मध्ययुगीन महाराष्ट्रातील वतने - देशमुख-देशपांडे-देसाई

प्रतिनिधी 28/07/2016

मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख-देशपांडे-देसाई ही महत्त्वाची वतने होत. देश म्हणजे परगणा (हल्लीच्या लहान तालुक्याएवढा प्रदेश) होय. त्यावर अधिकार गाजवणारी ती विविध वतने होत.

देशमुख म्हणजे देशमुख्य होय. देशाच्या अंतर्गत व्यवस्थेत तो सर्वाधिकारी असे. देशमुखी वतनाचे हे महत्त्व लक्षात घेऊन रामचंद्रपंत अमात्यांनी त्यांच्या राजनितीवरील ग्रंथात त्याचे गुणगान केले आहे ते असे –

‘राज्यातील देशमुख आदिकरून यास वतनदार ही प्राकृत परिभाषा मात्र आहे. ते स्वल्पच परंतु स्वतंत्र देशनायकच आहेत. त्यांना साधारण गणावे असे नाही. ते लोक म्हणजे राज्याचे दायादच आहेत.’

देशमुखाला समाजात व राजदरबारातही मान असे. गावसभेत पाटील व परगण्याच्या सभेत देशमुख असेल तर तेथे जहागिरदार व इनामदार यांनाही पहिला मान न मिळता तो देशमुखांना दिला जाई.

शेतीच्या उत्पन्नात वाढ व्हावी, नवीन जमिनी लागवडीखाली आणाव्या आणि त्यासाठी शेतकऱ्यांना उत्तेजन म्हणून त्यांना खंड माफ करावा, अशासारखे अधिकारही देशमुखाला असत. पिकांची अणेवारी ठरवणे हेही त्याचे काम होय. परगण्यातील सर्व प्रकारचे तंटे-बखेडे मिटवणे, गावा-शिवारांतील बांधबंदिस्ती कायम राखणे, गावाच्या सीमा ठरवणे, पिकांवर-गुराढोरांवर आणि रयतेवर सरकारी किंवा सावकारी जुलूम होऊ न देणे, एखाद्याला इनाम किंवा मिरासीहक्क देणे इत्यादी सर्व कामे देशमुख हा आपल्या अधिकारात करत असे.

देशमुखांच्या पदरी बरेच सैन्य असे. शिवाय, देशपांडे, यार्दी, कुलकर्णी, खासनीस, पेशवे इत्यादी अधिकारीमंडळही असे. देशमुखाला त्याच्या स्वत:च्या नावाचे नाणे असणे ही एक गोष्ट सोडून प्रतिष्ठा, सत्ता, फौज, हाताखालचे अधिकारी हे सर्व सत्तावैभव देशमुखी या संस्थेला लाभलेले होते. देशमुखी ही वंशपरंपरागत चाले. सरदारांना व जहागिरदारांना ते सर्व वैभव असले, तरी त्यात शाश्वतपणा नसे. म्हणून देशमुख वतनदारांना ‘शाश्वत अधिकारी’ व इतरांना ‘अशाश्वत अधिकारी’ असे म्हटले जाई.

देशमुखांच्या स्वत:च्या अधिकारदर्शक मुद्रा असत. ते राजसत्तेच्या आश्रयाने काम करणारे असले, तरी ते राजसत्तेचे सेवक नसत. त्यांच्या शिक्क्यांवर बव्हंशी नांगर हे चिन्ह असे. ते त्यांच्या राज्यकारभारातील मुख्य कामाचे निदर्शक असावे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच रामचंद्रपंत अमात्य यांनी त्यांच्या आज्ञापत्रात देशमुखांना स्वतंत्र देशनायक म्हटले आहे.

देशपांडे हा देशमुखांच्या हाताखालील अधिकारी होय. ग्रामव्यवस्थेत जे स्थान कुलकर्ण्याला, तेच स्थान परगण्याच्या व्यवस्थेत देशपांड्याला असे. परगण्यातील जमाबंदीचे सर्व कागदपत्र देशपांड्याच्या स्वाधीन असत. त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कारकुनाला मोहरीर अशी संज्ञा होती. देशपांड्याला त्याच्या कामाच्या स्वरूपावरून देशकुळकर्णी असेही म्हणत असत. कोकणातील प्रभू आणि कर्नाटकातील देसाई यांच्या साहचर्यामुळे कोकणातील प्रभूंना प्रभूदेसाई अशी एकार्थक जोडसंज्ञा लाभली होती. पुढे ती सर्व आडनावे झाली.

देशमुख-देशपांडे हे अनेकदा त्यांच्याजवळील शिबंदीच्या जोरावर आसपासच्या मुलखात पुंडावा करत आणि मध्यवर्ती सत्तेच्या दौर्बल्याचा गैरफायदा घेऊन स्वातंत्र्य पुकारत असत. वतनदारांच्या या सर्वंकष सत्तेमुळे एकछत्री राज्य निर्माण करणे आणि सर्व प्रजेची निष्ठा एकाच मध्यवर्ती सत्तेशी निगडित बनवणे अशक्य आहे हे ध्यानी घेऊन शिवाजी महाराजांनी वतनदारांना काबूत आणण्याचा प्रयत्न केला.

देशमुख-देशपांडे हे सरकारी शेतसाऱ्यापैकी शेकडा दोन ते पाच टक्क्यांपर्यंतचा हिस्सा स्वत: घेत, त्याला रुसूम असे म्हणत. त्यांनाही बलुतेदारांप्रमाणेच जोडा, पासोडी, तूप, तेल, इत्यादी वस्तू थोड्या अधिक प्रमाणात मिळत असत. इंग्रजी आमदानीत ही सारी वतने नष्ट झाली. आता त्या वतनाची स्मृती केवळ आडनावांच्या रूपाने टिकून आहे.

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.