शहाबाजचे शंभर वर्षांचे ग्रंथालय

प्रतिनिधी 14/07/2016

रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील शहाबाज गावातील ‘सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय’ या संस्थेस ३ एप्रिल २०१६ रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. शंभर वर्षांची यशस्वी वाटचाल करणारे रायगड जिल्ह्यातील ते एकमेव वाचनालय!

शहाबाज हे रतनगडच्या पायथ्याशी वसलेले गाव, तेथील टेकडीच्या भोवताली वसलेले शहाबाज, कमळपाडा, धामणपाडा, चौकीचापाडा व घसवड हे पाच पाडे. गावात देवतांची अनेक मंदिरे आहेत, पण टेकडीच्या माथ्यावर दत्तमंदिर व मुरलीधराचे मंदिर आहे. त्या दत्तमंदिराचा म.सु. पाटील यांच्या ‘लांबा उगवे आगरी’ या आत्मचरित्रात हृद्य उल्लेख येतो. धरमतरचा पूल ओलांडला, की उजव्या बाजूस टेकडीवर दत्ताचे मंदिर दिसते व गाव आल्याची खूण पटते. आता, तो परिसर पार बदलून गेला आहे. शहाबाजला प्राथमिक शाळा १८६५ साली सुरू झाली! शाळेत सातवीचा वर्ग १८९९ साली आला. प्राथमिक शाळा पूर्ण झाली. अनेक विद्यार्थ्यांनी १९०१ पासून सातवीच्या प्रमाणपत्र परीक्षेत जिल्ह्यात प्रथम श्रेणीत पास होण्याचा मान मिळवला. शहाबाज गाव शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र बनले. सातवी पास झालेल्यांना प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळण्याची सोय असल्यामुळे शहाबाज गावासजिल्ह्याला प्राथमिक शिक्षक पुरवणारा गाव अशी प्रसिद्धी मिळाली.

आगरी समाज बांधवांच्या उन्नतीसाठी परिषद १९०६ साली स्थापन झाली. त्यावेळी शहाबाज गावचे व्यापारी विठोबाशेठ पाटील व हरी जोमा पाटील हे उपस्थित होते. परिषदेने समाजातील वाईट सवयी, पंरपरा, रुढी, चालीरीती बंद करण्यासाठी समाजात शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्याचा ठराव केला; समाजातील पुढाऱ्यांनी ते कार्य हाती घ्यावे असे आवाहनही केले. त्यातून प्रेरणा घेऊन विठोबाशेठ पाटील व हरी जोमा पाटील यांनी त्यांच्या गावात व पंचक्रोशीत समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेतले.

कमळ विठू पाटील या निर्भीड व्यक्तीने केसरी, सुधारक, संदेश अशी वर्तमानपत्रे गावात आणून त्यांचे सामुदायिक वाचन भैरवनाथाच्या मंदिरात सुरू केले. लोकांची आवड व उत्साह पाहून, हरी जोमा पाटील यांनी ‘विद्यार्थी मंडळा’ची स्थापना केली. त्या मंडळात चाळीस-पन्नास विद्यार्थी सामील झाले. गावातील सुशिक्षित लोकांनी त्या वाचन चळवळीला मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. त्या लोकांनी गावातील शिक्षणप्रेमी, दानशूर, उदार नेत्यांच्या सहकार्याने ३ एप्रिल १९१६ रोजी विठोबा राघो पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काशी विश्वेश्वर मंदिराच्या माडीवर ‘सार्वजनिक मोफत वाचनालया’ची मुहूर्तमेढ रोवली.

लोकवर्गणी, देणगी मिळवण्यासाठी सुशिक्षित ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले. मात्र बहुसंख्य शेतमजुरांची परिस्थिती गरिबीची. त्यामुळे पर्याप्त निधी उपलब्ध होऊ शकला नाही. संस्थेचे अध्यक्ष विठोबाशेठ पाटील व सचिव यांचा ‘आगरी ज्ञाती परिषदे’च्या सभांच्या निमित्ताने मुंबई-ठाण्याच्या सुखवस्तू लोकांशी ओळखी होत्या. त्यांनी त्या मंडळींकडून देणगीरूपाने मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. मुंबईचे आगरी समाजाचे कंत्राटदार मंगळराव रामजी म्हात्रे यांनी संस्थेला भरीव देणगी दिली. म्हणूनच व्यवस्थापनाने वाचनालयाला ‘मंगळराम मोफत वाचनालय’ हे नाव दिले. संस्थेने ‘महाराष्ट्र विश्वकोश – (खंड एकवीस)’ हा पहिल्या वर्षीच विकत घेतला. त्याची तशी नोंद त्या खंडाच्या पहिल्या पानावर आहे.

नारायण जाखू भगत व तुकाराम जाखू भगत या बंधूंनी स्वखर्चाने वाचनालयाच्या इमारतीचा पाया १९२८ मध्ये बांधून दिला. ग्रामस्थांकडून लोकवर्गणी, देणगी जमा केली. त्या कामी ‘विद्यार्थी मंडळा’ने पुढाकार घेतला. प्रसंगी श्रमदान करून इमारत पूर्ण केली. इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कै. बाळासाहेब खेर यांच्या हस्ते झाले. वाचनालयासाठी स्वतंत्र मालकीची इमारत असलेले जिल्ह्यांतील ते खेडेगावातील एकमेव वाचनालय असावे.

- शशिकांत गोपाळ पाटील

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.