गणेश देवींची चिताऱ्याची रंगपाटी!

प्रतिनिधी 11/10/2017

_Ganesh_Devi.jpg‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ या प्रकल्पात गणेश देवी आणि त्यांच्या टीमने केलेले काम विलक्षण आहे. गंमत अशी, की त्या प्रकल्पामध्ये रंग व भाषा ह्यांचादेखील आढावा घेतला गेला आहे. अर्थात, प्रत्येक भाषेत कोणत्या रंगाला काय म्हणतात हे नमूद होत गेले आहे. त्यांनी ह्या ग्रंथात महाराष्ट्रातील बोलल्या जाणाऱ्या त्रेपन्न भाषा नोंदल्या आहेत. माझ्या लक्षात असे आले, की अरे, हे तर महाराष्ट्राची “पॅ’लिट्” आहे! म्हणजेच मराठीत चिताऱ्याची रंगपाटी! मला अचानकपणे मिळालेला रंग ह्या विषयाचा तो छान खजिना आहे!

मी त्या प्रकल्पाचे मराठी संपादक अरुण जाखडे ह्यांना इमेलने ती गोष्ट कळवली. दुर्दैवाने, त्यांनी त्याबद्दल उत्तर पाठवले नाही; किंवा काही विचारणा केली नाही. शेवटी, मी गणेश देवी यांच्याशी गुगलमार्फत संपर्क साधला. त्यांनी आमच्या फोनवरील प्रथम संभाषणातच ‘आपण एकत्र ह्या विषयावर काम करू शकू’ असे मला सुचवले. त्यामुळे माझा उत्साह वाढला होता. आम्ही ते मुंबईत आले असता एकत्र भेटून जेवण घेतले.

ती भेट घाईत झाली, परंतु मी माझे मित्र, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुद्रण तज्ञ आणि रंगतंत्रज्ञान तज्ञ किरण प्रयागी यांना बरोबर घेऊन गेलो होतो. आम्ही दोघे व देवी, आमच्या बोलण्यात असे ठरले, की त्यांनी जमवलेल्या रंग या शब्दावर आधारित आपल्या कल्पनेप्रमाणे रंगछटा तयार कराव्या; त्या निव्वळ महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारताची तशा प्रकारची माहिती संकलित करून “पॅ’लिट्”चा ग्रंथ तयार करावा! कल्पना अशी, की प्रथम शाळेतील विद्यार्थ्यांकरता पुस्तिका तयार कराव्यात!

संभाषणाच्या वेळी मुद्दा असा निघाला, की छपाईसाठी वापरण्यात येणारे रंग शब्दांना योग्य न्याय देणारे नसतील! आम्ही - मी व कै. श्रीमती डॉ. शालिनी पटवर्धन - त्या विषयावर असा एकत्रित शोधनिबंध १९८५ मध्ये फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय रंग चर्चासत्रात भित्तिचित्र स्वरुपात मांडला होता. त्यावर देवी यांनी असे सुचवले, की आपण प्रथम त्यांनी सुचवलेला पर्याय करून पाहू. त्यावर या प्रथम भेटीत मी, किरण व देवी सहमत झालो आहोत. त्यांची भाषासंस्था वडोदरा-गुजरातमध्ये आहे. तेथे जाऊन सविस्तर अभ्यास आराखडा तयार करावा असेदेखील ठरले आहे.

मला कलाशिक्षक म्हणून गेल्या चार दशकांच्या अनुभवांतून असे दिसून आले आहे, की रंग संवेदना आणि रंगज्ञान ह्यामध्ये भाषा हा खूप महत्त्वाचा दुवा आहे. गणेश देवी विज्ञानविरोधी नाहीत, परंतु त्यांचा यांत्रिकीकरणाला विरोध आहे. त्यांच्या सिद्धांतानुसार, त्रेपन्न रंगांचे “पॅ’लिट्” जर प्रमाण पद्धतीने (स्टँडर्डायझेशन) मांडले तर त्याचे मूळ भारतीय सांस्कृतिक संदर्भ नाहीसे होतील. उदाहरणार्थ, काही जमाती निव्वळ दोन शब्दांतून सप्तरंग व्यक्त करतात. इन्फ्रारेड व अल्ट्राव्हायोलेट यांसारखे प्रत्यक्ष न दिसणारे रंग तर त्यांच्या संवेदना परिघात येतच नाहीत! देवी म्हणाले, की प्रत्यक्ष वस्तू, कापड, घर, आकाश व भौगोलिक परिस्थिती यांचा आढावा घेत त्यांच्या साह्याने ती रंगमांडणी व त्रेपन्न भाषांतील रंगपट्टे (“पॅ’लिट्”) अंतिमतः मांडले जातील.

मराठीतील (महाराष्ट्र) रंग पुढीलप्रमाणे भाषाबोलीनुसार दिसून आले : वडारी:२, नॉ लींग:२, वारली:१२, पोवारी:१४, चंदगडी:१५, सिंधी:१६, कोकणा:१६, हलबी:१६, कोहळी:१७, झाडी:१७, पारधानी:१८, वाडवळी:२०, गोंडी:२१. गणेश देवी ह्यांच्या म्हणण्यानुसार वडारी, नॉ लींग यांच्यासारख्या कमी शब्दांच्या भाषा मृत होणार.

मला कोणता रंग - म्हणजे लाल, हिरवा, पिवळा इत्यादी - सर्व भाषांतून कॉमन आहे ते शोधावे लागेल; काही भाषांत तांबडा आहे, परंतु लाल नाही!

सर्व भाषाबोलींतून सप्तरंगांचे कसे आकलन होते हे समजले तर संपूर्ण ‘गोधडी’ (जशी विविध रंगाच्या कापडाच्या तुकड्यातून विणली जाते तशी) समान रंगपट तयार करता येईल. त्यामुळे राष्ट्रीय ध्वजाचे तीन रंग प्रतीकात्मक रीत्या जगभर मोडतो, त्याचप्रमाणे ती ‘गोधडी’ प्रत्येक राज्य आणि संपूर्ण राष्ट्र यांतून विस्तारत पुढे अजून संपूर्ण जग ‘गोधडीत’ पाहता येईल. त्यातून साध्य काय होईल? तर मानवी रंगसंवाद तयार होऊ शकेल. तो जीवनाच्या विविध उपयोजित क्षेत्रात आणता येईल. तंत्रज्ञान, विज्ञान आणि कला ह्यांचे समतोलाने एकत्रीकरण विकासासाठी महत्त्वाचे ठरेल. पाहुया गणेश देवी हा रंगप्रकल्प कोणत्या दिशेने नेतात? किरण प्रयागी व मी सध्या मुद्रण माध्यमातून ‘कलर कॅलिब्रेशन’ आणि ‘कलर मॅनेजमेंट’ यांवर अभ्यास केंद्रित करत असलो तरी तो विचार अनेक अंगांनी विस्तारत नवी दिशा मिळून पुढे जाता येईल.

- रंजन जोशी

लेखी अभिप्राय

Khup Anand vatala manapasun dhanyavad

RASHMI PRASHAN…05/06/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.