अशोक जाधव यांचे कलादालन


_Ashok_Jadhav_2.pngकलासक्त चित्रकार, काष्ठशिल्पकार अशोक दादू जाधव यांनी स्वतः आर्थिक झळ सोसून कलाप्रेम जोपासण्याचे धाडस चिंचोली गावात केले आहे. ते गाव सांगली जिल्‍ह्याच्‍या शिराळा तालुक्‍यात आहे. अशोक जाधव यांनी त्यांच्या घरी आर्ट गॅलरीची निर्मिती करून जनतेला चित्र, शिल्प व वैशिष्ट्यपूर्ण दुर्मीळ संग्रह वारंवार व मोकळेपणाने पाहण्याची सोय निर्माण केली आहे आणि तीही विनाशुल्क! त्यामुळे कलादालन सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतील लोकांचे आकर्षण बनले आहे. अशोक जाधव यांनी ‘खेड्याकडे चला’ हा गांधीजींनी दिलेला संदेश आचरणात आणला आहे! विद्यमान कर्कश्श व धावपळीच्या जीवनशैलीत अशोक जाधव यांचे हे वैविध्यपूर्ण कलादालन जीवनात हळुवार असे काही असते हेच जणू पटवून देत असते. अशोक जाधव यांनी त्यांच्या कलेत निसर्गाला हानी न पोचवता त्याच्याशी मैत्री करून, त्याच्या घटकांचा अप्रतिम वापर केला आहे. भोवतालचा निसर्ग, समाज कॅनव्हासवर मांडण्याचा ध्यास हाच त्यांचा श्वास बनला आहे. 

_Ashok_Jadhav_3.pngत्यात पिंपळाच्या नाजूक जाळीदार पानांवर दिग्गज व्यक्तींची भावपूर्ण अशी सुंदर व्यक्तिचित्रे आहेत आणि निसर्गचित्रे व रचनाचित्रेही आहेत. अफलातून काष्ठशिल्पे, संसारोपयोगी दुर्मीळ लाकडी वस्तूंचा संग्रह, दोन हजारांवरील सुविचार संग्रह विविध राज्यांतील, देश-विदेशांतील वेगवेगळ्या चित्रांचा, आश्चर्यजनक हजारो काड्यापेट्यांचा संग्रहपण आहे. तेवढेच नाही तर लोकनृत्ये व पाश्चिमात्य नृत्ये यांचा कात्रण संग्रह व शास्त्रीय नृत्यांच्या माहितीचा छायाचित्रांसह संग्रह अपूर्व असा आहे. त्या जोडीला भारतीय व पाश्चिमात्य चित्रकारांच्या माहितीचा व कलाविषयक पुस्तकांचा कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असा जबरदस्त अभ्यासपूर्ण संग्रह आहे. ते कलादालन वैविध्यपूर्ण,मौल्यवान व उपयुक्त अशा अनमोल खजिन्याने भरले आहे.

अशोक जाधव हे ‘रयत शिक्षण संस्थे’मध्ये कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मुलांच्या आयुष्याचे मोजमाप कागदी परीक्षेतील गुणांवरून करणे पसंत नाही. आयुष्य उत्तरपत्रिकेच्या लांबीरूंदीपेक्षा खूप खोल, विस्तीर्ण व आगळेवेगळे आहे. म्हणून ते कलाशिक्षणातून विद्यार्थांना सर्जनशील बनवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करतात व त्यांच्यातील क्षमतांचे सामर्थ्य जागृत करून त्यांच्यात कर्तव्याच्या जाणिवा मजबूत करण्यासाठी विविध क्षेत्रांतील यशस्वी लोकांशी संवाद घडवून आणतात.

_Ashok_Jadhav_1.pngजाधव हा तसा रांगडा माणूस- लाल मातीत काही काळ लोळलेला. त्यांनी विविध विषयांवर वृत्तपत्रातून लेखन केले आहे; दिवाळी विशेषांक, मासिके यांची मुखपृष्ठे साकारली आहेत. संस्थांचे लोगो तयार केले आहेत. त्यांना ‘महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळा’च्या बालभारती पुस्तकाचे चित्रकार म्हणूनसुद्धा कामाची संधी मिळाली आहे.

अशोक जाधव यांची चित्र- शिल्प प्रदर्शने अखिल भारतीय व बालसाहित्य संमेलनांच्या ठिकाणी आणि शहरी व ग्रामीण भागांमध्ये झाली आहेत. त्या प्रदर्शनांना समाजसेवक अण्णा हजारे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, अभिनेता नाना पाटेकर, कवी विठ्ठल वाघ आदी दिग्गजांनी भेटी देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. त्यांना विविध सामाजिक संस्थांचे कलाश्री, कलारत्न, आदर्श कलाशिक्षक, आदर्श कलाकार असे मानसन्मान कलाक्षेत्रातील कार्याबद्दल प्राप्त झाले आहेत.

अशोक जाधव, 9730438390

- धोंडिराम दत्तात्रय पाटील

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.