कंधारचे बुधाईचे ठाणे


बुधाई देवीचे ठाणे बोड्डावार या विणकर समाजाच्या घराण्यात बहाद्दरपुरा, तालुका कंधार येथे आहे. रामजी बोड्डावार हे बुधाई देवीचे मानकरी पन्नासच्या दशकात होते. बुधाईची समाधी गावातील महाकाली मंदिराजवळ बांधण्यात आली आहे. बुधाई ही मूळची बोधन. ती निजामाबाद - (आंध्र) येथील असून तेथून ती बहाद्दरपुरा येथे आली. तिने तेथे समाजसेवा केली. तिने गावकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली. बुधाईचा सत्कार किल्ल्यातील राजानेही केला होता व तिला साडी-चोळी ‘भेट’ देऊन तिचे दर्शन घेतले होते.

बुधाईच्या पूजेच्या दिवशी बुधाईच्या आडापासून गावात मिरवणूक वाजतगाजत निघते. मिरवणुकीत देवीचा बकराही चालवत नेतात. बक-यास शेंदूर व हळद लावलेली असते. मिरवणुकीत मानक-यांच्या घरच्या मायमाऊली कडुनिंबाचे ढाळे हाती घेऊन, जमिनीवर लोटांगण व देवीला दंडवत घालत देवीपर्यंत जातात. बोड्डावार कुटुंबीय आठ दिवस आधी गावात जोगवा मागून ज्वारीचे पीठ व तांदूळ जमा करतात. ते तसा जोगवा सर्वप्रथम मातंगाच्या घरी जाऊन मागतात हे विशेष आहे.

मिरवणुकीत पोतराज नाचत असतो. तो नाचता-नाचता दातांनी कडाकडा लिंबे फोडत असतो. हातात लिंबाच्या ढाळी असतात आणि चाबूक व कोरडाही असतो. अंगावर साज चढवलेला असतो. चोळीचे खण कमरेला खोवलेले असतात. ओढणी असते व पायात घुंगरेही बांधलेले असतात. कपाळावर हळदीने मळवट भरलेला असतो. लांब केस मोकळे सोडलेले असतात. पूर्वी पोतराज पुजेनंतर शिंदी, ताडी प्यायचे, पण आता ते नशा करतातच असे नाही. नाचतात, अंगावर कोरडा मारून घेतात व “कडाकडा” असा देवीचा दर्दभरा आवाज गावभर घुमतो. पोतराज त्याच्या जिभेवर कापूर जाळतो. त्यांनी लांब केस राखणे आवश्यक आहे. ते दाढी घरीच हातानीच करतात. त्यांची दरवर्षी चांद्याच्या (चंद्रपूरच्या) ‘धुरपता मायी’ची वारी चुकत नाही. लिंबे खाल्ल्यावर पोतराजाच्या अंगात येते व तो बेभान नाचतो.

मिरवणूक गावातील देवीजवळ आल्यावर तेथे बोड्डावार घराण्यातर्फे देवीची पूजा होते. तसेच बुधाईच्या समाधीचीही पूजा त्यांच्यामार्फत केली जाते. बकऱ्याचीही पूजा बांधली जाते. नंतर बकरा देवीपुढे कापतात. बोड्डावार यांच्यातर्फे त्याच बकऱ्याचे मांस शिजवून मटण, भाकरी व भात सर्वांस “गावजेवण” दिले जाते. सध्याचे पुजारी मारोती मास्तर बोड्डावार यांची भेट घेतली तेव्हा ते म्हणाले, की “आता आम्हाला गावजेवण देण्यास परवडत नाही. म्हणून आम्ही बकरा कापण्याची पद्धत बंद करणार आहोत, पण बुधाईची पूजा मात्र चालू राहणार आहे.”

बोड्डावार यांच्या घराला लागूनच बुधाईचा आड आहे. त्या आडाचे पाणी सहसा कधी आटत नाही. पाणी गोड असून बहाद्दरपुऱ्यातील गावकरी ते पोहऱ्याने भरून घरी नेतात.

- राजा गायंगी

Last Updated On - 22nd Jan 2017

लेखी अभिप्राय

माहिती चांगली आहे, पण बुधाईची समाधी कशी?

सुभाष कि देशपांडे 09/06/2016

नमस्कार सर,
आपण आमच्या मंकाळि आईची माहिती सर्वदुर पोहचवली याबद्दल आमचा बोड्डावार परिवार आभारी आहे. मला आपणास सांगावेसे वाटते की आपल्या लेखा मधे दुरुस्त करण्याची गरज आहे. ती अशी की सध्याचे पुजारी हे मारोती बोड्डावार नसून संभाजी पांडूरंग बोड्डावार हे आहेत. तसेच आम्ही बकरा कापन्याची पद्धत बंद करणार नाही. आपण हे बदल करुण पुन्हा प्रकाशित करावे ही नम्र विनंती.
मो :9096975897
ईमेल : nboddawar@gmail.com

निलेश संभाजी ब…30/07/2016

सर मला कंधार तालुक्यातील आणखी काही ग्रामदैवता विषयी माहीती हवी आहे माझे संशोधन कार्य चालू आहे कृपया मला कळवावे
मो नं ८००७८००६८०

गोविंद काकांडीकर 27/12/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.