गोव्यातील देवदासी समाजाचे उन्नयन!


_Govyatil_Devdasi_Samaj_1.jpgगोव्यातील देवदासी समाजाच्या शोषणाचा इतिहास विस्मरणात गेला आहे. आधी 'नाईक मराठा' आणि नंतर 'गोमंतक मराठा' म्हणून मान्यता पावलेल्या समाजातून संगीत, कला, विज्ञान, व्यवस्थापन या क्षेत्रांत नक्षत्रासारख्या व्यक्तिरेखा अवतरल्या.

किशोरी आमोणकर संगीतातील अनाघ्रात सूरसरिता होत्या. त्या कालवश झाल्यानंतर त्यांची जात किंवा त्यांचे कूळ यांचा शोध घेण्याचा सवालच येत नाही, पण किशोरी आमोणकर या गोमंतकीय निजखूण जपणाऱ्या एका चळवळीचे अपत्य होत्या. ती चळवळ देवाधर्माच्या नावावर होणाऱ्या शोषणाच्या विरुद्ध केलेला विधायक एल्गार होता. ते एका समाजाच्या उन्नयनाचे एक विरळा उदाहरण होते. ती चळवळ यशस्वी झाली नसती, तर किशोरी समाजाला माहीतच नसत्या! ती होती, गोव्यातील देवदासी समाजाची गुलामगिरी संपवणाऱ्या गोमंतक मराठा समाजाची पुरुषार्थ चळवळ!

गोव्याचा इतिहास माहीत आहे, तेव्हापासून तेथील देवदासी प्रथेचे संदर्भ सापडतात. गोवा, सिंधुदूर्ग, कारवार येथील अनेक मोठ्या देवळांच्या परिसरात देवदासी समाजाची घरे किंवा मुळे आहेत. कलावंत, देवळी, भावीण, पेरणी, बांदे, फर्जंद, चेडवा अशा, देवळात सेवा देणाऱ्या पोटजातींच्या समुहाला देवदासी असे नाव मिळाले. महाराष्ट्राच्या इतर भागांतील मुरळी, जोगतिणींपेक्षा तो समाज अधिक स्थिर होता. तो कधीच भिक्षेकरी नव्हता. त्या समाजातही स्त्रियांना देवाला वाहण्याचा सेषविधी होता, पण तो प्रत्येक बाईला बांधील नव्हता.

देवदासी समाजातील पोटजातींतही उच्चनीच भेदाभेद होते. त्या समाजातील परिवर्तनाचे पुढारपण करणाऱ्या राजाराम पैंगीणकरांनी त्यांचे आत्मचरित्र `मी कोण?` यामध्ये त्याचे विदारक अनुभव सांगितले आहेत. त्या भेदभावांमुळे धर्माच्या नावाने त्यांचे शोषण सोपे होते. गावातील जमीनदार देवदासींना रखेल म्हणून वागवत. प्रामुख्याने गौंड सारस्वत ब्राह्मण समाजातील जमीनदारांकडे तेव्हा सर्व सत्ता एकवटली होती. सणाउत्सवांना देवळात तर लग्नमुंजींच्या निमित्ताने श्रीमंतांच्या घरात कलावंतीणींचे नाचगाणे होत असे. त्यातून देहविक्रय स्वाभाविक होता. चर्चने त्यांच्यामुळे ख्रिश्चनांचे नैतिक अधःपतन होत असल्याचा ठपका ठेवत मोहीम उघडली होती. त्यामुळे गोव्याच्या व्हाईसरॉयने सतराव्या शतकाच्या शेवटी कलावंतिणींना गोव्याबाहेर हाकलवण्याचा हुकूमही काढला होता. नंतर उच्चवर्णीय जमीनदारांनी कार्यक्रमांसाठी गोव्याबाहेरून कलावंतिणी आणण्याची परवानगी मिळवली. पुढील शंभर वर्षात त्या पळवाटेचे मोठे भगदाड झाले.

स्त्रीशोषणाला ब्रिटिश भारतात कायद्याने प्रतिबंध सुरू होत असताना गोव्यात मात्र देवदासींच्या शोषणाला उपयुक्त ठरेल असे बदल कायद्यात केले गेले. देवदासी ही हिंदूंची धार्मिक प्रथा असून त्यात पोर्तुगीज सरकारने ढवळाढवळ करणे योग्य नाही, असे जमीनदारांनी पोर्तुगीजांच्या गळी उतरवून शोषणाचा जणू परवानाच मिळवला! त्यानंतरचे शतक देवदासी समाजाचा सर्व स्वाभिमान ठेचून काढला गेल्याचा इतिहास आहे. शारीरिक, मानसिक, लैंगिक, आर्थिक, धार्मिक, सामाजिक असे सर्व प्रकारचे दमन करून त्या समाजाचे सत्त्व संपवण्याचा प्रयत्न झाला. महिलांच्या शोषणावर कुटुंबे जगू लागली. त्यामुळे कुटुंबांचा, समाजाचा नैतिक आत्मविश्वास संपला.

देवदासी समाजात तशा परिस्थितीत पुरुषार्थ चळवळीला सुरुवात झाली. महिलांचा सेषविधी होऊ नये, पुरुषांनी कामधंदा करावा आणि मुलांना शिक्षण द्यावे, यासाठीची जागृती सुरू झाली. सर्वात आधी मराठा गायक समाज या नावाने सर्व पोटजातींमध्ये ऐक्य घडवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर त्याचे नाव नाईक मराठा समाज आणि शेवटी गोमंतक मराठा समाज असे ठरवले गेले. त्या आंदोलनात राजाराम पैंगीणकरांसारखे त्या समाजातील समाजसुधारक होतेच, पण भारतकार गो. पु. हेगडे देसाई यांच्यासारखे सारस्वतही होते. महात्मा गांधी, प्रबोधनकार ठाकरे यांनी त्या चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला होता. गोव्यातील काही उच्चवर्णीयांनी आणि महाराष्ट्रातील मराठ्यांच्या काही संस्थांनी देवदासी समाजाला मराठा म्हणवून घेण्याला विरोध केला होता, पण स्त्रीला सन्मान देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा त्या विरोधापेक्षा कितीतरी मोठी ठरली. दिवंगत पत्रकार वामन राधाकृष्ण यांच्या `पुरुषार्थ` आणि प्रा. पराग परब यांच्या `इंडियाज् फर्स्ट डेमोक्रॅटिक रेव्होल्युशन` या पुस्तकांत त्या चळवळीचा इतिहास आहे.

गोमंतक मराठा समाजाने स्वतःचा उत्कर्ष शिक्षण आणि संघटना यांच्या जोरावर घडवून आणला. समाजाने स्वकर्तृत्वाच्या जोरावर सन्मान मिळवला. त्यात गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर हे प्रमुख होते. त्यांच्या कन्या शशिकला काकोडकर दुसऱ्या मुख्यमंत्री बनल्या. गोमंतक मराठा समाजातील स्त्री गोव्यातील सर्वोच्च पदावर असणे ही मोठीच क्रांती होय. भाऊसाहेबांमुळे गोव्यातील बहुजन समाजाचे नेतृत्व दोन दशके त्या समाजाकडे होते. नव्या पिढीला त्या संघर्षाची ओळख नको आहे. ते अभिजनांच्या मान्यतेसाठी संघर्ष विसरून जायला तयार आहेत. प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली त्या समाजाच्या नव्या पिढीने बहुजनवादाकडून हिंदुत्वाच्या दिशेने प्रवास केला आहे. समाजाने आरक्षण नको म्हणून ठराव पन्नास वर्षांपूर्वी केला होता. त्या समाजानेच ओबीसी म्हणून राखीव जागा मिळवण्याची मागणी केली आहे.

कर्तृत्ववान माणसे त्या समाजातून उभी राहिली. नाईक मराठा समाजाचे संस्थापक सत्यशोधक विद्वान गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, मेजर जनरल विक्रम खानोलकर, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, कायदेतज्ज्ञ अधिक शिरोडकर, टाटा उद्योगाचे संचालक सुमंत मुळगावकर, शिक्षणमहर्षी रा. ना. वेलिंगकर, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे स्त्रीरोगतज्ज्ञ पद्मविभूषण डॉ. व्ही. एन. शिरोडकर, देशातील पहिले पॅथोलॉजिस्ट डॉ. व्ही. आर. खानोलकर, कोकण रेल्वेचे जनक अ. ब. वालावलकर अशी त्या समाजातील मान्यवरांची मोठी यादी आहे. गोमंतक मराठा समाजाचे शोषण एकोणिसाव्या शतकात शिगेला पोचलेले असताना त्यातील अनेक कुटुंबे मुंबईत स्थायिक झाली. त्यांनी पुढे संगीत, नाटक आणि सिनेमा या क्षेत्रांत मोठे कर्तृत्व गाजवले. सूरश्री केसरबाई केसकर, किशोरी अमोणकर यांच्या आई मोगुबाई कुर्डीकर, हिराबाई बडोदेकर, पहिल्या महिला नाटककार हिराबाई पेडणेकर, अंजनीबाई मालपेकर, मीनाक्षी शिरोडकर, ज्योत्स्ना भोळे, मास्टर विनायक, मास्टर दत्ताराम, भालजी पेंढारकर, कानन कौशल, आशालता वाबगावकर, शिल्पा शिरोडकर, किमी काटकर अशी त्या समाजातील कलावंतांची यादी आहे. हंसा वाडकर यांच्या `सांगत्ये ऐका` या आत्मचरित्रात आणि त्यावर बनवलेल्या `भूमिका` या हिंदी सिनेमात त्या समाजाचा संघर्ष पाहता येतो. समाजाचे शेकडो कलावंत कोणतीही नोंद न ठेवता संघर्षात कायमचे संपून गेले आहेत.

गोमंतक मराठा समाजाचा उल्लेख करताना एक नाव जे टाळून पुढे जाताच येणार नाही, ते आहे दीनानाथ मंगेशकर आणि त्यांची प्रतिभावान मुले. दीनानाथांचा देवळ्याचा पोर म्हणून गोव्यात खूप अपमान झाला. म्हणून लतादीदींनी गोव्यात कधीच जाहीर कार्यक्रम केला नाही. आशाताई गायल्या त्यादेखील खूप उशिरा, दोन वर्षांपूर्वी. लतादीदींना मंगेशी मंदिराच्या देव्हाऱ्यात जाऊ दिले नव्हते, त्याबाबतचा वाद गोव्यात काही वर्षांपूर्वी गाजला होता.

किशोरी आमोणकर यांना आदरांजली वाहताना त्यांचे गाणे पावित्र्य आणि मांगल्य यांचा सर्वोच्च अविष्कार म्हणून गौरवला जातो. परंतु अवघ्या शंभर वर्षापूर्वीच त्या कलेला कलावंतिणीचे पाप म्हणून धिक्कारले जात होते. तो धिक्कार सहन करत गोमंतक मराठा समाजाच्या कलाकारांनी शेकडो वर्षें इतरांसाठी पाप असणारी कला ही पूजा म्हणून श्रद्धापूर्वक जोपासली. त्या समाजाने पुरुषार्थ चळवळीद्वारे त्या पापाला साधना म्हणून मान्यता मिळवून दिली. त्या साधनेला किशोरी अमोणकर यांनी त्यांच्या प्रयोगांनी नव्या उंचीवर नेले. त्यामुळेच त्यांना गानसरस्वतीचा सन्मान मिळतो, ही गोष्ट फार मोठी ठरते.

- सचिन परब

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.