दिलीप कोथमिरे - विंचूर गावचे प्रयोगशील शिक्षक


नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील विंचूर गावचे जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक दिलीप कोथमिरे हे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहे. प्राथमिक शिक्षकसुद्धा मनात आणले तर कितीतरी विधायक गोष्टी करू शकतात आणि मुख्यत:, त्यांनी त्यांच्या हाती असलेल्या लहान मुलांना जाणिवपूर्वक घडवले तर कधी कधी, त्यांच्या विजयाची पताका दूरवर झळकू लागते ह्याचे दिलीप कोथमिरे हे उत्तम उदाहरण आहे!

दिलीप कोथमिरे प्रथम १९९१ साली निफाड तालुक्यातील ‘माळीवस्ती शाळे’मध्ये रूजू झाले. ती दोन शिक्षकी शाळा होती. पण त्यांची एकट्याचीच त्या शाळेत नेमणूक झाली होती. त्यामुळे ते एकटे दोन्ही शिक्षकांचे काम करत असत. त्या शाळेला इमारत नव्हती. त्यामुळे शाळा गोठ्यात नाही तर आंब्याखाली भरत असे, पण त्यांचे कामावरील प्रेम पाहून व त्यांची तळमळ जाणून विद्यार्थ्यांच्या पालकांनी गावातील तीन गुंठे जागा शाळेच्या इमारतीसाठी उपलब्ध करून दिली. गावातील एका कारखान्याने इमारतीच्या बांधकामासाठी सात हजार रुपये दिले. त्यानंतर पटसंख्या वाढून बेचाळीस झाली व दुसऱ्या शिक्षकांची नेमणूक झाली. त्यांच्या सहकार्याने शाळेची टुमदार इमारत उभी राहिली. त्या शाळेला १९९४ साली दोन हजार शाळांमधून निवड होऊन ‘जिल्हा परिषद आदर्श शाळा’ पुरस्कार मिळाला.

मुले विंचूर गावातून माळीवस्ती शाळेला जाऊ लागली एवढे त्या शाळेचे महत्त्व लोकांना जाणवू लागले. दिलीप कोथमिरे यांनी शाळेतील वातावरण टागोरांच्या शांतिनिकेतन शाळेसारखे ठेवण्याचा प्रयत्न केला.

त्यांची बदली बोकडदरा या गावी झाली. तेथील प्राथमिक शाळेत असलेल्या तीनशेदोन विद्यार्थ्यांपैकी एकशेचार मुले बंजारा समाजाची होती. दिलीप कोथमिरे यांनी बंजारा मुलांची प्रगती व्हावी म्हणून कष्ट घेतले व त्यांनाही यश आले. त्यांनी बोकडदरा शाळेतील बंजारा जमातीच्या दगड फोडणाऱ्या मुलांसाठी आरोग्य शिबिरे घेतली. त्यांचे हिमोग्लोबिन तपासले - त्याचे प्रमाण अनेक मुलांमध्ये खूप कमी दिसले. हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यासाठी मुलांना लोहयुक्त गोळ्यांचे वाटप केले. मुलांना त्यांचा स्वत:चा रक्तगट माहीत करून दिला. मुलांना जिल्हा स्तरावरील कबड्डी स्पर्धेत सहभागी केले. त्यांना स्पर्धेत बक्षिसेही मिळाली. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील यशवंत गोसावी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे असलेले चार क्विंटल धान्य बंजारा जमातीच्या मुलांना उपलब्ध करून दिले.

बोकडदरा शाळेला २००९ साली ‘साने गुरूजी स्वच्छ प्राथमिक शाळा’ पुरस्कार मिळाला. त्यांनी बोकडदरा शाळेतील विद्यार्थ्याना संगणक शिक्षण देण्यास सुरुवात केली. मुलांनी त्यातही चांगली प्रगती केली. तेथील मुले न्युझीलंड देशातील ऑकलंड शहरातील मुलांशी संगणकाच्या माध्यमातून संवाद साधतात. गुरुजींनी शाळेतील मुलांची इंग्रजी भाषेचीही तयारी उत्तम करून घेतली आहे. त्या शाळेतील चौथी-पाचवीमधील मुले इंग्रजी चौथ्या लिपीत लिहितात.

विंचूरच्या कुमार निकाळे ह्या दलित विद्यार्थ्याचे आई वडील दुर्धर आजाराने ग्रस्‍त होते. दिलीप यांनी त्याची परिस्थिती पाहून, त्याला सर्वतोपरी मदत केली. त्याला ‘जवाहर नवोदय विद्यालय’ प्रवेश परीक्षा देण्यास जाणीवपूर्वक प्रोत्साहन दिले. त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले. त्याला बारावीला ९६ टक्के मार्क मिळाले व त्याचे पुढील शिक्षण ‘आय आय टी - पवई’ येथे झाले. त्याला नोकरीमध्ये पंधरा लाखांचे पॅकेज मिळाले. त्यानेही दिलीप कोथमिरे यांच्या सामाजिक उपक्रमांना हातभार लावला.

दिलीप कोथमिरे रचनावादासाठी लागणारी शैक्षणिक साधने बाजारातून विकत घेण्यापेक्षा त्यांच्या गरजेनुसार स्वत: तयार करतात. एवढेच नाही, तर त्यांनी एक बचत गट स्थापन करून, महिलांना प्रशिक्षण देऊन ते त्यांच्यामार्फत असे साहित्य करून घेतात. त्यांनी रचनावादासाठी शैक्षणिक साधने बनवताना त्यात प्रयोग केले व अनेक प्रकारची साधने  बनवली आहेत. त्या साहित्याला पुण्याच्या बाजारपेठेतून देखील मागणी आहे.

दिलीप अनेक वेळा विज्ञान प्रदर्शनात सुद्धा सहभागी झाले आहेत. ते विज्ञान प्रदर्शनात सलग नऊ वर्षें तालुका स्तर, जिल्हा स्तर, विभागीय स्तर ओलांडत राज्य पातळीवर पोचले आहेत. त्यांनी लोकसंख्या शिक्षण हा एकच विषय घेतला होता. सात-आठ मुले बैलगाडीत बसलेली असून ती गाडी बाई ओढत आहे, नवरा व्यसनाधीन आहे अशी त्या प्रदर्शनासाठी बनवलेली फिरती गाडी फार लोकप्रिय झाली होती.

त्यांनी राज्य पातळीवरील अनेक प्रशिक्षण वर्गांत उपस्थित राहून त्यांचा लाभ घेतला. त्यांनी चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेचे पेपर सेटर म्हणून काम केले आहे.

दिलीप कोथमिरे विंचूर गावात एका गणपती मंडळाला उत्सवासाठी वर्गणी देत असत. एकदा, गणपतीच्या मागे मुले पत्ते खेळत असल्याचे व वर्गणीद्वारे जमा केलेल्या निधीचा गैरवापर होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हापासून, त्यांनी त्या मंडळाला वर्गणी देणे बंद केले व त्या ऐवजी विंचूरच्या आसपासच्या पंचवीस-तीस प्राथमिक शिक्षकांनी एकत्र येऊन प्रत्येकी शंभर रुपये वर्गणी काढून समाज प्रबोधनासाठी ‘दरेकर व्याख्यानमाला’ गुरूजींच्या सहाय्याने १९९७ पासून सुरू केली. त्यासाठी उत्तम कांबळे यांच्या माध्यमातून वक्त्यांशी संपर्क साधला. लेखक-कवींना निमंत्रित केले. हळुहळू गावकरीही त्या कार्यक्रमास मदत करू लागले.

प्रथम तीन वर्षें, फक्त शिक्षक वर्गणी देत असत. मात्र सक्तीने वर्गणी गोळा केली जात नाही. चौथ्या वर्षी शेख या गृहस्थांनी पाचशे रुपयांचे निनावी पाकीट देण्यास सुरुवात केली. दिलीप कोथमिरे गेल्या एकोणीस वर्षांपासून या कार्यक्रमाचे संयोजन करत आहेत. त्या  मंडळाचे आता एकशेसत्तर सभासद असून प्रत्येकी एक हजार रुपये वर्गणी गोळा करतात. ज्याला अध्यक्षपदाचा मान मिळतो त्याने सात हजार रुपये मानधन वक्त्याला द्यायचे असते. व्याख्यानमाला दरवर्षी नवरात्रात नऊ दिवस चालते. उत्तम कांबळे सलग बारा वर्षें त्या कार्यक्रमाला आले. अशा अनेक नामवतांच्या व्याख्यानांची मेजवानी ग्रामीण जनतेला मिळते. समाजाच्या व मुलांच्या ज्ञानात मोलाची भर पडते. इतर हिडीस प्रकारांना आळा बसतो.

दिलीप कोथमिरे समाजाला उपयोगी गोष्टी उदाहरणार्थ कुटुंब नियोजन, पल्स-पोलिओ व लसीकरण मोहीम, वृक्षारोपण मोहीम असे कार्यक्रम राबवण्यात साहाय्य करत असतात. त्यांनी गावात वाचनालयही सुरू केले आहे. ते सूत्रसंचालन करणे, कविता लिहिणे, शैक्षणिक लेखन करणे हेही इतर छंद जोपासतात. त्यांना वाचनाची आवड आहे.

दिलीप कोथमिरे,
976 570 6925, dilipkothmire@rediffmail.com
विंचूर, ता. निफाड जि. नाशिक

- अनुराधा काळे

Last Updated On - 11th Jan 2017

लेखी अभिप्राय

हरहुन्नरी व्यक्तिमत्व लाभलेल्या कोथमिरे सरांचा सहवास व त्यांच्या व्याख्यानमालेच्या आनंददायी उपक्रमाचा आस्वाद घेण्याचे भाग्य लाभले आहे.ही व्याख्यानमाला म्हणजे एखादे भव्य दिव्य साहित्य संमेलनच असते! त्यांची बोकडद-याची शाळा
डोळ्यांची पारणे फेडते.

किरण भावसार, सिन्नर04/01/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.