गोंदण : आदिम कलेचा वारसा


मानवी त्वचेवरील ‘गोंदण’. ‘गोंदण’ हा आदिवासींचा सांस्कृतिक वारसा आहे. त्यातून सांस्कृतिक ओळख पटते. शिवाय ते सौंदर्याचे लक्षण आहे, ते औषध आहे. ते मनोसामाजिक, सामाजिक-सांस्कृतिक संकल्पना या दृष्टीने संवाद साधण्याचे माध्यमही आहे - ती आदिवासींची संस्कृती अंकित करणारी ‘व्हिज्युअल भाषा’ आहे.

ज्या काळात कला किंवा कलाकार ही संकल्पना अस्तित्वात नव्हती, त्या काळात आदिवासी लोकांनी कलेचा व सौंदर्याचा उत्तम नमुना म्हणून गोंदणकलेची जगाला देणगी दिली!

कृत्रिम गोंदण अश्मयुगापासून चालत आले आहे. इतिहासपूर्व काळातील आदिवासी लोक गोंदवून घेत होते असा पुरातत्वीय दाखला आहे. मानवाने भूताखेतांपासून स्वत:चे रक्षण व्हावे म्हणून कपाळावर, हातावर व शरीरावर सांकेतिक गोंदवून घेण्याचा हा प्रघात पाडला. त्यानंतर त्यास सौंदर्यमूल्य प्राप्त होऊन गोंदण ही कला रूढ झाली असावी. त्वचा हा अशा तऱ्हेने कलेचा पहिला कॅनव्हास बनला. टोकदार वस्तूने त्वचेवर टोचणे हा त्यातील पहिला आघात.‘गोंदण’ करताना झालेली जखम भरून निघण्यासाठी राखेचा वापर केला जाई. आदिम मानव अग्नीमध्ये काठ जाळून त्याद्वारे कातडी कट करत असे व जखमेवर पदार्थ लावून ‘गोंदण चिन्ह’ तयार करत असे. आदिम मानवाने गोंदून घेण्याची प्रक्रिया करत असताना अग्नीपासून होणारी वेदना सहन केली, कारण त्यांचा पवित्र जीवनावर विश्वास होता. गोंदण करताना रक्तस्राव होई. त्याने रक्त देणे ही क्रिया निसर्गदेवतांशी जोडली.

गोंदण हे समाजसमुहाला एकात्म बांधून ठेवण्याचेही काम करत होते. गोंदणात धार्मिक जीवन, संस्कृती, कुळ, रुढी, परंपरा, सामाजिक मूल्य पाहण्यास मिळते. त्वचेवरील ‘गोंदण’ हे आदिवासी जमातीमध्ये अभिमानाचे प्रभावी साधन बनून गेले आहे. ती परंपरा आहे. देव, आत्मा यांचे चिन्ह असलेले ‘गोंदण’ आदिवासी जमातीच्या एकतेचे व वंशावळीचे संरक्षण करण्याचे प्रतीक होय.

गोंदण गोंदत असताना ‘प्राण्यांचे चिन्ह’ हे प्राणी हल्ल्यापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठीचे प्रतीक होते. मृत्यूनंतर आत्म्यापासून संरक्षण करण्यासाठी चित्रे रेखाटण्याची पद्धत होती. त्यातून देवतांच्या नावाने गोंदवून घेणे हा उद्देश घडत गेला. आदिम मानव टोळी टोळीने राहत असे. टोळीच्या सरदाराचा मृत्यू झाल्यास त्यामुळे (टोळीचा सरदार) टोळीवर वाईट दिवस ओढवले अशी त्यांची भावना होई. त्यापासून सुटका होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे चिन्हे गोंदवून घेण्याची प्रथा पडली.

दहन करून गोंदणे ही प्राचीन इतिहासातील ‘दहन कला’ आहे. ‘आत्मा’ मानवी शरिरात वास करत असतो असा प्राचीन लोकांचा समज होता. आधुनिक काळातही शरीर व आत्मा यासंबंधीचा गूढवादी विश्वास कायम आहे. वाईट गुण आत्म्यात वास करतात, म्हणून त्याला त्यापासून परावृत्त करण्यासाठी ‘गोंदण’ सुरू झाले असावे असे एक म्हणणे आहे.

आदिवासी गोंदताना ज्या चिन्हाचा वापर करत त्यास ‘कुलचिन्ह’ म्हणत. सामान्यत: कुलचिन्ह म्हणून प्राण्यांचा वापर होत असे. त्यामध्ये अस्वल, बेडूक, साप, फुलपाखरे या सारख्या प्राणी-पक्ष्यांचा व किटकांचा वापर केला जात होता. आध्यात्मिक विचार दर्शवण्यासाठी मार्गदर्शक म्हणून कुलचिन्ह गोंदवून घेतले जाई. लढाईच्या किंवा एखाद्या हल्ल्याच्या दरम्यान शत्रूपासून मित्रांना ओळखण्यासाठी त्या चिन्हांचा वापर होत असे. मित्राचा मृत्यू झाल्यास त्या मित्राशी स्वर्गात चांगले वर्तन करता येते असाही समज होता. नातेसंबंध असलेली व्यक्ती कोठेही मृत्यू पावली तरी ती कुलचिन्हामुळे ओळखता येत असे.

मुलांनी पौगंडावस्थेत गोंदवून घेण्याची प्रथा होती. मुलगा गोंदून घेत असताना वेदना सहन करत नसेल तर तो युद्धासाठी निरुपयोगी आहे असे समजले जाई. तसेच, मुलगी वेदना सहन करत असेल तर बाळंतपणात तिला त्रास होणार नाही अशी समजूत असे. ज्यांना गोंदून घेताना वेदना सहन होत नाहीत त्यांना कमकुवत समजले जाई.

‘गोंदण’ हे आदिवासी स्त्रियांमध्ये प्रिय आभूषण आहे. त्यांना त्यांचे जीवन ‘गोंदणा’विना अपूर्ण वाटे. ‘गोंदणा’ने त्यांचे सौंदर्य खुलून दिसे. जी युवती गोंदवत नाही. तिला आदिवासी समाजात लज्जित व्हावे लागे. तरुणींचा त्यांनी शरीरावर गोंदवून घेतल्यामुळे युवकाची (प्रेमी) नजर त्यांच्यावर असते असा विश्वास असे. गोटुलातील प्रेमिका कपाळ, छाती, मनगट, दंड, हात, हाताची व पायाची बोटे इत्यादी भागांवर गोंदवून घेई.

हलबी/हलबा जमातीत सुद्धा गोंदण्याची प्रथा प्रचलित आहे. लग्न व इतर समारंभ यांच्या वेळी गोंदवून घेण्यास विशेष महत्त्व आहे. ते हलबी जमातीचे वैशिष्ट्य आहे. लग्नानंतर मुलगी आईवडिलांकडून सासरी जाण्यापूर्वी तिचे अंग मुद्दाम गोंदवून घेतले जाते. मुलगी आईवडिलांना विसरू नये हा त्यामागील उद्देश असतो. हलबी/हलबा जमातीतील स्त्रियांच्या हातावर, गालावर, चेहऱ्यावर व कपाळावर गोंदलेले असते.

‘गोंड’, ‘माडिया’ जमातींतील स्त्रियाही अंगावर गोंदवून घेणे हे मानाचे लक्षण मानतात. त्यांचे शरीर अधिक आकर्षक दिसावे असा त्यांचा त्यामागे दृष्टिकोन आहे. गोंदणात ठिपके, लहान उभे-आडवे पट्टे, झाडे, प्राणी-पक्षी यांच्या नक्षी असतात. प्रत्यक्ष गोंदताना ‘घेलवा तेला’चा व गोंदल्यानंतर रंग उठून दिसण्यासाठी कोळशाचा वापर केला जातो. गोंदण्यासाठी ‘सायटस’च्या काट्यांचा वापर केला जातो.

ठाकूर स्त्रियांबरोबर पुरुषही गोंदवून घेतात. मुलगी आठ ते बारा वर्षांची असताना गोंदवून घेतात, तर काही ठिकाणी उशिरा गोंदवून घेण्याची प्रथा आहे. कंवर जमातीतील स्त्रिया छातीवर व पायांवर गोंदवून घेतात. एखादी स्त्री कंवर आहे की गोंड हे तिच्या गोंदणावरून ओळखता येते.

छत्‍तीसगढ जिल्‍ह्यातील रामनामी समाज सबंध शरिरावर रामनाम गोंदवून घेतो. त्या समाजात ती परंपरा शंभर वर्षांपासून चालत आली आहे. तो समाज मंदिरात जात नाही. अंगभर गोंदवलेले रामनाम हीच त्‍यांची पूजा आहे. त्‍या समाजात बालक जन्‍माला येताच त्‍याच्‍या छातीवर रामनाम गोंदवले जाते. त्‍या समाजात ज्‍या व्‍यक्‍तीच्‍या शरीराच्या कुठल्याही भागावर रामनाम गोंदवले असेल तर त्याला रामनामी असं संबोधले जाते. कपाळावर गोंदवले असेल तर त्याला शिरोमणी, संपूर्ण कपाळभर गोंदवलेल्या व्‍यक्‍तीला सर्वांग रामनामी तर शरीरभर गोंदवलेल्यांना नखशिख रामनामी म्हटले जाते.

गोंदण (टॅटू) नव्या जमान्यात सर्वप्रिय झाले आहे. फक्‍त गोंदवून घेण्‍यासाठीच नव्‍हे तर टॅटू कलाकार होण्‍याकडेही युवकांचा वाढता कल आहे. सनी भानुशाली यांच्‍यासारखे टॅटू कलाकार जागतिक पातळीवर प्रसिद्धीस पावले आहेत. आदिवासी जमातींमधील वाघ, ड्रॅगन यांसारख्या गोंदणामधील डिझाईन्सची युवावर्गात चलती आहे. गुगलवर ‘Indian Tattoos’ या सदराखाली आदिवासी गोंदणामधील प्रतीकात्मक चिन्हे व काळ्या रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येतो. अनेक लोक भारतीय गोंदण मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांना आदिवासी जमातीतील सुंदर व शक्तिशाली ‘गोंदण डिझाईन्स’ हवी असतात. काही तरुण-तरुणी त्यांच्या पूर्वजांच्या शोधात असतात. ते भारतीय आदिम वंशाचे भाग होते याचा त्यांना अभिमान वाटतो.

- रामकुमार प्रधान

(‘गोंदण’त्रैमासिकावरून पुन:प्रसिद्ध)

लेखी अभिप्राय

एका वेगळ्या विषयावरील छान माहिती वाचायला मिळाली. पूर्वी असे म्हणत की स्वर्गात गेल्यावर बाईला असे विचारले जाई की, "गोंदून आलीस की चोंदून आलीस?"... जर गोंदून आली असेल तरच तिला स्वर्गात प्रवेश मिळे. आपले "अहेवपण" अक्षय लाभावे म्हणून स्त्रिया कुंकवाच्या जागी मोठे टिंब गोंदवून घेत असत. असे गोंदण नवऱ्याच्या पश्चातही,आयुष्यभर दिसत राही.

मकरंद करंदीकर 22/05/2016

ya vishyacha symbolismchya angane vichar karavo.

Dr. Sopan shende02/10/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.