लोकशाही ‘दीन’!


‘लोकशाही दिन’ दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी साजरा होतो. त्यास आता कर्मकांडाचे स्वरूप आले आहे. बहुसंख्य ‘दिन’ संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सद्भावनेने जाहीर होतात, पण पुढे, देशोदेशीच्या सरकारांत ती रुढी होऊन जाते. लोकशाही युरोप-अमेरिकेत विकसित होत गेली ती गेल्या पाच-सातशे वर्षांत. ती जगभर पसरली गेल्या सत्तर-ऐंशी वर्षांत. दुसऱ्या महायुद्धानंतर साम्राज्ये विलयाला गेली. त्यांना अंकित देशांना सांभाळणे अवघड होऊ लागले. दुसऱ्या बाजूस परावलंबी देशांमध्येदेखील लोकांत शिक्षणप्रसार, जनजागृती, स्वहक्कांची जाणीव या गोष्टी घडत गेल्या. परिणामत: जगामध्ये साम्राज्ये नाहीत व त्यांचे मांडलिक देशही नाहीत. कोठे राजेच राहिले नाहीत. ते इंग्लंड, जपान, नेपाळ अशा देशांत प्रतीकात्मक रूपात आहेत. काही देशांमध्ये हुकूमशाही आहे. काही देशांमध्ये अनागोंदी आहे. परंतु एक देश दुसऱ्यावर आक्रमण करून जात नाही. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत तशा काही कुरबुरी घडल्या तरी यापुढे ते अधिकच अवघड होत जाणार आहे.

जे देश युद्धोत्तर स्वतंत्र होत गेले त्या बहुतेक ठिकाणी लोकशाही राजवट आली. म्हणजे लोकांचे लोकांनी निवडून दिलेले लोकांसाठी सरकार. त्यामुळे समज असा झाला, की लोकशाही हा राज्यव्यवस्थेचा एक प्रकार आहे - लोकांनी निवडणुकांच्या माध्यमातून सरकार निवडून दिले, की तेथे लोकशाही आली! लोकशाहीमधील ‘शाही’ या संज्ञेने तो समज खराच वाटू लागतो. वास्तवात, सरकार निवडणुकांच्या माध्यमातून निवडून दिले गेल्याने ज्या प्रकारची प्रशासन व्यवस्था येते तिचा अनुभव भारतीय जनता गेली सत्तर वर्षें घेत आहे. त्यामध्ये लोकांना अनुकूल आणि त्यांना हव्या अशा गोष्टी सहज घडताना दिसत नाहीत. लोकांच्या हक्कप्राप्तीस देखील प्रतीकात्मक महत्त्व येते - अगदी सार्वत्रिक मतदानाचा हक्क आहे, पण तो बजावला जात नाही.

मग लोकशाही हा मुद्दा आहे तरी काय? तर लोकशाही ही स्वतंत्र देशातील जनतेसाठी जीवनप्रणाली आहे. जनतेने त्या तत्त्वानुसार जगणे सुरू केले, तर आपोआपच देशामध्ये स्वच्छ व सुंदर कारभार, शांतता व सुव्यवस्था सुरू होऊ लागेल. देशाची प्रगतिपथावरील वाटचाल निकोप व वेगवान होईल.

देशातील जनतेस लोकशाही स्वत:ची स्वत:ला जाणवणे म्हणजे प्रथम स्वत:ला स्वतंत्र असल्याचा साक्षात्कार होणे – तसे आत्मबळ जागे होणे. तो व्यक्तिमत्व विकासच ! स्वत:ला स्वत:ची ओळख पटली, स्वत:चे सामर्थ्य जोपासण्याची युक्ती कळली, की आत्मसाक्षात्कार दूरचा वाटत नाही. तो दैनंदिन जीवनाचा भाग बनतो. मनुष्य निर्भय होतो. स्वत:चे म्हणणे आग्रहपूर्वक सांगत असताना दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेण्याकडे त्याचा कल तयार होतो.

इंग्लंड-अमेरिकेत लोकशाहीची ही तत्त्वे विकसित होत गेली. त्याबरोबर लोक अधिकाधिक सजग व सुजाण बनत केले. त्यामधून तेथे सिव्हिल सोसायटी नावाचा नवा वर्ग तयार झाला. म्हणजे बघा, एका बाजूला राज्यकर्ते व प्रशासन व्यवस्था; दुसऱ्या बाजूला देश संरक्षणासाठी गणवेशातील संरक्षण दले; आणि या दोन्ही घटकांना तालावर ठेवणारी जबाबदार सिव्हिल सोसायटी. सिव्हिल सोसायटी ही समाजाला गरजेच्या संस्था समाजासाठी निर्माण करते. सिव्हिल सोसायटी म्हणजे सुशिक्षित, सुसंस्कृत, सभ्य समाज. लोकशाही ही संज्ञा नसून मनुष्याला त्याच्या मनुष्यत्वाची जाणीव करून देणारी सांस्कृतिक बाब आहे. महात्मा गांधी हे लोकशाही जाणलेले व जगलेले भारतातील एकमेव व्यक्ती होते. त्यांनी सांगितलेल्या कार्यक्रमानुसार पाचगाव, मेंढालेखा अशा काही ठिकाणी स्थानिक पातळीवर लोकशाही जीवनपद्धतीचे अपूर्व प्रयोग झालेले आढळून येतात. परंतु सर्वसाधारणपणे लोकशाहीच्या नावाखाली भारतीय जनता वर्षानुवर्षें, निवडणुकांमागून निवडणुका मिंधी अधिकाधिक होत गेलेली आहे.

भारतातील छोट्या समजदार व विचारी जनांना गेल्या दशक-दोन दशकांत तंत्रविज्ञानाचे नवे हत्यार गवसले आहे. त्यामधून त्यांना स्वत:च्या सामर्थ्याची जाणीव होत आहे व त्याचे प्रत्यंतर कारभारातील पारदर्शीपणामुळे लगेच येतदेखील आहे. पुण्याच्या एका मासिकाच्या संपादकाने त्याच्यावर अंक पोस्ट करण्यासंबंधात जो अन्याय झाला त्याबद्दलची दाद ऑन लाइन तक्रारीने छत्तीस तासांत मिळवली. जन्म/मृत्यूचा दाखला मिळवण्यास महापालिकेत पूर्वी आठ-पंधरा दिवस लागत ते काम पंधरा मिनिटांत झाल्याची उदाहरणे नमूद आहेत. ही सोय सर्वत्र व सर्व पातळ्यांवर उपलब्ध होईल. त्याचे कारण माणसाला मोबाईलच्या रूपाने आणखी एक ज्ञानेंद्रियच लाभले आहे जणू! तो त्याचा शक्तिस्रोत आहे. तंत्रज्ञान लोकांना लोकशाही जीवनशैलीच्या दिशेने घेऊन जाईल. मग ‘लोकशाही दिना’चे उपचार पाळण्याची गरज कदाचित राहणार नाही.

- दिनकर गांगल

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.