नागावचे भीमेश्वर मंदिर आणि तेथील शिलालेख


_NagavcheBhimeshwarMandir_TethilShilalekha_2.jpgअलिबाग ते रेवदंडा हा रस्ता हवाहवासा वाटणारा. नारळ-सुपारीच्या मोठ-मोठ्या वाड्या, टुमदार घरे आणि स्वच्छ समुद्रकिनारे यांमुळे पर्यटकांची वर्दळ तेथे नेहमी असते. तेथील अक्षी व नागाव ही गावे अनेकांची आवडती ठिकाणे आहेत. त्या भागाला सुंदर निसर्गासोबतच इतिहासाचे सुद्धा वरदान लाभले आहे. त्याच परिसरातील पुरातन मंदिरे, भुईकोट किल्ले आणि शिलालेख यांमुळे इतिहासाचे अभ्यासक तेथे भेट देत असतात.

नागाव अलिबागपासून सात-आठ किलोमीटर अंतरावर आहे. तेथील सुंदर शिवमंदिरे आणि एक शिलालेख यांमुळे ते गाव अभ्यासकांचे आकर्षण आहे. नागावात भीमेश्वराचे पुरातन मंदिर आहे. लोक त्याचा उल्लेख भीमनाथाचे मंदिर असाही करतात. ते मंदिर त्याच्या सुंदर पुष्करणीने येणा-यांचे स्वागत करते! मंदिराच्या कमानीतून आत शिरल्यानंतर उजव्या हाताला पाण्याचे टाके दिसते. मंदिराची बांधणी जुनी असावी. मंदिराशेजारी सापडलेला शिलालेख किंवा अक्षीचे प्रसिद्ध गद्धेगळ किंवा मंदिराच्या बांधकामाची पद्धत पाहता मूळ मंदिर हे शिलाहारकालीन असावे. मात्र तसा शास्त्रीय पुरावा किंवा संदर्भ सापडत नाही. पेशव्यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तेथून जवळ असलेले वंखनाथाचे मंदिर शिलाहार स्थापत्यशैलीमधे बांधलेले आहे. त्या‍मुळे भीमनाथाचे मंदिरदेखील त्या काळातील असावे असा तर्क केला जातो.

_NagavcheBhimeshwarMandir_TethilShilalekha_1.jpgमंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर दोन पुरातन मूर्ती ठेवल्या आहेत. तेथील पुजा-यांच्या मते, जेव्हा तेथील तळे साफ केले तेव्हा त्या मूर्ती मिळाल्या. त्या मूर्ती प्राचीन भासतात. त्यांपैकी मोठी मूर्ती विष्णूची आहे आणि दुसरी मूर्ती बहुधा भैरवाची असावी. मंदिरात प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वारे आहेत. त्यांपैकी उजव्या हाताच्या प्रवेशद्वाराच्या बाजूस शिलालेख आढळतो. तो दोन-अडीच फूट लांब आणि दीड फूट रुंद आकाराचा आहे. तो शिलालेख पूर्वी गावात होता, मात्र पेशव्यांकडून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला त्यावेळी तो शिलालेख मंदिराच्या पायरीवर आणून बसवला गेला असा ऐकीव इतिहास आहे.

तो शिलालेख देवनागरीमध्ये आहे. त्यामुळे तो वाचण्यास मजा येते. संदर्भ पुस्तके घेऊन प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन लेख वाचण्यात जी मजा आहे ती दुसरीकडे कोठेच नाही. त्या शिलालेखाचा पहिला उल्लेख कुलाबा गॅझेटियरमध्ये आढळतो. पण तेथे तो शिलालेख संस्कृत भाषेतील असल्याचे नमूद केले गेले आहे. शिलालेख चांगल्या रीतीने कोरला गेलेला आहे. त्यावरील सर्व अक्षरे स्पष्ट वाचता येतात. त्यात फारसी शब्द व नावे कोरलेली आढळतात. तसेच, कालगणना हिजरी पद्धतीने केलेली आहे.

_NagavcheBhimeshwarMandir_TethilShilalekha_3.jpgशिलालेख अठ्ठावीस ओळींचा आहे. तुळपुळे यांच्या ‘प्राचीन मराठी कोरीव लेख’ या पुस्तकातून त्याल शिलालेखावरील मजकूर जसाच्या तसा उद्धृत करत आहे-

छस्वस्तिश्री हिजरत ७६९सकु संवतू १२८९पळवंग संवसरे आद्येय
श्रीमत्यप्रौढीप्रतापचक्रवर्ती माहाराजाधिराज श्रीहंबिरुराओ
ठाणे कोकण राज्यं कोति सत्येतस्मिनकाळेप्रवर्तमाने धरमादि---
पत्र ळीखीते यथासर्व्यव्यापारी सिहीप्रोतंनिरोपित आठगरआधि
करिआकुसनाकू हासणानाकाचा सैणवे देऊप्रोपहोऱ्ह वेळितसं
मंधचिचावळीत्रामपैकी तेथिळ मिजिगिति सिहीप्रोकेळी तेथेमरंगी
द्याळावेआळागी आठगरसमंध मुख्य
नागवे आगरुपैकीकातळवाडी
नारदेकवळीआपैकी भाधाळी १उभै वाडीआ २ससिम फळभोगास
हिते श्रीराजायाप्राधानु सिहीप्रो विकती सडाउनी चिचावळीयेचीये मिजिगि
तिवर मिधातळीया कातिळवाडी विकिती द्रमा १६०नारदेकवळीआ जि
येभाटालैये विकिता द्रम४० उभै वाडिआ २ विकिता द्रामा सते २००
हे दाम वरतकू कोश कवळीआ मुष्य करुनी समथीआगरीयासमागीत
डीळी धाकुटाबाळगोपाळी वाटुनी घेतले आठीआघाटातु वाहनाहीवाडी
आ दातारेहीन करुनीजाळीआ म्हणौनीसमथी आगरीचासहानीव्री
किळी ते गुती कैवाहसोडवूनि सिहीप्रोलागौनी वाडीआ विकिळीआ हे
वाडीआ कोण्ही दातारूठमटेळीत गुंतीकरि तरसमंथी आगरीचाई नि—
रवेहा धरमू सिहीप्रोचानितीचरूसमंथी आगरीचाई समाग्रीप्रतिपाळावे
डिआची जमेति सवारा जेतुकेआगर सोई झाडातेपावेतेतुकेआगाराचेआ प्र
झाडाचेचि रोपवुआ वाडी सिहीप्रोसासनविषयेभोगवावी हा धरमू समथी प्र
तिपाळावा आघाटाणे पूर्व दिसे नाउ म्हातारेआचि वाडीउतरदिसे चोरलेवाडीपष
सिम दिसेपठीआरवाडी दसिण दिसेकोणिष्ठीआचि वाडी ऐसि आघाटणे चि
आरिनिवारती आदिपाळक वरतकू कोशकवळीआ पोगुनाकुरामदेओ
वेदम्हतारेआचाधरमूदेओ विभूम्हतारेआचा वाउरे पैकीकावंदेओ कपाटे
आअधोयारी सोम्हाळ म्हाताराराउतनागदेओ भाई दार्षु जसदे सेठी
साकु म्हातारा वाईदेओ कावंदे म्हातारासवद म्हातारागोरु म्हातारा सा
जकारसोमदेओ जोनदेओ वारैकरू वरतकू भूपळ पातैळूनाभळा पातैळू
वैजकरूहे जन मुष्यकरूनिसमथी प्रतिपाळावे अप्राशेसासिना
गावूजमतेपैकी म्हैरुमाहामदु दाउवार आया हाजि दाउवार आया

प्रस्तुत लेख हा शके 1289 मधील (सन 1367) आहे. त्याकाळी ठाणे प्रांतात ‘श्रीमत्यप्रौढीप्रतापचक्रवर्ती महाराज’ हंबीरराव राज्य करत होते. त्यांच्या काळात ते धर्मपत्र लिहिण्यात आले. शिलालेखातील मजकुरात अनेकदा सिहीप्रो या नावाचा उल्लेख येतो. तो सिहीप्रो हा हंबीररावाचा मुख्य प्रधान. तर मूळ लेखात असा उल्लेख आला आहे, की सिहीप्रो याने अष्टागर प्रांतामधील (म्हणजे अलिबाग ते रेवदंडा या भागातील गावे) नागाव आगारातील चिचावळी या गावात एक मशीद उभारून तेथे रत्नदीप लावण्यासाठी काही दान दिले आहे. तसेच, इतर लेखांतसुद्धा त्याने आगरी लोकांना दान दिल्याचे उल्लेख आढळून येतात आणि काही कलह होऊ नये म्हणून त्यासाठी काय करावे याचे वर्णन केलेले दिसते. त्या शिलालेखाचा आशय तुळपुळे यांच्या पुस्तकात विस्तृतपणे लिहिलेला आहे.

महाराष्ट्रातील संस्कृतीवर दुसऱ्या साम्राज्यातील संस्कृतींचा प्रभाव पडलेला दिसून येतो. त्या शिलालेखाचे उदाहरण घेतले, तर हंबीरराव हा देवगिरीच्या यादव साम्राज्याशी निगडित असला तरी नागाव येथील शिलालेखावर बहामनी साम्राज्याचा प्रभाव दिसून येतो. लेखात अनेक फारसी शब्द आहेत. त्यामध्ये हंबीरराव याने मशीद बांधण्यासाठी दान दिल्याचे सुद्धा कळून येते. तेथपासून परकीय राजवटीचा प्रभाव महाराष्ट्राच्या पुरातन संस्कृतीवर पडण्यास सुरुवात झाली असावी. त्यामुळे त्यानंतरच्या मधल्या धामधुमीच्या काळात कलेपेक्षा संरक्षणाला महत्त्व दिले गेले. महाराष्ट्रात किल्लेबांधणी झाली. त्यानंतर पेशवे काळात पुन्हा एकदा मंदिर बांधणी किंवा जुन्या मंदिरांचे जीर्णोद्धार करणे सुरू झाले.

_NagavcheBhimeshwarMandir_TethilShilalekha_4.jpgभीमेश्वर मंदिरात दोन गाभारे आहेत. एका गाभाऱ्यात शिवशंकर आहेत तर दुसऱ्या गाभाऱ्यात आणखी एका देवाची मूर्ती आहे. ती कोणती ते ओळखता येत नाही. पेशव्यांनी जीर्णोद्धार करताना मंदिराच्या आत केलेली लाकडी कलाकुसर मनात भरते. भीमेश्वर मंदिराचे गुरव येणा-यांचे स्वागत आपुलकीने करतात. एकंदरच नागाव, भीमेश्वर मंदिर, जवळचे नागेश्वर आणि वंखनाथाचे मंदीर आणि नागावचा किनारा असा सर्व परिसर फिरणे एक दिवसात शक्य आहे.

(फिरस्ती महाराष्ट्राची’ या पुस्तकातून उद्धृत)

- शंतनु दत्तात्रय परांजपे

लेखी अभिप्राय

लेखकाचा दूरध्वनी

8793161028

उत्कृष्ठ लेख!!!

शंतनु परांजपे24/02/2018

छान.

Pariyanka27/05/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.