गौळणी-विरहिणी - मराठी संतसाहित्‍यप्रकार

प्रतिनिधी 18/06/2016

‘गौळणी’, ‘विरहिणी’ हा मराठी संतवाङ्मयातील महत्त्वाचा प्रकार आहे. वारकरी संप्रदायातील साहित्य ओवी आणि अभंग या छंदांतून प्रामुख्याने लिहिण्यात आले आहे. उत्स्फूर्त रचनेला त्या माध्यमाचा चांगला उपयोग होतो. शिवाय पाठांतर सुलभताही आहे. वारकरी संप्रदायातील बरेचसे वाङ्मय स्फुट स्वरूपात आहे. त्यात बालक्रीडा, गाऱ्हाणी, काला, अभंग, गौळण, जोहार, भारुडे, आरत्या असे विविध प्रकार येतात. त्यांतून विषयानुरूप आणि प्रसंगानुरूप भाव-भावना व्यक्त होतात. तरी परमेश्वर प्राप्तीच्या ओढीने निर्माण झालेली आर्तता करूण रसातून प्रत्ययाला येते. त्यांत जिव्हाळा, प्रेम यांतून भक्तिरस प्रकट होतो. या भावभावना व्यक्त करण्यासाठी संतांनी गौळणी, विरहिणी यांचा आधार घेतला आहे.

संतांनी प्रसंगोपात माता-बालक, पती-पत्नी, कधी प्रियकर-प्रेयसी अशा वेगवेगळ्या भूमिका स्वीकारलेल्या दिसतात. ज्ञानदेव महाराज तसेच नामदेव, एकनाथांसह संत तुकाराम, कबीर, निळोबा यांसारख्या श्रेष्ठ अनुभवी संतांनी विरहिणी-गौळणी-कृष्णकथा या वस्तुनिष्ठ भूमिकेतून सांगितल्या असल्या तरी त्यांचे खरे माहात्म्य त्यांच्या आत्मानुभूतीच्या उत्स्फूर्त उद्गारात आहे. ऐक्याचे त्यांना आलेले गूढ अनुभव व्यक्त करण्यासाठी त्यांनी निरनिराळ्या भूमिका स्वीकारलेल्या दिसतात.

संतवाङ्मयाच्या भव्य प्रासादात गौळणीवाङ्ममय हे एक शृंगारलेले दालन आहे. त्‍यात शृंगाराच्या नाना परी आहेत. प्रणय, क्रोध, विलास, विरह, सुख, वेदना असे सारे काही आहे. प्रेमभावनेने रतिरूप घेतले, की तोच शृंगाराचा स्थायी भाव बनतो. मराठी संतांनी आळवलेला, खेळवलेला जो गोपी कृष्णविषयक शृंगार तो भक्तिरसाचाच एक पर्याय आहे.  संतांनी त्यांना स्वत:ला गौळणी-विरहिणीच्या रूपात पाहिले. त्या भूमिकेतून भगवंत प्रेम दर्शवणाऱ्या गौळणी-विरहिणी लिहिल्या.

नंदकुमार श्रीकृष्ण हा मदनाहून सुंदर होता. गोकुळातल्या गोपी त्याच्या सौंदर्याला व माधुर्याला भुलल्या व त्याच्यावर जीवेभावे आसक्त झाल्या. अभिलाषा व आसक्ती बाळगून त्या श्रीहरीजवळ आल्या. हे खरे, पण श्रीहरीने दर्शन, स्पर्शन, संभाषण व रासरस या मधुर साधनांनी त्यांचे विकार जाळून टाकले व त्यांचा कामच निष्काम करून टाकला. ज्ञानेश्वरांनी एवढा सगळा अर्थ पुढील एकाच ओवीत सांगून टाकला आहे.

पाहें पां वालभाचेनि व्याजे | तिया वज्रांगनांची निजे!
मज मीनलिया काय माझे| स्वरूप नव्हती?||

कृष्ण, यशोदा, गोपी, गोप आणि गोकुळ – वृंदावन यांची वर्णने या गौळणीवाङ्मयात आहेत. यशोदेचे वात्सल्य, राधेचा अनुराग, गोपींचे अत्युत्कट प्रेम, गोपगड्यांची कृष्णनिष्ठा, बालकृष्णाचे अलौकिक पराक्रम, त्याच्या खोड्या आणि गोपींना रमविण्याचे त्याचे चातुर्य, इ. गुण विशेषांनी ते वाङ्मय मधुररसाचा उत्कृष्ट परिपाक ठरते. ते विविध रंगच्छटांनी नटलेले आहे. रांगणारा, दुडुदुडू धावणारा, गौळणींच्या घरी दहीदूध चोरणारा, गोपींच्या वात्रट खोड्या करणारा, मुरली वाजवणारा, गाई वळवणारा, रासक्रीडा करणारा अशी कृष्णाची नयनमनोहर रूपे या वाङ्मयात पाहायला मिळतात. आक्रस्ताळी, कांगावखोर, साधीभोळी, रमणी, मानिनी, कामिनी अशी गोपींचीही नानाविध स्वरूपे यात दृष्टीस पडतात.

नामदेवाची या विषयावरची पद्यरचना सर्वांपेक्षा प्रसादपूर्ण आहे. तुकोबाच्या पदांतून दिसणा-या गौळणी चतुर, ठसकेबाज व प्रगल्भ दिसतात. एकनाथांच्या गौळणी सकृद्दर्शनी लौकिक आणि कामप्रेरीत दिसल्या, तरी त्यांच्या अंतरंगात परमार्थ भरलेला दिसतो.

ज्ञानेश्वरांच्या विराण्या गहन अर्थाने भरलेल्या असतात. निळोबांच्या गौळणींना तर मराठी भाषेतील उपनिषेदच समजतात.

बालक्रीडा म्हणजे कृष्णाने गोकुळात बालरूपाने दाखविलेली मनोहर लीला होय. यशोदा दधिमंथन करीत असता कुठून तरी कृष्ण धावत येतो व तिची रवी धरून ठेवतो. त्यावेळी तिथे आलेल्या रधेला यशोदा कृष्णाचा खट्याळपणा पुढील पद्यात सांगते.

करूं वेईना मज दूध तूप बाई
मथिंता दधि तो धरी रवी ठायीं ठायीं
हट्टे हा कदापि नुमजें समजाविल्यास काई
समजावुनि यांते तुझ्या घरास नेंई नेंई
राधे हा मुकुंद कडिये उचलोनि घेई घेई
रडताना राहिंना करूं यास गत काई काई ||

कृष्णाच्या बालक्रीडेतूनच गा-हाणी हा काव्यप्रकार उगम पावला आहे. कृष्ण आणि त्यांचे सवंगडी यांच्या खोड्यांनी गौळणी हैराण हौऊन जातात. कृष्णाला पकडून शासन करण्याचे त्यांचे बेत विफल ठरतात. मग त्या यशोदेकडे दाद मागण्यास येतात व तिला कृष्णाची गा-हाणी सांगतात. एकनाथांनी अशा गौळणींचे एक गा-हाणे पुढील प्रमाणे वर्णिले आहे.

गौळणी सांगति गा-हाणी, रात्री आला चक्रपाणी |
खाउनि दहि दूध लोणी, फोडिलीं अवघीं विरजणीं|
हा गे बाई कोणासि आवरेना  || 1 ||
यशोदे बाळ तुझा तान्हा, कोठवरी सोसूं मी धिंगाणा || धृ ||
दुसरी आली धावत, याने बाई काय केली मात |
मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामधी हात घालित |
धरूं जाता सापडेना || 2 ||
तिसरी आलि धावुनी, म्हणे गे बाई काय केली करणी |
पतिची दाढी माझी वेणी, दोहोंसी गांठ देउनी|
गांठ बाई कोणा सुटेना || 3||
मिळोनी अवघ्या गौळणी, येती नंदाच्या अंगणीं |
जातो आम्ही गोकुळ सोडुनि, आमुच्या सुना घेउनी |
हे बाई आम्हांसि पहावेना || 4 ||
ऐशी ऐकतां गा-हाणीं, यशोदे – नयनीं आले पाणीं ’कृष्णा | खोड दे टाकुनी’, एका जनार्दनीं चरणीं
प्रेम तया आवरेना || 5 ||

कृष्ण थोडा मोठा होताच नंद त्याला गायी राखण्यासाठी रानात पाठवितो. त्याचा समागमे गोकुळातले अन्य गोपबालकही असतात. कृष्ण सवंगड्यासंगे गायीवासरे चारताना मुरली वाजून स्वत:ची आणि इतरांची करमणूक करतो. त्या मुरलीने स्थिरचराला वेड लागते. सारा आसमंत स्वरांनी भरून धुंद होतो. मुरलीचा स्वर ऐकून गोकुळातल्या गौळणींनाही कृष्णाचा वेध लागतो.  त्या अस्वस्थ होतात. त्यांच्या हातून गृह कार्यात प्रमाद घडू लागलात. मग त्या एकमेकींना  हाका मारून कृष्ण सहवासासाठी वनात जायला निघतात.  अशा प्रसंगी एका गौळणीची काय अवस्था होते, ते एकनाथांनी पुढील पद्यात वर्णिले आहे -

नंदनंदन मुरलीवाला, याच्या मुरलीचा वेध लागला ||
प्रपंच धंदा नाठवे काही, मुरलीचा नाव भरला हृदयी ||
पतिसुताचा विसर पडला, याच्या मुरलीचा छंद लागला ||
स्थावर जंगम विसरूनि गेले, भेदभाव हरपला ||
समाधि उन्मनी तुच्छ वाटती,
मुरली नाद ऐकता मना विश्रांती ||
एका जनार्दनीं मुरलीचा नाव, ऐकता होती त्या सदगद ||

दुपारच्या वेळी कृष्णासह सगळे गोप आपापल्या शिदो-या सोडून दहीभात व इतर खाद्यपदार्थ यांचा काला करतात. श्रीकृष्ण तो काला सगळ्यांना वाटून देतो आणि मग सर्वजण आनंदाने भोजन करतात. कित्येकदा सवंगडी आपल्या पानातला घास कृष्णांच्या मुखी घालतात. काल्याचे हे सुख भोगण्यासाठी गौळणी एकमेकींना बोलावून थव्याथव्याने यमुनेच्या वाळवंटात जमतात. हा काला आणि गोपाळांचे विविध खेळ यांच्याविषयी तुकोबांनी एक पद लिहिले आहे, ते असे –

चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी
मांडियेला काला, भवती गोपाळांची वाटी ||
आनंदे कवळ देती एका मुखी एक
न म्हणती सान थोर अवधीं सकळिक ||
हमामा हुंबरी पावा वाजविती मोहरी
घेतलासे फेर माजी घालुनियां हरी ||
लुब्धल्या नारी नर, अवघ्या पशुपती
विसरली देहभाव शंका नाही चित्ती || 
पुष्पांचा वरूषाव जाली आरतियांची दाटी
तुळशी गुंफोनिया माळा घालिति कंठी ||
यादवांचा राणा गोपी मनोहर कान्हा
तुका म्हणे सुख वाटे देखोनिया मना ||

ज्ञानेश्वरादी संतांच्या अनेक काव्यांपैकी विराणी नावाचा एक भावमधुर काव्यप्रकार आहे. विराणी म्हणजे विरहिणी, प्रियकराच्या दर्शनसमागमसुखाला पारखी झालेली, पण त्यासाठी जीव झुरविणारी प्रेमळ प्रिया. श्रीकृष्ण गोकुळातून मथुरेला निघून गेल्यावर सर्व गोपी विरहिणी बनतात. त्यांची अवस्था शोचनीय होते. त्यांना कशातच रस वाटेनासा होतो. त्यांना श्रीकृष्णाचा निदिध्यास  लागतो. त्यांतला काही गौळणी विरव्यथेने उन्मत्त बनतात. तर काही ‘मला कृष्ण भेटवा हो’ म्हणून मैत्रिणींची आळवळी करतात.

गोपींच्या प्रेमाची अलौकिकता पाहून संतांच्या प्रतिभेला उमाळा आला आणि त्यांनी ही गौळणींची पदे रचली. गौळणीसाठी वाग्विलास करताना सकल संतांना धन्यताच वाटली आहे.

('भारतीय संस्‍कृतिकोश - खंड ३' मधून साभार. शोभा घोलप, पुणे, यांनी 'आदिमाता' मासिकात लिहिलेला लेख आधारभूत.)

लेखी अभिप्राय

छान लेख

Sujit Hawale 18/06/2016

एवढ्या सर्व भारुडे गवलनओव्या एकत्र मिळाले खुप छान

मीनल सागर रंगदळ17/02/2017

For school project.

Gopal C. Gadivaddar02/07/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.