अनंत फंदी यांच्‍या नावाविषयी थोडेसे


अनंत फंदी हे कवी-शाहीर म्‍हणून सर्वपरिचित आहेत. त्‍यांचे मूळ नाव अनंत घोलप. मात्र ते फंदी या नावाने प्रसिद्ध पावले. त्यांचे फंदी नाव का पडले याविषयी वेगवेगळी मते आहेत.

संगमनेर येथे मलक फंदी म्हणून फकीर होता. तो लोकांशी चमत्कारिक रीतीने वागत असे. म्हणून लोक त्यास फंदी म्हणत. त्या फकिराचा आणि अनंत घोलप यांचा स्नेह होता. त्यावरून अनंत घोलप यासही लोक फंदी म्हणू लागले. महाराष्ट्र सारस्वतकारांच्या मते ‘अनंत फंदी यांचा जन्म शके १६६६ / इ.स. १७४४ मध्ये झाला. ते यजुर्वेदी कोंडिण्यगोत्री ब्राम्हण होते. त्यांचे उपनाव घोलप. त्यांच्या घरचा पिढीजात धंदा सराफीचा, पण अनंत फंदी यांचे लक्ष त्या धंद्यात नव्हते. ते लहानपणापासून व्रात्य चाळे व उनाडक्या करत. पुढे पुढे तर ते फंद इतके वाढले, की जनलोक त्यांस फंदीबुवा असे म्हणू लागले व ते त्यांचे नावच पडून गेले!

‘मराठी कवितेचा उष:काल किंवा मराठी शाहीर’ या पुस्तकात अधिकची माहिती दिली आहे, ती अशी, की फंदी मलंग असेही त्याचे नाव एका लावणीत आले आहे. तो त्यांचा तमाशातील साथीदार होता. त्यामुळे त्यालाही लोक फंदी म्हणू लागले.

सुलभ विश्‍वकोशातील नोंदीत त्यांच्या वडिलांचे नाव कवनी बाबा व आर्इचे नाव राजुबार्इ असे लिहिले आहे. मलिक फंदी या फकिराच्या स्नेहामुळे फंदी हे उपपद त्याच्या नावास जोडले गेले.’

भारतीय संस्कृती कोशात त्यांच्या पत्नीचे नाव म्हाळसाबार्इ व मुलाचे नाव श्रीपती अशी दिली आहेत.

शब्दकोशात छंद आणि फंद यांचे अर्थ वेगवेगळ्या प्रकारे दिले आहेत.

सुबोध मराठी शब्दकोशात : (संपादक - प्र.न. जोशी) छंद फंद, छंदफंद (पु) याचा अर्थ अनुक्रमे बाष्कळपणा व धुमाकूळ असा दिला आहे. तसेच, छंदी फंदी (वि) याचे दुर्व्यसनी, नादी, छांदिष्ट असे अर्थ दिलेले आहेत. हिंदी मराठी शब्दकोशात : (संपादन गो.प. नेने / श्रीपाद जोशी) छंद=छंद, अभिलाषा – इच्छा, नाद-बंधन, कपट- फसवणूक, युक्ती, फंद (पु) – बंधन, फांस-आळे असे अर्थ दिले आहेत.

अमरकोश हिंदी - मराठी - हिंदी (संपादक सुमेरची / लीलावती) छंद = लहर, वृत्त, अभिप्राय, काव्यबद्धचरण; फंद =जाळे, कपट, दु:ख, जाळ, छळ, दु:ख

गुजराथी-मराठी शब्दकोशात (संपादक - स.ज. धर्माधिकारी) मात्र जास्त ‘निगेटिव्ह छटेचे अर्थ आहेत.’ फंद = कारस्थान, कपटजाळ, दुर्व्यवस्था, फंदी = कपटी, ढोंगी, दुर्व्यसनी

कन्नड-मराठी शब्दकोश (संपादक पुंडलीकजी कातगडे) छंद = मनोधर्म, आकार, संतोष, दृष्टी, चेहरा, मुख, मुद्रा, आनंद, उत्साह, प्रीती, आवड, उद्देश, मन:पूर्वक वर्तन, विलास, विनोद.

रूढ अर्थ मात्र प्र.न.जोशी यांना (सुबोध मराठी शब्दकोश) ‘नादी’ व ‘छंदिष्ट’ हे अर्थ योग्य वाटतात.

नवनीतकारांनी अनंत फंदी यांच्याविषयी माहिती देताना, तळटीपेत वेगळी नोंद केली आहे. ‘तमाशासारखे छंदफंद करतात म्हणून त्यांना ते नाव शंकराचार्यांनी दिले. पुढे, ते उपनाव बनले. त्यांचे सध्याचे वंशज अ.ग. फंदी हे आहेत.’

– प्रा. शिरीष गंधे

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.