विपुल जलसंपदेने संपन्न तांबुळी-पडवे

प्रतिनिधी 14/08/2017

_Tambuli_Gav_1.jpgसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ओटवणे- सावंतवाडी तालुक्यातील तांबुळी गावाचे नाव घेताच नारळ-सुपारीच्या बागांनी बहरलेला हिरवागार परिसर नजरेसमोर येतो. ते गाव सुपारी-नारळाच्या बागायतीमधून वाहणारे मंद झुळूकवारे आणि नैसर्गिक सौंदर्य यांमुळे रमणीय वाटते, पण त्या बागांमुळे ते प्रगतीच्या वाटेवरदेखील आहे. लोकांनी त्यांच्या कष्टाळू वृत्तीमुळे बागबागायतीला उपजीविकेचे साधन मोठ्या प्रमाणात बनवले आहे. तांबुळी गावास जवळची बाजारपेठ म्हणजे बांदा.

गावात तांबूलपत्राची (खाण्याचे पान) लागवड मोठ्या प्रमाणावर होई. त्यातून लोकांना उत्पन्न उत्तम मिळे. गावाला तांबुळी हे नाव तांबुलपत्रावरून पडल्याचे जाणकार सांगतात. गावाच्या ग्रामपंचायतीची स्थापना १९५७ साली झाली. ग्रामपंचायतीमध्ये पडवे-धनगरवाडी हे महसुली गाव समाविष्ट आहे. गावाच्या पहिला सरपंचपदाचा मान सखाराम सावंत यांना मिळाला आणि त्यानंतर, गाव अनेक सरपंच, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून प्रगतीची घोडदौड करत गेले.

गावाच्या विकासाला निसर्गाची साथ भरभरून लाभली आहे. गावातील दोनशे नळजोडणी निसर्गनिर्मित पाण्याच्या स्रोतावर अवलंबून आहेत. नळजोडणी विनावीज आहे.

प्राथमिक उपकेंद्र, शाळा, अंगणवाडी यांसारख्या शैक्षणिक व आरोग्यविषयक सोयी गावात आहेत. गावात पूर्वी चंदनाची लागवड मोठी होई. मात्र, आता ती फार अल्प प्रमाणात केली जाते. तांबुळी हे गाव पूर्वी सावंतवाडी संस्थानाला जोडलेले होते. घोडेस्वार राजवाड्यात फुले तांबुळी येथील वनबागेतून घेऊन जात असत. गावचे ग्रामदैवत श्रीदेवी माऊली पंचायतन आहे. तिच्या मंदिराच्या अवतीभवती लहानमोठे पाषाण, मंदिरे आहेत. गावात वार्षिक जत्रोत्सव, शिमगोत्सव आनंदाने साजरा केला जातो.

गावात पस्तीस माजी सैनिक आहेत. गावात अंकुश सावंत, रवींद्र सावंत यांच्यासारख्या मूर्तिकारांबरोबर प्रताप तांबुळकर हा नवोदित दशावतारी कलावंत मोठ्या दशावतारी नाट्य कंपनीत काम करून गावाचे नाव उज्ज्वल करत आहे. अंकुश सावंत यांच्यासारखा ऐतिहासिक, सामाजिक नाटकांचे दिग्दर्शन करणारा कलावंत त्या गावातीलच आहे. मित्तल देसाईसारखे संगीत भजनी कलावंतही त्या गावात आहेत. श्रीराम सावंत गावात पोलिस पाटील असून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिनकर सावंत यांचेही सहकार्य गावाच्या विकासास लाभले आहे. गावाला २००८-२००९ साली महात्मा गांधी तंटामुक्त व निर्मलग्राम हे दोन्ही पुरस्कार महाराष्ट्र राज्य शासनाकडून प्राप्त झाले.

तांबुळी गाव ओटवणे दशक्रोशीतच नव्हे तर सावंतवाडी तालुक्यातही विकासाच्या दृष्टीने अग्रक्रमाने येईल अशी उमेद ग्रामस्थांना आहे.

- लुमा जाधव

(मूळ लेख ‘दैनिक प्रहार’, २७ मे २०१४)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.