मधुकर गीते – व्यसनमुक्तीसाठी तीळ तीळ आयुष्य


_MadhukarGite_VyasanmuktisathiTilTil_2.jpgमधुकर गीते! ते नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील मेंडीचे. त्यांनी ‘सहारा व्यसनमुक्ती केंद्रा’च्या माध्यमातून त्या कामाचा शिस्तबद्ध आराखडा मांडलेला आहे. व्यसनाधीन व्यक्तींचे दु:ख त्यांच्या थेट मनापर्यंत पोचून, ते दु:ख दूर करण्यासाठी धडपडणारे मधुकर गीते म्हणजे बाबा आमटे यांची छोटी आवृत्तीच जणू! त्यांनी स्वत:चा राहता बंगला व्यसनमुक्ती केंद्रासाठी वापरला आणि स्वत: पत्र्याच्या खोलीत राहण्यास गेले! त्यांना त्यांच्या कामात निर्माण होणारे अडथळे, समस्या काम दुपटीने करण्याचे बळ देतात. त्यांच्या मनी सगळया समस्या हळुहळू सुटतील असा दुर्दम्य आशावाद असतो.

माणूस व्यसनाधीनतेच्या खाईत कौटुंबिक-सामाजिक अस्थैर्य, काही वैयक्तिक कारणे, आयुष्यातील समस्या यांमुळे; तर कधी, स्वत:हूनच लोटला जातो. व्यसनाधीन माणूस हळुहळू स्वत:पासून, समाजापासून दुरावत जातो. त्याच्यातील आत्महत्येची प्रवृत्ती नैराश्याने ग्रासला गेल्याने वाढीस लागते. तशा वेळी त्याला जगण्याचे बळ देते ते ‘सहारा व्यसनमुक्ती केंद्र’! कुटुंबातील व्यक्ती व्यसनाधीन व्यक्तीला अक्षरश: बांधून, फसवून तेथे आणून सोडतात. त्यावेळी रुग्णामधील नकारात्मक मानसिकता, आक्रमकता, असहाय्यता जीव हेलावून टाकणारी असते. बहुतांश वेळा रुग्ण आदळआपट करतात. प्रसंगी, आत्महत्येचा प्रयत्न करतात. त्यानंतरचे साताठ दिवस फार बिकट असतात. मधुकर गीते व त्यांच्या पत्नी रुग्णाशी जवळीक तशा अवघड परिस्थितीतही प्रेमाने साधतात. प्रसंगी ते त्याचा प्रातर्विधी साफ करणे, त्याला खाऊ-पिऊ घालणे अशी कामेही आस्थेने करतात. रुग्णावर औषधोपचार तो केंद्रात आल्यापासून पहिले बाहत्तर तास, शरीरातील दारूचा शेवटचा थेंब बाहेर पडेपर्यंत केले जातात.

रुग्ण भानावर येऊ लागतो, व्यसनाधीनता कशी वाईट, त्याची जाणीव रुग्णाला स्वत:ला व्हावी या दृष्टीने प्रयत्न केले जातात. व्यक्ती स्वावलंबी बनली की ती आपोआप संवेदनशील होते, हे मधुकर गीते यांनी मनाशी पक्के केलेले सूत्र आहे. त्यामुळे केंद्रामध्ये रुग्णाच्या स्वाभिमानी होण्यावर, स्वत:ची कामे स्वत: करण्यास शिकवण्यावर भर दिला जातो. प्रत्येकाला सकाळी लवकर उठणे, योग-प्राणायाम-व्यायाम-नाश्ता-सामूहिक वर्तमानपत्रवाचन-स्वत:चे कपडे धुणे, जेवण वाढून घेणे-झाडांना पाणी घालणे, येणा-या.- जाणा-यांशी प्रेमाने बोलणे असे दैनंदिन वेळापत्रक लावून दिले जाते. त्याला त्याच्या खोलीची, आजुबाजूच्या परिसराची साफसफाई करणे, धान्य निवडणे अशी कामे देऊन तो व्यसनमुक्ती केंद्रात रुग्ण म्हणून नव्हे, तर त्या कुटुंबाचा सदस्य म्हणून राहत आहे अशी भावना रुजवली जाते. त्याच्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास, व्यसनाधीनतेचे घातक परिणाम, त्यातून बाहेर पडण्याची गरज, आयुष्यातील सौंदर्य यांबाबत विविध व्यक्ती मार्गदर्शन करण्याकरता येतात.

_MadhukarGite_VyasanmuktisathiTilTil_1.jpgगीते यांच्याकडे डॉक्टर, काऊन्सेलर अशी टीम सतत कार्यरत असते. रुग्ण तेथे वाढदिवस साजरे करणे, वेगवेगळे खेळ खेळणे, गाणी-भजने अशा माध्यमांतून रमतो. त्यांचा आजार निम्म्याहून जास्त प्रमाणात एकमेकांशी साधलेल्या संवादातून बरा होतो. दारुड्यांची गीता आणि प्रतिबिंब वाचन हा तेथे दररोज होणारा अनोखा उपक्रम! त्या गीतेतून व्यसनामुळे आलेली अगतिकता, आयुष्याचे झालेले नुकसान, कुटुंबाचे-समाजाचे मानवी आयुष्यातील महत्त्व आदी बाबींची संवेदनशीलतेने जाणीव होते. रुग्णांना निरोगी जीवनाचे सौंदर्य कळू लागते. रुग्णाला कुटुंबाच्या आधाराचे, त्याच्या माणसांचे महत्त्व जाणवते. मधुकर गीते आणि त्यांचे कुटुंब रुग्णांच्या आजुबाजूचे वातावरण शंभर टक्के प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतात. केंद्राच्या आजुबाजूची झाडांची हिरवळ मन प्रसन्न करते.

कुटुंबातील व्यक्तीला रुग्णाला महिन्यातून केवळ एकदा भेटता येते. रुग्णाला फोन वापरण्याची, बाहेरील कोणाशीही संपर्क ठेवण्याची मुभा दिली जात नाही. गीते यांना नव्वद-पंच्याण्णव रुग्णांना पूर्णत: व्यसनमुक्त करण्यात यश मिळाले आहे. गीते तो सगळा प्रपंच सांभाळत असताना, गावाकडून पाठिंबा मिळत नसल्याची खंत व्यक्त करतात. गावातील राजकीय शक्ती तरुणांना व्यसनाधीनतेकडे वळवू पाहत आहेत असा त्यांचा आरोप आहे. गावातील कोणीही लोक व्यसनमुक्ती केंद्र पाहण्यास, विचारपूस करण्यास आलेले नाहीत. व्यसनमुक्ती केंद्रात बहुतांश लोक ग्रामीण भागांतून येत असल्याने त्यांना केंद्रातील अल्प फीही परवडणारी नसते. प्रकल्पास नागरिकांची मदत झाली तर फी निम्म्याने कमी करून आणि गरीब रुग्णांसाठी पूर्ण फी माफ करून समाजासाठीचे काम पुढे नेण्याचा गीते यांचा मानस आहे. मधुकर गीते यांच्या पत्नी त्यांच्यामागे खंबीरपणे उभ्या आहेत. मुलगा आणि सून ही दोघेही त्या कामाला पूर्ण पाठिंबा देतात.

मधुकर गीते यांच्या आयुष्यातील चढउतार, त्यांनी अडचणींमधून काढलेला मार्ग हा प्रवास थक्क करणारा आहे. गीते म्हणतात, ‘माझे दोन्ही भाऊ व्यसनाच्या मार्गी लागलेले. मीही कधी व्यसनाच्या दिशेने वाटचाल करू लागलो, ते कळले नाही. आयुष्यात काहीच राम नाही असे वाटायचे, समस्या पुन्हा व्यसनाचा मार्ग दाखवायच्या. मी मुळचा खेडेगावातील; नोकरीच्या निमित्ताने 1980 मध्ये मुंबईला गेलो. बोईसर येथील ‘झेनिथ केमिकल’ या कंपनीत रुजू झालो. लहानपणापासून शिक्षक होण्याची इच्छा होती. कंपनीत कामगार शिक्षक झालो. लहान-मोठ्या शाळांमध्ये जाऊन मार्गदर्शन करायचो. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भाग, पालघर-डहाणू-तलासरी अशा अनेक ठिकाणी फिरलो. व्यक्तिमत्त्व विकास, वाढती लोकसंख्या, अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध विषयांबाबत जनजागृती केली. पंधराशेहून अधिक शाळांमध्ये भ्रमंती केली. त्या सगळया काळात दारू पिण्याची सवय काही सुटत नव्हती. एकीकडे समाजसुधारणा आणि दुसरीकडे व्यसनाधीनता अशा विसंगतीत आयुष्याचे चक्र दहा वर्षें फिरत होते. आयुष्याला कलाटणी मिळाली ती नरेंद्र दाभोलकर यांची भेट झाल्यावर.’

दाभोलकरांचे व्यसनमुक्ती शिबीर 2000 साली डोंबिवलीत होते. गीते यांनी त्या शिबिरात भाग घेतला. त्यावेळी दाभोलकर म्हणाले, ‘वर्षातून, महिन्यातून अथवा दिवसातून एकदा दारू पिणारी आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारी व्यक्ती एकाच पातळीवर असते.’ त्यांच्या त्या वाक्याने गीते यांच्या मनावर मोठा परिणाम झाला, त्यांचे मतपरिवर्तन झाले. ते स्वत:हून मुक्तांगण संस्थेमध्ये दाखल झाले. त्यांना व्यसनमुक्ती केंद्राची कल्पना तेथून प्रेरणा घेऊन सुचली. मधुकर गीते अण्णा हजारे यांना बर्यावचदा भेटले. त्यांनी राळेगण या गावी व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याची कल्पना हजारे यांना बोलून दाखवली. तेव्हा अण्णा म्हणाले, ‘तुझा कामाचा प्रयत्न अत्यंत प्रामाणिक आहे. मात्र, तो संकल्प स्वत:च्या गावी जाऊन पूर्ण कर. प्रसिद्धीसाठी धडपड न करता प्रामाणिकपणे आणि नेटाने काम कर. गावातील राजकीय शक्तींचा, टिकाटिपण्णीचा सामना कर.’

त्यानंतर मधुकर गीते यांनी त्यांच्या मेंडी या गावी जाऊन समाजोपयोगी कामे सुरू केली. ‘केंद्रीय कामगार शिक्षण मंडळा’तर्फे ग्रामीण भागातील लोकांसाठी शंभर-दीडशे शिबिरे घेतली. त्यांनी ‘जयहिंद विकास संस्थे’ची स्थापना 2006 मध्ये केली - शेतीविषयक माहिती, तरुणांचे प्रबोधन, महिलांमध्ये जागृती, आरोग्याचे महत्त्व असे उपक्रम सुरू केले. त्यांनी गावात गावाचा वाढदिवस ही संकल्पना रुजवली, गावातील सर्वात ज्येष्ठ आई-बाबांचे पूजन 31 डिसेंबर या दिवशी करून अनोखा कार्यक्रम आरंभला आहे. शाळाबाह्य मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांचा आणि आईचा सत्कार, एक किंवा दोन मुलांवर शस्त्रक्रिया करणार्याा जोडप्यांचा सत्कार, महिलांचे बचत गट, दूध व्यवसायासाठी मार्गदर्शन शिबिरे, गावात चांगले काम करणार्यांचचा गौरव अशा कार्यक्रमांनी गावाला सांस्कृतिक ओळख निर्माण करून दिली आहे. त्यांनी ‘हागणदारी निर्मूलना’ची मोहीम हाती घेऊन त्यात पन्नास टक्के यश मिळवले आहे.

चांगले काम करणे हेच गीते यांचे ध्येय आहे. त्यामुळे ते राजकारण्यांच्या नादी लागत नाहीत. मधुकर गीते यांनी सुरुवातीला तीन वर्षें नाशिक रोड व्यसन मुक्ती केंद्रामध्ये कामाचा अनुभव घेतला. त्यानंतर त्यांनी त्यांच्याच गावात केंद्र सुरू करण्याचा चंग बांधला. गीते यांनी स्वत:चे घरच व्यसनमुक्ती केंद्रासाठी देण्याचे ठरवले. केंद्र उभे करण्यासाठी मित्रांकडून कर्ज घेतले, गायी विकल्या. डॉ. आनंद पाटील यांनी त्यांना चार-पाच लाखांची मदत केली, तरीही पैसे कमी पडत होते. त्या वेळी सुनेने स्वेच्छेने दागिने विकून पैसे उभे केले.

मधुकर गीते यांचे व्यसनमुक्ती केंद्राचे स्वप्न 11 ऑगस्ट 2014 रोजी सत्यात उतरले. गीते प्राण पणाला लावून व्यसनाधीनतेविरुद्ध लढत आहेत. व्यसनमुक्त होऊन सुंदर आयुष्य जगणारे रुग्ण पाहिले, की मधुकर गीते यांना त्यांचे आयुष्य सार्थकी लागल्याचे समाधान मिळते.

- प्रज्ञा केळकर सिंग

लेखी अभिप्राय

Sir mi tumcyaach gawatil.swargwasi sopanrao pimple caa mulga aahey.mi army madhey aahey.tumhi je karta aahey tyasathi jai hind.sir

anil pimple04/01/2018

श्री. मधुकर केरू गिते साहेब यांची समाजासाठीची चाललेली धडपड खरच खुप प्रेरणादायी आहे. Mobile 8975485005

नामदेव एकनाथ सोनवणे 04/01/2018

My Salute to Gite Sir

Mayuresh M.Wadke04/01/2018

Very VeryGoodVery very Nice

Deeliprao Vish…04/01/2018

खूपच छान

Pravin28/01/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.