जांभारी गावातील शिमग्याची मिरवणूक


लाल वस्त्रांनी शृंगारलेली पालखी. आत चांदीचे देव भैरी-कालकाई, इंगलाई, जोगेश्वरी आणि कोनबाबा पालखीच्या आकर्षक सजावटीत विराजमान झाले आहेत. समोर पालखीचा कोरीव कठडा आहे. वरील बाजूस महिरपी कमान आहे. त्यावर नाजूक घंटा ओळीने झुलत आहेत. पालखी मजबूत गोलाकार दांड्यावर गरगर फिरू शकेल अशा गुळगुळीत पद्धतीने बसवली आहे. दोन्ही बाजूचे दांडे तुलनेने थोडे लांबच आहेत. दोघांनी दोन बाजूंला सन्मुख उभे राहून दांड्याला खांदा दिला, की मध्ये पालखी डौलाने डुलते. दोघांनी एकाच वेळी कंबर ताठ ठेवून खांद्याला विशिष्ट पद्धतीने झटका दिला, की पालखी गिरकी घेते. ते दृश्य पाहताच आबालवृद्धांच्या तोंडाचा आऽ वासतो, डोळे चमकतात. त्यात काय नसते? आश्चर्य असते, भय असते, अमाप श्रद्धा असते आणि अपार प्रेमभावना असते!

रत्नागिरी तालुक्यातील जांभारी गावातील शिमग्याची मिरवणूक फाल्गुन वद्य प्रतिपदेला निघते. ती गावाच्या सीमेवरील भैरीदेव देवस्थानापासून सुरू होते. तत्पूर्वी, पहाटे चार वाजता तेथे होळीला अग्नी देण्यात आला. अग्नी देताना सात खारवी मानकरी आणि कुणबी समाजाचा एक प्रतिनिधी (तोसुद्धा मानकरी असतो) होळीभोवती तीन प्रदक्षिणा घालतात. त्यामध्ये खांद्यांत लाकडी घोडा, गळ्यात हार आणि हातात भगवा झेंडा घेतलेला लाक्षणिक घोडेस्वार (तो मान कुर्टे घराण्याकडे आहे), चार ढोल, धुपारती धरणारी एक व्यक्ती, घंटा वाजवणारा एक जण ह्यांचा समावेश असतो. सर्वांत महत्त्वाची पंरपरा म्हणजे झाडाच्या फांदीचे तोरण तयार करून त्याला कोंबडा लोंबकाळत ठेवतात. त्या तोरणाला ‘शीत’ असे म्हणतात. ह्या सर्व लवाजम्याच्या तीन प्रदक्षिणा झाल्यानंतर, होळीला अग्नी दिला जातो. तो विधी यथासांग पार पाडल्यानंतर दुपारी चार वाजता पालखीचा जांभारी गावातील सहाणेकडे प्रवास सुरू झाला. पालखीला पाळण्याप्रमाणे गोल घुमवत भक्तगण मार्गक्रमण करत असतात. पालखीच्या मागे जनसमुदाय चालत असतो.

मी २०१६ च्या होळीला गावी गेलो तेव्हा पालखीच्या पुढे लाक्षणिक घोडेस्वार संतोष कुर्टे चार ढोलांच्या तालावर संथ लयीत पदन्यास करत होते. ढोलांची तीव्रता वाढली, की कुर्टेंच्या नृत्याची लय वाढायची. काही वेळा ते एका रेषेत पुढे-मागे तालबद्ध दहा-बारा पावले टाकत. त्या नृत्यात ताल, लय, वेग आणि वीररस यांचे मिश्रण होते. त्यांच्या साथीने घंटानाद करणारे आणि हातात धुपारती घेतलेले असे दोन गृहस्थ चालत होते.

त्या समुहाच्या पुढे नवयुवकांना झिंग आणणारा बेंजो. त्या तालावर वेडेवाकडे नृत्याविष्कार करणारी युवापिढी. मिरवणुकीच्या एकूण वातावरणाशी विसंगत. परंतु अलिकडे आयोजकांना ते अपरिहार्य झाले आहे. जांभारीच्या त्या मिरवणुकीत बेंजोच्या तालावर नाचणाऱ्यांची संख्या गर्दीच्या तुलनेने कमी होती. गावापासून दूर असणारा चाकरमानी शिमग्याच्या सणाला सहकुटुंब जांभारीला येतोच. एक मोठे संमेलन भरल्याचे वातावरण गावात होते. एकमेकांची आपुलकीने विचारपूस व जुन्या आठवणींना उजाळा या गोष्टी स्वाभाविकपणे होतात.

मिरवणूक कटनाक वठारात शिरल्यानंतर वातावरणात वीजेचा संचार झाला. तेथून गावाची मुख्य वस्ती सुरू होते. कटनाक वठाराच्या वतीने मिरवणुकीचे स्वागत सर्व उपस्थित मंडळींना थंड पेय देऊन झाले. उन्हाने तहानलेल्या भक्तजनांना तो गोड दिलासाच! पालखीची पूजा करण्याचे थांबे तेथून सुरू झाले. ठिकठिकाणी, महिला आरतीसह प्रतीक्षेत उभ्या असतात. तेथे पालखी फिरवण्याचा आणि लाक्षणिक घोडेस्वाराच्या नृत्याचा कालावधी वाढला. संतोषला विश्रांती देण्यासाठी इतर कुर्टे बंधू नृत्यात सहभागी होऊ लागले. नवीन नाचणाऱ्यांचा उत्साह दांडगा. त्यांना साथ करणारे ढोलपटूही बदलू लागले. ते पूर्ण शक्तीसह ढोल वाजवत. मिरवणूक मुंगीच्या पावलाने पुढे सरकते. पण त्याची कोणाला तमा नव्हती. भैरीदेवाचा सर्वांच्या मनात संचार आणि पालखीचे गोल गोल फिरणे ह्यामध्ये सर्वजण गुंग होते. शिवाय, रस्त्याच्या दुतर्फा अनेक वस्तूंची आणि खेळण्यांची दुकाने लागली होती. गावातील संपूर्ण रस्त्यांवर रांगोळ्या आणि वर चमचमणाऱ्या कागदांचे तोरण मिरवणुकीच्या शोभेत भर घालत होते.

पालखीच्या पूजाविधीबाबत अपवाद फक्त एक यशवंत वासावे आणि दोन सुगंधा पावरी ह्या दोन घरांचा.  इतरत्र, सर्व गावकरी मुख्य मार्गावर येऊनच थांबलेल्या पालखीस पूजतात. मात्र पालखी मुख्य मार्गावरून यशवंत वासावे यांच्या घरासमोरील अंगणात येते. पालखीतील देवांची आणि वासावे यांच्या कुलदैवतांची (भैरी, भवानी सालबाई, सोमेश्वरी अज्ञात महालक्ष्मी आणि साहीदेवी) भेट झाली. तेथे पालखी फिरवण्यासाठी अहमहमिका लागली. खांद्याशिवाय दोन मनगटांवर पालखी तोलून फिरवण्याची कलाही तेथे पाहण्यास मिळाली. त्यानंतर सुगंधा पावरी ह्यांच्या घरासमोर पुन्हा पालखी त्यांच्या अंगणात आली. तेथे पालखीतील देवांचा (रूपांचा) पेटारा आहे. त्या पेटाऱ्यातील गादीवर वर्षभर रूपांचा मुक्काम असतो.

सहाणेवर पालखी स्थानापन्न होण्यापूर्वी सुमारे सात वाजता पटेकर आणि कोळकांड हे दोघेजण दोन ओट्या घेऊन खाडीपलीकडे कुडली जांभारीत गेले. तेथे कुडली जांभारीतील त्रिमुखी देवीच्या मंदिरातील प्रतिनिधी संसारे वाट पाहत होते. त्यांच्याकडे त्या दोन ओट्या सुपूर्द केल्या गेल्या. ते दोघे परत निघाले तेव्हा पटेकर ह्यांच्याकडे एक ओटी देण्यात आली. जांभारीला परतल्यानंतर पालखीला कोंबड्याचा नैवेद्य दाखवण्यात आला. पालखी सहाणेवर स्थानापन्न झाली. पाडव्यापर्यंत तिचा मुक्काम तेथेच. ओटी भरण्यासाठी आणि नवस फेडण्यासाटी भक्तांची तेथे रोज रांग लागते.

पालखी सहाणेवर आल्यानंतर फाल्गुन वद्य द्वितीयेला पहाटे साडेचार वाजता सहाणेसमोर रचण्यात आलेल्या होळीला अग्नी देण्यात आला. तेथेही भैरीदेव देवस्थानात होतो तसा विधी करण्यात आला. त्यानंतर पालखी, मानकरी, ढोल, निशाण, घंटी, घोडा असा लवाजमा खाडीकिनारी गेला. त्यावेळी त्यांच्याकडून कुडली जांभारीच्या दिशेने कोलत्यांचा मारा करण्यात येत होता. कोलता म्हणजे एका टोकाला पेटवलेली काठी. त्यांना प्रत्युत्तर म्हणून समोरून येणाऱ्या होडीतून जांभारीच्या दिशेने उलटे कोलते येऊ लागले. पहाटेच्या अंधारात दोन दिशांना कोलते उडत असतानाचे दृश्य नेत्रदीपक व रोमहर्षक होते.

होडीतून त्रिमुखी देवी मंदिराचे संसारे आणि इतर मंडळी जांभारी किनाऱ्यावर उतरली. त्यानंतर पालखी पुन्हा सहाणेवर आली. सर्व मानकरी आणि संसारे काळकाई देवीच्या दर्शनाला गेले. काळकाई देवीच्या चौथऱ्यावर अनेक विधी झाले. तेथे नवस फेडण्यात आले. त्यामध्ये कोंबड्यांचेही नवस होते. ती प्रथा पूर्वीपासून आहे. परंतु अलिकडे कोंबडे किंवा बकरे कापण्यास माणसे सहज तयार होत नाहीत. सध्याचे मानकरी नारायण पटेकर यांच्या चुलत्यांना आणि भावाला तसे कृत्य करताना चक्कर आली होती. काळकाई देवीच्या चौथऱ्यावरून मानकरी सहाणेवर आले. त्यांनी स्वत: पालखीचे दर्शन घेऊन होळीला श्रीफळ अर्पण केले. त्या नंतर भक्तजनांना तसे करण्यास अनुमती दिली गेली. जांभारी गावातील होळीचे मानकरी अनुक्रमे पटेकर, वासावे, कटनाक, कोळकांड, झरवे, पावरी, कुणबी आणि वाडकर हे आहेत. प्रत्येक विधीला त्यांची उपस्थिती आवश्यक असते. मात्र काही अपिहार्य कारणामुळे कोणी गैरहजर राहिल्यास कार्याचा खोळंबा होऊ द्यायचा नाही असाही संकेत आहे.

कोलते मारण्याच्या प्रथेविषयी एक आख्यायिका प्रचलित आहे. त्रिमुखी देवी हा उच्चार गावकरी तिरमुखी असाही करतात. ती देवी आणि जाखमाता ह्या दोघी भैरीदेवाच्या बहीणी आहेत. ती तिघे खाडीत खेळत असताना कशावरून तरी भैरीदेव रागावला. त्या तिरिमिरीत त्याने खाजणातील डांबा (काठी) फेकून मारला. ती काठी चुकून जाखमाता देवीच्या डोळ्याला लागली. डोळा जायबंदी झाला. जाखमाता देवी एकाक्ष झाली. त्या प्रसंगाची आठवण कोलते फेकण्याच्या कृतीमध्ये दिसते.

पूर्वी गवताची घरे असत. असे म्हणतात, की पेटते कोलते घरावर पडले तरी काही नुकसान होत नसे. भैरीदेवाची किमया! पण एकदा मारलेला कोलता जमिनीवर पडला आणि तो कोणी पुन्हा चुकून मारला तर लागत असे व जखम होत असे. त्यामुळे वादावादी आणि मारामारी होई. असा एक प्रसंग घडला. त्यामुळे चौदा वर्षें शिमगोत्सव बंद होता. अखेर देवजी पावरी, गोपाळ पाटील, मुकुंद वासावे आणि लक्ष्मण पटेकर यांनी समेट घडवून आणला. त्यांनी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली. त्यानुसार पुन्हा १९२० च्या सुमारास  उत्सव सुरू झाला. तो अव्याहत सुरू आहे. गावात प्लेगची साथ आली त्या वेळी शंकर शिंपी व गावातील प्रमुख मंडळींनी १९२० मध्ये भैरीदेव मंदिरात श्रावण महिन्यात हरीनाम सप्ताह सुरू केला. त्या सप्ताहात मच्छिमारी पूर्ण बंद असते. तसेच, सप्ताह सुरू होण्यापूर्वी खारवी समाजातील प्रत्येक पहिवासी आपले घर धुऊन स्वच्छ करतो. एका व्रताचा प्रांभ स्वच्छता मोहिमेने होतो.

होळीची सुरुवात फाल्गुन शुद्ध अष्टमीला होते. सहाणेवर रोज संध्याकाळी छोटी होळी लावली जाते. त्याला चूड असेही म्हणतात. त्रयोदशी आणि चतुर्दशीला चूड लावतात त्याला तेरसे म्हणतात. पौर्णिमेची छोटी होळी भैरीदेव मंदिर परिसरात चेतवतात. तिला भद्र असे म्हणतात. हा पायंडा पार पाडल्यानंतर फाल्गुन वद्य प्रतिपदेला पहाटे मोठी होळी मंदिराच्या पटांगणात लागते. त्या कालावधीत खेळे येतात. त्यांच्यासह सोंगट्या किंवा संकासूर असतो. तो लहानग्यांना घाबरवण्यात पटाईत असतो.

शिमग्याच्या कालावधीत पूर्वी गोल दगड मांड्यांमध्ये उचलायचा, दोन मनगटांवर तोलून धरायचा अशा प्रकारचे खेळ व्हायचे. मानाचा नारळ हवेत उडवायचा जी व्यक्ती तो नारळ झेलेल तिला पकडायचे. त्यानंतर तो नारळ सहाणेजवळील एका विशिष्ट दगडावर फोडायचा. त्या खेळांमध्ये ईर्षा होती. दगड उचलणारा गावातून छाती पुढे काढून चालणार. नारळ झेलणाऱ्याला पकडताना झटापट व्हायची. त्यामुळे मारामारीचे प्रसंग उद्भवायचे. अशी पुनरावृत्ती टाळण्यासाठी ते खेळ बंद करण्यात आले. बोकड माजवून त्यांच्या कुस्त्या लावण्याचा एक चढाओढीचा खेळ होता. हा खेळ खेळणाऱ्या व्यक्तीचा पराभवाने दुराभिमान जागा व्हायचा. परिणाम काय? वाद ! तंटा ! त्यावरही पडदा पाडण्यात आला.

जांभारीचा भैरीदेव कसा आणि केव्हा अस्तित्वात आला हे गूढ आहे. होळीशी शंकराचा म्हणजे भैरीदेवाचा थेट संबंध आहे.

भैरी, कालकाई, इंगलाई, जोगेश्वरी आणि कोनबाबा ही शंकराची रूपे आहेत. पूर्वी मालवाहतुकीसाठी गलबतांचा वापर व्हायचा. बंगलोर, कारवार, मुंबई वगैरे ठिकाणांहून जांभारीला लागून वाहणाऱ्या जयगड उर्फ शास्त्री खाडीत माल यायचा. ती गलबते मुसलमानांच्या मालकीची असायची. त्यावरचे खलाशी खारवी असत. स्वातंत्र्य चळवळ सुरू असताना पाकिस्तानची मागणी जोर धरू लागली. त्याचा दुष्परिणाम गलबताचे मुसलमान मालक आणि खारव्यांच्या संबंधावर झाला. त्या लढ्यात आजुबाजूच्या गावातील हिंदूंनी खारव्यांना पाठिंबा दिला. पण दोन्ही गटांनी प्रकरण चिघळू दिले नाही. त्यांनी एक धोरण ठरवले. त्यानुसार गावाच्या दक्षिणेस मुस्लिम वस्तीलगत सीमेवर भैरीदेवाचे मंदिर आणि उत्तर सीमेवर हिंदू वस्तीला लागून मुस्लिमांचा पीर अशी सर्वमान्य व्यवस्था अस्तित्त्वात आली. आमचा देव तुमच्याकडे आणि तुमचा देव आमच्याकडे – परस्पर विश्वास!

या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी जाळ्यामध्ये वर उल्लेख केलेल्या पाच पाषाण मूर्ती सापडल्या. त्यांची स्थापना मंदिरात करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात जाकादेवी ते रत्नागिरी या परिसरातील सर्व गावांची ग्रामदेवता भैरीदेव आहे. प्रारंभी पटेकरांचे गावात वर्चस्व होते. त्यांच्याकडे देवळाचे पुजारीपद चालून आले. त्यामध्ये पूजा, नैवेद्य आणि प्रसाद अशा बाबींचा समावेश होतो.

भैरीदेव देवस्थानाची नोंदणी १३ डिसेंबर २००६ रोजी झाली. मंदिराचा जीर्णोद्धार २०१४ मध्ये करण्यात आला. जीर्णोद्धारात नवीन मूर्ती बसवून त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्रशस्त मंदिर, विस्तीर्ण आवार आणि प्रसन्न वातावरण अशा ह्या मंदिराच्या पुनर्बांधणीत सुधीर वासावे, नारायण पावरी, कृष्णा वासावे, कैलास सुर्वे इत्यादींचा प्रमुख वाटा आहे. सुसज्ज असा रंगमंच सुरेश वासावे ह्यांच्या उदार देणगीतून साकारला. कार्यकर्ते अपार मेहनत घेतात. सर्व गाव मंदिराच्या आणि भैरीदेवाच्या सेवेस तत्पर असतो. देणग्यांचा पूर वाहतो.

- आदीनाथ हरवंदे

लेखी अभिप्राय

Very nice and in detail information given about traditional holi of jambhari .

Sameer kolekar 06/10/2016

Good and detailed reporting.

Satpute Suresh06/10/2016

छान लेख.....

सुहास वासावे06/10/2016

जांभारी गावातील संस्कृती ही छान काम गावातील लोक करीत आहेत.आणि मला अभिमान आहे की , अश्या गावात मी नोकरी केली आहे...
जय भैरी..

कैलास कोकणी 06/10/2016

जांभारीचा शिमगोत्सव हा लेख वाचला. त्यामध्ये अापण मंदिराच्या जिर्णोध्दारा संबंधी अापण जी माहिती लिहीली अाहे.ति अपूर्ण अाहे.कृपया अापण त्याबद्दल पुर्ण माहिती करून मग लिखाण केलं असत तर फार बर झालं असत. कारण या कामामध्ये दोन प्रमुख नावांचा उल्लेख तुम्ही अजिबात केलेला नाही. ति दोन नाव मुख्य अाहेत. पहिलं नाव अाहे श्री. सुरेश महादेव वासावे.ज्यानी मंदिराच्याप्लान पासून वर्गणीसाठी रजिस्टस्ट्रेशन पर्यंत अाणी पुढे अनेक गोष्टी यशस्वीपणे पार पाडल्या. अाणि दुसरं नाव अाहे कै.सुभाष पाटील.यानी मंदिरासाठी अत्यंत महत्वाची भुमीका पार पाडली. त्यावेळची एकंदर परिस्थिती पहाता मला तर असं वाटतं की गावामध्ये त्यावेळी श्री पाटील जर श्री वासावे. यांच्या बाजूने ऊभे राहिले नसते तर मंदिर जिर्णोध्दार कदाचीत झाला नसता.अाणि एवढी भव्य व देखणी वास्तू साकारली गेली नसती. त्याच्यासाठी श्री पाटील यांना खूप खूप धन्यवाद. परमेश्वर त्यांच्या अात्म्याला शांती देवो.अाणी अजुन एक महत्वाची व्यक्ती, ज्यांच्यांमुळे ही भव्य वास्तू साकारली गेली ति व्यक्ती म्हणजे अार्कीटेक श्री. शिवलकर.यांच्या मार्गदर्शनाने अाणि श्री. पाटील व श्री. वासावे यांच्या पुढाकाराने व गावाच्या सहकार्यांने ही वास्तू जांभारीची शान बनून दिमाखात उभी राहिली अाहे. याची कृपया नोंद घ्यवी.

अज्ञात07/10/2016

Sundar... Mama abhiman she jambhari gavacha..

Dilkhush Adekar07/10/2016

हरवंदेसाहेब जांभारी भैरीदेव देवस्थानबाबत आपण माहिती दिल्याबद्दल आपले आभार
मंदिर जिर्णोध्दारबाबत अनेक आठवणींना उजाळा देता येईल अशा गोष्टी मनात साठवून ठेवल्या आहेत.पूर्ण माहिती लिहावयाची झाल्यास एक ग्रंथ लिहून होईल.पण थोडक्यात माहिती द्यावयाची झाल्यास मंदिराच्या उभारणीत सुरूवातीला श्री.सुभाष वासावे यांची समर्थ साथ, मंदिराचे रेखाचित्र व त्यामधील कल्पक-ता तसेच मंदिर बांधताना वेळोवेळी गावात जावून मंदिरबांधकामावरती लक्श ठेवून ते अधिक चांगले कसे होईल याबाबत श्री सुरेश महादेव वासावे(इंजि) यांनी मोलाचे योगदान दिले आहे तसेच मंदिर उभारणीमध्ये आपण उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या बरोबरीने नारायण पावरी , कैलास सुर्व, कृष्णा वासावेगुरूजी, प्रदिप सारंग, आदेश पावरी इ.मंडळींनी अथक परिश्रम केले.या मंदिर उभारणीत ग्रामस्थांनी भरघोस देणगी तसेच समर्थ साथ दिली.सर्वांचे आभार.

सुधीर वासावे.भ…07/10/2016

आमच्या गावाची यात्रा खूप छान विश्लेषण आहे

Milind Karbhari07/10/2016

मला गर्व आहे, मी जांभारीचा असल्याचा..
जांभारीचा राजा भैरीदेव माझा

दिपक पोमेंडकर
02/03/2018

दीपक पोमेंडकर 02/03/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.