डॉ. द.बा. देवल – जीवनशैलीचा पाठ


डॉ. द.बा. देवल यांना बाबा किवा फकीर म्हणावे अशी जीवनशैली ते निवृत्तीनंतर जगत आहेत. त्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्ताने त्यांचा नागरी सत्कार इंदूरमध्ये काही वर्षांपूर्वी करण्यात आला. त्यासाठी काही संस्थांनी एकत्र येऊन ‘डॉ. डी.बी. देवल अभिनंदन समिती’ निर्माण केली. तिने मराठीतील प्रसिद्ध कवयित्री अरुणा ढेरे यांना समारंभासाठी खास पुण्याहून पाचारण केले आणि एक हृद्य समारंभ घडवून आणला.

खरे तर, देवल आयुष्यभरच कलंदर जीवन जगले. त्यांनी रुग्णांना मदत केलीच, परंतु त्या पलीकडे त्यांना कोणती कला विशेष प्रिय असे विचारले तर ते त्याचे उत्तर नाही देऊ शकणार! सत्कार समारंभात त्यांच्या रुग्णसेवेचा आणि त्यांच्या या विविध ‘वेडां’चा वारंवार उल्लेख होत होता. अरुणा ढेरे म्हणाल्या, की देवल यांनी जीवन कसे जगावे याच कलेचे पाठ त्यांच्या आयुष्यातून दिले असे म्हणता येईल ! डॉक्टरचे जीवन सतत रुग्णांच्या सहवासात राहून रुक्ष व भावनाशून्य बनण्याची बरीच शक्यता असते. परंतु देवल यांनी तशा परिस्थितीतही संवेदना जपली.

डॉ. देवल इंदूरमधून एम.बी.बी.एस. झाले. त्यांनी मुंबईत येऊन अॅनास्थेशियामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि महापालिकेच्या ‘केईएम रुग्णालया’त नोकरी केली. तेथे ते अॅनास्थेशिया विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर, गेली वीस वर्षें त्यांनी अलिबागजवळ किहीम – जिराड परिसरात स्वच्छंदपणे जगणे सुरू ठेवले आहे. ते दिवसभर लाकडातून कोरीव वस्तू बनवतात आणि रात्री स्थानिकांसमवेत भजनाच्या मैफली रंगवतात. त्यांना ढोलक, तबला, बासरी, हार्मोनियम अशी सर्व वाद्ये उत्तम वाजवता येतात. बासरी तर ते स्वत: बनवून वाजवतात. त्यांच्या या ‘वेडां’चे सर्व श्रेय ते इंदूरच्या चिंचाळकर गुरुजींना व तेथील रसिकतेच्या जगण्याला देतात. त्यांचा जन्म इंदूरचा आणि त्यांचे कॉलेजपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले.

देवल यांची मते तीव्र आहेत. त्यांच्या मतांचा मूळ गाभा हिंदुत्ववादाचा, परंतु वयाच्या एका टप्प्यावर त्यांनी माओचे ‘रेड थॉट्स’देखील वाचले. त्यांनी स्त्रीमुक्तीचे तत्त्व उचलले, त्याचा प्रचार केला. ‘स्त्रीमुक्ती संघटने’च्या नाटकांना संगीतसाथदेखील केली. परंतु बौद्धिक पातळीवर ते पुरोगामित्वाच्या सर्व छटांना व विचारांना विरोध करत राहिले. त्यांचा खुलेपणा असा, की त्यांनी जवळ जवळ जाहीरपणे सांगितले, की ‘अरे यार, माओचे ‘रेड थॉट्स’ हे पुस्तक वाचता कामा नये. कारण ते पटते !’ स्वाभाविक आहे, कारण भारतावरील चिनी हल्ला होऊन त्यावेळी पंधरा वर्षे झाली होती. ती जखम ताजी होती आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात चीनबद्दल संताप होता.

ते वर्तमानपत्रांत त्या त्या प्रसंगानुसार येणाऱ्या प्रतिकूल, भडक नित्य बातम्या वाचून नेहमी चवताळून उठतात. त्यांनी ‘केईएम’मध्ये नोकरी सर्व तत्त्वे सांभाळूनच केली. ते फुलटायमर विरूद्ध ऑनररी या वादात फुलटायमरच्या बाजूने कणखरपणे उभे राहिले. कारण त्यांना डॉक्टरीपेशा नैतिक मूल्यांवर आधारित असावा, त्याचे व्यापारीकरण होऊ नये असे वाटे.

डॉ. देवल यांच्या सत्काराच्या निमित्ताने त्यांची बहीण कलावती देवल यांनी डॉ. देवल यांच्याबद्दल एक पुस्तक प्रसिद्ध केले आहे. त्यामधून डॉ. देवल यांचे विविधरंगी व्यक्तिमत्त्व प्रकट होते. पुस्तकाचे वैशिष्ट्य हे, की त्यामध्ये देवल यांचे लेखन व त्यांनी रचलेल्या कवितादेखील समाविष्ट केलेल्या आहेत. देवल यांनी व्यवसायाच्या निमित्ताने इंग्रजीतून जे लेखन केले त्याचा समावेश त्या पुस्तकामध्ये आहेच. डॉ. देवल यांच्या पुस्तकातील लेखनामध्ये एका लेखमालेचा समावेश आहे. ती आहे – चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोरांसंबंधी. त्यांनी सत्तरच्या दशकात मध्यप्रदेशातील चंबळ परिसरात फिरून, अनेक दरोडेखोरांच्या भेटीगाठी घेऊन, ती सत्याधिष्ठित लेखमाला लिहिली होती. पुढे, डाकू मंडळी  जे.पी., विनोबा भावे यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देऊन शरण येऊ लागली, तेव्हादेखील डॉ. देवल यांनी तत्संबंधी लेखन केले.

पुस्तकातील आणखी एका लेखाचा उल्लेख केला पाहिजे, तो म्हणजे व.पु. काळे यांचा प्रदीर्घ लेख - ‘आमच्यावर लिहू नका, यार’. तो लेख पुस्तकाची पंचवीस पाने व्यापतो. लेख अतिशय भावस्पर्शी आहे. तो डॉक्टरांची सर्व वैशिष्ट्ये यथार्थ टिपतो, त्याचे शीर्षकच त्या दृष्टीने बोलके आहे.

डॉ. देवल ‘ग्रंथाली’च्या काही पुस्तकप्रसार मोहिमांत सहभागी झाले. त्यांनी ‘स्त्रीमुक्ती संघटने’च्या कार्यातदेखील भाग घेतला. विशेषत: ते ‘मुलगी झाली हो’ नाटकाच्या वेळी ढोलकी वाजवत. देवल यांचा लाकडी फर्निचर बनवणे हा हातखंडा. त्यांनी घरी एक उत्कृष्ट चार-साडेचार फूट उंचीचा लॅम्प बनवला. त्यावर अप्रतिम कोरीव काम होते. कोणी त्यांना म्हणाले, की विकला तर दोन हजार रुपये सहज येतील (ही १९८० ची गोष्ट). त्यावर देवल यांचे उत्तर असे, की “अरे, टाटाकडेसुद्धा नाही अशी एकतरी वस्तू माझ्याकडे आहे. टाटाने सगळी संपत्ती लावली तरी त्यांना ती मिळणार नाही. ” त्यांनी घरचे फर्निचर सहसा स्वत: घरीच बनवले. त्यांची अमेरिकेत मोठ्या मुलाकडे- अतुलकडे - तर बेसमेंटमध्ये फर्निचरची कार्यशाळाच आहे. देवल वाईनदेखील उत्कृष्ट अशी बनवत असत.

देवल यांनी, सातत्याने जोपासलेला एक छंद म्हणजे नारळाच्या कवटीपासून कलाकुसरीच्या वस्तू बनवणे – सर्व्हिस बाऊल्स, पेन होल्डर्स, हातातील बांगड्या, कानांतील डूल, गळ्यातील माळा. त्यांच्या त्या कामासाठी सरळ फोडलेले नारळ लागत – आपटून वेडेवाकडे फोडलेले नारळ चालत नाहीत. म्हणून बिल्डिंगमधील सगळ्या बिऱ्हाडांचे नारळ करवतीने फोडण्याचे काम देवल करणार. त्या बिऱ्हाडाने कवट्या परत देण्याची भानगडच नको म्हणून देवल स्वत: नारळ खवून देणार! तो क्रम कित्येक वर्षांचा आहे. ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’तर्फे जे मानपत्र दिले जाते त्यातील कोरीव काम देवल यांचे आहे.

देवल त्यांना आवडणाऱ्या मराठी दिवाळी अंकांतील कविता गेले दशक-दोन दशक संकलित करत आहेत. त्यांनी त्यामधील काहींना चालीदेखील दिल्या आहेत. ते त्या कविता अनौपचारिक मैफलींत सादर करतात. तेव्हा श्रोते अचंबित होऊन जातात. देवल यांच्या पत्नी – मीना देवल या ‘स्त्रीमुक्ती’वाल्या - ‘स्त्री उवाच’ वाचक गटाच्या सदस्य. त्यांची स्त्रीमुक्ती संबंधातील कार्यनिष्ठा अशी, की त्यांनी कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी स्त्रियांना न्याय मिळावा यासाठी कायद्याची पदवीदेखील घेतली. त्यांचे विविध विषयांवरील लेखन प्रसिद्ध होत असते. देवल यांचा मोठा मुलगा अतुल अमेरिकेत अटलांटा येथे जाऊन स्थिरावला आहे, तर धाकटा डॉ. अजित नेत्ररोगतज्ज्ञ आहे. पण तो लोकांना अधिक माहीत आहे तो ऑर्केस्ट्रातील गायक म्हणून. आणि ऑर्केस्ट्रा सादरीकरणातील कल्पकतेमुळे. त्याने हिंदी सिनेमागीतांच्या वाद्यवृंदांना नवी झळाळी आणून दिली आहे.

डॉ. द.बा. देवल यांच्या पत्नी मीना यांना त्यांच्या पतीची विशेष आवडलेली कविता –

या माळावर असे उठावे

सळसळणारे सूर अनामिक

ज्यांच्या मागून येतील गाणी

वेदनेतली ज्वलंत जिवीत

या माळावर ... || १ ||

गोकुळीच्या इथल्या पेंद्याला

पुनरवी दुसरा पेंद्या होतो

अन् त्या पेंद्याच्या गर्भातून

पुन्हा पुन्हा पेंद्याच प्रसवती

त्या पेंद्याच्या घरात केव्हा

कृष्ण मुरारी जन्मत नाही

गाय गोपीचे नाव कशाला

मोरपिसही गवसत नाही

या माळावर ... || २ ||

या माळावर असा फुलावा

वेळूचा अजनबी

- दिनकर गांगल

Last Updated On 20 April 2018

लेखी अभिप्राय

खुप छान सहज वाचता येते

रामचंद्र जाधव 08/05/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.