अरण गावचे हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालय

प्रतिनिधी 11/08/2016

सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील अरण येथील ‘हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालया’ची स्थापना एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दिवशी, शनिवार, १ जानेवारी २००० रोजी करण्यात आली. ग्रंथालयामध्ये नऊ हजार पुस्तके आहेत. वाचनालयाने सुरुवातीपासून वाचकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. वाचनालयाच्या वतीने १८ एप्रिल २००३ या दिवशी पुस्तकप्रेमी अरणभूषण हरिभाऊ नाना शिंदे यांची ग्रंथतुला करण्यात आली. ती सोलापूर जिल्ह्यातील पहिली ग्रंथतुला असल्याचे त्यावेळी बोलले गेले. वाचनालय ‘ब’ वर्गात आहे.

वाचनालयाने वाचकांना पुस्तके, नियतकालिके व वृतपत्रे उपलब्ध करून देण्याबरोबर विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम योजले. वाचनालयाने ग्रंथप्रदर्शन, काष्ठशिल्प प्रदर्शन, नाना स्पर्धा, मनोरंजनाचे सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, गुणवंतांचे सत्कारसोहळे; तसेच, जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करून व वाचनालयाच्या वतीने इंटरनेट सेवा उपलब्ध करून देऊन ग्रामस्थांच्या मनामध्ये आस्थेचे स्थान निर्माण केले आहे.

वाचनालयाच्या वतीने ग्रंथालय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने ‘रणजितसिंह मोहिते-पाटील आदर्श ग्रंथालय’, ‘ग्रंथालय सेवक’, ‘ग्रंथालय कार्यकर्ता’ व ‘साहित्य पुरस्कार’ देण्यास २००४ पासून सुरुवात झाली आहे. हे पुरस्कार २००४ या वर्षी  जिल्हा पातळीवर देण्यात आले, ते २००५ या वर्षी पुणे विभागीय पातळीवर देण्यात आले, तर २००६ या वर्षापासून प्रत्येक वर्षी राज्यपातळीवर देण्यात येत आहेत. पुरस्कार वितरणाच्या सातत्यपूर्ण दिमाखदार सोहळ्यांमुळे अरणच्या ‘हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालया’ची ओळख राज्यभर निर्माण झाली आहे.

रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून वाचनालयाच्या इमारतीसाठी पाच लाख रुपयांचा निधी २००५-०६ मध्ये दिला. त्यामुळे वाचनालयाची दोन मजली आकर्षक इमारत उभी राहिली. ‘संत सावता माळी विद्यालया’च्या ‘हरित-सेना विभागा’च्या सहकार्याने इमारतीभोवती झाडे लावून व वाढवून वाचनालयाच्या वतीने ‘झाडे लावू, झाडे जगवू’ हा संदेश देण्यात आला.

वाचनालयाच्या वतीने तालुकास्तरीय वाचनालय कार्यशाळा घेण्यात येतात. ‘सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघा’ची अधिवेशनेही वाचनालयाने यशस्वीपणे घेतली आहेत. वाचनालय सार्वजनिक वाचनालयांचे मार्गदर्शन केंद्र म्हणूनच सर्वांना परिचित होत आहे. अनेक मान्यवरांनी वाचनालयाला भेटी दिल्या आहेत. C.B.I.चे उपसंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, I.A.S. रोहिणी भाजीभाकरे, I.A.S. रमेश घोलप, ग्रंथालय संचालक बी.आर. सनान्से, ऑलिम्पिक खेळाडू रिनाकुमारी आदींनी निमित्तानिमित्ताने वाचनालयाला भेट देऊन प्रशंसोद्गार काढले. I.A.S. रमेश घोलप यांच्या जडणघडणीत वाचनालयाचा मोलाचा वाटा आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या अनेक तरुणांना वाचनालयाचा चांगला फायदा झाला आहे.


चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी वाचनालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन केले, तर कवी विठ्ठल वाघ यांनी वाचनालयाच्या इमारतीमध्ये तीन दिवस मुक्काम ठोकून व इमारतीभोवती स्वहस्ते वृक्षारोपण करून वाचनालयास शुभेच्छा दिल्या. ग्रंथालय क्षेत्रात कार्य करणारे व करू इच्छिणारे कार्यकर्तेही तेथे येत असतात. केवळ अरणमधील नव्हे तर आसपासच्या गावांतील नागरिकदेखील वाचनालयाचे सभासद होतात.

वाचनालयास ‘सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघा’च्या वतीने देण्यात येणारा ‘सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील ‘ब’ वर्ग आदर्श ग्रंथालय’ पुरस्कार मिळाला आहे. हे ग्रंथालय आदर्श पद्धतीने चालवल्यामुळे ग्रंथालयाचे कार्यकर्ते हरिदास रणदिवे यांना ‘महाराष्ट्र शासना’चा ‘ग्रंथमित्र’ पुरस्कार मिळाला आहे. रणदिवे यांनी ‘सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघा’चे बिनविरोध अध्यक्ष दोन वेळा, ‘पुणे विभाग ग्रंथालय संघा’चे अध्यक्ष व ‘महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघा’चा संचालक अशी पदे भूषवली आहेत.

वाचनालयाची विविध ठिकाणी उपकेंद्रे सुरू करणे, वाचनालयाच्या वतीने ‘संत साहित्य अभ्यासकेंद्र’ व इंटरनेटने सुसज्ज ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र’ सुरू करणे असे वाचनालयाच्या संचालक मंडळाचे उद्दिष्ट आहे.

- ग्रंथमित्र हरिदास रणदिवे
९४२२४२८८५७, ९९२१५९२१०१
haridasranadive@gmail.com

लेखी अभिप्राय

उत्तम कार्य

Nitin Vilas Taktode16/08/2016

Thanks Think Maharashtra team.

ग्रंथमित्र हरि…16/08/2016

Increased our positive energy by knowing aran wachnalay we the youngsters are also want to develop such type of wachnaly in our village dubere.Now we have 1700 books in our Sant Tukaram sarwajanik wachnalay Dubere.

pravin wamane …16/08/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.