जायकवाडी धरण – पाण्यासाठी उपाशी?

प्रतिनिधी 13/12/2017

_JayakvadiDharan_PanyasathiUpashi_.jpgजायकवाडी हे गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहराजवळ बांधलेले धरण. धरणाच्या बांधकामाला 1965 साली सुरुवात झाली. ते 1976 साली पूर्ण करण्यात आले. धरणाची उंची 41.3 मीटर असून लांबी नऊ हजार नऊशे अठ्याण्णव मीटर आहे. धरणाचे जलधारण क्षेत्र एकवीस हजार सातशे पन्नास चौरस किलोमीटर असून एकूण जलसाठा दोन हजार नऊशेनऊ घन किलोमीटर एवढा आहे. धरणात वीजनिर्मितीचीही सोय असून बारा मेगावॅट क्षमतेचे जनित्र बसवण्यात आले आहे.

मराठवाड्यातील दुष्काळप्रवण क्षेत्रात पाण्याची उपलब्धता वाढावी यासाठी निजामाच्या काळापासून प्रयत्न चालू होते. गोदावरी नदीवर धरण बांधण्याची कल्पना जुनी होती. ती कल्पना बीड जिल्ह्यात जायकवाडी या खेड्यात गोदावरी नदीवर धरण बांधण्यात यावे अशी होती. पण ती मूर्त स्वरूपात येऊ शकली नाही. ती कल्पना महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यावर नवीन सरकारने उचलून धरली, पण धरणाची जागा बदलून ती पैठणजवळ आणली. जायकवाडी हे धरणाचे नाव मात्र तसेच ठेवण्यात आले. लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते कोनशिला समारंभ घडवून आणण्यात आला. तयार धरणाचे उद्घाटन इंदिरा गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. धरणामुळे जो मोठा जलाशय निर्माण झाला आहे त्याचे नाव  नाथसागर असे ठेवण्यात आले. ते आशिया खंडातील  सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून ओळखले जाते.

मूळ योजनेप्रमाणे, धरणातील ऐंशी टक्के पाणी शेतीसाठी, पाच टक्के पाणी पिण्यासाठी व पंधरा टक्के पाणी कारखानदारीसाठी वापरले जावे अशी कल्पना होती. ते बहुउद्देशीय धरण म्हणून ओळखले जाते. त्या धरणच्या बांधकामामागील प्राथमिक उद्देश दुष्काळग्रस्त मराठवाड्याला सिंचनासाठी पाणी मिळावे हा होता. आज मितीला मात्र धरणाचे पाणी औरंगाबाद व जालना शहरांना व औद्योगिक वसाहतींना व जवळपास दोनशे खेड्यांना पाणी पुरवठ्यासाठी वापरले जात आहे.

धरणामुळे जो जलाशय निर्माण झाला आहे, त्याचा विस्तार फार मोठा व उथळ आहे. त्याचा परिणाम म्हणून धरणाला बाष्पीभवनाचे संकट मोठ्या प्रमाणावर भेडसावत असते. परिसरातील माती वाहून आल्यामुळे जो गाळ भरला गेला आहे. त्यामुळे धरणाची साठवण क्षमता घसरत आहे. जवळपास तीस टक्के धरण गाळाने भरले गेले आहे. धरणांमुळे जी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे तिचा लाभ औरंगाबाद, जालना, बीड, अहमदनगरपरभणी जिल्ह्यांना झाला आहे. एकूण सिंचन क्षेत्र दोन लाख सदतीस हजार पाचशे हेक्टर एवढे आहे. गोदावरी नदीच्या वरील अंगाला बरीच धरणे बांधली गेल्यामुळे त्या धरणापर्यंत पाणी पाहिजे  तेवढे  येऊन पोचत नाही. त्यामुळे धरण पाण्यासाठी उपाशीच ठरत आहे!

धरणाच्या पायथ्याशी प्रशस्त ज्ञानेश्वर उद्यान वसवण्यात आले आहे. उद्यानाची उभारणी म्हैसूर येथील वृंदावन गार्डनच्या धर्तीवर करण्यात आली आहे. उद्यानाचा एकूण परिसर सव्वाशे हेक्टर एवढा आहे. नाथसागर जलाशयात तीस बेटे निर्माण झाली आहेत. ती बेटे उडत्या पक्ष्यांसाठी आकर्षक स्थान ठरले आहे. विविध पक्षी त्या परिसरात गर्दी करून असतात. तेथे सत्तर विविध प्रकारचे पक्षी - ज्यामध्ये परदेशातून आलेले पक्षी, करकोचे, फ्लेमिंगो यां सारखे पक्षी आढळून आले आहेत.

- (जलसंवाद नोव्हेंबर 2017 वरून उद्धृक्त)

लेखी अभिप्राय

Good

Rakesh surjuse 11/07/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.