कच्या पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला. ते वर्ष 1997 चे होते.

त्या निमित्ताने सुनील व मनीषा यांची ओळख झाली. त्यांना बाबा आमटे, मेधा पाटकर यांच्यासोबत कामाचा अनुभव मिळाला. त्या काळातील भेटींमधून त्यांना समाजकार्यातच पुढे आयुष्य द्यायचे आहे या जाणिवेने एकत्र आणले आणि लग्नगाठीत बांधले. आरंभीचा काळ स्थिरावण्यात गेल्यावर 2003 पासून दोघे पूर्ण वेळ समाजकार्यात पडले. सुनील व मनीषा पोटे म्हणतात, आम्ही कोणतेही काम त्या कामातून फंड मिळतील, पैसा उभारला जाईल या विचाराने केले नाही. आम्हाला संवादातून लोकांचे प्रश्न कळायचे आणि आम्ही त्यावर कामाला लागायचो. त्याच कामात दुस-या नव्या कामाचे बीज सापडायचे. त्यामुळे लोकांच्या गरजा आणि समस्यांनाच थेट हात  घातल्याने काम उभे राहत गेले. वेगवेगळे प्रकल्प तयार होत गेले आहेत. दोन गाव व दोन व्यक्ती यांपासून सुरू झालेल्या प्रवासात त्रेपन्न कार्यकर्ते जोडले गेले. ‘युवा मित्र’ ही संस्था नाशिक जिल्ह्यातील छपन्न गावे, इगतपुरी तालुक्यातील चौतीस गावे, पेठ तालुक्यातील अठ्ठावीस व येवला तालुक्यातील काही गावे या ठिकाणी कार्यरत आहे.

सुनील व मनीषा या दांपत्याला एक मुलगी (मुक्ता) आहे. त्यांनी या लेकीकडे लक्ष देता यावे यासाठी मित्रांगण कॅम्पसमध्येच छोटेखानी घर उभारले आहे. त्यामुळे त्यांचे घर आणि ‘युवा मित्र’चा पसारा हे एकत्रितच मित्रांगण कॅम्पसमध्ये नांदते!

सुनील व मनीषा पोटे, अध्यक्ष, युवा मित्र.
9422942799/ 9423970655

- हिनाकौसर खान-पिंजार

लेखी अभिप्राय

Chaanch..

Vandana05/02/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.