मानवमुक्ती


_Manav_Mukti_1.jpgमानवी जीवनात गेल्या हजार वर्षांत प्रगती झाली त्यापेक्षा जास्त गेल्या शंभर वर्षांत घडून आली; गेल्या शंभर वर्षांत जेवढी प्रगती झाली त्यापेक्षा जास्त गेल्या दशकभरात होऊन गेली आणि गेल्या दशकभरात होऊन गेली तेवढी प्रगती या वर्षभरात झाली. येत्या महिन्या-दीड दरवर्षी 31 डिसेंबरचा दिवस जवळ आला, की वर्ष फार झटकन गेले असे वाटते ना! हे वाटणे वर्षानुवर्षें अधिकच झपाट्याचे होत चालले आहे, कारण प्रगतीच तशी वेगवान आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या सुमारास जन्मलेल्या आमच्या पिढीने प्रगतीची ती धगधगती सहा-सात दशके अनुभवली आहेत. प्रथम शिक्षण पसरले, खेडोपाडी शाळा आल्या. औपचारिक शिक्षणाबरोबर जाणीवजागृती झाली. कसली जाणीव होती ती? मनुष्य असल्याची जाणीव! माणूस आहोत म्हणजे गाय-बैल, वाघ-सिंह, गाढव नाही हे तर त्याला केव्हापासून कळत होते. माणूस आहोत म्हणजे दोन हात, दोन पाय, एक धड, एक डोके आहे हेही त्याला केव्हापासून माहीत होते! तरीही मनुष्य असल्याची जाणीव मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर होऊ लागली, हे कसे काय? तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला शिक्षण उपलब्ध झाले आणि बुद्धी व त्याबरोबरच मन मोकळे झाले. प्रत्येक व्यक्तीला तिच्या मनाच्या गरजा काय आणि तिची जबाबदारी काय याचीदेखील जाणीव झाली.

मी स्वातंत्र्यानंतरची सहा-सात दशके धगधगती गेली असे म्हटले, म्हणजे काय झाले? अस्पृश्यतेसारख्या दुष्ट प्रथा नष्ट झाल्या. जातीपाती जाग्या झाल्या, त्यामधून प्रत्येक जातीला ओळख मिळाली, पण जातिभेद प्रगतीला मारक आहेत हे कळून चुकले. लोक भले जात म्हणून आरक्षण मागत असतील, पण त्यांची ती दिशा प्रगतीची, विकासाची आहे हे लक्षात आले. त्यामुळे त्यात हेवा, असुया राहिले नाहीत. कामगार हक्कांची जाणीव झाली आणि शोषण संपवण्याचा मार्ग मोकळा झाला. संयुक्त राष्ट्रसंघाने स्त्रीदशक 1975 साली जाहीर केले आणि माणसांना स्त्रीपुरुष पक्षपाताची जाणीव झाली. पृथ्वीतलावरून दिसणारे आकाश... त्यांपैकी अर्धा भाग त्यांचा आहे हे स्त्रियांना कळले. स्त्रीला व एकूण व्यक्तीलाच... तिची स्पेस तिला मिळाली पाहिजे हे आपण किती सहजपणे म्हणतो! म्हणजे ते तिचे अवकाश असते. म्हणजे तिचे स्वातंत्र्य. तिच्या मनाची मोकळीक. आता तर आपण लहान बालकांची स्पेस जपू पाहत आहोत. ‘मी मुक्त मानव’ ही आहे नव्या युगाची नवी जाणीव. मुक्त याचा अर्थ बेजबाबदार नव्हे. माणूस हा या पृथ्वीतलाचा घटक आहे, तेव्हा पृथ्वीतलाचे जे नियम आहेत ते सांभाळूनच त्याला जगले पाहिजे. परंतु त्यावर रुढी, प्रथा, परंपरा यांची जी बंधने लादली गेली होती ती शिक्षणाने आणि त्यातून आलेल्या जाणीवजागृतीने नष्ट केली.

प्रत्यक्षात तसे घडले का? तर नाही. माणूस मुक्त झाला का? तो त्याला हवे तसे जगू लागला का? मुक्ततेचे प्रतीक आकाशात उडणारा पक्षी असे नेहमी दाखवले जाते, तर माणूस तेवढा स्वेच्छेने, त्याच्या पसंतीने आणि स्वत:च्या हिंमतीवर जगू लागला आहे का? तर नाही! अजून तो पल्ला खूप दूरचा आहे. ते कसे काय? काळ तर झपाट्याने मागे पडत आहे असे आपण म्हटले आणि आपल्या मुक्ततेचा क्षण मात्र दूर दूर पळत आहे असे नमूद करत आहोत. ते कसे काय? तर ते तसे नाही. जगभरची माणसे सहा-सात दशकांपूर्वी राजकीय दृष्ट्या स्वतंत्र होऊन गेली. त्यांचा कारभार त्यांची ती पाहू लागली. त्यामध्ये व्यवस्थेच्या, अंमलबजावणीच्या अडचणी आहेत. त्या देशोदेशी जाणवत आहेत. स्थानिक पातळीवर देशादेशांत संघर्षाचे वातावरणही कोठे कोठे दिसून येते. अगदी प्रगतिमान अमेरिका-जर्मनी-जपानपासून आफ्रिका खंडातील गरीब देशांपर्यंत आणि सिरिया-पाकिस्तानसारख्या धर्मवादी प्रदेशांपर्यंत सर्वत्र त्या अडचणी दिसून येतात. पण देशादेशांतील वाटाघाटी त्यापलीकडे जाण्याच्या आहेत. ‘युनो’चे ठराव मानवतेच्या गोष्टी सांगणारे आहेत आणि सर्व देश त्यांच्या त्यांच्या पार्लमेंटांमध्ये ते स्वेच्छेने मान्य करत असतात.

माणसाने स्वातंत्र्य-समता-बंधुता हे स्वप्न दोन-अडीचशे वर्षांपूर्वी पाहिले. ते देशोदेशींच्या राजकीय स्वातंत्र्याने सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी प्राप्त झाल्यासारखे वाटले. मग आला मानवमुक्तीचा लढा. या मानवमुक्तीच्या लढ्यात जगभरचा माणूस पुन्हा एकवटत आहे. यावेळी त्याच्या हाती शस्त्र आहे ते तंत्रविज्ञानाचे. जीवतंत्रविज्ञान त्याच्या शरीरप्रकृतीची काळजी घेत आहे. तंत्रविज्ञान त्यापुढे जाऊन माणसाला व्यक्तिस्वातंत्र्य बहाल करत आहे. त्याचे मन सामर्थ्यशाली बनवत आहे. तंत्रविज्ञान माणसाला त्याच्या सर्व तर्हे्च्या अंध समजुतींमधून बाहेर काढणार आहे. तंत्रविज्ञान त्याच्या मनाला स्वतंत्र विचार व निर्णय करण्याचे सामर्थ्य देणार आहे. ‘या विद्या सा विमुक्तये’ अशी म्हण भारतात प्रचलीत आहे. काही शिक्षणसंस्थांचे ते ध्येयवाक्यदेखील आहे. तंत्रविज्ञान मन मुक्त करणारी विद्या घेऊन आले आहे आणि त्याची व्यक्ती-व्यक्तीच्या हातातील निशाणी म्हणजे मोबाईल फोन ही आहे. कोणी त्याचे वर्णन व्यक्तीचे सहावे ज्ञानेंद्रिय असे करते. ते सत्यच आहे. पण माणूस स्वत: ज्ञानेंद्रिये जाणीवपूर्वक वापरतो. तो सुवास स्वीकारतो आणि दुर्गंधी दूर सारतो. तो मायेचा स्पर्श आपलासा मानतो आणि दुष्टता धुडकावून लावतो. तो चांगली गाणी कानात साठवून ठेवतो आणि ध्वनिप्रदूषणास हरकत घेतो. त्याला नयनरम्यता हा दृष्टीचा लाभ वाटतो- तो नकोशा प्रसंगांत डोळे मिटून घेतो आणि जिभेने काय खायचे- काय खायचे नाही ते ठरवतो. मग त्याचे सहावे ज्ञानेंद्रिय जे मोबाईल बनत आहे तो कसा-किती वापरायचा हे माणूस ठरवू शकणार नाही का? मोबाईल तेवढा माणसाचे मन बिघडवेल असा विचार करणे अयोग्य होय. एवढे नक्की, की मोबाईल माणसाला व्यक्ती म्हणून मुक्त करू पाहत आहे. ती त्याची शक्ती जाणून घ्यायला हवी आणि त्या मुक्ततेत माणसाचे भविष्य दडलेले आहे! मुख्यत: विकासमग्न तिस-या जगात सत्तर वर्षांपूर्वी सुरू झालेला स्वातंत्र्यलढा मानवमुक्तीच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे, माणसाने त्याच्या हातातील तंत्रविज्ञान शहाणपणाने वापरले तर!

(आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर झालेल्या भाषणाआधारे)

- दिनकर गांगल

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.