वाल्मिकींच्या नावाचा आजोबागड

प्रतिनिधी 13/12/2017

_ValmikichyaNavacha_Ajobagad_4.jpgबालघाटाच्या रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध अगदी कडेला असलेला 'अजापर्वत' ऊर्फ 'आजोबाचा डोंगर' आहे. तो एखाद्या पुराण पुरुषाप्रमाणे भासतो. घनदाट झाडाझुडपांनी नटलेला आजोबाचा गड गिर्यारोहकांसाठी आगळेवेगळे लक्ष्य ठरला आहे. त्यात त्या गडाची तीन हजार फूट उभी भिंत ही प्रस्तरारोहकांसाठी एक मोठे आव्हानच आहे.

आजोबागड ठाणे जिल्ह्यात आहे. त्या गडावर बसून वाल्मिकी ऋषींनी 'रामायण' हा ग्रंथ लिहिला अशी कथा प्रचलित आहे. त्याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला. ते दोघे वाल्मिकी ऋषींना 'आजोबा' म्हणत असत. म्हणून त्या गडाचे नाव आजोबाचा गड!

_ValmikichyaNavacha_Ajobagad_1.jpgगडावर वाल्मिकी ऋषींचा आश्रम व त्यांची समाधीसुद्धा आहे. आश्रमाजवळून गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी वाट नाही. त्यामुळे मुक्काम आश्रमातच करावा लागतो. गडावर राहण्यासाठी एक कुटी आहे. मुक्कामाचा कार्यक्रम असेल तर जेवणाची सोय घरून करून आणावी लागते.

आश्रमाजवळून पुढे धबधब्याच्या वाटेने वर चढत गेल्यास सुमारे एक ते दीड तासानंतर एक गुहा लागते. तेथे लवकुशाच्या पादुका खडकात कोरलेल्या आहेत. तेथे डावीकडे एक पाण्याचे टाकेसुद्धा आहे. गुहेपर्यंत जाण्यासाठी शिड्यादेखील लावल्या आहेत. त्याच मार्गाने आश्रमात परतावे.

गडाच्या माथ्यावर असलेली दोन-तीन पाण्याच्या टाकी सोडल्यास पाहण्याजोगे काही नाही. अनेक दुर्गवीर, ट्रेकर्स रतनगड-आजोबागड-हरिश्चंद्रगड असा चार-पाच दिवसांचा ट्रेक करतात. गडावर सापांचे वास्तव्य आहे.

_ValmikichyaNavacha_Ajobagad_3.jpgतो किल्ला गिरीदुर्ग प्रकारात मोडतो. किल्ला ट्रेकसाठी मध्यम श्रेणीचा समजला जातो. गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग हा सरळ आणि सोपा आहे. मुंबईहून आसनगाव रेल्वे स्थानकावर यावे. तेथून शहापूर गावी रिक्षाने अथवा एस.टी.ने पोचावे. तेथून एस.टी.ने अथवा जीपने डोळखांब-साकुर्ली मार्गे डेहणे या गावी जावे. डेहणे गावातून जाताना वाटेत एक पठार लागते. पठारावर तीन वाटा एकत्र येतात. त्यातील एक बैलगाडीची वाट सरळ वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापर्यंत घेऊन जाते. दुसरी वाट कात्राबाईच्या डोंगरात जाते आणि पुढे 'कुमशेत' या गावास जाऊन मिळते. तिसरी वाट मात्र जंगलात जाते. त्या वाटेने न जाणे श्रेयस्कर!

दुसरा मार्ग हा कल्याण-मुरबाड-टोकवडे-डोळखांब हा आहे. त्यामार्गाने डेहणे गाव गाठता येते. आजोबागडावर जाण्यासाठी एक तासाचा अवधी लागतो.

- प्रतिनिधी

लेखी अभिप्राय

very nice poin

arun koli14/12/2017

good

arun koli14/12/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.